फिफा विश्वचषकाच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी ३२ संघ आता तय्यार आहेत. फुटबॉलवर निस्सीम प्रेम करणाऱ्या ब्राझीलनगरीत १२ जून ते १३ जुलै २०१४ या कालावधीत हा फुटबॉल महासंग्राम रंगणार आहे. १९५०नंतर दुसऱ्यांदा ब्राझील यजमानपद भूषवत आहे. ब्राझीलची स्पध्रेच्या संयोजनासाठी बिनविरोधपणे निवड झाली आहे. पात्रता फेरीचा अडथळा पार करून ३१ संघांनी आपले विश्वचषकातील स्थान पक्के केले, यजमान ब्राझीलला थेट प्रवेश मिळाला. या एकंदर ३२ संघांना प्रत्येकी चार संघांचा एक गट याप्रमाणे आठ गटांमध्ये विभागण्यात आले आहे. ब्राझीलमधील १२ शहरांमध्ये हे ६४ सामने रंगणार आहेत. याचप्रमाणे गोल-लाइन तंत्रज्ञानाचा यावेळी प्रथमच वापर होणार आहे.
१९३०पासून आजमितीपर्यंत जगज्जेतेपद प्राप्त करणारे सर्वच संघ यावेळी आपले नशीब आजमावताना दिसणार आहेत. ब्राझील, अर्जेटिना, जर्मनी, स्पेन, इटली, उरुग्वे, नेदरलँड्स आणि पोर्तुगालकडून यंदा विशेष अपेक्षा करण्यात येत आहे. २०१०मध्ये झालेल्या मागील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्पेनने नेदरलँड्सचा १-० असा पराभव करून विश्वविजेतेपद प्राप्त केले होते. ते जगज्जेतेपद टिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

ग्रुप A

ब्राझील
यजमानपद भूषवणारा ब्राझीलचा संघ फिफा विश्वचषकासाठी थेट पात्र ठरला असून, कॉन्फेडरेशन चषक जेतेपदानंतर विक्रमी सहावे विश्वचषक अजिंक्यपद जिंकण्यासाठी हा संघ उत्सुक आहे. २००२मध्ये प्रशिक्षक स्कोलारीने ब्राझीलला जगज्जेतेपद जिंकून दिले होते, यंदा ही पुनरावृत्ती होणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. बार्सिलोनाचा आघाडीवीर नेयमारची कामगिरी विश्वचषकातही प्रभावी ठरली तर ब्राझीलला जगज्जेतेपदापासून कुणीही रोखू शकणार नाही.

सर्वोत्तम कामगिरी : १९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२ विजेते.
प्रशिक्षक :
लुइझ फिलिपे स्कोलारी.
स्टार खेळाडू : नेयमार.

क्रोएशिया
फ्रान्समध्ये १९९८मध्ये झालेल्या फिफा विश्वचषक स्पध्रेत क्रोएशियाने अनपेक्षितपणे तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली होती. परंतु त्यानंतर ती कामगिरी त्यांना कधीच करता आली नव्हती. सध्याच्या क्रोएशिया संघात बायर्नचा मारिओ मँडझुकीक आणि रिअल माद्रिदचा ल्युका मॉड्रिक अशी गुणवत्ता आहे. परंतु तरीही या संघाची ९८च्या संघाशी तुलना होऊ शकणार नाही.

प्रशिक्षक : निको कोव्हाक.
स्टार खेळाडू : मारिओ मँडझुकीक.
सर्वोत्तम कामगिरी : १९९८मध्ये तिसरे स्थान.

मेक्सिको
पात्रता फेरीचा टप्पा मेक्सिकोसाठी जितका खडतर होता, तितकाच मुख्य स्पध्रेचा टप्पासुद्धा त्यांच्यासाठी आव्हानकारक असणार आहे. गटसाखळीमधून पुढे जाण्यासाठी मेक्सिकोला ब्राझील आणि क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवण्याची नितांत आवश्यकता आहे. अनुभवी आणि उदयोन्मुख खेळाडूंसह या संघाची समतोल बांधणी झाली आहे. मँचेस्टर युनायटेडचा आघाडीपटू जेव्हियर हर्निडाझ हा ब्राझीलसाठीही धोकादायक ठरू शकेल.

प्रशिक्षक : मिग्युएल हेरेरा.
स्टार खेळाडू :
जेव्हियर हर्निडाझ.
सर्वोत्तम कामगिरी : १९७०, १९८६मध्ये उपांत्यपूर्व फेरी.

