लढा

संरक्षण दलाच्या संयुक्त कवायती सुरू असताना अमर पळधे या नौदलातील तरुणाचा गूढ मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या कारणांबाबत नौदलाने उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली आणि सुरू झाला एका आईचा नौदलासारख्या बलाढय़ व्यवस्थेशी संघर्ष. गेली २१ वर्षे सुरू असलेल्या या संघर्षांनंतर न्यायालयाने या नौदलाच्या निष्काळजीपणामुळे अमरचा मृत्यू झाल्याचा निकाल दिला आणि एक आई जिंकली. तिची ही संघर्षगाथा तिच्याच शब्दांत…
गौरी-गणपतीचे ते दिवस होते. अमर दोन महिन्यांची सुट्टी संपवून विशाखापट्टणम येथे सेवेत दाखल झाला होता. त्यानंतर नऊ दिवसांनी म्हणजे २३ सप्टेंबर १९९३ रोजी नौदलाचे दोन अधिकारी आमच्या डोंबिवलीतील उदयांचल सोसायटीतील जुन्या घरी धडकले. अमरला अपघात झाला आहे असे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांनी विमानाची दोन तिकिटे आणली होती. अचानक आलेल्या या बातमीने आभाळ कोसळले. काही सुचेना. अमरला अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. बघता बघता घर परिसर माणसांनी भरून गेला. या सगळ्या धावपळीत, भेदरलेल्या अवस्थेत अमरला खूप काही लागले आहे का, त्याच्यावर कोठे उपचार सुरू आहेत अशा अनेक प्रश्नांनी मी नौदल अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. अखेर माझा भाऊ सुभाष पटवर्धन याला अधिकाऱ्यांनी अमरचा मृत्यू झाल्याचे सांगितले. माझ्या भावाने ही बाब तात्काळ मला सांगितली नाही. माझी बैचेनी जसी वाढत गेली तसे भाऊ सुभाषने मला अमर आपल्यात नाही असे सांगितले. माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. माझं पोर गेलं आणि मग मी का जिवंत आहे असं मला वाटत होतं. आम्ही तिकडे हैदराबादला जायला निघालो. हैदराबाद विमानतळावर आमच्याबरोबर असलेल्या  मिलिंद शिंदे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ खरेदी केला. त्यामध्ये ‘नौदलातील पाणबुडय़ाचा मृतदेह सापडला’ अशी बातमी आली होती.
२१ सप्टेंबर रोजी अमरचा मृत्यू झाला होता. नौदल अधिकाऱ्यांना आम्ही मृत्यूची कारणे विचारू लागलो. काकिनाडा येथे बंगालच्या उपसागराला गोदावरी नदी मिळते तेथे भूदल, हवाईदल, नौदलाची संयुक्त युद्धाची तयारी सुरू होती. त्यावेळी हेलिकॉप्टरमधून समुद्रात उडी मारताना अमरचा मृत्यू झाला. असे उपस्थित लेफ्टनंट रावत, कसरतींचे प्रमुख सुब्रम्हण्यम सांगू लागले. अमरच्या अगोदर तीन जणांनी उडय़ा मारल्या. त्यामधील एक जण अगोदर जखमी झाला. तो सुखरूप होता. अमरने सकाळी पावणेसात वाजता उडी मारल्यानंतर तो पाण्यातून वर आलाच नाही. शोध घेऊनही सापडला नाही. समुद्राला उधाण आले होते. उडी मारताना त्याला हदयविकाराचा झटका आला असावा, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. अशा वेळी तुमची आपत्कालीन यंत्रणा काय करीत होती  यासारख्या आमच्या प्रश्नांची नीट आणि स्पष्ट उत्तरे नौदल अधिकारी देत नव्हते.
