scorecardresearch

साठवण : असे होते गदिमा!

कवी, कथा-पटकथा-संवादलेखक, अभिनेते आदी अनेक कलाप्रांतांत एकाच वेळी लीलया संचार केलेल्या ग. दि. माडगूळकर अर्थात ‘गदिमां’ची समग्र माहिती आता एका क्लिकवर ‘गदिमां’चे नातू सुमित्र यांनी अथक परिश्रमाने मांडली आहे.

साठवण : असे होते गदिमा!


कवी, कथा-पटकथा-संवादलेखक, अभिनेते आदी अनेक कलाप्रांतांत एकाच वेळी लीलया संचार केलेल्या ग. दि. माडगूळकर अर्थात ‘गदिमां’ची समग्र माहिती आता एका क्लिकवर ‘गदिमां’चे नातू सुमित्र यांनी अथक परिश्रमाने मांडली आहे.

‘गदिमा’ हे अष्टपलू कलाकार होतेच, मात्र त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुपेडी होतं. त्यांच्या या विविध छटा चिमटीत पकडून ठेवणं शक्यच नाही, तरीही त्यांची जगावेगळी प्रतिभा व त्यांचा कलाविष्कार पुढील पिढय़ांना कळावा, या हेतूने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मी काही तरी भरीव करायचं ठरवलं. ते वर्ष होतं १९९८, तेव्हा माझं इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीयिरग नुकतंच पूर्ण झालं होतं. त्या वेळी आजच्यासारखा सोशल मीडिया तर नव्हताच, मात्र मराठीमध्ये वेबसाइटही एक-दोनच होत्या. त्यातच मी ‘गदिमाडॉटकॉम’ ही साइट सुरू केली. मात्र तेव्हा इंटरनेट सुविधेचा फार विस्तार झाला नसल्याने मी या साइटवरील सर्व तपशिलाचा समावेश असलेली एक सीडी काढली होती, तिला चांगला प्रतिसाद लाभला.
या साइटचं रूपडं पालटलं ते ‘गीतरामायणा’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने. यंदा एप्रिलमध्ये या वर्षांला सुरुवात झाली, त्या वेळी या साइटवर मी ‘गीतरामायणा’चं एक विशेष पेज फेसबुकवर सुरू केलं, त्याला एवढे व्हिजिटर्स लाभले व अजूनही लाभतायत की, आम्ही सारे थक्क झालो. त्यातून गदिमा साइट अपडेट करण्याची कल्पना सुचली. या कामी मला पत्नी प्राजक्ताचीही मोलाची सोबत होती. हे काम करताना आम्हाला ‘गदिमां’च्या प्रतिभेचा आवाका नव्याने जाणवला. या प्रतिभेला न्याय देण्यासाठी आम्हाला सुरुवातीला दोन-चार तास आणि शेवटीशेवटी तर रोज पंधरा-पंधरा तास काम करावं लागलं, त्यातून ही समग्र साइट आकाराला आली.
या साइटमध्ये काय-काय आहे, याची उत्सुकता एव्हाना ‘गदिमां’च्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली असेल. तर रसिकहो, यामध्ये तुम्ही गदिमांची तब्बल सातशे चित्रपटगीते ऐकू शकता, सोबत ही गीते वाचण्याचीही सुविधा आहे. आपल्यापकी अनेक जण शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात गेले असतील, तर तेथे जी काकडआरती होते, ती ‘गदिमां’च्या लेखणीतून उतरली आहे. या काकडआरतीसाठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं, हे आम्हालाही यानिमित्ताने समजलं. या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. ही आरतीही या साइटवर आहे. गदिमांनी स्वातंत्र्यलढय़ातही भाग घेतला होता, त्या वेळी त्यांनी जे काही काव्य रचलं, ते टोपणनावाने म्हणजे ‘शाहीर बोऱ्या भगवान’ या नावाने केलं आहे, ही माहितीही जिज्ञासूंना यात मिळेल. ‘फडके-माडगूळकर’ जोडीचं ‘गीतरामायण’ किती लोकप्रिय झालं हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही, मात्र या ‘गीतरामायणा’ची दोन व्हर्जन्स यामध्ये आहेत. पहिलं म्हणजे, आकाशवाणीवरून प्रसारित झालेली विविध गायकांच्या आवाजातील गीते व दुसऱ्या व्हर्जनमध्ये सर्व म्हणजे ५६ गीते बाबूजींच्या आवाजात ऐकायला मिळतात.
‘गीतरामायणा’इतकंच तोलामोलाचं काम गदिमांनी ‘गीतगोपाल’च्या वेळी केलं. श्रीकृष्णचरित्रावर आधारित हे ‘गीतगोपाल’ दुर्दैवाने गाजलं नाही, मात्र ही गीतेही इथे आहेत. गंमत म्हणजे सी. रामचंद्र, यशवंत देव आणि श्याम जोशी अशा तीन संगीतकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं स्वरबद्ध केलेलं ‘गीतगोपाल’ येथे ऐकायला मिळतं. गदिमांनी पेशवाईवरही ‘गंगाकाठी’ या नावाने एक काव्यकथा लिहिली होती, त्याचं वाचनही यात उपलब्ध आहे. अथर्वशीर्षांचं मराठी रूपांतर ही कल्पनाच वाटेल, मात्र गदिमांनी तेही केलं आहे आणि हे मराठी अथर्वशीर्ष इथे ऐकता येतं.