कॅमेरून
फिफा विश्वचषकात कॅमेरूनचा संघ पाचव्यांदा खेळत आहे. परंतु सॅम्युएल इटोचा खेळ पाहण्याची ही फुटबॉलरसिकांना अखेरची संधी असेल. फुटबॉलच्या या सर्वोच्च व्यासपीठावर इटो संघाला चांगले यश मिळवून देऊ शकतो, परंतु ‘अ’ गटातील बलाबल पाहता या संघाकडून माफक अपेक्षा करण्यात येत आहेत. १९९०मध्ये कॅमेरूनने आश्चर्यकारक कामगिरीचे प्रदर्शन करीत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत आगेकूच केली होती. इटोचा सुवर्णकाळ जरी आता ओसरत असला तरी स्टीफन मबिया, अ‍ॅलेक्स साँग आणि जीन मॅकॉन यांच्यासारखे खेळाडू या संघात आहेत.

प्रशिक्षक : व्होल्कर फिंके
स्टार खेळाडू : सॅम्युएल इटो.
सर्वोत्तम कामगिरी : १९९०मध्ये उपांत्यपूर्व फेरी.

ग्रुप B

स्पेन
इकर कॅसिल्लासच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या स्पेनसाठी गटसाखळीतील आव्हान फारसे कठीण नसेल. परंतु ‘ब’ गटातील हॉलंडविरुद्धचा त्यांचा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. २०१४ च्या विश्वचषकासाठी संभाव्य विजेत्यांच्या पंक्तीतसुद्धा त्यांचे स्थान आहे. पण हा संघ जगज्जेतेपदाची पुनरावृत्ती करू शकेल का, याविषयी मात्र सर्वाच्याच मनात साशंकता आहे. आंद्रेस इतिनएस्टा, डेव्हिड व्हिला आणि झ्ॉव्हीसारख्या दर्जेदार खेळाडूंचा खेळ यावेळीसुद्धा पाहायला मिळावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. परंतु आता नव्या खेळाडूंची फळीसुद्धा स्पेनच्या यशासाठी कार्यरत झाली आहे.

प्रशिक्षक : व्हिसेंट डेल बॉस्क्यू.
स्टार खेळाडू : आंद्रेस इनिएस्टा.
सर्वोत्तम कामगिरी : २०१०मध्ये विजेते.

हॉलंड
मागील विश्वचषकातील विजेते स्पेन आणि उपविजेते हॉलंड हे दोन्ही संघ एकाच गटात आल्यामुळे या गटातील चुरस कायम असेल. अनेक डच खेळाडूंचा हा अखेरचा विश्वचषक असल्यामुळे ते आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतील. नेदरलँड्सच्या संघाला जगज्जेतेपद टिकवायचे असेल तर बचावात सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच या संघाला गटबाजीने पोखरले असून, त्यामुळेच युरो-२०१२मध्ये त्यांचे अतोनात नुकसान झाले. गटातील सर्वच सामने त्यावेळी त्यांनी गमावले होते.

प्रशिक्षक : लुइस व्हान गाल.
स्टार खेळाडू : रॉबिन व्हान पर्सी.
सर्वोत्तम कामगिरी : १९७४, १९७८ आणि २०१०मध्ये उपविजेते.

चिली
सलग दुसऱ्यांदा चिली विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. स्पेन आणि नेदरलँड्स यांच्यासारख्या बलाढय़ संघांपुढे चिलीची ताकद कमी पडणार त्यामुळे गटसाखळीचा अडसर पार करणे त्यांच्यासाठी मुश्कील ठरणार आहे. अर्जेटिनाच्या जॉर्ज सँपॉली यांना प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून या संघाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. अ‍ॅलेक्स सांचेझने बार्सिलोनातर्फे खेळताना यंदाच्या मोसमात चांगली चुणूक दाखवली आहे. या पाश्र्वभूमीवर चिली संघ ‘डार्क हॉर्स’ ठरल्यास वावगे ठरणार नाही.

प्रशिक्षक : जॉर्ज सँपॉली.
स्टार खेळाडू : अ‍ॅलेक्स सांचेझ.
सर्वोत्तम कामगिरी : १९६२मध्ये तिसरे स्थान.