अमरचा मृतदेह नंतर सापडला. तो ज्या ठिकाणी ठेवण्यात आला होता, तेथे योग्य तापमान राखण्याची काळजी घेण्यात न आल्याने दरुगधी सुटली होती. योग्य तापमान का ठेवले नाही या आमच्या प्रश्नाचे उत्तरही त्यावेळी एका अधिकाऱ्याने ‘असेच घडते येथे’ असे गोलमाल उत्तर दिले. माझा भाऊ म्हणजेच अमरचा मामा सुभाष पटवर्धन जलतरणपटू आहे. त्याचा समुद्राच्या पाण्याचा अभ्यास आहे. त्याला नौदल अधिकारी आपल्याला चुकीची माहिती देत आहेत याचा अंदाज येत होता. अमरचा मृत्यू झाला त्यावेळी ‘समा’ होती. म्हणजे समुद्र खवळलेला नसतो आणि खाडीचे पाणी शांत असते. अशा परिस्थितीत अमरचा मृत्यू होणे शक्य नव्हते, असे सुभाषने संतप्त होऊन अधिकाऱ्यांना सांगितले.

अमरची कहाणी
पळधे कुटुंबीय मुळचे श्रीवर्धनचे. नोकरीनिमित्त डोंबिवलीत स्थिरावलेले. अमरचे वडील अशोक पळधे शिपिंग कॉपरेरेशनमध्ये नोकरीला होते. आई अनुराधा डोंबिवलीत टिळकनगर शाळेत शिक्षिका. त्यांना अमर आणि प्रताप ही दोन मुलं.   
आव्हानात्मक काहीतरी करायचे म्हणून अमर एकविसाव्या वर्षी नौदलात खलाशी (सेलर) म्हणून भरती झाला. विशाखापट्टणम (वायझाक) येथील तळावर त्याची नियुक्ती झाली. नौदलात त्याने डायव्हिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले. तो एक उत्कृष्ट डायव्हर (दहा तास पाण्यात बुडून राहण्याची क्षमता) बनला. दुर्दैवाने २१ सप्टेंबर १९९३ रोजी काकीनाडा समुद्राजवळ संरक्षण दलाच्या संयुक्त कवायती सुरू असताना हेलिकॉप्टरमधून उडी मारताना अमरचा गूढ मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे स्पष्ट कारण सांगण्यास नौदल अधिकाऱ्यांनी टाळाटाळ, टंगळमंगळ सुरू केली आणि सुरू झाला एका आईचा नौदलाबरोबरचा संघर्ष. गेली तब्बल २१ वर्ष सुरू असलेल्या त्यांच्या या लढय़ाला आता यश आले आहे.

IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?
Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
gangster mukhtar ansari family
स्वातंत्र्यसैनिक ते कुख्यात गुंड; एका कुटुंबाचा सुरस व चमत्कारिक प्रवास

संशयाला बळकटी…
अमरचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो. तेथे रुग्णालयाबाहेर आम्हाला अर्धा तास उन्हात ताटकळत ठेवण्यात आले. मोठय़ा मुश्किलीने प्रवेश मिळाला. अमरचा मृतदेह तेथे कपडय़ात बांधून ठेवण्यात आला होता. भाऊ सुभाषने अमरचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. ती सुरुवातीला नाकारण्यात आली. बांधलेले कापड फाडण्यासाठी प्रथम पात(ब्लेड) आणण्यात आली. त्याने कापड फाडणे शक्य नव्हते. नंतर कात्री आणण्यासाठी गेलेला अधिकारी अध्र्या तासाने आला. देखण्या, सुदृढ अमरचा ३५ तास पाण्यात असलेला मृतदेह पाहण्याच्या स्थितीत नव्हता. जड अंतकरणाने आम्ही तेथून निघालो. नौदल अधिकाऱ्यांच्या उंची निवासात आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. अमरच्या साथीदारांशी आमची भेट होणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती.
