31 May 2020

News Flash

आवाज की दुनिया : एफएमचे दिवस, एफएमच्या रात्री!

दिवाळी २०१४ ‘रेडिओ संस्कृती’ लोप पावण्याची चिन्हं असतानाच एकाएकी एफएम नावाचं वादळ आलं आणि या वादळानं देशभरातील श्रोत्यांना कवेत घेतलं.

| November 26, 2014 01:04 am

lp10दिवाळी २०१४
‘रेडिओ संस्कृती’ लोप पावण्याची चिन्हं असतानाच एकाएकी एफएम नावाचं वादळ आलं आणि या वादळानं देशभरातील श्रोत्यांना कवेत घेतलं. रेडिओचा हा नवा अवतार नव्या युगाशी नातं सांगणारा होता. ‘आरजे’ म्हणजे रेडिओ जॉकी अर्थात निवेदकांची मोठी फळीच एफएमवर निर्माण झाली. हे ‘आरजे’ रेडिओच्या पालखीचे सध्याचे भोई आहेत.

‘एफएमवाला नवा मोबाइल आला का तुमच्याकडे?’
फोर्टच्या ग्रे मार्केटमधील एका विक्रेत्याला एका तरुणाने हा प्रश्न विचारला, तेव्हा त्या विक्रेत्याने त्याला वेडय़ात काढलं.
‘जाओ, ऐसा कुछ नही होता, पागल हो क्या, मोबाइल में एफएम कैसे बजेगा..’
दहा-बारा वर्षांपूर्वी घडलेला हा प्रसंग. यात ना त्या तरुणाची चूक ना त्या विक्रेत्याची. कोठून तरी मिळालेल्या माहितीनुसार त्या तरुणाची उत्कंठा ताणली गेलेली. एरव्ही पहिला मोबाइल घ्यायचा आहेच, तर तो एफएम असलेलाच घ्यावा, असं त्याला वाटलं. दुसरीकडे, हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विस्फोटाची चाहूलही नसलेल्या विक्रेत्याची ही प्रतिक्रिया स्वाभाविकच म्हणायची. मधल्या काळात पुलाखालून किती पाणी गेलं, हे तुम्हा-आम्हा सर्वाना ठाऊक आहे. आता मोबाइलमध्ये एफएम ही तर फार किरकोळ गोष्ट झाली आहे. एफएमचे कार्यक्रम रेकार्ड करण्याची सुविधा देणारे मोबाइलही आता कुतूहलाचा विषय नाहीत. केवळ मोबाइलच नव्हे तर म्युझिक प्लेअर्स, रिक्षा-टॅक्सी, बस, कार यांच्यात एफएम असणं ही गोष्ट अनिवार्य झाली आहे. (गेल्या वर्षभरात तर इंटरनेट एफएम नावाचा नवा प्रकारही सुरू झाला आहे. या प्रकाराने अद्यापि मूळ धरलं नसलं, तरी या नव्या पर्यायामुळे कोणत्याही देशातली एफएम तुम्ही ऐकू शकता!) एफएम म्हणजे ‘फ्रीक्वेन्सी मॉडय़ुलर’. या प्रसारणात असं काय विशेष आहे, की ते देशभरात एवढं लोकप्रिय व्हावं, हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तर, सुस्पष्ट, दणकेबाज प्रसारण (एवढं की, तुम्हाला स्टुडिओत बसल्याचा भास व्हावा), डिजिटल असल्याने अचूकपणे सेट होणारी स्टेशन्स, तरुणाईचा सळसळता उत्साह, स्पर्धेमुळे निर्माण झालेलं प्रसारणातलं वैविध्य, त्यातून निर्माण झालेला निवडीचा अधिकार आणि दिवसाचे १२ नाही तर २४ तास होणारं मनोरंजन, ही एफएमच्या लोकप्रियतेची ढोबळ कारणं आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही माध्यमातून एफएम खिशात घेऊन फिरता येतं हे कारणही तितकंच महत्त्वाचं. अर्थात, एफएमची पाळंमुळं रुजायला काही र्वष खर्ची पडली.