ऑस्ट्रेलिया
फिफा विश्वचषक स्पध्रेतील ऑस्ट्रेलियाचा हा एकंदर चौथा आणि सलग तिसरा सहभाग. २००६मध्ये ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती, हीच त्यांची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. ‘ब’ गटातील स्पेन, नेदरलँड्स आणि चिली ही आव्हाने पेलणे त्यांच्यासाठी कठीण आहे. आशियाई विभागातून
ऑस्ट्रेलियाचा संघ इथवर पोहोचला आहे. काही मैत्रीपूर्ण लढतींमध्ये पत्करलेल्या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर होल्गर ओसीक यांचे प्रशिक्षकपद गेले. त्यानंतर अँगे पोस्टेकोग्लोऊ यांच्याकडे ही सूत्रे सोपवण्यात आली
आहेत.

प्रशिक्षक : अँगे पोस्टेकोग्लोऊ.
स्टार खेळाडू रॉबी क्रूसे.
सर्वोत्तम कामगिरी : २००६मध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत.

ग्रुप C

कोलंबिया
फिफा विश्वचषकातील हा कोलंबियाचा पाचव्यांदा सहभाग असेल. १९९०मध्ये या संघाने अंतिम १६ संघांमध्ये स्थान मिळवले होते, हीच त्यांची आतापर्यंतची पुंजी. पात्रता फेरीतील कोलंबियाचा प्रवास हा स्वप्नवत असाच होता. अर्जेटिनापाठोपाठ हा संघ दुसऱ्या स्थानावर होता. परंतु या दोन्ही संघांमधील गुणांचा फरक हा फक्त दोनच गुणांचा होता. त्यामुळे जोस पीकरमॅनच्या मार्गदर्शनाखालील कोलंबियाला गटसाखळीचा अडसर पार करणे जड जाणार नाही. रॅडामेल फाल्काओची गोल झळकावण्याची भन्नाट क्षमता आणि जेम्स रॉड्रिगझची गुणवत्ता कोलंबियाला तारणारी ठरू शकेल.

प्रशिक्षक : जोस पीकरमॅन.
स्टार खेळाडू : रॅडामेल फाल्काओ.
सर्वोत्तम कामगिरी : १९९०मध्ये उपउपांत्यपूर्व फेरी.

आयव्हरी कोस्ट
आयव्हरी कोस्टाला विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न साकारण्याची अखेरची संधी दिदियर ड्रोग्बापुढे असे. हे घडणे खूप कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही. आयव्हरी कोस्टचा संघ अतिशय समतोल आहे. पात्रता फेरीत त्यांना अनेक कणखर संघांना सामोरे जावे लागले होते. त्यांनी सेनेगलसारख्या संघालाही या वाटचालीत हरवले आहे. गटसाखळीचा टप्पा आयव्हरीला ओलांडता येऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करता येऊ शकते.

प्रशिक्षक : सबरी लॅमॉन्ची.
स्टार खेळाडू : याया टॉरी.
सर्वोत्तम कामगिरी : २००६, २०१०मध्ये गटसाखळी.

ग्रीस
पात्रता फेरीत ग्रीसचा संघ बोस्नियासोबत पहिल्या स्थानावर बरोबरीत होता. परंतु एकमेकांशी झालेल्या लढतींआधारे बोस्नियाला फायदा झाला. त्यामुळे ग्रीसला रोमानियाविरुद्धच्या प्ले-ऑफ फेरीला सामोरे जावे लागले. हा अडथळा पार करून ते विश्वचषकास पात्र ठरले आहेत. गोल नोंदवणे ही ग्रीसची प्रमुख समस्या आहे. त्यामुळे जॉर्जस समारस आणि अनुभवी दिमित्रिस सॅल्पिंगिडिस यांच्यावरील दडपण हे अधिक असेल. हे सारे जुळून आले तर ग्रीसचा संघ गटसाखळीतून पुढे जाऊ शकेल.

प्रशिक्षक : फर्नाडो सांतोस.
स्टार खेळाडू : जॉर्जस समारस.
सर्वोत्तम कामगिरी : १९९४ आणि २०१०मध्ये गटसाखळी.

जपान
जपानची पात्रता फेरीतील कामगिरी अतिशय चांगली झाली. ‘क’ गटात तसा जपानचा संघ वेगळय़ा धाटणीचा संघ आहे. या संघातील युवा गुणवत्तेकडे सर्वाना चकित करण्याची क्षमता आहे. अल्बटरे झ्ॉकेरोनीने जपानच्या संघाचा कायापालट करून एक बलाढय़ संघ उदयास आणला आहे. मागील हंगामात झालेल्या कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पध्रेतील तीनपैकी तीन सामन्यांत त्यांनी हार पत्करली होती. त्यामुळे उच्चस्तरावर हा संघ कितपत कमाल करू शकतो, याबाबत सर्वानाच साशंका आहे.

