सिद्धार्थ खांडेकर – response.lokprabha@expressindia.com

नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ग्रीसच्या युवा स्टेफानोस त्सित्सिपासविरुद्ध पहिले दोन सेट गमावले, त्यावेळी एक नवा ग्रँड स्लॅम स्पर्धाविजेता गवसला, अशी चर्चा सुरूही झाली होती. उपान्त्य सामन्यात ‘फ्रेंच सम्राट’ राफाएल नदालविरुद्ध चुरशीच्या लढतीत विजय मिळवल्यामुळे जोकोविच थकला असेल, अशीही एक शक्यता वर्तवली गेली. नाही तरी नदालची सद्दी मोडली आहेच, आणखी अजून काय मिळवायचे राहिले आहे, हा दुसरा सूर. जोकोविचला अलीकडे फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यांत सूर गवसतच नाही असेही पुराव्यानिशी मांडले जाऊ लागले. कोविडमुळे गतवर्षी जूनऐवजी ऑक्टोबरमध्ये खेळवल्या गेलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यावेळी नदालने तीन सेट्समध्येच जोकोचा धुव्वा उडवला होता, हा तो पुरावा! सबब, तीन सेट्समध्येच त्या दिवशी जोकोविच आटपणार होता आणि नवा विजेता लाभणार होता. पण तसे अजिबातच घडले नाही. पहिले दोन सेट्स गमावल्यानंतर जोकोविचने त्या सामन्यात थोडा ‘ब्रेक’ घेतला. नंतर पुढील तीन सेट्स त्याने ज्या सफाईने जिंकले, त्याला तोड नव्हती. अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविच ६-७, २-६, ६-३, ६-२, ६-४ असा जिंकला. या स्कोरवर नीट नजर टाकल्यास – ज्यांनी तो सामना पाहिला, त्यांना पुढील तपशिलाचीही गरज नाही. पहिले दोन सेट गमावताना विशेषत दुसऱ्या सेटमध्ये त्सित्सिपास फारच एकतर्फी जिंकून अजिंक्यपदाकडे निघाला होता. नंतरच्या तीन सेट्समध्ये जोकोविचकडून जो खेळ झाला, त्याला त्सित्सिपासकडे तोडच नव्हती. त्या तिन्ही सेट्समध्ये एकदाही जोकोविचने त्याच्या युवा प्रतिस्पध्र्याला ब्रेक-पॉइंटपर्यंतही येऊ दिले नाही! तिसरा आणि चौथा सेट गमावत असताना, शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहूनही त्सित्सिपास मानसिकदृष्टय़ा खचत गेला. अंतिम सेटमध्ये त्याने थोडाफार जोर दाखवत प्रतिकार केला, परंतु तोवर उशीर झालेला होता. जोकोविच दर दोन गेमनंतर जे काही तांबूस रंगाचे द्रव प्राशन करत होता, ते हुडकून त्याचे मार्केटिंग आपल्याकडे एनर्जी ड्रिंक म्हणून सहज होऊ शकेल! शेवटच्या गेमच्या शेवटच्या गुणापर्यंत जोकोविच थकलेला वा विचलित वाटला नाही. त्याने फ्रेंच ओपन जिंकून १९वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले.

रॉजर फेडरर आणि राफाएल नदाल यांच्या २० ग्रँड स्लॅम जेतेपदांशी तो बरोबरी करेल किंवा त्यांच्या पुढे तो जाईल का, हा मुद्दा गौण आहे. कदाचित त्याचे वय आणि त्याची सध्याची ऊर्जा तसेच अजिंक्यपदांची भूक पाहता, तो आणखी काही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकेलही. तोपर्यंत फेडरर किंवा नदाल यांनी एखाद-दुसरी स्पर्धा जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुद्दा असा, की निव्वळ आकडय़ांच्या बाबतीत फेडरर किंवा नदाल यांच्यापुढे जाऊन त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरण्याची किंवा म्हणवून घेण्याची गरजच जोकोविचला राहिलेली नाही. त्या दोघांना आजवर जे कमावता आले नाही, ती कमाई जोकोविचच्या नावावर नोंदली गेली आहे. ती म्हणजे, प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धा किमान दोन वेळा जिंकणारा तो ‘ओपन’ युगातला एकमेव टेनिसपटू ठरतो. फेडररला केवळ एकच फ्रेंच ओपन जिंकता आली. नदालला ऑस्ट्रेलियन स्पर्धाही एकपेक्षा अधिक वेळा जिंकता आलेली नाही. या दोघांचे वर्चस्व विशिष्ट पृष्ठभागांवर अधिक ठळकपणे दिसून येते. नदालने फ्रेंच स्पर्धा विक्रमी १३ वेळा जिंकलेली आहे. फेडरर विम्बल्डनला आठ वेळा जिंकला. जोकोविच सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन अधिक सातत्याने जिंकायचा. पण अलीकडे त्याचे यश माती, गवत आणि सीमेंट या सर्व प्रकारच्या कोर्टवर सारखेच विभागलेले आढळून येते. त्यामुळे इतर दोन महान टेनिसपटूंच्या तुलनेत तो अधिक बहुपैलू ठरतो.