महाकवी
गदिमांचा उल्लेख कोणी महाकवी असा केला, की ते गमतीने म्हणत असत- अहो, मी महाकवी नाही, महाकाय कवी आहे! त्यांची प्रतिभा निर्विवाद असूनही काही जण त्यांची हेटाळणी गीतकार अशी करत असत. गीतलेखन करताना दर्जात कोठेही तडजोड न करणारे गदिमा या टीकेकडे लक्ष देत नसत. ‘जोगिया’ या पहिल्या काव्यसंग्रहाच्या मनोगतामध्ये ते म्हणतात, जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेइमानी करण्याचा प्रसंग आला/येतो. या संग्रहातील कविता मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे आणि म्हणूनच त्याला ‘जोगिया’ असं नाव दिलं आहे.

हिंदीतही छाप
गदिमांनी तब्बल १५८ मराठी चित्रपटांसाठी कथालेखन केले, यातील अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा व संवादही त्यांच्याच लेखणीतून उतरले. मात्र त्यांचा संचार केवळ मराठी चित्रसृष्टीतच नव्हता, तर हिंदीतही त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कथेवर सुमारे २५ हिंदी सिनेमांची निर्मिती झाली असून त्यात ‘तुफान और दिया’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’ आदींचा समावेश आहे. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’ची मूळ कथाही गदिमांचीच होती, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही याच शब्दप्रभूची!

सोप्या शब्दांत तत्त्वज्ञान
गदिमांच्या अनेक गीतांमध्ये जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या शब्दांत मांडलेलं दिसतं. ‘दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा’ या पंक्ती मानवी जीवनाचं सार आहेत. ‘जगाच्या पाठीवर’ची गीते तर पराकोटीच्या तत्त्ववेत्त्याने लिहिल्यासारखी वाटतात. ‘इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना परी चिरंजीविता, बोरी-बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार, अजब तुझे सरकार’.. किंवा ‘एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’.. असो, गदिमांची चिंतनशील वृत्ती यात दिसून येते. ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई, कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’ यासारखं कटू सत्य सांगणारं गीत तर त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नदिनी लिहिलं आहे!