अमरचा कोणी साथीदार भेटेल का, त्याच्याकडून काही कळेल का म्हणून मन बेचैन होते. त्याच वेळी रात्री बारा वाजता एक खलाशी आमच्या निवासाचा सुरक्षा रक्षक झोपी गेला आहे हे पाहून सर्वाची नजर चुकवून आमच्याकडे आला. अमरचे वडील कोण अशी विचारणा करून त्याने ‘अमरच्या मृत्यूचे कारण तुम्हाला कळले पाहिजे. नौदलाच्या कोणत्याही कागदांवर घाईने सह्य़ा करू नका. तुम्ही राहता ते निवास नौदलाच्या मोठय़ा अधिकाऱ्यांचे आहे. येथे खलाशांना प्रवेश नसतो’ असे सांगितले. काही नौदल अधिकाऱ्यांची चाहूल लागल्याने घाईघाईने तो निघून गेला. मग मात्र आम्हाला अमरचा मृत्यू नैसर्गिक नाही तर संशयास्पद आहे, याची खात्री पटली.
लष्करी इतमामात अमरचा अंत्यसंस्कार करण्यात आला. अमरला लपेटलेला तिरंगा ध्वज अधिकाऱ्यांनी अमरचे बाबा अशोक यांच्या स्वाधीन केला. गगनाच्या दिशेने निघालेला चितेचा धूर पाहणाऱ्या बाबाकडे तो तेवढा ध्वज सांभाळण्याची देखील ताकद उरली नव्हती. नौदल अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आपला मुलगा गेला याविषयी आमची सगळ्यांची खात्री झाली होती.
कोळ्याचा शोध…
काकीनाडय़ाला गेलो तेव्हा मनात आले कोळीवाडय़ात जावे. तेथे ज्या कोळ्याने अमरचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढला, त्याला भेटून आभार मानावेत, काही भेटवस्तू द्यावी म्हणून पोलीस ठाण्यातून कोळ्याचे नाव घेण्यासाठी गेलो. पोलीस तक्रारीत कोळ्याचे नाव, पत्ता नव्हता. अमरचा कोट पोलीस ठाण्यात सील करून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. तेथून परतलो. काकीनाडा नागरी रुग्णालयात अमरचे शवविच्छेदन केले होते. तेथील सिव्हील सर्जनला भेटावे म्हणून तेथे गेलो. मुंबईला न्यायालयात साक्ष देण्यासाठी आलेले डॉक्टर तेथे होते. त्यांनी आम्हाला ओळखले. अमरविषयी काय घडले असेल याविषयी ते घडघडा बोलले. आता जे सांगता ते तुम्ही न्यायालयात का नाही बोललात, असे भाऊ सुभाषने त्यांना विचारले. ते गडबडले. त्यांनी सत्य काय ते लिहून देण्यास सुरुवात करताच त्यांचे साहेब तेथे आले. त्यांनी काय करता म्हणून विचारून त्या डॉक्टरची खरडपट्टी काढली. तेथून आम्ही हात हलवीत परतलो.
परतीच्या वाटेवर…
अमरला विशाखापट्टणमला साश्रू नयनांनी निरोप देऊन आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. नौदलाने आमची परतीची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. अमर आणि प्रतापचे मित्र मिलिंद, अतुल, अजित, शशांक यांनी रेल्वेने जाण्याचे निश्चित केले. गाडी सुटण्यापूर्वी अमरचा एक सहकारी जवळ आला. ‘अमर खूप उदार होता. गरजूंना तात्काळ पैसे द्यायचा. त्याचे कोणी पैसे घेतले असतील तर ते कार्यालयात जमा करा अशी सूचना आम्ही फलकावर लावली होती. ते पैसे तुम्हाला मिळाले का, असे विचारले. आमच्या काळजाच्या तुकडय़ाचा जीव गेला होता तेथे पैशाचे काय? गाडी मुंबईच्या दिशेने निघाली. दोन दिवसांचा प्रवास होता. प्रत्येकाचे पाणावलेले डोळे. मध्येच फुटणारे बांध पाहून आसपासचे प्रवासी काय झाले याची चौकशी करत होते. आमची कहाणी ऐकून त्यांनी आम्हाला व्यवस्थित बसता येईल अशी व्यवस्था करून दिली. ओळखीची ना पाळखीची, आमची भाषाही त्यांना समजत नव्हती. पण सामान्य माणसाच्या काळजाला आमचं दु:ख भिडलं, हे जाणवत होतं.  