त्या आकडेवारीकडे वळण्यापूर्वी काही माजी टेनिसपटूंच्या, प्रशिक्षकांच्या नजरेतून नोव्हाक जोकोविच टेनिसपटू आणि माणूस म्हणूनही कसा आहे, याचा धांडोळा घेणे अप्रस्तुत ठरणार नाही. ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावर याविषयी काही रंजक मासले वाचायला मिळाले. विख्यात माजी टेनिसपटू बोरिस बेकर हा मध्यंतरी जोकोविचचा प्रशिक्षक होता. त्यांची जोडी फार टिकली नाही आणि काही काळानंतर दोघांनीही स्वखुशीने फारकत घेतली. तरीही दोघांना एकमेकांविषयी कडवटपणा नाही, उलट आदरच आहे. सन २०१३ सरताना जोकोविचने बेकरशी संपर्क साधला. तोपर्यंत जोकोविचने सहा वेळा ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले होते. परंतु त्या वर्षी विशेषत: नंतरच्या टप्प्यात त्याचा फॉर्म ढासळत होता. सहा अजिंक्यपदांमध्ये आनंद मानणाऱ्यांपैकी जोकोविच नव्हता. उलट बेकरशी संपर्क साधेपर्यंतच्या १८ महिन्यांमध्ये चार ग्रँड स्लॅम स्पर्धामधील अंतिम सामन्यांतील पराभव त्याला खुपत होता. लक्षात घ्या, तो काळ फेडरर आणि नदाल ऐन भरात असतानाचा होता. २००८पासून जोकोविच वगळता इतरांना या दोघांनी ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये संधीच दिली नव्हती. अशा परिस्थितीत सहा ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे मिळवण्यात आयुष्याची इतिश्री झाल्याचे कुणी मानून घेते, तर त्याला दोष द्यावा अशी परिस्थिती अजिबात नव्हती. बेकरबरोबर त्याची जोडी जमली. बेकर आणि जोकोविचचा जवळचा प्रशिक्षक-सहायक मरियन वायदा यांच्या टीमबरोबर जोकोविचने आणखी सहा ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावली. बेकरशी भावनिक जवळीक साधता यावी, यासाठी जोकोविच त्याच्याशी आवर्जून जर्मनमध्ये संवाद साधत असे. नोव्हाक जोकोविचविषयी बेकरचे निरीक्षण मार्मिक आहे : त्याच्यात दोन व्यक्तिमत्त्वे आहेत. एक जोकोविच अत्यंत जिद्दीने मैदानात कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचाच आटोकाट प्रयत्न करतो. त्याचे दुसरे रूप मात्र लोभसवाणे आहे. त्याचे आपल्या कुटुंबावर, देशावर, खेळावर निरतिशय प्रेम आहे. धर्मादाय कार्यात त्याला रस आहे. आणि तुम्हाला गरज पडल्यास तो त्याचा शेवटचा शर्टही देऊन टाकेल. परवा फ्रेंच ओपन स्पर्धा संपल्यानंतर प्रेक्षकांतील एका छोकऱ्याला आपली रॅकेट देणारा सगळ्यांच्याच नजरेत भरला.

माजी विम्बल्डन विजेता गोरान इवानिसेविचने जोकोविचची एक आठवण सांगितली आहे. २००१मध्ये विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याच्या काही महिने आधी १३ वर्षीय जोकोविचला इवानिसेविचबरोबर सराव करण्याची संधी मिळाली. ‘आम्ही एक सेट खेळलो. मग त्याने मला चॉकलेट बार दिला. त्याला वाटले मला एनर्जीची गरज आहे! ती हिंमत होती, की भाबडेपणा? माझ्यासमोर तो अजिबात दडपणाखाली वाटला नाही. त्याच्या डोळ्यांतली चमक आजही आठवते. त्या वयातदेखील तो मला हरवू शकेल या विश्वासाने खेळत होता.’ इवानिसेविच आज जोकोविचच्या कोचिंग स्टाफमध्ये आहे. इवानिसेविच हा क्रोएशियाचा. जोकोविच सर्बियाचा. युगोस्लाव्हियाची शकले उडून निर्माण झालेली आणि सहसा परस्परांना शत्रू मानणारी ही राष्ट्रे. पण म्हणून त्या दोघांमध्ये कोणताही वैरभाव नाही. जोकोविचचे प्रत्येक घटकात बारकाईने लक्ष असते. तो अनेकदा प्रश्न विचारतो, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी आपण तयारीत असावंच लागतं, असे इवानिसेविच बजावतो. त्याला कोचिंग करताना दमछाक होते. २४ तास दडपणाखाली राहावे लागते. आरोग्यावर परिणाम होतोच. पण जोकोविचचे रिझल्ट पाहिल्यावर या साऱ्या भावना पळून जातात, असे इवानिसेविच कबूल करतो.