प्रशिक्षक : अल्बटरे झ्ॉकेरोनी.
स्टार खेळाडू : किस्युके होंडा.
स्पध्रेतील सर्वोत्तम कामगिरी : २००२ आणि २०१०मध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत.

ग्रुप D

कोस्टा रिका.
फिफा विश्वचषकामध्ये कोस्टा रिका हा संघ चौथ्यांदा सहभागी झाला आहे. पात्रता फेरीत अमेरिकेपाठोपाठ हा संघ दुसऱ्या स्थानावर होता. इटली आणि इंग्लंडसारख्या संघांचे आव्हान पेलणे त्यांना जड जाईल, असे म्हटले जात आहे. १९९०मध्ये झालेल्या विश्वचषक स्पध्रेत या संघाने कमाल केली होती. स्वीडन आणि स्कॉटलंडसारख्या संघांना पराभूत करून या संघाने बाद फेरीत स्थान मिळवले होते. संघाच्या खेळापेक्षाही प्रतिस्पर्धी संघांच्या कच्च्या दुव्यांचा अभ्यास त्यांना करावा लागणार आहे.

प्रशिक्षक : जॉर्ज लुइस पिंटो.
स्टार खेळाडू : ब्रायन रुइझ.
सर्वोत्तम कामगिरी : १९९०मध्ये उपउपांत्यपूर्व फेरी.

इंग्लंड
पात्रता फेरीत हा संघ अव्वल स्थानावर होता. युक्रेनपेक्षाही अधिक गुणांसह इंग्लंडने आपले फिफा विश्वचषकातील स्थान नक्की केले होते. १९६६च्या विश्वचषक स्पध्रेत मायदेशात इंग्लंडने विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. परंतु यंदा हा संघ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहाचू शकेल, पण जेतेपद प्राप्त करण्याइतपत क्षमता या संघात नाही. क्लब फुटबॉलमध्ये अनेक इंग्लिश खेळाडू महत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसतात. वेन रुनी, फ्रँक लॅम्पर्ड यांच्यासारख्या खेळाडूंचा इंग्लंड संघात समावेश आहे.

प्रशिक्षक : रॉय हॉडसन.
स्टार खेळाडू : वेन रूनी.
सर्वोत्तम कामगिरी : १९६६मध्ये विजेता.

इटली
सीसारे प्रान्डेली यांच्या मार्गदर्शनाखाली उतरणाऱ्या इटलीच्या संघाने २०१२मध्ये युरो चषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. त्यामुळे ब्राझीलचा सर्वाधिक पाच विश्वचषक जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी इटलीला यंदा चांगली संधी आहे. विश्वचषक पात्रता फेरीत या संघाला कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. डेन्मार्कपेक्षा सहा अधिक गुण इटलीच्या खात्यावर होते. यंदाच्या विश्वचषकासाठीसुद्धा एक दावेदार म्हणून या संघाकडे पाहिले जात आहे.

प्रशिक्षक : सीसारे प्रान्डेली.
स्टार खेळाडू : मारिओ बालोटेली.
सर्वोत्तम कामगिरी : १९३४, १९३८, १९८२, २००६मध्ये विजेते.

उरुग्वे
पात्रता फेरीमध्ये उरुग्वेला अतिशय झगडावे लागले होते. त्यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे जॉर्डनविरुद्धच्या प्ले-ऑफ सामन्याला त्यांना सामोरे जावे लागले होते. परंतु उरुग्वेने जॉर्डनला ५-० अशी आरामात धूळ चारून विश्वचषकातील आपले स्थान पक्के केले होते. या गटात इटली आणि इंग्लंडसारख्या संघांचा समावेश असल्यामुळे उरुग्वेला पुढील फेरीत जाणे आव्हानात्मक ठरणार आहे. परंतु हा संघ धक्कादायक कामगिरी नोंदवून सर्वाचे लक्ष मात्र सहजगत्या वेधू शकतो. २०११मध्ये झालेल्या कोपा अमेरिका चषकाचे जेतेपद उरुग्वेच्या खात्यावर जमा आहे. एडिन्सन कावानी आणि लुइस सुआरेझसारख्या खेळाडूंमुळे या संघाला कमी लेखून चालणार नाही. ब्राझीलमध्ये १९५०मध्ये झालेल्या विश्वचषक स्पध्रेत उरुग्वेनेच जेतेपद जिंकले होते.

