पावसाळ्याच्या दिवसांत मोबाइल अगर इ-गॅजेट्स खराब होण्याचा धोका सर्वाधिक असतो. आपल्यासाठी आपण जशी रेनकोट, छत्री यांची खरेदी करतो तशीच पावसाळा आल्यावर आपल्या गॅजेट्ससाठीही ‘रेनकोट’ खरेदी करणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्यासाठीही पावसाळा सुरू होण्याच्या वेळीच बाजारात विकले जाणारे प्लास्टिक पाउच खरेदी करावेत. सध्या पाच-दहा रुपयांना विकले जाणारे प्लास्टिक पाउच सहज उपलब्ध होतात; परंतु त्यांची विश्वासार्हता म्हणावी तेवढी नक्कीच नसते. चालू वापरासाठी म्हणून हे पाउच ठीक असले तरी जरा जास्तीचा खर्च करून ऑनलाइन शॉपिंगमधून चांगल्या प्रतीचे वॉटरप्रूफ मोबाइल पाउचेस आपण मागवू शकतो. आणि शक्य असल्यास ते मागवावे. नॉइस, अॅक्वापॅक कंपनीचे पाउच ऑनलाइन उपलब्ध होऊ शकतात. जरा शोधल्यास लॅपटॉपसाठीही हे पाउचेस उपलब्ध होऊ शकतील. बऱ्याचदा लॅपटॉपच्या की-बोर्डसाठी कव्हर मिळाले तर शोधावे. बऱ्याचदा या प्लास्टिक कव्हरमध्येही मॉईश्चर जमा होऊ शकतं. त्यासाठी त्यामध्ये सिलिका जेलचे छोटे पॅकेट्स ठेवावेत. हे अगदी छोटे पांढऱ्या रंगाचे पॅकेट्स आजूबाजूच्या हवेत असणारी आद्रता शोषून घेतात. त्यामुळे आपले गॅजेट्स खराब होण्याचा धोका कमी होतो.

आपण उंचावर ट्रेकिंगसाठी गेले असाल तर तेथे सतत ढग असतात ज्यामुळे हवेतील आद्र्रतेचं प्रमाण अधिक असतं, अशा वेळी आपले मोबाइल भिजण्यापासून वाचविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे ते खिशातून बाहेर काढणे टाळावे. अशा वेळी कॉल रिसिव्ह करण्यासाठी हॅन्ड्स फ्री अगर ब्लू टूथ हेडसेटचा वापर करावा. मेसेज टाइप करण्यासाठीही व्हॉइस मेसेज सुविधेचा उपयोग करावा. जेणेकरून फोन बाहेर काढावा लागणार नाही. जर आपणांस कॉल पर्सनली अटेंड न केलेले चालणार असतील तर कॉल फॉरवíडंग अगर कॉल डायव्हर्ट सुविधेचाही वापर करता येऊ शकतो. टच स्क्रीन सुविधा असणारे मोबाइल हे आद्र्रता आणि पाण्याच्या बाबतीत अधिक संवेदनशील मानले जातात त्यामुळे त्यांची विशेष, काळजी घ्यावी.
या काळात कॅमेऱ्यांची देखील विशेष काळजी घ्यावी. त्यासही योग्य ते प्लास्टिक कव्हर शोधावे, मुख्य म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच कॅमेरे चालू करावेत अन्यथा त्याच्या लेन्समधील जागेत आद्र्रतेचा परिणाम घडतो व बऱ्याचदा त्याची लेन्स नीट बंद होत नाही. कधी कधी सतत पाण्याच्या अगर अधिक आद्र्रतेच्या संपर्कात असताना कॅमेराच खराब होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात उंचावर फिरायला जाताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी.
पावसाळ्यात विजा चमकत असल्यामुळे घरातील व्होल्टेज कमी अधिक होत असते ज्यामुळे आपल्या घरातील उपकरणे खराब होण्याची भीती असते. त्यासाठी स्पायगार्ड खरेदी करावे जेणेकरून आपल्या महागडय़ा इ-वस्तू खराब होण्यापासून बचावतील. होम थिएटर सुविधा अगर प्लाझ्मा डिस्प्ले भिंतीला टांगण्याआधी त्या भिंतीला आद्र्रतेपासून धोका नाही याची खात्री करून घ्यावी अन्यथा आद्र्रते मुळे या उपकरणांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. शक्य असल्यास यासाठी स्टॅन्डचा वापर करावा.
