01youthनेहमीच्या निळ्या आणि काळ्या डेनिम्स वगळता मुलांसाठीसुद्धा वेगवेगळ्या रंगांच्या डेनिम्स आणि ट्राऊझर्स सध्या बाजारात पाहायला मिळतात, पण त्या घातल्यावर मात्र खूप रंगीत ड्रेसिंग केल्यासारखं वाटतं आणि आपला प्रयोग फसेल असं वाटतं. हे टाळण्यासाठी या डेनिम्स नक्की कशा घालाव्यात?
– सुहास जगताप, २१

मुलांसाठी नेहमीच्या ठरावीक रंगांच्या बाहेरचे ही खरं तर एक मोठी परीक्षा असते. त्यामुळे सुहास, तुझी चिंता नक्कीच समजू शकते. खरं सांगायचं तर, मुलीही रंगांच्या बाबतीत प्रयोग करायला घाबरतातच. अर्थात, त्यांचेही काही ठरावीक रंग ठरलेले असतात, त्यापलीकडे फारशा त्या जात नाहीत. त्यामुळे मुलांनी ही फक्त आपलीच समस्या आहे असं समजायची अजिबात गरज नाही. मुलांना वेगवेगळ्या रंगांचे टी-शर्ट्स, शर्ट्स घालायला काहीच हरकत नसते, पण प्रश्न जेव्हा पँटचा येतो, तेव्हा निळा, काळा, राखाडी, ब्राऊन असे ठरलेले रंगच त्यांना पसंत पडतात. पण तुला त्यापलीकडे जायचं असेल, तर सुरुवातीला काही गडद रंग वापरून पाहा. म्हणजे डार्क ब्राऊन, चॉकलेट शेड, मरून, मस्टड यलो, मेहंदी ग्रीन, नेव्ही ह्य शेड्स गडद असल्याने वापरायला सोयीचे असतात. एकदा तुझा आत्मविश्वास आला की थोडय़ा खालच्या पट्टीतील रंग वापरायला हरकत नाही. कलर डेनिम्स किंवा ट्राऊझर वापरताना सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे त्याच्यासोबत अतिरंगांचा भडिमार करू नये. सफेद शर्ट कधीही उत्तम. ते कोणत्याही रंगाच्या डेनिमसोबत घालता येतात. शक्यतो राखाडी, बेज, बिस्कीट कलर असे अर्दी टोन्स या डेनिम्ससोबत जुळून येतात. चेक्स कधीही उत्तम. प्रिंट्स वापरताना काळजी घे. पेस्टल शेड्सच्या पँटसोबत पेस्टल शेड टी-शर्ट वापरता येतात. जॅकेट मात्र डार्क शेडच हवं.

आपल्या बॉडीटाइपप्रमाणे डेनिम कशी निवडावी? कित्येकदा डेनिम दुकानात ट्राय करताना चांगली दिसते, पण प्रत्यक्षात वापरताना आपल्याला सूट होत नाही. विशेषत: माझी उंची कमी आहे आणि पाय जाडे आहेत. त्यामुळे हा प्रश्न मला डेनिम निवडताना पडतोच.
– सुप्रिया वारंग, २२

दुकानात आपण डेनिम निवडताना पहिल्यांदा तिचा रंग, मटेरिअल याकडे जास्त लक्ष देतो. त्यात ती लेटेस्ट स्टाईलची असेल तर तिच्या फिटकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं; पण सुप्रिया, खरं सांगायचं झालं तर डेनिमचा फिट हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे प्रत्येकानेच डेनिम निवडताना त्याच्या फिटकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझी उंची कमी आहे आणि तुझे पाय जाडे आहेत. म्हणजे तू पेअर शेपची आहेस. तुला बूटकट असलेल्या डेनिम्स वापरून पाहायला हरकत नाही. या डेनिम्सना खालच्या बाजूने थोडासा फ्लेअर असतो, अर्थात बेल बॉटम डेनिम्सइतका नाही, पण त्यामुळे मांडय़ांना असलेला जाडेपणा काहीसा लपला जातो. यामध्येही डार्क शेडच्या आणि हाय किंवा मध्यम वेस्टच्या डेनिम्स निवडणे उत्तम. सध्या हायवेस्ट डेनिम्सचा ट्रेंड आहे. त्यामध्ये दोन किंवा तीन बटन्सची बटनपट्टी छान दिसते. सोबत एखादे स्मार्ट शर्ट इन करून घातल्यास किंवा पफ सिल्व्हचे शॉर्ट लेन्थ टय़ुनिक वापरायला हरकत नाही. स्किन टाइट डेनिम्स शक्यतो निवडू नकोस. प्रिंटेड डेनिम्स ट्राय करायच्या असतील तर छोटे प्रिंट्स निवड आणि शक्यतो पॉकेटला जास्त डिटेलिंग नसलेल्या डेनिम्स निवडल्यास उत्तम.
मृणाल भगत

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.