नऊवारी साडी, अंबाडा, ठसठशीत दागिने, रुपयाएवढं कुंकू आणि चेहऱ्यावर कमालीचे सोज्वळ भाव हे एके काळच्या मराठी हिरॉइनचं रुपडं आता काळाच्या ओघात ग्लॅमरस झालं आहे. कसा झाला हा प्रवास?

सुलोचनादीदी ते सईमॅडम ताम्हणकर असे अगदी सुरुवातीलाच म्हणताना तुम्हाला काही खोच लक्षात आली का?
सुलोचनादीदी असे आपण गेली अनेक दशके म्हणत आहोत, त्यात त्यांच्याबाबतचा केवढा तरी आदर सामावला आहे. सईला मॅडम म्हणताना ती कॉपरेरेट युगातील मराठी अभिनेत्री आहे, याचे नेमके भान ठेवलेत तर ते किती योग्य वा समर्थक आहे हे पटेल..
मराठी अभिनेत्रींची वाटचाल खूप खूप मोठी आहे. नुसती सूची द्यायची म्हटलं तरी किती तरी पाने खर्च होतील. जवळजवळ प्रत्येकीने मराठी चित्रपटाच्या वैभवशाली चौफेर वाटचालीत आपला कमी-अधिक प्रमाणात वाटा उचलला आहे. काहींनी येथे दीर्घ वाटचाल केली, काही एक-दोन चित्रपटांतून ‘पडद्याआड’ झाल्या. कोणी नामांकित, कोणी वलयांकित, कोणी नियमित, कोणी तात्कालिक, कोणी अधूनमधून, कोणी सहज म्हणून, कोणी प्रसिद्धीसाठी, कोणी पुरस्कारासाठी, कोणी अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारायची गरज म्हणून, कोणी येथे आलो आहोत म्हणून, कोणी सामाजिक भावनेने अशा अनेक प्रकारच्या कारणास्तव येथे पुरुष व स्त्री कलाकार ‘भूमिका’ साकारतात.
तसाच एक मुद्दा, सुलोचनादीदी ते सई ताम्हणकर अशा प्रवासातील सामाजिक बदल व चित्रपट तारकांच्या प्रतिमातील स्थित्यंतरचा!
सुलोचनादीदींमध्ये गृहिणी / ताई / बहिणी / वहिनी असे करता करता आई/ आजी/ अशी रूपे दिसू लागली. कलाकार चित्रपटातून भूमिका साकारत साकारत पुढची वाटचाल करतो, त्या प्रवासात त्याची अशी ‘प्रतिमा’ तयार होत जाते याचे आपल्याकडे फारसे ‘मूल्य’मापन होत नाही. चित्रपटाच्या इतिहासात डोकावताना चित्रपटाच्या नावाच्या संदर्भापलीकडे बरेच बरेच काही सामावलेले असते.
सुलोचनादीदी यांची सगळय़ात मोठी मिळकत म्हणजे, त्यांनी समाजाकडून मिळवलेला प्रचंड आदर! पडद्यावरच्या त्यांच्या भूमिकांशी समाज एकरूप झाला, तसाच प्रत्यक्षातही त्यांच्याकडे नेहमीच आदराने पाहिले जाते.
सई ताम्हणकर हे सुलोचनायुगाचे दुसरे अथवा आधुनिक अथवा मॉडर्न रूप!
पन्नास-साठच्या दशकातला सिनेमा व समाज या दोन्हींत एक प्रकारचे भाबडेपण होते. दोन्हींच्या जगण्यात साधेपण, सहजपण व खरेपण होते. ‘पडद्यावरच्या गोष्टी, त्यातील सुख-दु:ख, त्यातील व्यक्तिरेखा यांच्याशी समाजमन सिनेमा पाहायला जाण्यापूर्वीच एकरूप होई. घरून निघतानाच त्यांच्या मनात सिनेमा सुरू होई. म्हटलं तर हे भाबडेपण, म्हटलं तर निस्सीम प्रेम.
सईचा काळ खूप वेगवान व स्पर्धात्मक असा. ई-कॉमर्स, व्हॉटस अ‍ॅप, फोर जी यांचा! फ्रेंडशिपसाठी भावना व्यक्त करायला वेळ नाही, संसाराला आकार येत नसेल तर शक्य तितक्या लवकर घटस्फोट घेणारा असा. हा सगळा अमेरिकन जीवनशैलीचा प्रभाव व परिणाम असे म्हणतानाच त्यातही लग्नसंस्था टिकून ठेवण्याचा घट्ट प्रयत्न करणारेही अनेक आहेत. काही मराठी चित्रपटातून याचे प्रतिबिंब पडू लागले आहे.