निकोला पिलिच हे विख्यात टेनिसपटू प्रशिक्षक. जर्मनीत त्यांची टेनिस अ‍ॅकॅडमी आहे. जर्मनी, क्रोएशिया आणि सर्बिया या तीन देशांच्या डेव्हिस चषक संघांना अजिंक्यपद मिळवून देण्याचा विक्रम त्यांनी रचला आहे. नोव्हाक जोकोविचविषयी त्यांनीही काही आठवणी सांगितल्या आहेत. सर्बियातील येलेना गेनेसिच हे नोव्हाक जोकोविचच्या अगदी आरंभीच्या काळातील प्रशिक्षक. ग्रँड स्लॅम विजेते अगदी आरंभीच हुडकून काढणाऱ्यांमध्ये गेनेसिच यांचा हात कोणी धरू शकत नाही. मोनिका सेलेस, गोरान इवानिसेविच, इव्हा मायोली (१९९७मधील फ्रेंच ओपन विजेती), नोव्हाक जोकोविच अशी ही समृद्ध यादी आहे. गेनेसिच यांनी एका शहरात टेनिस कॅम्प भरवला, त्यावेळी तेथे आलेल्या जोकोविचचा खेळ आणि टेनिसमधली समज पाहून त्या प्रभावित झाल्या. सहा वर्षे जोकोविचला शिकवल्यानंतर, त्याने पिलिच यांच्या अ‍ॅकॅडमीत जर्मनीत जावे, असे गेनेसिच यांनी सुचवले. जोकोविच जर्मनीला आला. पहिल्या दिवसापासून त्याची शिस्त आणि निष्ठा वाखाणण्याजोगी होती. तो प्रशिक्षणणादरम्यान २० मिनिटे आधी कोर्टवर उपस्थित असायचा. त्याने रॅकेट्स, चेंडू, टॉवेल्स सारे काही व्यवस्थित आणलेले असायचे. पिलिच सांगतात, की तंदुरुस्तीसाठी काही वेळा फुटबॉल खेळवले जायचे, त्यातही जोकोविच चमक दाखवायचा. त्याच्या खेळाइतकीच त्याची विचारशक्ती प्रगल्भ होती. भविष्यात काय करायचे आहे, याची त्याला सुरुवातीपासूनच जाण होती. त्याचा ‘आयक्यू’ उच्च होता. त्याला प्रशिक्षण देणे हा एक विलक्षण अनुभव असायचा, असे पिलिच सांगतात.

नोव्हाक जोकोविचच्या अशा काही ज्ञात-अज्ञात पैलूंविषयी सांगितल्यावर आकडेवारीकडे वळायला हरकत नाही. फेडरर आणि नदाल या दोघांविरुद्ध त्याचे वैयक्तिक रेकॉर्ड सरस आहे. फेडररविरुद्ध २७-२३ आणि नदालविरुद्ध ३०-२८. चारही ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये फेडरर आणि नदाल यांच्याविरुद्ध विजय मिळवलेला तो एकमेव. फ्रेंच ओपनमध्ये नदालविरुद्ध दोन विजय आणि विम्बल्डनमध्ये फेडररविरुद्ध तीन-तीन अंतिम सामन्यांमध्ये विजय मिळवणे जोकोविच व्यतिरिक्त कोणालाच साधलेले नाही. एखाद्या खेळाडूविरुद्ध किंवा एकापेक्षा अधिक खेळाडूंविरुद्ध सरस रेकॉर्ड असणे आणि त्या-त्या टेनिसपटूच्या आवडत्या टेनिस कोर्टवर सरस कामगिरी करणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. तरीही आजवर जोकोविचला फेडरर आणि नदाल यांच्याइतकी प्रसिद्धी किंवा लोकप्रियता का लाभली नाही? नदालची १३ अजिंक्यपदे अभूतपूर्व आहेत. आजवर कोणत्याही टेनिसपटूला एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचे दोन आकडी वेळा अजिंक्यपद मिळवता आलेले नाही. नदाल अलीकडे फ्रेंच ओपनमध्ये हरू लागला असला, तरी अगदी अलीकडेपर्यंत तो जवळपास अजिंक्य होता. दुसरीकडे, फेडररने विम्बल्डन ही सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि लोकप्रिय ग्रँड स्लॅम स्पर्धा आठ वेळा जिंकलेली आहे. ही कामगिरी त्याच्या असीम लोकप्रियतेत भर घालणारीच ठरते. या दोघांच्या तुलनेत जोकोविचच्या नऊ ऑस्ट्रेलियन अजिंक्यपदे ‘ग्लॅमर कोश्यंट’च्या मोजपट्टीवर काहीशी फिकी ठरली असावीत. शिवाय फेडरर किंवा नदालच्या तुलनेत जोकोविच अधिक मुक्त संवादी आहे आणि मतप्रदर्शनाच्या बाबतीत थोडा अघळपघळ आहे. परंतु फेडरर किंवा नदालपेक्षा शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीत तो सरस आहे. फेडररच्या तुलनेत फिटनेसच्या तक्रारी अधिक असूनही त्याने हे करून दाखवले आहे. त्याच्या मानसिक एकाग्रतेचा आणि तंदुरुस्तीचा पुरावा टेनिस कोर्टवरच मिळेल.

