दिवाळीसाठी शॉपिंग करायचं ठरवत असाल तर डोळे मिटून गडद रंगाचे कपडे निवडा आणि ते दिमाखात मिरवा.. कारण नुकत्याच झालेल्या फॅशन वीकमधून येत्या काही दिवसांचा हा ट्रेंड असल्याचं सूचित झालं आहे.
फॅशनजगतामध्ये गडद रंगांची मोहिनी मुख्यत्वेकरून काळ्या रंगाची मोहिनी कायम राहिलेली आहे. कोणत्याही पार्टीमध्ये काय घालायचे असा प्रश्न उपस्थित झाल्यावर तरुणींची पहिली पसंती ‘लिटिल ब्लॅक ड्रेस’ला असते, मुलांसाठी ‘ब्लॅक सूट’ म्हणजे जीव की प्राण. रोजच्या आयुष्यात पण साधी पर्स, शूज नवीन घ्यायची वेळ आली की अजूनही कित्येक जण काळ्या रंगाला प्राधान्य देतात. कारण एकच ‘सगळ्यासोबत मॅच होतो.’ ‘हे सगळे ठिक आहे, पण आज अचानक हिला काळ्या रंगावर इतके प्रेम का आले आहे?’ असा विचार आला असेल ना तुमच्या मनात? तर त्याचे प्रयोजन असे की यंदाच्या फेस्टिव्हल सीझनमध्ये आपल्या सर्वावर या गडद रंगांची मोहिनी असणार आहे. अरे, घाबरू नका..मी शकून-अपशकुनाबद्दल बोलत नाही आहे. फॅशनवरून भविष्यावर लिहायला अजूनतरी सुरुवात नाही केली. मी बोलतेय ते फॅशनसंदर्भातच आहे.

हां तर आपण कुठे होतो? दरदिवशी तयार होताना कुठे ना कुठे काळ्या रंगाचा वापर होतोच आपल्याकडून. मग ते काळे काजळ का असेना. पण याच काळ्या रंगाला सणांच्या दिवसात मात्र आपण दूर लोटतो. कोणी म्हणते, ‘शुभ नसते’, तर कोण ‘सणावाराच्या दिवसात काळा का घालायचा’ अशा मताचे असतात. पण यंदा मात्र या काळ्याच्या मोहिनीतून तुमची सुटका नाही. कारण यंदाच्या फेस्टिव्हल सीझनमध्ये तुमच्या आजूबाजूला काळ्या रंगासोबत इतर गडद रंगांचे राज्य दिसेल. त्यामुळे ‘अभी इनसे बचके कहां जाओगे’..नुकतेच ब्राइडल फॅशन वीक, ज्वेलरी फॅशन वीक आणि लॅक्मे फॅशन वीक पार पडले आहेत आणि या सगळ्यांमध्ये गडद रंगांचे वर्चस्व प्रकर्षांने जाणवले आहे.
तसे पाहायला गेले तर, पाश्चात्य देशामध्ये लोकांना काळ्या रंगावर जरा जास्तच प्रेम असते. विशेषकरून जेव्हा विषय लग्न समारंभ, पार्टीजचा असतो तेव्हा तर काळ्या रंगाशिवाय त्यांना पर्याय नसतोच. त्यात तरुणींकडे रंगाच्या बाबतीत बरेच पर्याय उपलब्ध असतात. पण मुलांकडे हे पर्यायसुद्धा नसतात. ब्लॅक सूट हा युनिफॉर्म लग्न असो वा पार्टी, त्यांची पाठ सोडत नाही. मग ते ब्लेझर असो, थ्री पीस सूट असो किंवा बो सूट. पण आपण मात्र या काळ्या रंगाला याच दिवसांमध्ये कडीकुलपात बंद करून ठेऊन देतो. खरे पाहिल्यास आपले लाडके सोन्याचे किंवा चांदीचे दागिने याच काळ्या किंवा गडद रंगाच्या कपडय़ांवर जास्त खुलून दिसतात. या गडद रंगांवर हिऱ्यांची चमक अजूनच वाढते. त्यामुळे कोणत्याही कारणाने यांना नाही म्हणणे अतिशय चुकीचे ठरेल.
मागच्या सीझनमध्येच मी तुम्हाला सांगितले होते की सध्याची नववधू जुन्या पारंपारिक पद्धतीचे कपडे, दागिने घेण्यापेक्षा तिला काय चांगले दिसेल, सहज घालता येईल असे कपडे निवडण्यास प्राधान्य देत आहे. त्याचेच एक पाऊल म्हणजे या गडद रंगांचा तुमच्या फेस्टिव्हल कलेक्शनमधला शिरकाव. आतापर्यंत वेस्टर्न कलेक्शन्समध्ये या गडद रंगांनी राज्य केले आहेच, पण इंडियन लुकमध्ये पण हे रंग शिरकाव करू पाहात आहेत. काळ्यासोबतच ग्रे, ब्राऊन, र्बगडी, नेव्ही, मेंहदी ग्रीन, जांभळा, मॅट यल्लो, मॅट गोल्डन किंवा सिल्व्हर रंग या सीझनमध्ये हिट आहेत आणि त्याला कारणही तसेच आहे.