तात्पर्य, सईशी जोडून घेण्यात आजच्या प्रेक्षकांसमोर अडथळे खूप आहेत. सईने त्या साऱ्यावर मात करीत आपली जागा तयार केली हे जास्त कौतुकाचे आहे. तिच्यासारख्याच इतरजणीही आहेत.
सुलोचनादीदी ते सई यांच्या मधल्या प्रवासाचे काय?
आपण पंचवीस-तीस वर्षांचा मागोवा घेतला तरी बऱ्याच गोष्टी दिसतात.
नेमकं सांगायचे तर, १९८२ साली आपल्या देशात रंगीत दूरदर्शन व चित्रफीत यांच्या झालेल्या आगमनाने हिंदी चित्रपटाला चांगलाच फटका बसला, तेव्हा मराठी चित्रपट कोणत्या वळणावर होता? तर तेथेच नेमके ‘मराठी नायिकां’च्या वाटचालीला ‘नवे वळण’ लागलेले दिसते. चोरटय़ा मार्गाने हिंदी चित्रपटाची चित्रफीत उपलब्ध होऊ लागल्याने ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’पासूनच चित्रपटगृहे ओस पडू लागली. त्या ‘नकारात्मक वातावरणा’चा मराठीला खूप फायदा झाला.
मालिकांच्या बाबबीत तो नेमका कसा झाला?
‘लेक चालली सासरला’च्या यशाने अलका कुबलला सोशिक नायिका अशी प्रतिमा मिळाली. माहेरची साडीच्या वेळी ती रडूबाई नायिका अशी ओळखली गेली. मराठी चित्रपटाच्या नायिकांच्या परंपरेशी ते सुसंगत होते. अशा कौटुंबिक चित्रपटाचा ग्रामीण भागात हुकमी प्रेक्षक आहे. चित्रपटातील नायिकेवरील दु:खाचा डोंगर ते स्वत:चा मानतात आणि जणू आपले दु:ख हलके करण्यासाठी नायिकेशी एकरूप होतात. अशा मानसिकतेमुळे अलका ‘नायिकेतील यशस्वी स्टार’ झाली.
याच टप्प्यावर सचिन पिळगावकर व महेश कोठारे यांचा ‘यशस्वी निर्माता-दिग्दर्शक’ असा डाव आकाराला आला. ‘नायिकेच्या वाटचाली’ला या रंगाचा कसा लाभ झाला?
सचिनच्या ‘गंमत जंमत’द्वारे ‘वंडरगर्ल’ वर्षां उसगावकरने ‘मी आले, निघाले’ अशी उत्स्फूर्त वाटचाल सुरू केली. सचिन-महेशने चित्रपटगृहाकडे खेचून आणलेल्या ‘युवा’ प्रेक्षकांना अशा अभिनय, सहजता व सौंदर्य यांचे चांगले समीकरण जुळून आलेल्या आपल्या वयोगटाच्या तारकेची असलेली अपेक्षा वर्षांकडून पूर्ण झाली. तिच्या अभिनय क्षमतेवर जवळजवळ सर्वच दिग्दर्शकांनी दाखवलेला विश्वास तिने सार्थ ठरवला ही तिची सर्वात मोठी मिळकत! त्या काळाचा विचार करताना वर्षां नवीन पिढीचा मराठी चित्रपट व प्रेक्षक या दोन्हींची योग्य प्रतिनिधी ठरली. त्यात तिचा ‘आत्मविश्वास’ वाढला. लोकप्रियताही चढती भाजणीनुसार रंगली.
अश्विनी भावेने ‘कळत-नकळत’, ‘वजीर’, ‘जन्मठेप’, ‘आहुती’ अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. मराठी रसिकांना अशा पद्धतीची सतत वेगळय़ा वाटा शोधणारी अभिनेत्री आवडते. हे अश्विनीच्या पथ्यावर पडले.
मराठी चित्रपटाच्या नेमक्या याच टप्प्यावर हिंदी चित्रपटाच्या आकर्षक अभिनेत्रीसारखं व्यक्तिमत्त्व असणारी गरज किशोरी शहाणेने पूर्ण केली.
या टप्प्यावर मराठी चित्रपटाला खूप चांगले दिवस आले होते व प्रेक्षकांना विषयात विविधता अपेक्षित होती. नायिकांच्या बाजूवर पाहिले तर जब्बार पटेल यांच्या ‘उंबरठा’तून स्मिता पाटीलने नवीन पिढीतील स्वतंत्र बाण्याच्या स्त्रीचे दर्शन घडवले..
या काळात सुप्रिया पिळगावकर, निवेदिता जोशी, प्रिया अरुण अशा अनेक तारकांनी लक्षवेधी यश मिळवले. प्रत्येकीचा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण झाला.