१८ महिने पत्रव्यवहार
अमरच्या मृत्यूची माहिती देणारी सर्व माहिती नौदलाकडून मिळावी म्हणून आम्ही तब्बल अठरा महिने नौदलाच्या अ‍ॅडमिरल ते स्थानिक कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार केले. उडवाउडवीची, गोलमाल करणारी उत्तरे याशिवाय आमच्या हातात काहीही पडले नाही. अमरच्या मृत्यूचे सबळ कारण नौदलाकडून देण्यात येत नव्हते. अमरच्या शरीरावर जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले. त्या जखमा माशांनी शरीर खाल्ल्याच्या असल्याचे सांगण्यात आले. बुडून मृत्यू झाला होता. पण हृदय आणि फुफ्फुसात पाणी का नव्हते, यासाठी डायटेम टेस्ट का घेण्यात आली नाही, या टेस्टसाठी समुद्राच्या पाण्याचे एक पेलाभर पाणी नौदल पोलिसांना देऊ शकले नाही, असे का याची कोणतीही उत्तरे आम्हाला मिळाली नाहीत. चौकशी समितीचा फार्स उरकण्यात आला.
लष्करातील व्यक्तीची मिसिंगची पोलीस तक्रार झाली की नौदलाकडून सात वर्ष त्या जवानाला निवृत्ती वेतन देण्यात येत नाही, असे आम्हाला कळले. आम्हाला तो पैसा नको होता तर अमरच्या मृत्यूचे सबळ कारण हवे होते. नौदल अधिकारी दाद देत नव्हते. त्यांची संतापजनक पत्रे पाहून न्यायदेवताच आम्हाला मदत करेल असे आम्हाला वाटायला लागले. त्यामुळे आम्ही नौदलाविरुद्ध  मुंबई उच्च न्यायालयात चौकशी समितीचा अहवाल मिळविण्यासाठी याचिका दाखल केली. तो खूप उशिरा न्यायालयाला सादर केला गेला. न्यायालयाने हा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे, ही आत्महत्या नाही, अपघाताऐवजी निष्काळजीपणा शब्द अहवालात शोभला असता असा निर्णय दिला. घटना काकीनाडा येथे घडली म्हणून हैदराबाद उच्च न्यायालयात नौदलाने आव्हान याचिका दाखल केली. आम्हीही काकीनाडा येथे नुकसानभरपाईसाठी याचिका दाखल केली. एखादा निर्णय झाला की नौदल आव्हान याचिका दाखल करत होतं. नौदलाने आम्ही मयताला नुकसानभरपाई दिली असा उल्लेख केला. त्यावेळी न्यायाधीशांनी ती नुकसानभरपाई चणे चुरमुरे दिल्यासारखी आहे असे नौदलाला खडसावले. नौदलाकडून सत्यप्रतिज्ञापत्र सादर करून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला जात होता. विश्वासार्हता असलेल्या व्यवस्थेकडून असे नाचविले जात आहे हे बघून आमच्या दु:खात आणखी भर पडत होती.