जरदोसी एम्ब्रोयडरी म्हणजे इंडियन फेस्टिव्हल कलेक्शनचा जीव की प्राण. या जरदोसीची रंगत गडद रंगांवर अधिक उठून दिसते. सिक्वेन्स वर्कसुद्धा गडद रंगावर खुलून दिसते. काळ्या रंगावर सिल्व्हर किंवा गोल्डन रंगाच्या एम्ब्रॉयडरीने मस्त कॉन्ट्रास लुक मिळतो. थ्रेड वर्कसुद्धा त्यामुळे खुलून दिसत. जिथे काळ्या रंगाचा विषय निघतो, तिथे पांढरा रंग न सांगता हजर होतो. कुठल्याही गडद रंगावर पांढऱ्या रंगाची खासकरून फुलांची एम्ब्रॉयडरी केल्यास त्याची नजाकतता जी उठून दिसते..त्याला काही तोड नाही. गुलाबी, हिरवा, पिवळा या फ्लोरोसंट रंगांची हायलाइटसुद्धा या गडद रंगावर उठून दिसते. लाल आणि काळ्या रंगाची एकमेकांना साथ असेल तर कलिजा खल्लास होण्यासाठी इतर कसलीही गरज नाही. ग्रे तसा डल, उदासीन रंग. पण त्याला जर सेल्फ शाइन कापडाची आणि मरून, काळा, नेव्ही अशा गडद रंगांची किंवा फ्लोरोसंट रंगांची साथ मिळाली, की त्यातून जो शाही अंदाज तयार होतो, उसके क्या कहने.
हे झाले रंगांच्या बाबतीत. पण कपडय़ांच्या स्टाइलबद्दल बोलायचे झाले तर या गडद रंगांच्या आगमनाला काही खास कारण आहे. आपल्याकडे गाऊन्समध्ये काळा रंग पुष्कळदा वापरला जातो. सध्या आपल्याकडे अनारकली, साडय़ा, पंजाबी सूट यांना नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून घागरा, साडय़ा यांचा घेर सांभाळत बसायला नको आणि दरवेळी त्याच साडय़ा, ड्रेस यांपेक्षा काही नवीन ट्राय करायची संधी पण मिळावी. हे करत असताना डिझाइनर्सनी गुपचूपपणे यात गडद रंग भरले. तसेच नेहमीच्या लग्न समारंभात आपण नखशिखांत सजतो, पण सणांमध्ये आपल्याला तितके सजायचे नसते, पण म्हणून बोरिंगसुद्धा दिसायचे नसते. यात गडद रंग आपल्या मदतीला धावून येतात. गडद शेड्सना कापडाचीसुद्धा तक्रार नसते. सिल्कपासून जॉर्जेटपर्यंत कोणतेही कापड वापर हे रंग त्यात जान भारतात. दागिन्यांमध्येसुद्धा सध्या संपूर्ण गोल्ड किंवा सिल्व्हर ज्वेलरी घेण्याऐवजी कलरफुल स्टोन्स किंवा कुंदन घेण्याकडे जास्त कल आहे. हे दागिने गडद रंगांवर अधिकच खुलून दिसतात. तसेच या रंगांसोबत प्रयोग करण्याचा वाव जास्त असतो. त्यामुळे दागिने, अ‍ॅक्सेसरीज यांसोबत तुम्ही मस्त खेळू शकता. गडद रंगाची तुमच्या स्कीनटोनबद्दल पण तक्रार नसते, त्यामुळे तुम्ही गोरे असा वा सावळे, हे रंग तुम्हाला नक्की सूट होतात. तसेच तुमची बॉडी परफेक्ट मेंटेनन्ड असो किंवा तुम्ही गुबगुबीत बाळ असाल, गडद रंग कधीच तुम्हाला निराश नाही करणार. उलटपक्षी छान टोन्ड बॉडी असेल तर या रंगांमध्ये तुमचा बॉडीशेप उठून दिसतो आणि जाडे असाल तर तुमचा लठ्ठपणा लपलाही जातो. त्यामुळे आता तुमच्याकडे एकही कारण नाही या रंगांना नाही म्हणायचे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये या रंगांना अंतर दिलेत तर खबरदार.
मग वाट कसली बघताय, या सीझनमध्ये या काळ्या रंगाची मोहिनी तुमच्यावरही चढू द्यात की..