scorecardresearch

Premium

आपत्ती : नंदनवनातील हाहाकार

एकेकाळचं नंदनवन असलेलं काश्मीर आजघडीला पुरानं वेढलंय. या नंदनवनाच्या सफरीवर गेलेल्या प्रवाशांनी अनुभवलेली श्रीनगरची वाताहत

आपत्ती : नंदनवनातील हाहाकार

एकेकाळचं नंदनवन असलेलं काश्मीर आजघडीला पुरानं वेढलंय. या नंदनवनाच्या सफरीवर गेलेल्या प्रवाशांनी अनुभवलेली श्रीनगरची वाताहत

५ सप्टेंबरला सकाळच्या विमानाने आम्ही श्रीनगरला सुखरूप पोहोचलो. विमानतळावर टॅक्सी घेऊन आलेले बशीर खान यांनी आम्हाला दाल लेकसमोरील बुलिवर्ल्ड भागातील हॉटेल पॅराडाइजवर सुखरूप आणले. नेहमीच्या रस्त्याने न जाता आपण थोडय़ा लांबच्या रस्त्याने जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सप्टेंबर महिन्यात मौसम अतिशय सुखदायक असतो, त्यामुळे प्रवासी जास्त संख्येने येतात, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत; परंतु यंदा मात्र पाऊस अधिक प्रमाणात अवेळी सुरू झाला असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आम्हास विश्रांती घेण्यास सांगून त्यांनी आपण आता उद्याच येऊ, असे सूचित केले. दुसऱ्या दिवशी सहा तारखेला सकाळी नऊ वाजता ते हजर झाले. दिवसभर श्रीनगरमधील प्रमुख ठिकाणे त्यांनी आम्हास दाखविली. पाऊस पडतच होता. रस्त्यांवर पाणी साचत होते. संध्याकाळी रस्त्यांवर पाण्याची उंची वाढली. आम्ही हॉटेलवर पोहोचलो तेव्हा आमच्या एजंटने आम्हाला मुंबईत परत जाण्याचा सल्ला दिला. ‘मौसम अब और खराब होगा,’ असेही ठामपणे सांगितले. त्याच्याच मदतीने सात तारखेचे तिकीट मिळवले. मुंबईहून निघताना १४ तारखेचे तिकीट हातात होते. ते मुंबईला जाऊनच परत करण्याचा सल्लाही त्याने दिला. सायंकाळी दल सरोवरच्या रस्त्याने सहज फेरफटका करायला निघालो आणि सरोवराचे दरवाजे अचानक तुटून पाण्याचे लोट येऊ लागले. लोक सरावरा धावू लागले. पाण्याने महापुराचे रौद्र स्वरूप धारण केले. पाणी घराघरांत घुसू लागले. कसेबसे लोक हॉटेलमध्ये पोहोचले. रात्रभरात पाण्याची पातळी वाढू लागली. मुंबईतील २६ जुलचा भीषण थरार श्रीनगरमध्ये अनुभवला. माणसांचा थांगपत्ता लागत नव्हता. लोकांचा आक्रोश क्षणोक्षणी काळजाचा ठोका चुकवत होता. पुराच्या विळख्यात निद्रित असलेले श्रीनगर शहर, जगाशी तुटलेला संबंध, सतत आप्तस्वकीयांशी संपर्क न झाल्यामुळे चिंताग्रस्त झालेले हॉटेलमधील इतर प्रवासी ही परिस्थिती फारच चिंताग्रस्त होती. त्या परिस्थितीतही मरण म्हणजे काय? याची सतत चाहूल देणारे ते क्षण, यामुळे ‘वाचलो रे’ ही जाणीव, पुनर्जन्माचा आनंद देऊन गेली. सर्वदूर रात्रीची भयाण शांतता आणि पुराचे पाणी आम्ही अनुभवत होतो.
दुसऱ्या दिवशी सात तारखेला बशीरभाई पाण्यातून कसाबसा रस्ता काढत हॉटेलमध्ये पोहोचले. आमच्याप्रमाणेच काही निवडक प्रवासी विमानतळावर निघाले खरे; परंतु काही वेळातच ठिकठिकाणी साचलेले पाणी पाहून हॉटेलमध्ये परतले. हॉटेलमधील पाण्याचा, अन्नाचा साठाही मर्यादितच होता. हॉटेलमालकाने अंदाजे दीडशे प्रवाशांना सुरक्षित स्थळी उंचावरच्या एखाद्या हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडे शिल्लक असलेला खाण्याचा, पाण्याचा साठाही संपुष्टात आला होता. आमच्या हॉटेलमध्ये कोलकात्याहून आलेले ३५ प्रवासी होते. त्यांच्याबरोबर