मंत्र्यांच्या भेटीगाठी…
शरद पवार त्यावेळी संरक्षणमंत्री होते. अमरच्या मृत्यूविषयीचा लेख त्यांनी वर्तमानपत्रात वाचला होता. माजी मंत्री स्व. नकुल पाटील यांच्या सहकार्याने आमची शरद पवार यांच्याशी नवी दिल्लीत भेट झाली. अमरचा उल्लेख आम्ही करताच तो लेख वाचल्याचे पवार यांनी सांगितले. अमरच्या मृत्यूविषयीचा चौकशी समिती अहवाल मिळावा, अशी मागणी केली. पवार यांनी नौदल मुख्यालयात अ‍ॅडमिरल विष्णू भागवत यांना दूरध्वनी करून पळधे कुटुंबीयांना तुमच्याकडे पाठवितो. त्यांना सहकार्य करा असे सांगितले. तातडीने आम्ही नौदल मुख्यालयात गेलो. अ‍ॅडमिरल भागवतांनी अहवालातील महत्त्वाची माहिती देण्याचे कबूल केले. आम्हाला नंतर जे संक्षिप्त निष्कर्ष दिले त्यामध्ये अपेक्षित असे काही नव्हते. भागवत यांच्याकडूनही आमचा हिरमोड झाला होता. शरद पवार एकदा डोंबिवलीत माजी मंत्री नकुल पाटील यांच्याकडे आले होते. त्यावेळी आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला ओळखले. पण, आम्ही नौदलाविरुद्ध न्यायालयात गेल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे ते पूर्वीसारखे सहकार्य करण्याच्या मन:स्थितीत दिसले नाहीत.
नंतर जॉर्ज फर्नाडिस संरक्षणमंत्री होते. त्यांना डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ओळखीने नवी दिल्लीत भेटलो. सप्तर्षीची कोणतीही ओळख नसताना एका शब्दाने ते पुण्याहून नवी दिल्लीत आले होते. सप्तर्षीचा मान राखण्यासाठी काही सेकंदांसाठी फर्नाडिस यांनी ‘सवड मिळाली की फाइल मागवितो व तुम्हाला कळवितो’ असे आश्वासन दिले. ती सवड त्यांना कधीच मिळाली नाही आणि त्यांनी कधी काही कळविलेही नाही. आता स्त्री जागृतीविषयी विविध कार्यक्रम घेणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना अमित नानीवडेकर या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भेटले. आपले दु:ख त्यांनी समजून घ्यावे त्यासाठी सहकार्य करावे ही अपेक्षा ठेवून आम्ही त्यांना भेटलो. एका आईचे दु:ख दुसरी आई समजून घेईल असे वाटले होते. आम्हाला पैशाची मदत नको होती. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी मदतीचा हात हवा होता. मी अमरच्या मृत्यूची कहाणी सुप्रिया सुळे यांना सांगत होते. पण त्यांचे माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. त्या फक्त ऐकल्यासारखे करत होत्या. त्यांच्याकडे आपल्यासाठी वेळ नाही असे माझ्या लक्षात आले. त्यांच्या दालनातून बाहेर पडले. त्यानंतर मंत्री, नेते, राजकीय पुढाऱ्यांना भेटून आपला मनस्ताप वाढून घ्यायचा नाही. नाहक पैशाची उधळपट्टी करायची नाही. आपला लढा आपणच लढायचा असे मनाने पक्के केले.
माहितीच्या अधिकारातून नौदलाच्या चौकशी समितीचा अहवाल मागवावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकार्य मिळेल म्हणून त्यांच्या स्वीय साहाय्यकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तर त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पुण्याचे झेंडे यांच्या प्रयत्नातून अण्णांचे सहकारी के. डी. पवार यांना पुण्यातच भेटलो. पवार यांनी म्हणणे ऐकून अण्णांचे संरक्षणविषयक काम अंधेरी येथील कर्नल वासुदेव पाहतात असे सांगितले. कर्नल वासुदेव यांच्याबरोबर भेटीची वेळ ठरली. वासुदेव यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. शेवटी म्हणाले, ‘‘माझी मुलगी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे गेली. हे मी विसरून जाण्याचा प्रयत्न करतो. तुम्हीही तसेच करा.’’ हे ऐकून मन आवरले आणि तेथून उसंत न घेता बाहेर पडलो. असे हे अण्णांचे सहकारी.