प्रशिक्षक : ऑस्कर वॉशिंग्टन ताबारेझ.
स्टार खेळाडू : एडिन्सन कावानी.
सर्वोत्तम कामगिरी : १९३० आणि १९५०मध्ये विजेते.

ग्रुप E

स्वित्र्झलड
विश्वचषकाच्या मुख्य स्पध्रेत खेळणाऱ्या ३२ संघांच्या प्रशिक्षकांपैकी ऑटमार हिट्झफेल्ड हे एक अनुभवी प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. पात्रता फेरीचा अडसर स्वित्र्झलडने विनासायास पार केला. पात्रतेच्या १० सामन्यांपैकी ७ सामने या संघाने जिंकले, तर एकही सामना त्यांनी गमावला नव्हता. दुसऱ्या स्थानावरील आइसलँडपासून ते ७ गुणांनी आघाडीवर होते. यंदा १०व्यांदा हा संघ विश्वचषकात सहभागी झाला आहे. फ्रान्ससह हा संघ गटसाखळीतून आगेकूच करू शकेल.

प्रशिक्षक : ऑटमार हिट्झफेल्ड.
स्टार खेळाडू : शेरडान शाकिरी.
सर्वोत्तम कामगिरी : १९३४, १९३८, १९५४मध्ये उपांत्यपूर्व फेरीत.

इक्वेडोर
पात्रता फेरीतील अखेरचा सामना इक्वेडोरने गमावला, तरीही गोलफरकांमध्ये आघाडी घेत या संघाने विश्वचषकात थेट प्रवेश मिळवला. अ‍ॅन्टोनिओ व्हॅलेन्सिया, ख्रिस्तियाना नोबोआ आणि फिलिपे कॅकेडो यांच्यासारख्या गुणी खेळाडूंवर इक्वेडोरची मदार आहे. तीन वेळा हा संघ विश्वचषकात सहभागी झाला होता. यापैकी २००६मध्ये या संघाने दुसरी फेरी गाठली होती. वेग, कौशल्य आणि ऊर्जा या बळावर प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदण्याची क्षमता या संघात आहे.

प्रशिक्षक : रिनाल्डो रूएडा.
स्टार खेळाडू : अ‍ॅन्टोनिओ व्हॅलेन्सिया.
सर्वोत्तम कामगिरी : २००६मध्ये दुसरी फेरी.

फ्रान्स
पात्रता फेरीच्या सुरुवातीला फ्रान्सचा संघ झगडत होता. परंतु त्यानंतर मात्र या संघाचा प्रवास सुकर झाला. प्ले-ऑफमध्ये फ्रान्सने युक्रेनला हरवले. फ्रान्सकडे जगज्जेतेपदाचा दावेदार म्हणूनच पाहिले जात आहे. १९९८मध्ये घरच्या मैदानावर जेतेपद जिंकणाऱ्या या संघाचे धारदार आक्रमण प्रतिस्पर्धी संघाची डोकेदुखी ठरू शकते. फ्रान्सचा दबदबा पाहता गटसाखळीतील अव्वल स्थानासह हा संघ बाद फेरीत पोहोचू शकेल.

प्रशिक्षक : दिदियर डीसचॅम्पस्.
स्टार खेळाडू : फ्रँक रिबेरी.
सर्वोत्तम कामगिरी : १९९८ मधील विजेते.

होंडुरास
होंडुरासचा संघ तिसऱ्यांदा विश्वचषकात आपले नशीब आजमावत आहे. पात्रता फेरीतील चौथ्या फेरीत हा संघ तिसऱ्या स्थानावर होता. परंतु मेक्सिकोसोबत प्ले-ऑफ सामने या संघाला खेळावे लागले आणि त्यानंतर हा संघ पात्र ठरला. होंडुरासचा संघ या स्पध्रेत आपले कर्तृत्व दाखवू शकेल, याबाबत कुणालाही विश्वास नाही. परंतु विश्वचषक स्पध्रेत नवे तारे उदयास येतात, हीच गोष्ट या संघाला सार्थ ठरू शकेल.

प्रशिक्षक : लुइस फर्नाडो सुआरेझ.
स्टार खेळाडू : विल्सन पालासिओस.
सर्वोत्तम कामगिरी : १९८२, २०१०मध्ये गटसाखळी.