नव्वदचे दशक सुरू होताना देशात खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण यांचे वारे आले, लवकरच उपग्रह वाहिन्यांचे आगमन झाले, काही वर्षांतच आपण ‘विश्वसुंदरी’ व ‘जगतसुंदरी’ या ‘मानाच्या स्पर्धा’ जिंकल्या. हा ‘सांस्कृतिक धक्का’ पुन:पुन्हा बसू लागताना आपल्या समाजात ‘मी सुंदर दिसणार’ या भावनेने जोर पकडला. दर्जेदार व महागडी सौंदर्य प्रसाधने व देशी-विदेशी उंची फॅशनची वस्त्रे ही गरज कधी व का झाली हेच समजले नाही. हे प्रगतीचे लक्षणही मानले गेले.
रेशम टिपणीस या नवीन समीकरणाची शंभर टक्के ‘सही’ प्रतिनिधी ठरली. प्रेक्षकांच्या ‘पुढील पिढी’ला रेशममध्ये ‘आधुनिक फंडे’ दिसले, म्हणून ती लवकरच लोकप्रिय ठरली.
काळ बदलला तरी मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना परंपरा व आधुनिकता यांचा सुवर्णमध्य गाठणाऱ्या अभिनेत्रीबाबत आपलेपण वाटते. ते ‘मुक्ता’च्या सोनाली कुलकर्णीबाबत झाले. सोनालीची नंतरची वाटचाल कमालीची सकारात्मक अशीच आहे. ती चित्रपटात आहे म्हणजे नक्कीच काही तरी चांगलेच पाहायला मिळणार असा तिच्या दर्जेदार अभिनयातून विश्वास वाढीला लागला. तुमच्या भूमिकेतून काय ते सांगा असे म्हणतात, त्याचा उत्तम व योग्य प्रत्यय असा येतो. मुक्ता बर्वे व प्रिया बापट यांच्या अभिनय कौशल्यानेही विश्वास कमावला.
..मराठी चित्रपट व त्यातील नायिका यात पूर्वी ‘पडद्यावरचे रूप’च प्रत्यक्षात हा बाणा होता, आता तशी ‘खासियत’ गरजेची राहिलेली नाही. पण काळ बदलला तसा मराठी नायिकांचा पुढचा टप्पा वेगवान व गुंतागुंतीचा होत गेला. कारण, आता चित्रपट निर्मितीची संख्याच भरमसाट वाढली आणि कलाकारापुढेही चित्रपट नसेल तर उपग्रह वाहिनी आहेच, असा मोठा पर्याय आला. एकेकाळी मराठीत वर्षभरात जेमतेम बारा-पंधरा चित्रपट निर्माण होत, ती संख्या २०१२, २०१३ मध्ये शंभरपेक्षा जास्त अशी वाढली. काम वाढले की धावपळही वाढते आणि काही कलाकारांना एकाच भूमिकेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे अथवा सिनेमाच्या भाषेत त्याला ‘भूमिकेत शिरणे’ म्हणतात ते खूप अवघड जाते. या काळात प्रेक्षकही खूप-खूप बदलला. तो नेट-सॅव्ही झाला, इंग्रजी माध्यमात शिकू लागला, सहजपणे विदेशी चित्रपट पाहू लागला, ई-कॉमर्सने त्याच्यासमोर माहिती व मनोरंजनाचे फार मोठे विश्व खुले केले. तो त्यात हितकारक असे किती पाहतो व अनावश्यक गोष्टींना किती वेळ देतो हा पुन्हा स्वतंत्र विषय झाला. पण त्याच्यात आंतर्बाह्य़ बदल होताना त्याच्यातील एक गोष्ट चांगली राहिली. त्याला मराठी चित्रपटातून अभिनय साकारणारी अशीच अभिनेत्री आवडू लागली. मग ती भूमिका कोणत्याही स्वरूपाची असू देत. तो चित्रपट ग्रामीण असो, एखाद्या विशिष्ट कलावरचा असो, तो नवप्रवाहाच्या वळणाने जाणारा असो अथवा अगदी आजच्या पिढीच्या संसारातील व नातेसंबंधातील ताण-तणाव व्यक्त करणारा असो. त्या चित्रपटातील नायिकेने भूमिकेला न्याय द्यावा अशी आजच्याही पिढीच्या रसिकांची पहिली अपेक्षा आहे. म्हणजे तो त्याबाबत परंपरेला घट्ट चिकटून आहे अथवा सुलोचनादीदींच्या काळापासून मराठी चित्रपटाच्या नायिकेबाबत असणारे आपलेपण हे असे पुढील पिढय़ांतून कायम राहिले आहे असे म्हणावे लागेल.
