मेकअप करायचा तो फक्त लग्नसमारंभासाठी किंवा पार्टीसाठी अशीच आपली समजूत असते. पण रोजच्या धकाधकीत थोडं उठून दिसण्यासाठी हलकासा टचअप करायला काहीच हरकत नाही.

‘नाही यार, मजा नाही आली. इतक्या मेहनतीने अगदी दीपिकासारखा ड्रेस मिळवला होता. तिच्यासारखे शूज, अ‍ॅक्सेसरीज पण मिळवल्या मग नेमकी माशी कुठे शिंकते?’ कोणत्याही पार्टीला जाण्याआधी हा डायलॉग ठरलेला असतो. नक्की काय कमी राहिलंय आपल्या लुकमध्ये हेच मुळी कळत नाही. गहन विचार केल्यावर मग कुठे डोक्यात प्रकाश पडतो. ‘अरेच्या! मेकअपचं काय?’ हा प्रश्न आपल्यापैकी अनेकजणींना पडतो. त्यात एखाद्या पार्टीसाठी मेकअप करण्यासाठी पार्लरला जायचं म्हटलं, तर ‘लग्नाला चाललोय का?’ हा प्रश्न विचारून आपल्याला निरुत्तरित केलं जातं. खूप विनवण्यांनंतर पार्लरला जाण्याची परवानगी मिळालीच तर पार्लरवाली आपला चेहरा असा पांढराफिट्ट करून टाकते की, विचारायलाच नको. वाटतं, ‘असंच गेलो असतो तर बरं झालं असतं.’
बरं आपल्या घरच्यांना तर हे मेकअपचं खूळच वाटत असतं. आपला लुक पूर्ण होण्यासाठी मेकअपची नक्की काय गरज आहे हेच त्यांना काय कळत नाही. मागच्या वेळी आपण अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलताना पावभाजीतील योग्य मसाल्याचे महत्त्व सांगितले होते. आता समजा, आईने पावभाजी तर मस्त बनवली आहे. त्यात मीठ-मसाला पण योग्य पडला आहे. घरभर मस्त सुवास दरवळला आहे आणि गरमागरम पावभाजीची प्लेट आपल्यासमोर आली पण.. ‘अरेच्या, कुछ तो गडबड है.’ भाजीवर भुरभुरलेली कोथिंबीर, कापलेला कांदा आणि लिंबाची फोड गायब आहे. त्या वेळी आपली जी अवस्था होते अगदी तीच अवस्था मेकअप न करता पार्टीला जाणाऱ्या मुलीची होते.
आपल्याकडे मेकअप (बोलीभाषेत बोलायचं झालं तर नट्टापट्टा) हा केवळ पार्टी, सणसमारंभ किंवा लग्नाच्या वेळेस करण्याची चैन असं मानलं जातं. त्यात अशा वेळी आपल्या घराजवळची पार्लरवाली विशिष्ट पद्धतीने आपला चेहरा पांढराफटक करते तोच काय मेकअप ही आपली आणि आपल्यापेक्षा आपल्या घरातील थोरामोठय़ांची भाबडी समजूत बनते. पण मेकअप हा आपल्या रोजच्या पेहरावातील एक अविभाज्य घटक आहे. तो योग्य जुळला तर मग कोणीच आपल्या दिसण्यात खोट काढू शकत नाही. पण मेकअप चुकला तर आपल्या चेहऱ्याची ठेवण पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे या मेकअपकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखे नाही. रोज बाहेर पडताना मग ते ऑफिस असो, कॉलेज, आऊटिंग असो किंवा छोटीशी टी-पार्टी.. थोडासा टचअप तो बनता है बॉस! पण प्रत्येक प्रसंगात स्पष्टच सांगायचं झालं तर अगदी सकाळी आणि रात्री करायच्या मेकअपमध्ये फार फरक असतो. तो नक्की काय असतो हे पाहण्याचा प्रयत्न आज आपण करूयात.
