lp19अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वी दिवाळीला गुलाबी थंडी पडायची. त्या गुलाबी थंडीत लाडू, चिवडा, शेव, चकली, करंज्या, शंकरपाळे, अनारसे असे फराळाचे पदार्थ कसे गट्टम व्हायचे ते कळायचंही नाही. आता गुलाबी थंडी गेली, पण दिवाळी म्हटली की फराळाचे पदार्थ आलेच. पुण्या-मुंबईसारख्या शहरांत आता हे पदार्थ विकत आणायची पद्धत पडायला लागली आहे. एखाद्या घरी शास्त्राला म्हणून दोन-तीन पदार्थ केले जातातच. पुणं-मुंबई वगळता इतरत्र मात्र दिवाळी घरच्या फराळाचीच. 

फराळात शुभचिन्ह म्हणून करंजी सगळ्यात आधी करायची प्रथा आहे. म्हणजे करंजी करून फराळाला सुरुवात केली जाते, पण फराळाचे खरे मानकरी लाडू, चिवडा हेच पदार्थ. कुणालाही फराळाचं बांधून द्यायचं म्हणजे लाडू, चिवडाच बांधून दिला जातो. त्यानंतरचा मान चकलीचा. म्हणजे मानाने चकली नंतरची, पण आवडीत मात्र ती पहिलीच. एक वेळ कुठलाच लाडू आवडत नाही म्हणणारा महाभाग सापडेल, चिवडय़ातला हा प्रकार आवडतो आणि तो आवडत नाही, असं म्हणणारे चोखंदळ खवय्ये सापडतील, पण खुसखुशीत, कुरकुरीत, खमंग चकली आवडत नाही, असं म्हणणारा शोधायला दुर्बीण घेऊनच बाहेर पडावं लागेल.
कुणी काही म्हणा, दिवाळी फराळातला सेलिब्रिटी असतो तो लाडूच. दिवाळीत त्याचे वेगवेगळे प्रकार जिव्हादेवीवर राज्य करतात. या सगळ्या प्रकारांतला स्टार म्हणजे बुंदीचा लाडू. पूर्वी लग्नापासून कोणत्याही समारंभात पंगतीतल्या गोड पदार्थाचा मान बुंदीच्या लाडवाचा असायचा. आचारी घरी बोलवून घरच्या साजूक तुपात बुंदी पाडून नंतर ती साखरेच्या पाकात घातली जायची. त्यात काजूचे नाजूक तुकडे आणि केशराचा हलका हात. तो लाडू जसाजसा मुरत जातो तसतसा रंग-रूप-चव सगळ्याच बाबतीत आनंद देतो. तो आधी असा डोळ्यांनी बघायचा. केशरी रंगाचा सुंदर पोत त्याने पकडलेला असतो. मग तो हातात घेतला की त्या बुंदीचा नाजूकपणा, साखरेचा तलमपणा स्पर्शाने जाणवतो आणि त्याचा तो गंध.. मुरलेली बुंदी, साखर, केशर, वेलदोडे या सगळ्यांच मिश्रणातून येणारा तो सुवास. डोळ्यांना, नाकाला सुखावून तो असा जिभेवर अलगद उतरला की, लाडू खाण्याचा आनंद काय ते समजतं. आता अर्थात असा घरी बुंदी पाडून लाडू बनवण्याचा उपद्व्याप कोण करील? दुकानांमध्ये अगदी साजूक तुपातले बुंदीचे लाडू मिळतात, पण ती सर या लाडवांना नाही हेच खरं.
बुंदीच्या लाडवाखालोखाल घरोघरी केला जाणारा लाडू बेसनाचा. हा तसा करायला सोपा. भरपूर साजूक तुपात बेसन चांगलं खमंग भाजायचं. गॅसवरून उतरवताना दुधाचा हबका द्यायचा. भरपूर वेलदोडे, काजू, बदाम, मनुके घालायचे. पिठीसाखर मिसळायची आणि लाडू वळायला घ्यायचे. बेसन जितकं भाजाल तितका लाडू खमंग आणि तुपाचा हात जितका सैल सोडाल तितका लाडू खाली बसणार. लाडू बसला म्हणजे करणारीने अगदी प्रेमाने तूपबिप भरपूर घालून लाडू केलाय हे समजायचं.
