उन्हाळ्याच्या काळात वाढत जाणारं तापमान, वेळेअभावी अन्नपदार्थ जास्त काळ टिकवण्याची गरज यामुळे बघता बघता रेफ्रिजरेटर हा स्वयंपाकघरातला अपरिहार्य घटक झाला आहे. तो खरेदी करताना कोणती काळजी घ्याल..?

घरगुती उपकरणे खरेदी करताना आपण फारशी चिकित्सा करत नाही, अशा वेळी कोणत्याही दुकानदाराने आपल्याला फसविण्याची शक्यता अधिक असते. गेल्या काही दिवसांपासून आपण घरात वापरल्या जाणाऱ्या व अतिशय महत्त्वाच्या अशा उपकरणांची खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती घेत आहोत. या वेळी आपण तेवढय़ाच महत्त्वाच्या व पहिली गरज वाटणाऱ्या रेफ्रिजरेटरची (फ्रिज) खरेदी करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा यांबद्दल पाहू या.
उपलब्ध जागा- फ्रिज खरेदी करताना हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे आपण घेतलेला रेफ्रिजरेटर हा आपल्याला सारखा सारखा हलविता येत नाही. त्यामुळे तो खरेदी करताना आपल्याकडे किती जागा उपलब्ध आहे, याचा सर्वप्रथम विचार करणे अत्यावश्यक आहे. तसेच फ्रिजचे दरवाजे हे नेहमी बाहेरच्या दिशेने उघडतात. त्यामुळे हे दरवाजे पूर्णत: उघडले जातील अशी योग्य जागा निवडावी. वरील गोष्टींचा विचार केल्याने आपल्याला कोणत्या प्रकारातील फ्रिज घ्यावयाचा आहे (सिंगल डोअर, डबल डोअर, टॉप फ्रीझर, बॉटम फ्रीझर इ.) हे निश्चित करण्यास मदत होते.
प्रकार- रेफ्रिजरेटरचे मुख्य प्रकार हे बऱ्याचदा त्याच्या फ्रीझरच्या फ्रिजमधील स्थानावरून ठरत असतात. त्यापैकी काही विशेष प्रकारांबद्दल-
टॉप फ्रीझर रेफ्रिजरेटर्स :
’ नावानुसार यामध्ये फ्रीझरची जागा ही रेफ्रिजरेटरमध्ये सर्वात वर असते व बऱ्याचदा त्यासाठी वेगळे दारही असते.
’ ज्यांना बर्फ अगर मुख्यत: फ्रीझरमध्ये ठेवल्या जाणाऱ्या गोष्टींची सतत गरज असते त्यांच्यासाठी या प्रकारचे फ्रिज हे उत्तम मानले जातात.
’ यामध्ये अ‍ॅडजेस्टेबल शेल्फ सुविधा उपलब्ध झाल्यास उत्तम.
’ या प्रकारचे रेफ्रिजरेटर्स हे उत्तम व सोयीचे ठरतात. हे रेफ्रिजरेटर्स हे सर्वाधिक खपतात.
बॉटम फ्रीझर रेफ्रिजरेटर्स :
’ यामध्ये फ्रीझरची जागा तळाला असते. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी या प्रकारची फारशी मॉडेल्स उपलब्ध नसतात.
’ यामध्ये फ्रीझर खालच्या बाजूला असतो. हा डोअर फ्रीझर असेल तर फ्रीझरचा वापर करताना त्रास होण्याची शक्यता असते.
’ त्यामुळे अशा प्रकारातील फ्रिज खरेदी करण्याआधी त्याचे फ्रीझर हे स्लाइड डोअरचे असतील याची खात्री करून घ्यावी.
साइड रेफ्रिजरेटर्स :
’ यामध्ये एका बाजूला एक असे दोन डोअर्स असतात. थोडक्यात, दोन लहान रेफ्रिजरेटर्स एकमेकांना जोडलेले असतात.
’ या प्रकारातील रेफ्रिजरेटर्स महागडे असतात.
’ या प्रकारचे रेफ्रिजरेटर्स हे मुख्यत: जास्त उंचीचे व रुंदीचे असतात, त्यामुळे यांना जरा जास्त जागा लागते.
’ या प्रकारच्या रेफ्रिजरेटर्सची खोली इतर प्रकारच्या रेफ्रिजरेटर्सपेक्षा जरा कमी असते.