न्यायालयात तारखांवर तारखा
न्यायालयात तारखांवर तारखा पडत होत्या. न्यायदेवताच आपल्याला न्याय देईल यावर आपला ठाम विश्वास होता. पण या देवतेच्या मागे जी तारखा लावणारी व्यवस्था होती तिचा अनेक वेळा राग येत होता. माझे वडील वकील होते. भारतीय नागरिकांनी कायदा हातात न घेता सनदशीर मार्गानेच गेले पाहिजे हा संस्कार आमच्यावर झाला होता. त्यामुळे जागोजागी मनाला आवर घालत असे. एकदा न्यायाधीशांनी आमच्या वकिलाला ‘तुम्ही पालकांना का न्यायालयात आणता’ असा प्रश्न केला. त्यावेळी मी येथे मालमत्तेच्या वादाचा खटला ऐकण्यासाठी येत नाही. माझ्या मुलाच्या मृत्यूचे कारण समजावे यासाठी येत असल्याचे सांगावे असे वाटत होते. मी गप्प बसले. मुंबई उच्च न्यायालयातील एक ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि आताचे प्रख्यात न्यायाधीश यांनी आम्हाला त्यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले. काकीनाडा जिल्हा न्यायालयात आम्हाला नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्याचे सुचविले. या ठिकाणीच अमरचा मृत्यू झाल्याने त्या भागात जाण्यास मन तयार नव्हते. डॉ. बाहेकर, डॉ. नितीन जोशी हे विद्यार्थी माझे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होते. हो ना करीत काकीनाडय़ाला ज्येष्ठ विधिज्ञ तिमाजी राव यांना भेटलो. त्यांनी आमचे म्हणणे ऐकले. नम्रपणे मी आता ७५ वर्षांचा आहे. न्यायालयात जात नाही असे सांगितले. तुमचे काम ज्युनिअर तिमाजी राव पाहतील हे स्पष्ट केले. ज्युनिअर राव यांना माझा भाऊ सुभाष अमरची केस सांगत असताना सीनिअर राव ऐकत होते. आमची केस ऐकल्यानंतर सीनिअर तिमाजी राव यांनी मी तुमच्या केससाठी काळा कोट अंगात घालून न्यायालयात येणार असे स्वत:हून सांगितले. साक्षात परमेश्वर उभे राहिल्याचा अनुभव त्यावेळी आला. पण इतरही दुखदायक अनुभव होते. हैदराबादमध्ये दोन निष्णांत वकिलांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. रग्गड शुल्क घेतले, पण काडीचेही काम केले नाही.

२१ वर्षांनी न्याय
अमर पळधे याचा संशयास्पद मृत्यू झाला असून नौदलाला निष्काळजीपणाच्या आरोपाखाली दोषी ठरविल्याचा निकाल अलीकडेच हैदराबाद उच्च न्यायालयाने दिला असल्याची माहिती याचिकादार अनुराधा पळधे, त्यांचे वकील सुरेश गानू यांनी दिली आहे. अनुराधा यांनी नौदल आणि दोषी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशा प्रकारचे किती तरी अमर गूढ मृत्यूचे बळी ठरले असतील. त्यांच्याबाबत झालेल्या आपल्या चुकांवर नौदलाने नेहमीच पांघरूण घातले आहे. म्हणूनच केवळ नुकसानभरपाई मिळावी म्हणून नाही, तर या प्रकारांना कायमचा आळा घातला जावा यासाठी अनुराधा पळधे हा लढा देत आहेत.