रवा बेसनाचा लाडू मात्र तुलनेत करायला अवघड आणि राजस. तुपात खमंग भाजलेल्या रव्याला भाजलेल्या बेसनाची जोड द्यायची. हात सैल सोडून वेलदोडा घालायचा. इथपर्यंत सगळं ठीक असतं, पण या लाडवाची खरी कसोटी त्याच्या पाकात. जिला एकतारी पाक जमतो ती खरी सुगरण. कारण पाक पक्का झाला तर लाडू हातोडय़ाने फोडायची वेळ येते. कच्चा झाला तर लाडू वळतच नाहीत. अशा वेळी करायचं काय? एखादी जाणती सांगते, एकतारी पाक करायचा. ताटात पाकाचा एक थेंब टाकून तो बोटाने उचलायचा आणि दुसऱ्या बोटावर सरकवायचा. एक तार दिसली की झाला एकतारी पाक. तो पूर्ण पक्काही नाही आणि अगदी कच्चाही नाही. त्या पाकात भाजलेला रवा-बेसन घालून दिवसभर ठेवून द्यायचे आणि नंतर लाडू वळायला घ्यायचे. हा लाडूही पाकात छान मुरतो आणि रंगरूपरसगंधाने एकदम देखणा होऊन जातो आणि जिभेवर ठेवल्यावर असा काही विरघळतो की बास.. लाडूपुराणाचे इतरही मेंबर आहेत, पण दिवाळीत सहसा केले जाणारे लाडू हे तीनच.
त्याच्यानंतर नंबर चिवडय़ाचा. हा चिवडा करण्याची मानसिक तयारी किती तरी आधीपासून गृहिणीला करावी लागते. वरवर ही तयारी सोप्पी वाटली तरी ती असते दमछाक करणारी. पोहे आणा, निवडा, चाळा, उन्हात वाळवा. उन्हात वाळल्याशिवाय ते दादच देत नाहीत. एकदा का ते उन्हात चांगले वाळले, की चिवडा कुरकुरीत होणार याची गॅरंटी. त्याशिवाय खोबऱ्याचे काप, काजूचे काप, कढीपत्ता, शेंगदाणे, डाळं या सगळ्याची तयारी करायची. चिवडय़ाला फोडणी द्यायच्या मात्र वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुणाच्या घरी ही फोडणी तुपाचीच असते, तर कुणाकडे तेलाची. तुपाच्या फोडणीने चिवडय़ाला एक वेगळाच खमंगपणा येतो हे मात्र खरं. तर कुणी लाल तिखट घालून चिवडा करतं, तर कुणी हिरवी मिरची. काही जणांना लसूण हवाच असतो तर काहींना सणासुदीच्या चिवडय़ात लसूण चालत नाही. आपल्या चिवडय़ाच्या चवीची खात्री नसते अशी एखादी सरळ चिवडा मसाला आणून तो चिवडय़ात घालून मोकळी होते, पण असा चिवडा मसाला घरोघरी घातला जायला लागला तर फराळांची देवाणघेवाण होताना प्रत्येक ठिकाणचा चिवडा सारखाच होईल त्याचं काय? पण अजून तरी तसं होत नाही. घरोघरचा चिवडा वेगवेगळ्या चवींचा असतो. शेंगदाणे, डाळं, अधनंमधनं लागणारे काजू यांनी चिवडोबा भलतेच सजतात. त्याच्याबरोबरच बऱ्याच घरी दिवाळीचा चिवडा भाजक्या पोह्य़ांचाच करायची पद्धत आहे. हे भाजके पोहे पातळ पोह्य़ांसारखे उन्हात वाळवावे लागत नसले तरी बाकी सगळा तोच उपद्व्याप करावाच लागतो. मुख्य म्हणजे आजच्या डाएट कॉशस आणि मधुमेहपीडित जमान्यात लाडूच्या तुलनेत चकली-चिवडाच बाजी मारून जातात.
