मलबारी कॅश्यू कोकोनट स्टय़ू 

साहित्य

दीड वाटी नारळाचे घट्ट दूध
१ लहान गाजर, मध्यम तुकडे
३-४ फरसबी, मध्यम तुकडे
१ लहान बटाटा, सोलून मध्यम तुकडे
७० ग्राम पनीर, मध्यम तुकडे
५० ग्राम लाल भोपळा, लहान तुकडे
मलबार मसाला
१ चमचा मिरीदाणे
१ चमचा लवंग
अर्ध चक्रीफूल
४-५ वेलची
३ चमचे बडीशेप
२ चिमटी जायपत्रीची पूड
२ चिमटी जायफळ पूड
१ दालचिनीची काडी

इतर साहित्य

१ चमचा बटर
१ लहान चमचा आलं-लसूण पेस्ट
२ ते ३ चमचे भरून कांदा, बारीक चिरून
१ चमचा भरून काजू पेस्ट
चवीपुरते मीठ
तळलेले काजू सजावटीसाठी

टीप

मसाला आधी कमीच वापरावा. कारण हा मसाला चवीला उग्र असतो. चव पाहून लागल्यास अजून थोडा घालावा.

कृती

१) मसाल्याचे सर्व साहित्य थोडेसे भाजून घ्यावे. गार झाले की बारीक पावडर करून घ्यावी.
२) कढईत बटर गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट आणि कांदा घालावा. मिनिटभर परतावे. नंतर बटाटा, गाजर, फरसबी घालून परतावे.
३) नारळाचे दूध आणि थोडेसे पाणी घालावे. काजू पेस्ट घालून ढवळावे.
४) भोपळा, पनीर, आणि एक चमचा मसाला घालावा. ५ ते ८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. भाज्या शिजल्या की मीठ घालून आच बंद करावी.
५) स्टय़ू प्लेटमध्ये वाढावे. तळलेल्या काजूंनी सजवावे. सव्‍‌र्ह करताना भाजलेला ब्राऊन ब्रेड आणि भात यांबरोबर सव्‍‌र्ह करावे.

कॉर्न चाऊडर

साहित्य

१ वाटी स्वीट कॉर्न
१/४ वाटी रेड कॅप्सिकम, लहान चौकोनी तुकडे lp35
१/४ वाटी कांदा, बारीक चिरून
१ लहान बटाटा, मध्यम चौकोनी तुकडे
२ ते ३ फरसबीच्या शेंगा, मध्यम तुकडे
३-४ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१/४ ते १/२ चमचा लाल मिरची पावडर
२ चमचे बटर
२ चमचे मैदा
२ ते ३ चमचे साय, फेटून
चवीपुरते मीठ, मिरपूड
चीज आवडीनुसार

कृती

१) स्वीट कॉर्न मायक्रोवेव्हमध्ये दोन मिनिटे वाफवून घ्यावे.
२) बटर पातेल्यात गरम करावे. त्यात आधी बटाटा घालून एक वाफ काढावी. नंतर रेड कॅप्सिकम, कांदा, फरसबी आणि स्वीटकॉर्न घालून मिक्स करावे.
३) १-२ मिनिटे परतून त्यात २ ते ३ वाटय़ा पाणी घालावे. उकळी येऊ द्यावी.
३) वाटीत थोडे पाणी घेऊन त्यात मैदा मिक्स करावा. हे मिश्रण पातेल्यात घालावे. उकळू द्यावे.
४) लाल तिखट, मीठ आणि मिरपूड घालावे. चीज घालून मिक्स करावे. सव्‍‌र्ह करताना किसलेले चीज घालून सजवावे.
५) कॉर्न चाऊडर भाजलेल्या ब्रेडबरोबर सव्‍‌र्ह करावे.

थाई स्टय़ू

साहित्य

२ वाटय़ा नारळाचे घट्ट दूधlp34
२ चमचे तेल
१ लहान चमचा आले-लसूण पेस्ट
२-३ बटण मशरूम, उभे काप
१ टॉमेटो, मोठे तुकडे
१/२ वाटी लाल सिमला मिरची, उभी पातळ चिरून
१ लहान कांदा, बारीक चिरून
ब्रोकोलीचे ७-८ लहान तुरे
७० ग्राम टोफू, चौकोनी तुकडे
१ चमचा थाई रेड करी पेस्ट

कृती

१) तेल कढईत गरम करावे. त्यात कांदा आणि आले-लसूण पेस्ट परतावी.
२) आच एकदम मंद करून रेड करी पेस्ट घालावी. थोडे मिक्स करून टोफू आणि भाज्या घालाव्यात.
३) भाज्या २-३ मिनिटे परताव्यात. नंतर नारळाचे दूध घालावे. मिक्स करून अगदी थोडे पाणी घालावे. मंद आचेवर ५ मिनिटे उकळी काढावी.
भाताबरोबर थाई स्टय़ू सव्‍‌र्ह करावा.

टिपा

१) रेडीमेड थाई करी पेस्टमध्ये मीठ पुरेसे असते. त्यामुळे वेगळे घालावे लागत नाही. जर कमी वाटले तर थोडेसे मीठ घालू शकतो.
२) या स्टय़ूमध्ये टोफूऐवजी चिकनचे लहान तुकडे वापरू शकतो. शिजेस्तोवर मंद आचेवर उकळी काढावी.
वैदेही भावे