१९९३मध्ये दाखल झालेल्या खासगी एफएम केंद्रांची टक्कर होती ती प्रसारभारतीच्या आकाशवाणीशी आणि अध्र्या शतकाहून अधिक काळ रेडिओ म्हणजे आकाशवाणी, हे समीकरण आपल्या देशात रूढ झालं होतं. नाही म्हणायला, ‘रेडिओ सिलोन’ने आकाशवाणीची झोप उडवली होती. मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी आकाशवाणीनेही १९५७ मध्ये पं. नरेंद्र शर्मा यांच्यासारख्या दिग्गजाच्या नेतृत्वाखाली नवी प्रसारण सेवा सुरू केली, ती सेवा म्हणजे ‘विविधभारती’. हे नामकरणही पं. शर्मा यांनीच केलं. पुढे १९६७मध्ये विविधभारतीला व्यावसायिक रूप देण्यात आलं. हिंदी सिनेसंगीताच्या त्या सुवर्णकाळात ‘विविधभारती’ लोकप्रिय झाली नसती तरच नवल. ‘संगीत सरिता असो, भूले बिसरे गीत असो किंवा मधुमालती’, ‘एक फनकार, मनचाहे गीत, जयमाला, छायागीत, बेला के फूल’ आदी विविध कार्यक्रम असोत, ‘विविधभारती’मुळे कानसेनांची चांगलीच चंगळ झाली. हे कमी म्हणून ‘मुंबई ब’ होतंच. ‘वनिता मंडळ, कामगार सभा, आपली आवड’ आदी कार्यक्रमांमुळेही श्रोते सुखावत होते. प्रादेशिक-राष्ट्रीय बातम्या, क्रिकेट सामन्यांचे समालोचन ही तर आकाशवाणीची खास वैशिष्टय़े ठरली.
ग्रामोफोनच्या रूपात उच्चभ्रूंच्या दिवाणखान्यात बंदिस्त झालेलं संगीत व मनोरंजन आकाशवाणीच्या विविध प्रसारण सेवांमुळे समाजाच्या सर्व थरांपर्यंत पाझरलं. मात्र, काळानुसार बदलायचं नाही, हा सरकारी अलिखित नियम असल्याने या भरजरी वस्त्राचं पोतेरं होणंही क्रमप्राप्त होतं. आर्थिक उदारीकरणाचे, जागतिकीकरणाचे जोरदार वारे वाहात असताना किंवा त्यापूर्वीच अकार्यक्षम यंत्रणेमुळे रेडिओची खरखर वाढू लागली. नावीन्याचा अभाव तर होताच आणि अन्य सरकारी खात्यांप्रमाणे अपुरे मनुष्यबळ ही रडही होतीच. अशातच अहमदाबादमध्ये एक खासगी एफएम सुरू झालं, आकाशवाणीची मक्तेदारी संपली. काळाची पावलं ओळखून सरकारने मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, गोवा, इंदूर या निवडक शहरांमध्ये एफएमचे एअरटाइम ब्लॉक विकले आणि साथीच्या आजाराप्रमाणे एफएम पसरू लागलं. हा प्रतिसाद पाहून सरकारने २०००मध्ये ८७ ते १०८ या एफएम फ्रीक्वेन्सीचा लिलाव केला. सध्या सर्रास ऐकू येणारी एफएम गोल्ड, रेनबो, सिटी, फीव्हर, बिग, रेड आदी केंद्रं ही याच लिलावाची अपत्यं. लहान-मोठय़ा शहरांमध्ये चालणारी स्थानिक एफएम केंदं्र तर वेगळीच. गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात ही एफएम क्रांती होत असताना तंत्रज्ञानातही अफाट प्रगती होत होती. जग जवळ येत होतं. भारत हा तरुणांचा देश होत होता. या सगळ्याचे संस्कार या नवजात एफएमवर होणारच होते. त्यामुळेच या नवागताने रेडिओचं रूपडं बदलून टाकलं. एफएमचं हे नवं रूप उभं होतं ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या पायावर. वेगवेगळ्या एफएम केंद्रांचे सादरीकरण, त्यांचे कार्यक्रम भले वेगळे असतील, मात्र त्यांच्यात एक गोष्ट समान होती व ती म्हणजे त्यांचं सुस्पष्ट, खणखणीत प्रसारण. