येत्या काही दिवसांत जगातील सारे वातावरण हे फुटबॉलमय होणार आहे. संपूर्ण जगाला त्या ९० मिनिटांच्या खेळाने वेड लावलेले असेल. क्रिकेट हाच काय तो आपला राष्ट्रीय खेळ असल्याच्या आविर्भावात वावरणारा भारत हादेखील त्या फुटबॉलमय वातावरणाला अपवाद असणार नाही. २०२५ पर्यंत आपला देश हा जगातील सर्वाधिक तरुण असलेला देश असणार आहे. म्हणूनच फुटबॉलचेही वेड या देशाला लागणे हा महत्त्वाचा बदल आहे. एरवी फुटबॉलचा वर्ल्डकप येऊन गेला तरी आपल्या देशात फार कुणाला त्याचे काही पडलेले नसायचे. पण आता तरुणाई अख्खी रात्र टीव्हीसमोर बसून असते, कारण बहुतांश सामने हे युरोपमध्ये होतात आणि वेळेच्या गणितानुसार आपल्याकडे ते मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत पाहायला मिळतात. पण गेल्या दहा वर्षांमध्ये रात्रभर जागून फुटबॉलचा सामना पाहणाऱ्यांची संख्या वाढते आहे. रग, जिगर, शारीरिक ताकद आणि बुद्धिचापल्य पणाला लागते ते फुटबॉलमध्ये. फुटबॉलच्या त्या ९० मिनिटांच्या सामन्यात एक खेळाडू सरासरी किती किलोमीटर्स धावतो याची आकडेवारी समोर येते तेव्हाही अनेकांची छाती दडपून जाते. हा प्रचंड वेगवान आणि खऱ्या अर्थाने सांघिक असा खेळ आहे.. हळूहळू का होईना हे आता भारतीयांच्या पचनी पडू लागले आहे, ही खूपच चांगली गोष्ट आहे!
प्रतिवर्षी भारतीय फुटबॉलपटूंची टीम क्वालिफाइंग होण्यासाठी म्हणून जातेदेखील, पण ते कधी क्वालिफाय होणार हे तर ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही, एवढे आपण मागे आहोत. फक्त फुटबॉलच नव्हे तर क्रिकेटचा अपवाद वगळता जवळपास सर्वच खेळांमध्ये आपली हीच अवस्था आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूने जागतिक स्पर्धेमध्ये मुसंडी मारली आणि पदकजिंकले नाही तरी आपला ऊर लगेचच अभिमानाने भरून येतो. दर खेपेस ऑलिम्पिकनंतर आपण ‘पदकतालिका कोरीच का?’ यावर जोरदार चर्चा करतो आणि नंतर पुढच्या ऑलिम्पिकपर्यंत पहिले पाढे पंचावन्न अशीच अवस्था असते!
पदक मिळवून देण्यासाठी देशच काही प्रयत्न करत नाही, इतर देश बघा कशा सोयीसुविधा देतात असे म्हणून आपण अनेकदा मोकळेही होतो. पण पदक मिळवून देणे हे काही एकटय़ा देशाचे काम नसते. तर वैयक्तिक पातळीवर, समाज म्हणून सामाजिक पातळीवर आणि मग त्यानंतर देशपातळीवर असे सर्व पातळ्यांवर प्रामाणिक प्रयत्न क्रीडा क्षेत्राच्या संदर्भात होतात तेव्हा त्याचा परिपाक पदक मिळण्यात होत असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची तयारी ही किमान १०-१५ वर्षे आधी करावी लागते. या दोन वर्षांत होणाऱ्या गोष्टी नसतात. कारण इथे काहीच सोपे नसते आणि तुम्ही मेहनत घेतलीत तरी इतर काही बाबींची साथही तुम्हाला असावी लागते. यात वेळीच म्हणजे बालपणीच एखाद्या तज्ज्ञाचे तुमच्याकडे- तुमच्यातील गुणांकडे लक्ष जाणे, त्याने तुम्हाला हेरून त्यानुसार प्रशिक्षण देणे, हे प्रशिक्षण तुम्हाला परवडणे, एवढे सारे झाल्यानंतर तुम्हाला संधी मिळणे, त्या संधीचे सोने होईल अशी कामगिरी वेळीच होणे या सर्व गोष्टी जुळून याव्या लागतात. या जुळून येतात, तेव्हाच तो सचिन तेंडुलकर होतो आणि तो एखादाच असतो!
