lp02सतरा ग्रॅण्डस्लॅम जेतेपदं, ८० एटीपी स्पर्धाची जेतेपदं, ऑलिम्पिक सुवर्णपदक, डेव्हिस चषक विजेता- टेनिसविश्वातल्या सर्व प्रमुख स्पर्धाची जेतेपदं नावावर करणारा अवलिया म्हणजे रॉजर फेडरर. त्याचा शांत, संयमी स्वभाव आणि खेळभावना जपणारा त्याचा वावर यामुळे जगभर त्याचे चाहते पसरले आहेत. यापैकी भारतीय चाहत्यांना आपलंसं करून घेण्याची संधी फेडररला मिळाली. निमित्त होते पहिल्यावहिल्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धेचं. या लीगच्या निमित्ताने फेडरर भारतात पहिल्यांदाच टेनिस खेळण्यासाठी आला. भारत आणि इथली संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक फेडररने ट्विटरच्या माध्यमातून एक अनोखी संकल्पना राबवली. मुळातच धमाल-मस्ती हे फेडररच्या चित्तप्रवृत्तीला साजेसं नाही. तो मान जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचचा. मात्र चाहत्यांचं मन जाणून घेण्यासाठी फेडररने स्वत:चं गंभीरपण बाजूला ठेवलं. भारतात येतोय- दोनच दिवस आहे- काय पाहू- काय करू ते तुम्ही मला फोटोशॉपच्या अर्थात (दृश्य-अदृश्याची धमाल सांगड घालणारी संगणकप्रणाली) माध्यमातून सुचवा असे फेडररने चाहत्यांना सांगायचा अवकाश- भारतातल्या फेडरर चाहत्यांच्या प्रतिभाशक्तीला अचाट असे धुमारे फुटले. सप्टेंबर ते डिसेंबर या दोन महिन्यांत भारतीय चाहत्यांनी फेडररचा ट्विटफीड ओसंडून वाहेस्तोवर फोटोशॉप करामती सादर केल्या. आंतरराष्ट्रीय टेनिसचे व्यस्त कॅलेंडर, प्रवास, अन्य व्याप यामुळे फेडररचं प्रत्येक सेकंद आरक्षित असतं. मात्र या सगळ्यातून वेळ काढत फेडररने हे ट्विट पाहिले, तुम्ही दिलेला प्रतिसाद थक्क आणि अचंबित करणारा आहे. माझी हसून हसून पुरेवाट झाली, तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल आभारी आहे अशा शब्दांत फेडररने आपल्या ट्विटर फॉलोकरांचे ऋण व्यक्त केले आहेत. साडय़ांच्या दुकानात एकामागोमाग एक वेगवेगळ्या पॅटर्नच्या साडय़ा दाखवणारा सेल्समनरूपी फेडरर, ठगवणाऱ्यांची दिल्ली म्हणवल्या जाणाऱ्या दिल्लीत रिक्षाप्रवास करणारा फेडरर, केरळच्या बॅकवॉटर्समध्ये सुशेगात बोटिंग करणारा फेडरर, गंगानदीत स्नान करताना फेडरर, ताजमहालच्या पाश्र्वभूमीवर स्वत:चा फोटो काढून घेणारा फेडरर, लुंगीरूपात केळी विकणारा फेडरर, अभयारण्यात वाघासमोर नतमस्तक होणारा फेडरर, साधुवेशात तथास्तु म्हणणारा फेडरर, गरबा खेळणारा फेडरर, हाणामारीच्या टिपिकल गुंडा पिक्चरच्या पोस्टरवर झळकलेला फेडरर, हॉर्न ओके प्लीज अशी पाटी असलेल्या ट्रकचा ड्रायव्हर, तोंडाला पाणी सुटणाऱ्या पाणीपुरीचा आस्वाद घेणारा फेडरर, गर्दीभरल्या मुंबई लोकलमध्ये फुटबोर्डवर लोंबकळणारा फेडरर, स्टेशनबाहेर कानकोरण्याद्वारे कानातला मळ काढून घेणारा फेडरर असं सगळं विश्वरूपदर्शन चकित करणारं आहे. फेडररसारखा वर्ल्ड आयकॉन खेळाडू र्मचडाइज अर्थात ब्रॅिण्डगसाठी अशी संकल्पना राबवतो आणि टेक्नोसॅव्ही चाहते फोटोशॉपचा पुरेपूर उपयोग करून त्याला प्रतिसाद देतात हे खेळाडू-चाहत्याचं नव्या कनेक्टचं रूप आहे. ऑटोग्राफसाठी ताटकळत राहणाऱ्या, उन्हातान्हात त्याच्या एका छबीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांऐवजी आपल्या देशातल्या चिवित्र गोष्टी टिपून त्यात आपल्या लाडक्या फेडररला बसवणे ही फोटोशॉपी किमया चाहत्यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. विशेष म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून अजब दुनियेतला गजब फेडरर साकारणारी मंडळी आयपीटीएलच्या दिल्लीतील सामन्यांना प्रत्यक्ष उपस्थित होती. ऑनलाइन प्लॅटफॉर्मस् आणि त्यावर चालणारं कम्युनिकेशन हे आभासी यावर समाजधुरिणांनी शिक्कामोर्तब केले असले तरी मूळचा स्वित्र्झलडचा आणि स्पर्धाच्या निमित्ताने जगभर फिरत असणारा फेडरर आणि त्याला नियमितपणे फॉलो करणारे चाहते यांची प्रत्यक्ष भेट होणं दुर्मीळच. मात्र ज्यासाठी केला अट्टहास त्या फेडररनेच आवाहन करताच चाहत्यांचं एक्स्प्रेस होणं या नात्यातला घट्टपणा सिद्ध करतं.

lp03

lp04

lp05

lp06

lp07

lp08

lp09

lp10

lp11(सर्व छायाचित्रे : फेडररच्या ट्विटर हॅण्डलवरून साभार)