काही दर्जेदार भूमिकांची ‘दखल’ घ्यायला हवीच. (नायिका व त्यांचे चित्रपट हे असे) आदिती देशपांडे आणि मधुरा वेलणकर (नॉट ओन्ली मिसेस राऊत), सोनाली कुलकर्णी (देवराई), मधुरा वेलणकर (अधांतरी), ऐश्वर्या नारकर (झुळूक), अश्विनी भावे (कदाचित), माधवी जुवेकर (टिंग्या), मुक्ता बर्वे (जोगवा), दीपा परब (उरूस), अमिता खोपकर (जोशी की कांबळे), माधवी जुवेकर (झिंग चिक झिंग), मिताली जगताप (बाबू बॅन्ड बाजा), ऊर्मिला कानेटकर (मला आई व्हायचंय), मानसी साळवी (सद्रक्षणाय), ज्योती चांदेकर (पाऊलवाट), तेजस्विनी पंडित (मी सिंधुताई सपकाळ), प्रिया बापट (काकस्पर्श), उषा जाधव (धग), सई ताम्हणकर (सौ. शशी देवधर), वीणा जामकर (टपाल), मुक्ता बर्वे (बदाम राणी गुलाम चोर), सोनाली कुलकर्णी (पुणे ५२), मृणाल कुलकर्णी (प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं), मुक्ता बर्वे (मंगलाष्टक वन्स मोअर), सई ताम्हणकर (दुनियादारी), ऊर्मिला कानेटकर (दुनियादारी), प्रिया बापट (टाइम प्लीज गोष्ट लग्नानंतरची)..
आजच्या पिढीच्या तारकांनी आपल्या अभिनय गुणाने मोठय़ा प्रमाणावर समीक्षक व प्रेक्षक या दोघांचेही ‘विशेष लक्ष’ वेधले अशी ही ‘हिट लिस्ट’ आहे.
सुलोचनादीदी ते सई अशी वाटचाल विचारात घेताना हे अगदी वेगळे वळण ठरते. ‘काकस्पर्श’साठी प्रिया बापटचाच विचार योग्य ठरला असे तिने अभिनयातून साध्य केले. सुलोचनादीदींच्या काळात प्रेक्षक म्हणत ‘भूमिका आवडली, फार छान काम केलेत.’
सईच्या काळात ‘ऑडियन्स’ नेटवर ‘लाइक’ करतो, त्याच्या वाढत्या लाइक्स म्हणजे कलाकाराला दाद मिळाली असा होतो.
या प्रवासात आदराने नाव घ्यावे अशा सीमा देव, उमा भेंडे आहेतच. आशा काळे ‘वहिनी’ म्हणूनच समाजात प्रिय ठरल्या. उषा चव्हाण, उषा नाईक यांनी नृत्यप्रधान चित्रपटांतून आपले कलाकौशल्य दाखवले. अशी मराठी अभिनेत्रींची नामावली खूप खूप मोठी आहे.
कांचन अधिकारी ते प्रतीक्षा लोणकर असा प्रत्येकीचा या इतिहासात/ प्रवासात वाटा आहे. त्यांची रुपेरी वाटचाल सुरू असतानाच समाज बदलत होता.
एक पडदा चित्रपटगृह ते मल्टीप्लेक्स (आता मोबाइलही) अशा चित्रपट पाहण्याच्या पद्धती बदलल्या.
दसरा-दिवाळीला नवे कपडे खरेदी करूयात ते सिंगापूर/ दुबईच्या प्रशस्त मॉलमध्ये खरेदीला जाऊया अशी जीवनशैली बदलली (निदान उच्चमध्यमवर्ग तरी). मोठ-मोठी पत्रं लिहिण्याची सवय रद्दीत जाऊन व्हॉटस अपवर मेसेज क्लिक होऊ लागला.
सगळी जीवनशैलीच बदलत चाललीय, भविष्यात ‘बदलाचा हा वेग’ आणखी वाढेल.
त्याच सामाजिक/ सांस्कृतिक/ आर्थिक बदलांच्या पाश्र्वभूमीवर सुलोचनादीदी ते सई ताम्हणकर अशा ‘मराठी नायिकां’च्या प्रवासाचा एक धावता आढावा घेण्याचा हा प्रयत्न.
सुलोचनादीदीत ‘आई’ दिसणे जेवढे सहज घडते, तशीच सईमध्ये ‘गर्लफ्रेण्ड’ दिसणेही स्वाभाविक आहे.
‘पडद्यावरच्या जगा’ला समांतर असा ‘पडद्यामागे’ही एक प्रवास सुरू असतो, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याचा हा ट्रेलर. मध्यमवर्गाचे भावविश्व ते कापरेरेट जगत असा ही हा प्रवास आहे…