आचारी आणि अन्नाचा साठा होता. त्या आचाऱ्याने आम्हाला आठ तारखेला सकाळी आणि संध्याकाळी जेवण व चहा दिला. बरोबरच्या इतर चिंताग्रस्त प्रवाशांनी खांद्यापर्यंत पोहोचलेल्या पाण्यातून रस्त्यावर जाऊन खाण्याच्या वस्तू आणल्या. प्रवाशांमध्ये स्त्रिया, लहान मुले होती. हॉटेलमालकाने अखेर नऊ तारखेला सकाळी बोटवाल्याला बोलावले. आमची बाहेर पडण्याची धडपड सुरू झाली. लोक पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून, खाली उभ्या राहिलेल्या लोकांच्या मदतीने, वरून माणसे सोडून थोडय़ा फार प्रमाणात उडय़ा मारून बोटीत बसत होती. मनाचा थरकाप होत होता. तरीही डोळे मिटून वरून आपल्याला खाली सोडणाऱ्या माणसावर विश्वास ठेवून खाली उभा राहण्याच्या व्यक्तीच्या अंगावर उडी मारत, आम्ही ही जीवघेणी वेळ निभावून नेली. बोटवाल्याने त्याच्या बुद्धीला झेपेल अशा पद्धतीने आम्हास सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडले. युनायटेड नॅशनल ऑर्गनायझेशनच्या दिशेने आम्ही चालू लागलो. अखेर पाच ते सहा किलोमीटर अंतर सामानासह चालून गेल्यावर द ललित या पंचतारांकित हॉटेलपर्यंत आम्ही पोहोचलो. त्या हॉटेलच्या लोकांनी प्रवेशद्वारे बंदच केली होती. आमच्या बरोबरीच्या काही लोकांनी ठामपणे येथून न हलण्याचा पवित्रा घेतला. रात्री शेवटी त्यांनी आम्हाला दरवाजे उघडून आत येण्याचा सल्ला दिला. सुटकेचा नि:श्वास टाकून आम्ही हॉटेलमध्ये दाखल झालो. त्यांनी आम्हा स्त्रिया आणि पुरुषांची दोन प्रशस्त हॉलमध्ये राहण्याची सोय केली. जेवणाची सोय झाली. जेवल्यानंतर सुका मेवा, फळे, चॉकलेटही त्यांनी सर्वाना दिली. आता येथून बाहेर कसे पडावे, हे विचारचक्र सुरू झाले. सकाळी उठल्यावर लॉनवर बसून मीडियाचे लोक येऊन हॉटेलचे फोटो काढून नेत होते. जवळच हेलिपॅड होते. त्यात स्थानिक प्रवासी मोठय़ा संख्येने होते. प्रत्येकाची जीव वाचविण्यासाठी धडपड चालू होती. क्वचितप्रसंगी लाठय़ा-काठय़ांचाही वापर केला जात होता. प्रवाशांपेक्षा स्थानिक लोकांना आधी जाऊन द्या, असा आग्रह करणाऱ्यांची संख्या अधिक होती. या परिस्थितीत दोन-दोन दिवस कंटाळून प्रवासी हॉटेलच्या दिशेने येत होते. पाणी उतरण्याची तिळमात्रही शक्यता नव्हती. नदी अधिकाधिक रौद्र रूप धारण करत होती. अनेक प्रकारच्या वावडय़ा येत होत्या. प्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणे अंदाज बांधत होता. पाण्याची पातळी मात्र कमी होण्याचे नाव घेत नव्हती.
सन्य जिवाचे रान करून लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करीत होते. यात आमच्यातील एका गृहस्थांना त्रास होऊ लागला. परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आलेल्या जवानांना आम्ही विनंती केली. त्यांनी त्या गृहस्थांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तयारी दाखविली. त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये मीही गेले आणि येथील दृश्ये बघून हृदय पिळवटून गेले. बेपत्ता, मेलेल्या माणसांचे नातेवाईक, घरांतील लोक असे विदारक दृश्य, मनाचा तोल सुटणारी परिस्थिती, लोकांचा प्रत्यक्ष अनुभवलेला आक्रोश, मात्र सर्वच बुद्धीच्या पलीकडले आणि ठोका चुकविणारे होते. पुन्हा आम्ही हॉटेलवर आलो आणि