खरे तर तसेच फेडरर, नदालही एकेकटेच होतात. पण मग आपण मागे का राहतो? ते ज्या देशांमधून येतात, तिथे पुरेशा सोयीसुविधा असतात. आपल्याकडे लोकसंख्या तर एवढी आहे की, सरकार काय काय करणार?
७०-८०च्या दशकापासून गरिबी हटाव ही आपल्या निवडणुकांमधील महत्त्वाची घोषणा झाली आहे. आजही २०१४ साली निवडून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सांगावे लागते, ‘अच्छे दिन आयेंगे.’ त्यांच्या त्या ‘अच्छे दिन’मध्ये पहिले अपेक्षित असते ते या देशातील लोकांना दोन वेळचे अन्न पोटभर मिळेल हे. इथे क्रीडा क्षेत्राकडे एकदा व्यवस्थित पाहिलेत तर लक्षात येईल की, केवळ दोन वेळचे पोटभर अन्न यापलीकडे चौरस आहार ही त्यांची गरज असते. मग तो मुष्टियुद्ध अर्थात बॉक्सिंग खेळणारा असो किंवा मग टेनिसपटू. त्यांच्या जेवणाला आहार नव्हे तर खुराक म्हणतात, तो खिशाला परवडावा लागतो. त्यातही एखाद- कुणी तरी नशीब काढतो, मग आपण त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव करतो, १० बाय १०च्या खोलीत तो व त्याचे कुटुंबीय कसे राहतात आणि घरी आईने केलेल्या चुलीवरच्या पोळ्या किंवा भाकऱ्या खाऊन त्याने कसे पदकजिंकले किंवा मर्दुमकी गाजवली त्याची चर्चा आपण दोन दिवस करतो. त्याने एवढे सारे केले म्हणून त्याच्या भावी आयुष्याच्या खुराकाची सोय करायला आपण सोयीस्कर विसरतो!
आपल्याकडे उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करण्यासाठी म्हणून स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (साई) या संस्थेची स्थापना देशपातळीवर करण्यात आली आहे. साईची ही सर्व संकुले क्रीडापटूंना उत्तम वातावरण आणि प्रशिक्षणाची चांगली सुविधा देणारी असायला हवीत, पण साईच्या कोणत्याही संकुलाला भेट द्या मग ते चंदिगढमधील असो किंवा महाराष्ट्रात मुंबई येथील कांदिवलीमधील. आपण भारतीय असल्याची लाज आपल्याला वाटेल. आपल्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना आपण धर्मशाळेपेक्षाही अतिशय वाईट अवस्थेत टपरीवजा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करतो. त्यांना धड सुविधाही देत नाही आणि त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा करतो. आपलीच आपल्याला लाज वाटेल आणि नंतर उत्तरायुष्यात ‘आपला देश पदक का मिळवत नाही’ हा प्रश्न विचारायला मन धजावणार नाही, अशी वाईट अवस्था या संकुलांमध्ये आहे. या संकु लांचीच अवस्था ही तर मग बाकी तर बोलणेच नको!