ग्रुप F

अर्जेटिना
फ-गटातून गटविजेत्याच्या थाटात अर्जेटिनाचा संघ पुढच्या फेरीत गेल्यास त्याचे कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. लिओनेल मेस्सीच्या या संघाकडे विश्वचषक जिंकण्याची क्षमता आहे. पात्रता फेरीतील १६ सामन्यांतून ३२ गुण कमवत या संघाने फिफा विश्वचषकात स्थान मिळवले. क्लब फुटबॉलमध्ये आपल्या जादुई खेळाची भुरळ गेल्या काही वर्षांत मेस्सीने पाडली आहे, हीच अदाकारी येत्या विश्वचषकात दिसेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. प्रशिक्षक अलेजँड्रो सॅबेल्ला यांच्याकडे संघात आक्रमणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु अव्वल प्रतिस्पध्र्याशी सामना करण्याजोगा बचाव त्यांच्याकडे नाही.

प्रशिक्षक : अलेजँड्रो सॅबेल्ला.
स्टार खेळाडू : लिओनेल मेस्सी.
सर्वोत्तम कामगिरी : १९७८, १९८६मध्ये विजेते.

बोस्निया आणि हेझर्ेेगोव्हिना
१९९०च्या दशकात युगोस्लाव्हियापासून स्वतंत्र झालेला हा देश यंदा प्रथमच फिफा विश्वचषकात आपले नशीब आजमावत आहे. मँचेस्टर सिटीचा आक्रमणपटू एडिन झेकोवर या संघाची प्रमुख मदार असेल. याशिवाय मध्यरक्षक मिरालेम पजानिक आणि कर्णधार इमिर स्पाहिक हेसुद्धा संघातील महत्त्वाचे खेळाडू आहेत. या गटातून अर्जेटिनाचा संघ सहज आगेकूच करेल. मात्र दुसऱ्या स्थानासाठी उर्वरित तीन संघांमध्ये चुरस असेल. त्यामुळे ५९ वर्षीय प्रशिक्षक सॅफेट स्युसिक यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा करण्यात येत आहे.

प्रशिक्षक : सॅफेट स्युसिक.
स्टार खेळाडू : एडिन झेको.
सर्वोत्तम कामगिरी : यंदा पहिलीच स्पर्धा.

इराण
१९९८मधील विश्वचषकात इराणने चक्क अमेरिकेला पराभूत करण्याची किमया साधली होती. हा एकमेव विजय इराणच्या खात्यावर जमा आहे, परंतु तरी कार्लोस क्वीरोझच्या मार्गदर्शनाखाली हा संघ यंदा गटसाखळीचे शिवधनुष्य सहज पेलेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. पात्रता फेरीत इराणने आठ सामन्यांपैकी ५ विजय आणि एक बरोबरी करीत सर्वाधिक १६ गुणांसह आपले विश्वचषकातील स्थान निश्चित केले. इराणने प्रतिस्पर्धी संघांना फक्त २ गोल लगावण्याची संधी देऊन आपल्या दर्जेदार बचावाची चुणूक दाखवली. परंतु समस्या आक्रमणाची आहे. कारण त्यांना फक्त ८ गोलच नोंदवता आले होते. कार्लोस क्वेरोझ यांनी इराणच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर जन्माने इराणी असलेल्या अनेक परदेशी खेळाडूंना राष्ट्रीय संघात आणण्याची करामत केली.

प्रशिक्षक : कार्लोस क्यरोझ.
स्टार खेळाडू : जवाद नीकोनॅम.
सर्वोत्तम कामगिरी : १९७८, १९९८, २००६मध्ये गटसाखळी.

नायजेरिया
नायजेरियाला विश्वचषक स्पध्रेत पाहून आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. त्यांचा संघ अतिशय मजबूत आहे. कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत ते आपला प्रभाव पाडू शकले नव्हते. यंदाचा आफ्रिकन नेशन्स चषक नायजेरियाने जिंकण्याची किमया साधली आहे. पात्रता फेरीतील अखेरच्या टप्प्यात त्यांचा सामना इथिओपियाशी झाला. परंतु त्यांनी दोन्ही सामने जिंकून विश्वचषकात स्थान मिळवले. व्हिक्टर मोसेस हा फ क्त २२ वर्षांचा आहे, परंतु त्याच्यातील गुणवत्ता असामान्य आहे. गोलरक्षक आणि कर्णधार व्हिन्सेंट इनयीमाने संघाला स्थैर्य दिले आहे.