न्यायालयीन खटल्यात हैदराबादचे ज्येष्ठ विधिज्ञ सुनील गानू, मंजिरी गानू, ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र पै यांच्यासारखी खूप मोलाची माणसे भेटली. न्यायालयीन प्रक्रियेत आम्ही कोणती भूमिका घ्यावी याविषयी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केले. एवढी मोठी माणसे किती शुल्क घेणार अशी मनात धाकधूक होती. आमच्या शुल्काविषयी तुम्ही काही बोलायचे नाही असा सज्जड दम त्यांनी भरला. ते पाहू नंतर. याशिवाय आमच्या कुटुंबातील तुम्ही घटक आहात, अशील नाहीत असे समजून आम्हाला वागणूक दिली. राजेंद्र पै यांच्या ओळखीने गानूंशी भेट झाली. पै स्वत: निष्णात वकील. माझ्या कामासाठी ते स्वत: हैदराबादला आले. साध्या हॉटेलमध्ये राहिले. हैदराबादला गेल्यानंतर गानू दाम्पत्य मला न्यायालयात, प्रवासात सर्वोतपरी सहकार्य करायचे. स्वत:च्या वाहनातून मला सोडायचे. घरच्यासारखे आदरातिथ्य तेथे पाहिले. हैदराबादच्या तारखेसाठी प्रवास सुरू झाला की तारीख पुढे ढकलल्याची माहिती पुण्यापर्यंत पोहोचले की समजायची.  
काकीनाडय़ाचा निकाल आमच्या बाजूने लागला. हा दावा चालविणाऱ्या अ‍ॅड. तिमोजी राव यांना त्यांचे शुल्क म्हणून धनादेश पाठवून दिला. राव त्यावेळी आजारी होते. तो धनादेश पाहून त्यांनी एका आईचा मुलगा हकनाक गेला. तिची केस चालवल्याचे हे पैसे घेऊन मी काय करू असे म्हणून त्यांनी तो धनादेश बाजूला ठेवला असे त्यांच्या सुनेने सांगितले. चौकशी समितीचा अहवाल आम्हाला निवांतपणे वाचता यावा म्हणून एका सरकारी वकिलाने आम्हाला त्यांच्या कार्यालयात नेले. मला वकिलांच्या रूपाने भेटलेले हे परमेश्वर होते.
मुंबई उच्च न्यायालयात मला ओळखणारी माझी विद्यार्थिनी भेटली. तिने रजिस्ट्रार गंगाखेडकर यांची ओळख करून दिली. त्यांनी कविता गाडगीळ यांच्याशी संपर्क साधा, असे सुचवले. कविता गाडगीळ यांचे पती हवाई दलात पायलट आहेत. संरक्षण दलात असलेला त्यांचा मुलगा अभिजीत असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. तो त्याच्या कामातल्या हलगर्जीपणामुळे गेला असा अहवाल लष्करी अधिकाऱ्यांनी दिला होता. त्याविरोधात कविता गाडगीळ यांचा संघर्ष होता. अमरचा मृत्यू संशयास्पद वाटत असला तरी देशात वरिष्ठांच्या चुका उघड केल्या जात नाहीत, त्या करू पाहणाऱ्याला त्रास दिला जातो, असे गाडगीळांच्या तोंडून ऐकले आणि त्यांना झालेला मनस्ताप लक्षात आला. कविता गाडगीळ यांच्या संघर्षांमुळे अभिजीतला न्याय मिळाला. अमरलाही न्याय मिळेल. एक दिवस सत्य उजेडात येईल. निराश होऊ नका असे कविता गाडगीळ यांनी सांगितले. त्यानंतर काकीनाडा जिल्हा न्यायालयाने लष्करी कवायतींचे प्रमुख लेफ्टनंट रावत यांना दोषी ठरविले. आम्हाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. नौदलाला दोषी ठरविण्यासाठी आम्हाला बारा वर्षे जीवाचे रान, पैशाचे पाणी करावे लागले.