‘गदिमां’चा आवाज प्रत्यक्ष ऐकायला मिळणं, हे आपल्यासाठी आता शक्य नाही, तरीही ‘जोगिया’ ही त्यांची आवडती कविता तसेच ‘जत्रेच्या रात्री’ आणि ‘पूजास्थान’ या कविता खुद्द त्यांच्या आवाजात ऐकायला मिळते, शिवाय पेण येथे गणेशोत्सवात केलेलं एक तासाचं भाषणही आहे, यात गदिमांनी ते कवी कसे झाले, त्यांच्यावर कोणाचे संस्कार झाले, त्यांची जडणघडण कशी झाली, याचं सविस्तर कथन केलं आहे. याच ‘जोगिया’ काव्यसंग्रहातील निवडक १६ कवितांना सुरेश देवळे यांनी स्वरबद्ध केलं असून त्या श्रीधर फडके, रवींद्र साठे, उत्तरा केळकर आदी गायकांच्या स्वरांत ऐकण्यास मिळतात. गदिमांच्या जुन्या गाण्यांना नंदू घाणेकर यांनी स्वरबद्ध करून तयार केलेला ‘अगदि आज’ हा अल्बमही यात आहे. 

जुन्या काळातील कलाकारांची छायाचित्रं मिळणं ही दुरापास्त गोष्ट, मात्र या साइटवर ‘गदिमां’ची १०-२० नाहीत, तब्बल पाचशे छायाचित्रं पाहाता येतात. या छायाचित्रांची सरमिसळ नसून त्यात घरातले, साहित्यातले, चित्रपटातले व राजकारणातले गदिमा वेगवेगळ्या भूमिकांत दिसतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘गीतरामायणा’च्या वेळी बाबूजी व गदिमांचं मनापासून कौतुक केलं होतं. इतकंच नव्हे, तर त्यांनी आपल्या चिकट वहीमध्ये दर आठवडय़ाला प्रसारित होणारी ही गीतं लिहून ठेवली होती. पुण्यात झालेल्या ‘गीतरामायणा’च्या एका कार्यक्रमातील उत्पन्न सावरकरांना गौरवनिधी म्हणून देण्यात आलं, त्या वेळी टिपलेलं एक दुर्मीळ छायाचित्रही यात आहे. अन्य एका छायाचित्रात तर संजीवनी मराठे, पद्मा गोळे, यशवंत, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, वा. रा. कांत, वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि गदिमा असे असे मराठीतील नऊ दिग्गज कवी एकत्र दिसतात. गदिमांच्या पत्नी व आमची आजी विद्या माडगूळकर या उत्तम गायिका होत्या, हे आता कमी जणांना ठाऊक असेल. उभरती लता मंगेशकरही आमच्या आजीची तेव्हा फॅन होती, तर या साइटमध्ये आमच्या आजीच्या आवाजातलं ‘छुमछुम नाच मोरा’ हे गीतही उपलब्ध आहे. ‘गदिमां’नी साधारण दोन सहस्र चित्रपटगीते लिहिली आहेत, अशी माहिती आहे, पुढील टप्प्यांत यातील उर्वरित गाणी समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या यात गदिमांच्या उपलब्ध पुस्तकांची सूची व ती विकत घेण्यासाठी ऑनलाइन सुविधा आहेच, मात्र गदिमांची सुमारे ४० पुस्तकं जी अनेक र्वष ‘आऊट ऑफ िपट्र’ आहेत, ती येत्या तीन-चार महिन्यांत बाजारात येतायत, ही पुस्तकंही या साइटमध्ये टाकणार आहोत.
मी केवळ दोन वर्षांचा असताना म्हणजे १९७७ मध्ये गदिमा गेले, त्यांच्या अगदी अंधूक आठवणी माझ्या मनात आहेत, मात्र त्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर व ही साइट सुरू केल्यानंतर त्यांच्या अधिक जवळ गेलो, त्यांची थोरवी ठळकपणे समजली. पुढच्या पिढीतल्या मुलामुलींच्या मनात गदिमांविषयी जिज्ञासा निर्माण होईल, तेव्हा ही साइट ‘असे होते गदिमा’ उत्तर देईल, असा आम्हाला विश्वास आहे.
शब्दांकन- अनिरुद्ध भातखंडे

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या