क्रीडा क्षेत्राच्याच बाबतीत बोलायचे तर फुटबॉलपटू तयार करायला मुळात मैदाने तर असायला हवीत. शहरामध्ये असलेले शिवाजी पार्क हेच तुमचे शहरवासीयांसाठीचे एकमात्र मोकळे, मोठे आणि खुले मैदान असेल तर तुम्ही खेळाडू तरी किती आणि कसे निर्माण करणार? सिंगापूर, युरोप-अमेरिका कुठेही गेलात तर लक्षात येईल की, तिथे गृहनिर्माण संकुलांचे मैदानच एका शिवाजी पार्क एवढे मोठे असते. खेळाडू निर्माण करायचे तर मैदान ही त्याच्यासाठीची पायाभूत सुविधा आहे, हे सत्य आपल्याला केव्हा उमगणार? सध्या तर आपल्याकडे मैदानांची आरक्षणे उठवून त्या जागा इतर कुणाच्या तरी (बहुतांश ठिकाणी बिल्डरच्या किंवा मग श्रीमंतांच्या क्लब्जच्या) घशात घालण्याची स्पर्धाच सुरू असल्यासारखी अवस्था आहे. यात कोणताही राजकीय पक्ष मागे नाही. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापले क्लब्ज थाटले आहेत. एखादाच राजीव शुक्ला त्यात अडकतो आणि मग जमीन परत देण्याची वेळ त्याच्यावर येते, पण याचा अर्थ त्या जमिनीचे दान नंतर तरी सत्पात्रीच असेल याची खात्री देवही देऊ शकणार नाही!
आपल्याकडचे बहुतांश सारे प्रश्न हे आपल्या गरिबीशी आणि त्यानंतर क्रीडा या विषयाकडे पाहण्याच्या आपल्या कमनशिबी दृष्टिकोनाशी संबंधित आहेत. म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडूंच्या बाबतीत असे होते की, त्या पातळीवर पोहोचल्यावर सुरुवातीच्या काळात ते खेळतात ते आवड म्हणून आणि नंतर त्यांना सरकारी नोकरी मिळवायची असते. अनेकदा ती भारताच्या बाबतीत रेल्वेमध्ये हवी असते, कारण तिथे खेळाडूंना सुविधा मिळतात असे त्यांना वाटते. इथे प्रत्येकाला पहिली भ्रांत आहे ती, नोकरीची, कुटुंबाच्या सुरक्षिततेची. अशा अवस्थेत खेळाडूंकडून त्यांनी सारे आयुष्य खेळामध्ये झोकून द्यावे अशी अपेक्षा कशी काय करणार? आणि त्यांनी झोकून दिले तर त्याची जबाबदारी समाज घेणार का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात ना आपल्याला त्या प्रश्नांमध्ये रस असतो! प्रयत्न फक्त सरकारी नव्हे तर समाजाच्या पातळीवरही व्हायला हवेत. एक-दोन संस्थांचे हे काम नाही!
क्रीडा क्षेत्राशी संबंधित विषयाची आपल्यापैकी प्रत्येकाची भूमिका तयार होते ती साधारणपणे प्राथमिक शाळेमध्ये. तिथे नेमके काय होते हे पाहिले तर ‘पदकतालिका का कोरी राहते?’ हा प्रश्न आपल्याला पडणारच नाही! शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकाला अर्थात पीटीच्या शिक्षकांना किती महत्त्व दिले जाते, हा प्रश्न आपण सर्वजण एकदा स्वतलाच विचारून पाहू. अनेक शाळांमध्ये अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक म्हणून त्यांची नेमणूक केली जाते. अन्यथा भुगोल किंवा मराठी शिकवणाऱ्या शिक्षकाला पीटी घेण्यासाठी सांगितले जाते. ज्यांचा क्रीडा या विषयाशी असलेला संबंध बालपणीच संपलेला असतो ते शिक्षक तुम्हाला खेळाची गोडी कशी काय लावणार? पीटीचा तास म्हणजे इतर विषयांचा राहिलेले अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा तास असे म्हणत विद्यार्थ्यांना मिळालेल्या त्या हक्काच्या तासावरही गदा आणली जाते.. सारे वातावरण असे नकारात्मक असेल तर विद्यार्थ्यांनी उत्साह आणायचा कुठून आणि अच्छे दिन येणार तरी कसे?
यावर उपाय एकच, क्रीडा विषयाकडे पाहण्याचा बुरसट, जुनाट, नकारात्मक आणि कालबाह्य़ दृष्टिकोन फेकून द्या!
सोच बदलो, देश बदलेगा!