माणुसकीचे झरे…
अमरचे दावे सुरू असतानाच २००७ मध्ये अमरचे बाबा अशोक पळधे यांचे निधन झाले. त्यानंतर अभियंता मुलगा प्रताप याचा विवाह झाला. पत्नी पल्लवी नोकरी करीत होती. नातू चैत्यनचा जन्म झाल्यानंतर घरात चैतन्य आलं. पतीच्या निधनानंतर सर्व न्यायालयीन कागदपत्रे, त्यांचे वाचन, धावपळ करण्याचे काम एकदम माझ्यावर पडले. पण मी डगमगले नाही. अमरला न्याय मिळाला पाहिजे ही चिकाटी, जिद्द माझ्याकडे होती. माझे विद्यार्थी मुलांसारखे माझ्या अवतीभवती होते. वर्तमानपत्रांतून आलेल्या बातम्या, लेखांनी मला मोठे पाठबळ दिले. यामध्ये विमानतळावर तिकिटासाठी पैसे म्हणून स्वत:ची सोनसाखळी विकणारे मिलिंद शिंदे यांचे सहकारी, वैशाली नाजरे, डॉ. नितीन जोशी, विवेक नवरे, वरुण पित्रे, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, मिलन भिसे, सुमेधा राव, डॉ. अनुराधा रानडे, अरुणा गाभे, छाया चित्ते, शिल्पा भिसे, नंदू कुलकर्णी अशा अनेक माझ्या विद्यार्थ्यांनी मला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदतीचे हात दिले.
टपाल घेऊन पोस्टमन आला की त्याला कधी मी चहापाण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न करीत असे. तो पोस्टमनही नम्रपणे त्यास नकार देत असे. मी डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेत शिक्षिका होते. सततच्या धावपळीमुळे शाळेतच वर्गशिक्षकांच्या कक्षात मी टेबलावर डोके ठेवून झोपत असे. यावेळी वर्गातील विद्यार्थी बाईंना झोप लागली आहे. त्यांना त्रास नको म्हणून वर्गात शांतपणे वाचन सुरू करीत असत. न्यायालयीन कामाची महत्त्वपूर्ण कागदपत्र माझ्या विद्यार्थ्यांच्या पत्नीने मराठीत करून दिली. बाईच्या कामात अडथळा नको म्हणून एक दिवसही दांडी न मारणारी कामवाली बाई दिपाली कोलते. दु:खी ऊर घेऊन मी सत्यासाठी सगळीकडे वणवण फिरत होते. त्यावेळी माझ्या अवतीभवती हे माणुसकीचे असंख्य झरे वाहत होते. मन:शांतीसाठी पुस्तकांचे वाचन सुरू होते. असेच एकदा निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचे ‘एक पूर्ण, एक अपूर्ण’, तर रागिणी पुंडलिक यांचे ‘अश्विन एक विलापिका’ ही पुस्तके वाचनात आली. त्यावेळी वाटले आपण पण अमरच्या मृत्यूनंतर आलेले अनुभव पुस्तकरूपाने लिहावेत. शिरीष पै, विजया वाड, विनिता ऐनापुरे, प्रकाशक शरद मराठे यांच्याशी यानिमित्ताने संपर्क साधला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून ‘संघर्ष एका आईचा-नौदलाशी’ हे दुर्दैवी कहाणीचे पुस्तक आकाराला आले.
ज्या व्यवस्थेमुळे देशाच्या सीमा सुरक्षित असतात, त्या व्यवस्थेने आपल्याशी असा खेळ करावा याचे मनोमन दु:ख व्हायचे. नौदलाबरोबर मी ज्या ईर्षेने संघर्ष केला, त्याचेही खरेतर मनात कुठेतरी दु:ख व्हायचे. पण ती व्यवस्था जर बेजबाबदारपणे वागत असेल तर दुसरे काय करणे आपल्या हातात होते? नौदलातील या प्रवृत्तींना आळा बसावा, त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये पारदर्शकता यावी, माझ्यासारखे दु:ख पुन्हा कोणत्या आईच्या वाटेला येऊ नये या एका उद्देशाने माझा हा लढा होता आणि आहे.