प्रशिक्षक : स्टीफन केशी.
स्टार खेळाडू : व्हिक्टर मोसेस.
सर्वोत्तम कामगिरी : १९९४, १९९८मध्ये दुसऱ्या फेरीत.

ग्रुप G

जर्मनी
जर्मनीच्या संघाची गेल्या काही वर्षांतील कामगिरी आणि प्रगती पाहता या संघाने विश्वचषक जिंकल्यास त्याचे कुणालाही आश्चर्य वाटू नये. पहिल्या फेरीत या संघाला पोर्तुगालचे प्रमुख आव्हान असेल. तसे या गटाला ग्रुप ऑफ डेथ असेही अनेकांनी म्हटले आहे. थॉमस म्युलर, बेस्टिन श्वेनस्टेगर, मिरोस्लाव्ह क्लोज यांच्यासारख्या नावाजलेल्या खेळाडूंचा या संघात भरणा आहे. १७ विश्वचषकांमध्ये सहभागी होण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या जर्मनीच्या खात्यावर तीन जेतेपदे तर चार उपविजेतेपदे आहेत.

प्रशिक्षक : जोआकिम लो.
स्टार खेळाडू : मेस्यूट ओझिल.
सर्वोत्तम कामगिरी : १९५४, १९७४, १९९० मध्ये विजेते. (सर्व पश्चिम जर्मनीला)

पोर्तुगाल
पोर्तुगालचा संघ जगातील कोणत्याही महाशक्तीला धूळ चारू शकतो, परंतु हे सारे काही ख्रि्रस्तियानो रोनाल्डोच्या खेळामुळेच शक्य होऊ असते. त्यामुळेच ‘वन मॅन आर्मी’ असा शिक्का या संघावर बसला आहे. पोर्तुगालचा संघ विश्वचषकात पात्र ठरला, तोच मुळी रोनाल्डोच्या आठ गोलमुळे. विश्वचषक पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यात ‘फ’ गटात समावेश झालेल्या पोर्तुगालला रशियापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. १९६६मध्ये पोर्तुगालच्या संघाने विश्वचषकात पदार्पण केले आणि चक्क उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. परंतु वेम्बले स्टेडियमवर इंग्लंडने त्यांचा पराभव करून मग जगज्जेतेपदाकडे वाटचाल केली. आक्रमकता, वेग आणि क्षमता ही पोर्तुगालच्या यशाची त्रिसूत्री आहे.

प्रशिक्षक : पावलो बेंटो.
स्टार खेळाडू : ख्रिस्तियानो रोनाल्डो.
सर्वोत्तम कामगिरी : १९६६मध्ये तिसरा.

घाना
घाना तिसऱ्यांदा विश्वचषक स्पध्रेत सहभागी झाला आहे. मागील विश्वचषक स्पध्रेत घानाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु उपांत्य फेरी गाठण्यात त्यांना दुर्दैवाने अपयश आले होते. उरुग्वेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी पेनल्टी शूट-आऊट्समध्ये हार पत्करली होती. त्यामुळे गटातील सर्वच संघांवर घानाचे दडपण असेल. आफ्रिकेच्या खंडाची ताकद आणि ओळख म्हणजे घानाची कामगिरी अशा प्रकारे या संघाकडे पाहिले जात आहे. कर्णधार असामोह ग्यानने पात्रता फेरीमध्येही संघाला आवश्यक कामगिरी केली होती. याशिवाय मध्यरक्षक मायकेल इसेन याच्यावरही संघाची मदार असेल.

प्रशिक्षक : जेम्स क्वेसी अपय्या.
स्टार खेळाडू : असामोह ग्यान.
सर्वोत्तम कामगिरी : २०१०मध्ये उपांत्यपूर्व फेरी.

अमेरिका
या आव्हानात्मक गटात अमेरिकेकडे ‘अंडरडॉग’ म्हणूनच पाहिले जाऊ शकते. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या अमेरिकेकडे महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवण्याची क्षमता आहे. २०१०च्या विश्वचषकात दुसऱ्या फेरीत मजल मारणाऱ्या अमेरिकेकडून त्यामुळेच मोठय़ा अपेक्षा करण्यात येत आहेत. १९३०मध्ये या संघाने तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली होती, परंतु या कामगिरीची पुनरावृत्ती त्यांना अद्याप करता आलेली नाही. ज्युर्गेन क्लिन्समॅनचा संघ पात्रता फेरीत प्रारंभी डगमगला होता, परंतु नंतर मात्र त्यांनी आरामात तो अडसर पार केला. उपांत्यपूर्व फेरी गाठणे, हे या संघाचे महत्त्वाचे लक्ष्य असेल.

