19 February 2020

News Flash

एकाच शुक्रवारी चार मराठी चित्रपट

मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून जवळपास दर शुक्रवारी दोन-तीन किंवा चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे आढळून येते. नेहमीची कौटुंबिक-विनोदी मसालापटांची चौकट सोडून अन्य विविध...

| July 10, 2015 01:09 am

मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून जवळपास दर शुक्रवारी दोन-तीन किंवा चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे आढळून येते. नेहमीची कौटुंबिक-विनोदी मसालापटांची चौकट सोडून अन्य विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या चित्रपटांचीही मोठी संख्या दिसून येते. २४ जुलैच्या शुक्रवारीसुद्धा एकंदरीत चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
‘कॅरी ऑन मराठा’, ‘हायवे’, ‘पन्हाळा’ आणि ‘मनातल्या उन्हात’ अशी त्यांची नावे आहेत. चित्रपटांच्या नावावरूनच या सर्व चित्रपटांचे आशय-विषय निरनिराळे आहेत हे चटकन ध्वनित होते.
‘कॅरीऑन मराठा’ हा चित्रपट नवीन दिग्दर्शक, नवीन कलावंत, नवीन विषयाच्या पाश्र्वभूमीची प्रेमकथा आणि मराठीमध्ये ‘लय भारी’ नंतर येत असलेला किंचित ‘लार्जर दॅन लाइफ’ स्वरूपाचा मनोरंजन मसालापट आहे असे म्हणता येईल. या चित्रपटाद्वारे मराठीतील गाजलेले नट रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी रुपेरी पडद्यावर ‘हिरो’ म्हणून पदार्पण करतोय. तर त्याच्याच जोडीला कश्मीरा कुळकर्णी ही नवोदित अभिनेत्री नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. मनोरंजनाचा तडका असे या चित्रपटाचे वर्णन करता येईल. ‘हद्द बघितलीस आता जिद्द बघ’ अशी कॅचलाइन देण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची पाश्र्वभूमी या चित्रपटात असेल. ‘तंटा नाय तर घंटा नाय’च्या धर्तीवरची ‘हद्द बघितलीस आता जिद्द बघ’ ही कॅचलाइन प्रमोशन, ट्रेलरमुळे लोकांना चांगलीच माहीत झाली आहे. नृत्य-हाणामारी-प्रेमकथा-किंचित विनोदाची फोडणी अशा नवरसयुक्त भावभावनांचे प्रकटीकरण यात पाहायला मिळू शकेल. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे दिग्दर्शक संजय लोंढे यांचा हा पदार्पणातील चित्रपट असला तरी त्यांनी आतापर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये अब्बास मस्तान, निखिल अडवाणी यांच्यापासून ते अनेक दिग्गज आणि प्रथितयश दिग्दर्शकांच्या जवळपास २८० हून अधिक हिंदी चित्रपटांसाठी कॅमेरा ऑपरेटर म्हणून काम केलेले आहे. संजय लोंढे यांनी म्हणूनच पहिला मराठी चित्रपट असूनही भव्यतेची कास धरली आहे. ते म्हणाले की ‘संपूर्ण मसाला मनोरंजन’ दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. व्यावसायिक चित्रपटाचे सगळे निकष डोळ्यासमोर ठेवून निखळ मनोरंजन प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा उद्देश आहे.
‘हायवे’ हा राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा नवा चित्रपट आहे. शीर्षकावरूनच हा ‘रोड मूव्ही’ प्रकारातील चित्रपट वाटतोय. ‘माणूस प्रवासाने घडतो आणि माणूस प्रवासातच कळतो’ हे सांगणारा हा चित्रपट असेल. गिरीश कुलकर्णी, रेणुका शहाणे, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, सतीश आळेकर, श्रीकांत यादव, किशोर कदम, सविता प्रभुणे, ओम भुतकर, विद्याधर जोशी अशा मराठीतील जानेमाने कलावंत तर आहेतच. त्याशिवाय हुमा कुरेशी आणि टिस्का चोप्रा या हिंदीतील अभिनेत्री प्रथमच या चित्रपटाद्वारे मराठीच्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
अतिशय निराळ्याच विषयावरचा ‘मनातल्या उन्हात’ हा पांडुरंग के. जाधव दिग्दर्शित चित्रपटही २४ जुलैलाच प्रदर्शित होतोय. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या गाजलेल्या नाटकातील प्रमुख कलावंताच्या भूमिकेत गाजलेला अभिनेता कैलास वाघमारे या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर प्रमुख भूमिकेत झळकत आहे. किशोर कदम, नागेश भोसले, रुचिता जाधव, समीर धर्माधिकारी, मिताली जगताप अशा कलावंतांबरोबरच बालकलाकार हंसराज जगताप, ओवेशिक्षा पाटील, मंथन पाटील यांच्याही भूमिका आहेत. पथनाटय़, लोकनाटय़, एकांकिका यातून अभिनय केल्यानंतर कैलास वाघमारे या कलावंताला ‘शिवाजी अंडरग्राउंड..’ यांसारखे नाटक मिळाले आणि आता तो ‘मनातल्या उन्हात’द्वारे रुपेरी पडद्यावर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
२४ जुलैला प्रदर्शित होत असलेल्या ‘पन्हाळा’ या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच हा पन्हाळा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारा चित्रपट आहे असे जाणवते. प्रथितयश नट नागेश भोसले यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात मकरंद देशपांडे, संग्राम साळवी, समिधा गुरू, अमृता संत, स्वत: नागेश भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १०३ मिनिटांच्या या चित्रपटात नागेश भोसले ‘सरप्राइज एलिमेण्ट’ प्रेक्षकांसमोर आणतील अशी रास्त अपेक्षा नक्कीच बाळगायला हवी.
सुनील नांदगावकर response.lokprabha@expressindia.com

First Published on July 10, 2015 1:09 am

Web Title: friday release marathi movie
टॅग Marathi Movie
Next Stories
1 विनोदी-रहस्यमय-थरारपट
2 वेगळ्या विषयांची जुगलबंदी
3 रिमेकदृश्यम
Just Now!
X