कसेही करून परत जाण्याचा विचार केला. पाण्याची पातळी कमी होण्याचे चिन्ह दिसेना. हॉटेलचे कर्मचारी, सहकारी उंच डोंगरावर असलेल्या ठिकाणी शिस्तीत एका रांगेत आम्हाला रात्रीच्या काळोखातही जेवणासाठी घेऊन जात होते. लष्कराची हेलिकॉप्टर सेवा सुरू होती. अंदाजे २५ ते ३० हजार लोकांनी वेढलेल्या या जागी जाणेदेखील कठीण होते. त्यातूनही प्रत्येक जण वेगवेगळे आपले अनुभव कथन करीत होता. हेलिकॉप्टरने जाण्यासाठी धडपड करणे किती व्यर्थ आहे, ते पटवून देत होता.
शेवटी १२ तारखेला आम्ही एक ठाम निर्णय घेतला, की कोणत्याही परिस्थितीत इथून निघायचंच. हॉटेल सिक्युरिटीच्या लोकांशी बातचीत करून, त्यांना विनंती करून, बसची व्यवस्था केली. त्यांनी आम्हाला जवळच्या मिलिटरी कॅम्पपर्यंत नेऊन सोडले. मिलिटरीच्या लोकांनी बस देऊन काही अंतरावरील एका डोंगराच्या पायथ्याशी सोडले, त्यातून एक रस्ता डोंगराळ भागातून जाणारा व दुसरा रस्ता पाण्यातून मुख्य रस्त्याकडे नेणारा होता. आम्ही काही मंडळी मिलिटरीच्या लोकांच्या मदतीने डोंगराळ रस्त्याकडे वळलो. अत्यंत दुर्गम पाऊलवाटेने स्थानिक लोकांच्या आधाराने वाट काढत होतो. वाटेत लागणारे काटेकुटे, लोखंडी तारा, अनेक वेळा निसरडी चिंचोळी वाट या कशाचेही आम्हाला भान नव्हते. फक्त नजरेसमोर विमानतळ दिसत होते. जवळजवळ तीन तासांपर्यंत चालून डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. अंतराअंतरावर ही वाट चालताना फक्त आणि फक्त स्थानिक लोकांनी अत्यंत प्रेमाने रस्ता पार करण्यास मदत केली. खाली आल्यावर, मोठय़ा पातेलीत फोडणीचा भात घेऊन उभे असलेले एक जोडपे प्रत्येकाला भातवाटप करीत होते. आम्हीदेखील तो घास देवाचा प्रसाद म्हणून ग्रहण केला आणि पुढे निघालो. झेलमवरील मोडकळीस आलेला पूल ओलांडून जीव अक्षरश: मुठीत घेऊन नदीपार मुख्य रस्त्यावर पोहोचलो. पुन्हा एकदा स्थानिक बसमधून विमानतळाकडे जाणाऱ्या कमरेइतक्या पाण्याने भरलेल्या वाटेने रस्त्याला लागलो. बसवाल्याने थोडेसे आधीच उतरण्यास आम्हास भाग पाडले. पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली. खासगी वाहने थांबविण्यास सुरुवात केली, परंतु कुणीच थांबेनात. दोन कॉलेजमधील मुली मदतीला धावून आल्या. त्यांनी एक गाडी थांबवली व त्यांच्या भाषेत बोलून आम्हाला गाडीत बसण्यास सांगितले. विमानतळावर आम्ही पोहोचलो. या सर्व दिव्यातून आम्ही बरोबर निघालेले सर्वच जण एकमेकांपासून कमीअधिक अंतरावर विखुरले गेलो होतो. पुढे नवीनच समस्या उभी होती, ती विमानात जागा मिळण्याची. अखेरीस तिसऱ्या विमानात जागा मिळाली. आमची तिकिटे वेगवेगळ्या दिवसांची होती. पाण्यामुळे आम्ही विमानतळावर पोहोचू शकलो नाही. विमान ठीक पाच वाजता सुटण्याऐवजी रात्रौ सव्वा आठ वाजता सुटले. त्यातही धावपट्टीवरच काही तरी तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा खोळंबा झाला. अखेरीस जम्मूमाग्रे सर्व अडचणींतून मार्ग काढत संकटांवर मात करीत आम्ही रात्री साडेबारा वाजता मुंबईत छत्रपती शिवाजी हवाई अड्डय़ावर उतरलो.. निश्वास सोडला!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flood in kashmir

First published on: 26-09-2014 at 01:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×