’ तसेच यामध्ये दोन दरवाजे असल्यामुळे एका दरवाजाची रुंदी जरा कमी असते. त्यामुळे मोठय़ा आकाराचे सामान त्यात ठेवणे जरा कठीण असते.
कॉम्पॅक्ट रेफ्रिजरेटर्स :
’ या प्रकारचे रेफ्रिजरेटर्स हे मुख्यत: दवाखाने अगर कमर्शियल वापरासाठी उत्तम असतात.
’ या प्रकारातील काही जुनी मॉडेल्स ही फारच कमी वस्तू त्यामध्ये ठेवू शकण्याची क्षमता असलेली होती. परंतु आता नवीन काही मॉडेल्समध्ये त्यांची क्षमता बरीच सुधारली आहे.
’ या प्रकारचे रेफ्रिजरेटर्स खरेदी करताना नवीन मॉडेल्ससाठी विचारणा करावी.
इतर सुविधा :
खरं तर सध्याच्या स्मार्ट जगात रेफ्रिजरेटर्सही स्मार्ट होऊ पाहताहेत. रेफ्रिजरेटर्सच्या दारावर टीव्ही, वायफायद्वारे फ्रिजवरूनच जोडले गेलेले सोशल नेटवर्किंग ही काही स्मार्ट झालेल्या रेफ्रिजरेटर्सची उदाहरणे. यांसारख्या अनेक सुविधा रेफ्रिजरेटर्समध्ये उपलब्ध असतात. परंतु आपली गरज ओळखून आपण त्याप्रमाणे योग्य रेफ्रिजरेटर्सची निवड करावी. काही महत्त्वाच्या सुविधा रेफ्रिजरेटर्समध्ये असणे कधीही उत्तम. त्या पुढीलप्रमाणे-
कूलिंग टाइप-
आपला रेफ्रिजरेटर कोणत्या प्रकारे काम करतो यानुसार म्हणजे कूलिंग करण्याच्या पद्धतीनुसार दोन मुख्य प्रकार आहेत.
१. डायरेक्ट कूल- रेफ्रिजरेटरमधील तापमान थंड राखण्यासाठी फॅनिंग किंवा सक्र्युलेशन पद्धतीचा अवलंब या प्रकारच्या फ्रिजमध्ये केला जात नाही. त्यामुळे फ्रीझर विभागात सतत बर्फ साठत असतो, ज्यासाठी मॅन्युअल अथवा सेमी ऑटोमॅटिक पद्धतीने फ्रीझर सारखा डी-फ्रीझ करावे लागतो. अशा प्रकाराला डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर्स म्हणतात.
यांची किंमत सहसा कमी असते. तसेच यांची वीज वाचविण्याची क्षमताही उत्तम मानली जाते.
२. फ्रॉस्ट फ्री- रेफ्रिजरेटरमधील तापमान थंड राखण्यासाठी फॅनिंग किंवा सक्र्युलेशन पद्धतीचा अवलंब या प्रकारच्या फ्रिजमध्ये केला जातो. त्यामुळे फ्रीझर विभागात सतत बर्फ साठत नाही व तापमान योग्य प्रकारे कंट्रोल केले जाते, ज्यामुळे फ्रिजमधील अन्नपदार्थाचे आयुर्मान वाढते.
– या प्रकारच्या रेफ्रिजरेटर्सची किंमत सहसा जास्त असते व वीज वाचविण्याची क्षमता कमी असते.
वॉटर डिस्पीन्सर- बर्फ आणि पाणी यासाठी उत्तम डिस्पीन्सर असावा. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या काही मॉडेल्समध्ये बर्फ व थंड पाणी हे फ्रिज न उघडताही घेता येण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे.
कप्पे – रेफ्रिजरेटर्सचा उत्तम क्षमतेने वापर करण्यासाठी त्यामध्ये विविध कप्पे असणे महत्त्वाचे असते. पूर्वी फक्त बर्फ व इतर वापरासाठी कप्पे रेफ्रिजरेटर्समध्ये असत. परंतु सध्या विविध गोष्टी साठविण्यासाठी विविध कप्पे पुरविले जातात. उदा. डेअरी प्रॉडक्ट्स; जसे दूध, बटर इ. गोष्टी साठविण्यासाठी वेगळा कप्पा. भाज्या साठविण्यासाठी थोडय़ा जास्त तापमानावर असणारा वेगळा कप्पा. सतत बर्फ हवा असणाऱ्यांसाठी कमीतकमी वेळात बर्फ उपलब्ध व्हावा यासाठी क्विक फ्रीझ टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. असे विविध वापरासाठी विविध कप्पे आपल्या रेफ्रिजरेटर्समध्ये असणे अन्न साठवणुकीच्या दृष्टीनेही उत्तम असते.
