lp36कैरीची तुडतुडी
साहित्य- पाव किलो मोठी कैरी, ३५० ग्रॅम गूळ, ५ ते ६ सुक्या लाल मिरच्या, १ चमचा हिंग पावडर, मीठ, १ चमचा बडीशेप, ३ ते ४ लवंगा, २ ते ३ मिरे, दालचिनीचा मोठा तुकडा.

कृती- कैरी धुऊन पुसून सोलून घ्यावी. कैरीच्या पातळ लांब फोडी कराव्यात, गूळ बारीक चिरून ७ ते ८ तास कैरी गूळ एकत्र करून ठेवावा. जाड बुडाच्या कढईत एकत्र ठेवावा. त्यात मीठ, हिंग, लवंग, मिरे, दालचिनी तुकडा, बडीशेप, मिरचीचे तुकडे एकत्र करून घालावेत. गुळाचे पाणी झाले असेल तर ते भांडे गॅसवर मंद आचेवर शिजवावे. चांगले घट्ट झाले की गॅस बंद करावा, आंबट गोड तुडतुडी छान लागते. परत विनातेलाचे लोणचे केव्हाही चांगले वर्षभरही टिकते.

lp38मसाला कैरी-
साहित्य- बाट तयार न झालेल्या छोटय़ा कैऱ्या १० ते १२, १ कप व्हिनेगर, लाल तिखट अर्धी वाटी, ४ टे. स्पून मोहरी डाळ, ३ चमचे मेथी डाळ, ४ चमचे हिंग, ३ टे.स्पून मीठ, १ चमचा हळद, १ वाटी तेल.
कृती- तिखट, मीठ, हिंग, हळद, मोहरी डाळ, मेथी डाळ एकत्र करून त्यावर तेल कडकडीत करून ओतावे. एकजीव करावे. कैऱ्यांना अर्धी चीर द्यावी. त्यात हा मसाला भरावा व बरणीत भरावा. व्हिनेगर घालून गोल दगड त्यात घालावा म्हणजे कैरी बुडेल. मुरल्यावर वाढावे, कैरीचे भाग करून वाढावेत.

lp37टक्कू
साहित्य – कैरी पाव किलो, २०० ग्रॅम गूळ, ५ टे.स्पून तिखट, चवीप्रमाणे मीठ, १ टे.स्पून मोहरी डाळ, १ चमचा मेथी डाळ, तीन चमचे हिंग, २ टे.स्पून तेल, फोडणीसाठी मोहरी, १ चमचा हळद.
कृती- कैरी धुऊन पुसून बारीक फोडी करून मिक्सरच्या भांडय़ात घालाव्यात. गूळ बारीक करून, तिखट, मीठ मिक्सरच्या भांडय़ात घालावे. भरडसर फिरवावे, पसरट तोंडाच्या बरणीत काढावे, तेल चांगले गरम करून त्यात मोहरी तडतडू द्यावी. हिंग, हळद, मोहरी डाळ, मेथी डाळ तेलात घालून ती फोडणी वाटलेल्या कैरीवर घालावी, टक्कू तयार.

lp39मँगो सॅन्डविच
साहित्य- २ हापूस आंबे, १ व्हीट ब्रेड, पनीर स्लाईसेस ४ ते ५ मिक्स फ्रुटजॅम.
कृती- आंबे सोलून फ्रिजमध्ये ठेवून द्यावेत. त्याच्या स्लाईस कराव्यात, ब्रेड स्लाईसला एका बाजून जॅम स्प्रेडरने लावावा, दोन्ही स्लाईसवर पनीर स्लाईस ठेवावी. एका तयार स्लाईसवर मँगोच्या स्लाईस ठेवाव्यात. पनीर ठेवलेली स्लाईस त्यावर उलटय़ा बाजूने ठेवावी. मधून कट दिल्यास आकर्षक ब्रेक फास्टची सोय होते.
 माधुरी प्रमोद गोखले