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बदलाच्या या झंझावातामध्ये ‘आकाशवाणी’नेही कात टाकली (खरं तर टाकावी लागली.) त्याहून नवल म्हणजे ‘आकाशवाणी’ने या स्पर्धेमध्ये बाजीही मारली. एफएम वन आणि एफएम टू या नावाने सुरू झालेल्या ‘आकाशवाणी’च्या एफएमचं नामकरण १९९८मध्ये अनुक्रमे एफएम गोल्ड आणि एफएफ रेनबो असं झालं. गोल्डवर हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्णकाळातील गाणी आणि रेनबोवर प्रामुख्याने इंग्लिश पॉप व अलीकडच्या काळातली हिंदी चित्रपटगीते. (ठरावीक वेळेच्या प्रादेशिक बातम्या, तसंच दर तासाला प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्या हे गोल्ड आणि रेनबोचं आणखी एक ठळक वैशिष्टय़.) ‘आकाशवाणी’ने आणखी एक पाऊ ल टाकत तीन वर्षांपूर्वी या दोन्ही केंद्रांचा कालावधी अहोरात्र केला. ‘विविधभारती’वर पूर्वी लागणारी सदाबहार गाणी दिवसभरच नाही, तर रात्री बारा ते पहाटे सहा या वेळेतही ऐकण्याची सोय झाली. गोल्डला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून अन्य एफएमनाही त्याचं अनुकरण करावं लागलं. यानंतर झाला तो मनोरंजनाचा महास्फोट. बरं, हे मनोरंजन केवळ तरुणांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे असंही नाही किंवा एकाच प्रकारची गाणी लागतात, असा आरोपही कोणी करू शकत नाही. तपशिलातच जायचं तर, ज्यांना पहाटे लवकर उठून भक्तिगीतं, भावगीतं ऐकायची आहेत, त्यांच्यासाठी एफएम रेनबो सज्ज आहे. पहाटे पाच ते सकाळी आठ तब्बल तीन तास या प्रकारची गीतं अखंड सुरू असतात. यानंतर सर्व एफएमवर न संपणारी मैफल सुरू होते. निवेदकाचा आवाज मार्दवपूर्ण असायला पाहिजे, हा समज खोटा ठरवणारी हस्की आवाजाची मलिष्का रेड एफएमवरून श्रोत्यांची सकाळची मरगळ दूर करते. ‘सुहाना सफर विथ अन्नू कपूर’च्या माध्यमातून (बिग एफएम) उत्तमोत्तम गाणी त्यांच्या किश्शांसह ऐकता येतात. अन्नू कपूरचं निवेदन शब्दबंबाळ आणि काहीसं तिखटमीठ लावलेलं असतं, मात्र स्मरणरंजन होतं, हे खरं. मराठी गाण्यांच्या चाहत्यांसाठी एफएम गोल्डवर सकाळी दहा ते दुपारी तीन या कालावधीत पर्वणी असते. दुपारची उन्हं कलल्यानंतर तर या मैफलीत आणखी रंग भरले जातात. लव्ह गुरू (रेडिओ सिटी), पिक्चर पांडे (फिव्हर), यादों का इडियट बॉक्स (बिग एफएम) आदींसह गोल्डवर सलग सुरू असणाऱ्या अवीट गाण्यांच्या कार्यक्रमांमुळे ब्रह्मानंदी टाळी लागते. निद्रानाश असणाऱ्या संगीतप्रेमींनी तर खुशाल उशाशी मोबाइल घेऊन पडावं. रात्री बारानंतरही लता, आशा, रफी, किशोर त्यांच्यासाठी न थकता गात असतात. या महान गायकांची, त्यांना उत्तमोत्तम गाणी देणाऱ्या प्रतिभावान संगीतकारांची, कसलेल्या गीतकारांची महती एफएममुळे रोज नव्याने अधोरेखित होते. म्युझिक सिस्टमवर ठरवून लावलेल्या गाण्यांपेक्षा रेडिओवर नकळत लागलेली आवडती गाणी किती तरी अधिक आनंद देऊन जातात.
रेडिओची ही पालखी सध्या ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या आरजेंमध्ये प्रचंड ऊर्जा व उत्साह आहे. या क्षेत्राचे मापदंड त्यांनी बदलून टाकले आहेत. रेडिओची खरखर आता इतिहासजमा झालीये. आणि केवळ दिवसच नाहीत, तर रात्रीसुद्धा एफएमच्या झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2014 1:04 am

Web Title: fm radio
टॅग Diwali
Next Stories
1 आवाज की दुनिया : आवाज की दुनिया के दोस्तों…
2 वार्षिक भविष्य : दिवाळी २०१४ ते दिवाळी २०१५
3 एक आलिया वेडीशी…
Just Now!
X