आवाजाची पातळी- आवाज हा अनेक रेफ्रिजरेटर्सचा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे आपण रेफ्रिजरेटर निवडण्यापूर्र्वी तो किती आवाज करतो हे न विसरता तपासून पाहा.
– एनर्जी एफिशिएन्सी ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे जे रेफ्रिजरेटर्स तुमच्या इलेक्ट्रिक मीटरला फार जोरात फिरविणार नाहीत, असे रेफ्रिजरेटर्स निवडायला काहीच हरकत नाही. स्टार मार्कवरून रेफ्रिजरेटर्सची वीज खेचण्याची क्षमता आपल्याला कळू शकते. जेवढे स्टार्स जास्त तेवढी वीज कमी वापरली जाणार.
– वॉटर टब बऱ्याचदा फ्रीजर विनाकामाचा चालू राहिल्याने त्यामध्ये भरपूर बर्फ साठतो व कधी रेफ्रिजरेटर बंद केल्यावर सारा बर्फ वितळतो व तळाशी बसविण्यात आलेल्या एका ट्रेमध्ये जमा होतो. हे ट्रे काढता-घालता येतील व स्वच्छ करता येतील अशी सुविधा असल्यास उत्तम. याखेरीज नवीन रेफ्रिजरेटर्समध्ये हे कमीतकमी जमा होईल व त्याच्या साफसफाईसाठी आपणास त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली असते.
– रेफ्रिजरेटर्समध्ये उपलब्ध असलेले कप्पे आपल्याला लहानमोठे करता येत असतील तर आपल्याला हव्या त्या आकाराच्या वस्तू आपण त्यामध्ये साठवू शकतो.
– कोणत्या कंपनीचा रेफ्रिजरेटर खरेदी करावा हा प्रश्न प्रत्येकासमोर असतो. व्हिडीओकॉन, गोदरेज यांसारख्या कंपन्या खात्रीलायक व अनेक रेफ्रिजरेटर्स उपलब्ध करून देतात. गेल्या वेळी वॉशिंग मशीनसाठी अनेकांनी सिमेन्स कंपनी उत्तम असल्याचे सुचविले होते. सिमेन्स कंपनी ही रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशीनसारखी घरगुती उपकरणे बनविण्यात उत्तम आहे. परंतु त्यांची सव्‍‌र्हिस सेंटर्स ही फारच कमी ठिकाणी असतात, ज्यामुळे कधी आपले उपकरण बिघडले तर सव्‍‌र्हिसिंगसाठी वेळ जातो. त्यामुळे ज्या कंपन्यांची सव्‍‌र्हिस सुविधा उत्तम असेल अशा कंपन्यांच्या रेफ्रिजरेटर्सची निवड करावी.
काळजी- कोणत्याही वस्तूचा टिकाऊपणा हा वापरणाऱ्यावर अवलंबून असतो. त्यामुळे आपल्या उपकरणाची योग्य काळजी घ्यावी.
– फ्रीझर हा रेफ्रिजरेटरचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. त्याला अतिलोडपासून वाचविण्यासाठी नेहमी त्यामध्ये काहीतरी ठेवावे. काही ठेवण्यासाठी नसल्यास प्लास्टिकच्या भांडय़ात पाणी भरून ठेवावे.
– रेफ्रिजरेटर्सच्या दारावर असणारी रबरी पट्टी ही लीकेज वाचविण्यासाठी असते. त्यामुळे ती खराब होऊ न देण्यासाठी ती आठवडाभराने स्वच्छ करावी, ज्यामुळे ते रबर कडक न होता तसेच टिकते.
– बरेच दिवस बंद ठेवल्यामुळे व काही कारणांमुळे रेफ्रिजरेटरमधून वाईट वास येऊ लागतो त्यासाठी महिन्यातून एकदा ब्लीचिंग पावडरने रेफ्रिजरेटर पूर्णत: स्वच्छ करावा.
प्रशांत जोशी

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स