प्रशिक्षक : ज्युर्गेन क्लिन्समॅन.
स्टार खेळाडू : क्लिंट डेंपसे.
सर्वोत्तम कामगिरी : १९३०मध्ये तिसरे स्थान.

ग्रुप H

बेल्जियम
बेल्जियमचा संघ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचू शकतो. आव्हानात्मक ठरू शकेल, अशा युवा खेळाडूंचा भरणा या संघात आहे. पात्रता फेरीत अव्वल स्थानासह हा संघ फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. मार्क विल्मॉट्सच्या मार्गदर्शनाखाली हा संघ यंदा पराक्रम दाखवू शकेल. पहिल्यावहिल्या विश्वचषकात सहभागी झालेला हा संघ आतापर्यंत ११ विश्वचषकात सहभागी झाला आहे. कागदावर हा संघ अतिशय बलवान वाटतो. नासीर चॅडली आणि एडीन हॅझार्ड यांच्यावर बेल्जियमच्या संघाची मदार असेल.

प्रशिक्षक : मार्क विल्मॉट्स.
स्टार खेळाडू : एडीन हॅझार्ड.
सर्वोत्तम कामगिरी : १९८६मध्ये चौथा.

अल्जेरिया
२०१०च्या विश्वचषकानंतर हा संघ पुन्हा आपले नशीब आजमावत आहे. पात्रता फेरीत झगडून हा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. आफ्रिकन नेशन्स चषक स्पध्रेत अल्जेरिया संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. मजिद बॉघेरावर अल्जेरियाची मदार असेल. हा संघ या आधी तीन वेळा पहिल्या फेरीचा अडसरसुद्धा ओलांडू शकला नव्हता. त्यामुळे बेल्जियम, रशिया आणि दक्षिण कोरियापुढे अल्जेरियाचा कस लागेल.

प्रशिक्षक : वहिद हॅलिलहोझिक.
स्टार खेळाडू : मजिद बॉघेरा.
सर्वोत्तम कामगिरी : १९८२, १९८६, २०१०मध्ये साखळी फेरीत.

रशिया
पात्रता फेरीचा प्रवास रशियासाठी खडतर होता. परंतु पोर्तुगालपेक्षा अधिक गुण कमवत विश्वचषकातील स्थान या संघाने थेट निश्चित केले. रशियाच्या संघात युवा आणि गुणी खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे गटसाखळीचा अडथळा ते लिलया पार करू शकतील. नवव्यांदा हा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. मागील चारपैकी तीन स्पर्धामध्ये रशियाला सहभागी होता आले नव्हते. याचप्रमाणे १९८६नंतर या संघाने गटसाखळीचा टप्पाही ओलांडला नव्हता. फॅबिओ कॅपेल्लो यांच्यासारख्या अनुभवी प्रशिक्षकामुळे या संघाची कामगिरी सुधारेल अशी अपेक्षा करू या.

प्रशिक्षक : फॅबिओ कॅपेल्लो.
स्टार खेळाडू : अ‍ॅलेक्झांडर कोकोरिन.
सर्वोत्तम कामगिरी : १९६६मध्ये चौथा.

दक्षिण कोरिया
आशियाई पात्रतेचा टप्पा पार करून दक्षिण कोरियाच्या संघाने नवव्यांदा आपले स्थान पक्के केले. या संघाने २००२मध्ये कौतुकास्पद कामगिरी करून सर्वाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी दक्षिण कोरिया आणि जपान या आशियाई राष्ट्रांकडेच या स्पध्रेचे यजमानपद होते. पोलंड आणि पोर्तुगालसारख्या संघांना त्यावेळी दक्षिण कोरियाने चकित केले होते. त्यामुळे हा संघ दुसऱ्या फेरीत आरामात पोहाचू शकेल. कू जा-चेओलचे नेतृत्व आणि हाँग म्युंग-बोचे मार्गदर्शन हे संघासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रशिक्षक : हाँग म्युंग-बो.
स्टार खेळाडू : सन ह्यंग मिन.
सर्वोत्तम कामगिरी : २००२मध्ये चौथे.