चकली तशी सगळ्यांचीच लाडकी, पण करणारीचा मात्र कस पाहते. कारण चकली सगळ्यांनाच जमणं तसं सोपं काम नाही. मुळात भाजणी जमायला हवी. वेगवेगळ्या धान्यांचं प्रमाण नेमकं जमायला हवं. ते जमलं की ती परफेक्ट भाजता यायला हवीत. थोडं कमी भाजलं तर चकल्या फिकट दिसणार, शिवाय खमंगही होणार नाहीत. थोडं प्रमाणापेक्षा जास्त भाजलं तर चकल्या काळपट होणार. प्रसन्न सोनेरी रंगाच्या चकल्या जमायला भाजणीतल्या धान्याचं प्रमाण आणि नंतर भाजणं हे दोन्ही जमायला हवं. ते जमलं की चकलीचं पीठ मळायचं. त्यातही तिखट, मिठाचं प्रमाण, तीळ आणि मोहन नेमकं पडायला हवं. मग गरम पाण्यात ते पीठ मळायचं आणि सोऱ्यातून काढलेल्या चकल्या कढईत सोडायच्या. पुढचं दिव्य म्हणजे त्या नीट तळल्या जाणं. पहिलीच चकली तेलात विरघळली नाही म्हणजे सगळं नीट जमून आलंय.. मग त्या खमंग, खुसखुशीत चकल्या करणारीच्या चेहऱ्यावरचं आणि खाणाऱ्यांचं समाधानही जमून येतं.
करंजीबाईंना दिवाळी फराळात मानाचं स्थान असलं तरी करंजी काही सगळ्यांनाच आवडते असं नाही, पण म्हणून करंजी करण्याचं कसब विसरून चालत नाही. मैद्याच्या पातळ पारीमध्ये सारण भरून ती पारी नाजूक हातांनी बंद करून तळायची, हे वाटतं तितकं सोप्पं नाही. पिठीसाखर, किसलेलं सुकं खोबरं, वेलदोडे यांचं सारण परफेक्ट भरता आलं पाहिजे ना. म्हणजे बघताना ते परफेक्टच वाटतं, पण करंजी जेव्हा तळायला कढईत पोहोचते तेव्हा सारण कमी असेल तर तिचा खुळखुळा होतो. सारण जास्त झालं आणि कढईत गेल्यावर ते पिठाला सहन नाही झालं तर रुसून ती करंजी कढईतच फुटते आणि मग सगळं मुसळ केरात, पण सगळं फक्कड जमून आलं तर अश्शा करंज्या सुरेख बाई माहेरी धाडाव्या अस्सं समाधान करणारीच्या चेहऱ्यावर पसरतं. दिवाळीच्या फराळाच्या ताटाची शोभा करंजी वाढवते खरी, पण जातीच्या खवय्यांना करंजी आवडते ती ओल्या नारळाची, तोंडात ठेवलं की विरघळणारी. अर्थात ती काही दिवाळीच्या दिवसांत होत नाही.
अनारसे तर आता फराळाच्या ताटातून हळूहळू गायबच होत चालले आहेत. कारण ते जमणंही असं सहजसोपं नाही. तांदूळ कुटण्यापासून अनारसा कढईत न विरघळता नीट तळला जाईपर्यंत प्रत्येक पायरीवर धाकधूक वाढवतो, पण खसखशीचं नाजूक आच्छादन घेतलेला अनारसा एकदा जमला की क्या बात है.. शंकरपाळी हा तसा फराळातला लिंबूटिंबू आयटम. एरवी खुसखुशीत शंकरपाळी समोर आली तर चहाबरोबर बशीभर सहज संपतात, पण फराळाच्या ताटातली शंकरपाळी मात्र तोंडात टाकली काय आणि नाही टाकली काय सारखंच.
तर असं हे फराळाचं ताट गोड मानून घ्या…