पाच सेट्समध्ये रंगलेल्या सामन्यांचे विजयात रूपांतर करण्यात जोकोविचचा हातखंडा आहे. पाच सेट्सच्या सामन्यांमध्ये त्याची विजयाची टक्केवारी (७७ टक्के) ही नदाल (६३ टक्के) आणि फेडरर (५८ टक्के) यांच्यापेक्षा सरस आहे. गवती पृष्ठभाग किंवा ग्रासकोर्टवर आपल्याला सुरुवातीला नीट खेळता यायचे नाही, असे जोकोविच सांगतो. ग्रासकोर्टवर पाच सेट्समध्ये त्याचे दोन विजय संस्मरणीय ठरतात – पहिला विजय, २०१८ मध्ये नदालविरुद्ध विम्बल्डन उपान्त्य फेरीतला. पाचव्या सेटच्या १५ व्या गेममध्ये जोकोविच स्वतच्या सर्विसवर १५-४० असा पिछाडीवर, म्हणजे ब्रेकपॉइंटच्या उंबरठय़ावर होता. तो गेम जिंकून ८-७ अशी आघाडी घेऊन १६व्या गेममध्ये सर्विस राखत सामना जिंकायचा, असा नदालचा बेत असणारच. परंतु ते दोन्ही ब्रेक पॉइंट वाचवत जोकोविचने सर्विस राखली. पुढे नदालची सर्विस भेदत तो सेट १०-८ असा जिंकून, सामनाही खिशात घातला. दुसरा विजय, २०१९मध्ये विम्बल्डनच्या फायनलमध्ये फेडररविरुद्ध. तोही अभूतपूर्व असा सामना होता. सोळाव्या गेममध्ये फेडरर ८-७ आणि स्वतच्या सर्विसवर ४०-१५ असा आघाडीवर होता. म्हणजे नवव्या विम्बल्डन आणि २१व्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदापासून अवघा एक पॉइंट दूर. पण तो पॉइंट, गेम आणि अखेरीस सामना जोकोविचने त्याला जिंकू दिला नाही. गेली काही वर्षे पाच सेट्समध्ये जिंकण्याची जोकोविचची ही सवय त्याच्या प्रतिस्पध्र्यासाठी धोकादायक ठरू लागली आहे.

जोकोविच फार वेगाने सर्विस करणाऱ्यांपैकी नाही. पण गरजेनुरूप सर्विसच्या वेगात बदल करण्याची युक्ती त्याच्याकडे आहे. त्याची ऊर्जा आणि चिकाटी असीम असल्यामुळे धडाकेबाज सर्विस करून किंवा नेटजवळ धाव घेत आक्रमक खेळण्याची गरज त्याला फारशी भासत नाही. या वर्षी त्याने दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेतच. आता ऑलिम्पिक आणि उर्वरित दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून अनोखे गोल्डन ग्रँड स्लॅम मिळवण्याचा त्याचा प्रयत्न राहील. त्याच्या १९ अजिंक्यपदांचे मोल फेडरर-नदालच्या २० अजिंक्यपदांच्या तुलनेत अजिबातच कमी नाही. उलट या आघाडीवर त्याची मजल २५पर्यंत जाण्याची शक्यताच अधिक. त्याचा खेळ चौफेर असल्यामुळे त्याचे श्रेष्ठत्वही बिनतोड ठरावे असेच!