सकाळी आपण स्वत:साठी जास्तीत जास्त वेळ देऊन मस्त तयार होण्याचा प्रयत्न करतो. पण ऑफिस किंवा कॉलेजला जाईपर्यंत घाम, चिकटपणा यामुळे आपल्या या मेकअपचे पार बारा वाजलेले असतात. मग बस किंवा ट्रेनमध्ये फावल्या वेळात काहीजणी लिपस्टिक, कॉम्पॅक्ट लावत बसलेल्या दिसतात. सकाळचा मेकअप थोडा लाइट असलेला बरा. मुख्य म्हणजे तुम्ही कुठे जात आहात, कसे जात आहात त्यानुसार तुमच्या मेकअपची आखणी केलेली कधीही उत्तमच. जास्त वेळ टिकणारा कॉम्पॅक्ट शक्यतो पावडर स्वरूपातला कारण लिक्विड कॉम्पॅक्ट घामाबरोबर निघतो आणि त्यामुळे कित्येकदा तुमच्या कपडय़ांच्या कॉलर्स त्यामुळे रंगलेल्या असतात. तसेच तुमच्या पसंतीच्या रंगाचे लिप ग्लॉस (पसंतीचा म्हणजे जांभळ्या, भडक मरून अशा शेड्सचा नव्हे. त्या शेड्स सर्वानाच सूट होतील असे नाही. पण आपल्याकडे या शेड्स सर्रास वापरल्या जातात. पण याचा विचार फार कमीजण करतात.) आणि काजळ किंवा लायनर एवढय़ा साहित्यात आपला मेकअप पुरेसा होण्यास काहीच हरकत नाही. शक्यतो लायनर आणि काजळ यांचा एकत्रित वापर करू नका. त्यामुळे डोळे खूपच गडद दिसतात. लायनर आणि मस्कारा पण तुम्ही वापरू शकता. काळ्याऐवजी छान कलरमधील लायनर वापरून पाहा. सध्या खूप काळ टिकणारे मेकअपचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे पण तुमच्या इच्छित ठिकाणी पोहोचल्यावर एक टचअप करायला विसरू नका.
संध्याकाळच्या पार्टीसाठी किंवा समारंभासाठी थोडा जास्त मेकअप चालून जातो. जर तुम्हाला आय मेकअपला प्राधान्य द्यायचे नसेल तर वेगळ्या रंगाचे लायनर वापरण्यास काहीच हरकत नाही. तसेच स्मज आय, ग्लिटर शेड्स तुम्ही संध्याकाळी वापरू शकता. पार्टीसाठीचा मेकअप गडद ठेवा तर घरगुती कार्यक्रमासाठी सटल शेड्स वापराव्यात. डार्क मेकअपच्या नावाखाली आपले डोळे काळे होणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. सध्या सटल आय मेकअप करून लिप्स फोकस करण्याचा ट्रेंड आहे. हा प्रयोग करून पाहण्यास काहीच हरकत नाही.
रोजचा मेकअप आपण सांभाळून घेतो, पण प्रश्न येतो जेव्हा आपण एखाद्या स्पेशल कार्यक्रमासाठी किंवा लग्नसमारंभासाठी पार्लरला मेकअप करायला जातो. आपला चेहरा नेहमीपेक्षा पांढरा झालेला असतो. त्यात पार्लरमध्ये ‘छान दिसताय!’ असं म्हणतात तेव्हा काय चुकलंय हे कळत नाही. मुळात फक्त अशा समारंभासाठीच नाही तर नेहमीच तुमच्या कॉम्पॅक्टची शेड तुमच्या स्किनला मॅच झाली पाहिजे. गोरं दिसण्यासाठी आपण लाइट शेड निवडतो आणि फसतो. कॉम्पॅक्ट किंवा फाऊंडेशन खरेदी करताना नेहमी पडताळणी करूनच घ्या.
तीच बाब आहे नेलपेंटची. कित्येकदा आपल्या नकळत आपल्या दोन्ही हातांच्या नेलपेंटचा रंग वेगवेगळा असतो. असे होते कारण उजव्या हाताने जेवताना जेवणातील मसाल्यांची नेलपेंटवर प्रक्रिया होऊन त्याची छटा हलकीच पिवळसर होते किंवा कधीकधी नेलपेंटचे पापुद्रे लवकर निघू लागतात. यावर उपाय म्हणजे नेलपेंट लावल्यावर त्यावर पारदर्शक नेलपेंटचा एक थर द्या. जेणेकरून या समस्या उद्भवत नाहीत. हाच प्रश्न लिपस्टिकबाबतही येतो. शेड कितीही गडद असू द्यात काही काळाने ती लिपस्टिकची शेड लाइट झालेली असते. शिमर शेडचा लिप ग्लॉस वापरल्यास हे टाळता येते.
घरातून हेअरस्टाइल करून निघालं की कार्यक्रमाला पोहोचेपर्यंत त्या हेअरस्टाइलचे बारा वाजतात. पार्लरमध्ये हेअर स्प्रे वापरून केस सेट करतात. त्यामुळे ते विस्कटत नाहीत. त्यामुळे घरातून निघताना पुरेशा पिना लावून केस विस्कटणार नाहीत याची काळजी घेऊन हेअरस्टाइल ठरवावी. रोज ऑफिस, कॉलेजला जाताना वेळखाऊ हेअरस्टाइल्सपेक्षा सुटसुटीत, सोप्पी हेअरस्टाइल करणे कधीही उत्तम. सध्या टायअप बन्स, पोनीटेल्स या स्टाइल्सची फॅशन आहे.
थोडक्यात मेकअप म्हणजे काहीतरी फार मोठा कार्यक्रम असतो असा विचार करण्याऐवजी सहजसोप्या मेकअप टिप्स वापरून तुम्ही तुमच्या लुकमध्ये बऱ्यापैकी बदल आणू शकता.