मोबाइल प्रमाणापेक्षा अधिक काळ चार्ज करू नये. चार्जिग झाल्यावर मोबाइल काढून ठेवावा. चार्जिग करण्यासाठी स्वस्तातील व कमी क्वालिटीचे चार्जर वापरणे टाळावे. अचानक वीज पडल्यास अगर व्होल्टेज कमी अधिक झाल्यास आपला फोन अगर इ-साधने खराब होऊ शकतात. शक्यतो आपल्या मोबाईलसाठीचा ओरिजनल चार्जर वापरावेत. शक्यतो जोरदार विजा चमकत असताना ई-वस्तू वापरणे टाळावे.
काळजी घेऊनही आपला मोबाइल ओला झालाच तर काळजी नसावी. लगेच मोबाइल खराब होत नाही, कारण प्रत्येक मोबाइल हा अनेक खडतर चाचण्यांतून गेलेला असतो. परंतु पुढील काही बाबी करणे अतिशय आवश्यक आहे.
सर्वप्रथम मोबाइल पाण्यातून काढावा व तो चालू असल्यास लगेचच स्वीच ऑफ(बंद) करावा. कारण मोबाइल अगर कोणतेही इ- गॅजेट ओले झाल्यानंतर त्याच्या सर्किटमध्ये पाणी जाते आणि जर त्यातून विद्युतप्रवाह चालूच राहिला तर हानिकारक ठरू शकते. त्यामुळे लगेचच बंद करून त्यातील बॅटरी काढून टाकावी. मग तो सुकवावा.
आपल्याकडे बऱ्याचदा ओला झालेला फोन वाळविण्यासाठी हेअर ड्रायर वापरण्याचा सल्ला दिला जातो. परंतु हे अतिशय चुकीचे आहे. हेअर ड्रायरमधील हवेचा जोर कधीकधी गॅजेटमधील सर्किट खराब करू शकतो. त्यामुळे आपले गॅजेट ऊन येईल अशा ठिकाणी ठेवावे. त्यामुळे ते लगेचच वाळते. यासाठी आणखी एक उपाय नेहमी सांगितला जातो तांदूळ घेऊन त्यात गॅजेट ठेवावे, तांदूळ हे आद्र्रता अगर पाणी शोषक समजले जातात ज्यामुळे त्या गॅजेटमधील पाणी शोषून घेतले जाते. हे काही अंशी खरे असले तरी हे उपाय टाळावेत कारण गॅजेटमधील पोर्ट्स नाजूक असतात.
ओला फोन कधीही चार्ज करू नये. पावसाळ्याच्या दिवसात फोन अगर कोणतेही गॅजेट चार्जिगला लावण्यापूर्वी त्याचा चार्जिग पोर्ट ओला नसल्याची खात्री करून घ्या. ओला झालेल्या गॅजेटला आतून पुसण्यासाठी कधीच कापूस अगर कापडाचा वापर करू नका. त्यातील लहान धागे सर्किटमध्ये अडकल्यास ते काढणे कठीण होते.
मॉन्सून काळात आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची योग्य काळजी घेतलीत तर ते नक्कीच जास्त काळ आपल्याला सेवा देतील..

मॉन्सून ट्रेकसाठी जात आहात?
* मॉन्सून ट्रेक ही सगळ्यात मोठी धम्माल असते, आणि सध्याची ईन फॅशन गोष्ट म्हणजे फोटोग्राफी. मॉन्सून ट्रेकला जावून पावसामध्ये आपला मोबाइल काढता येत नाही किंवा त्यात सेल्फीदेखील अपलोड करता येत नाहीत त्यासाठी नॉइस, अॅक्वापॅकसारख्या कंपन्यांनी मोबाइल कव्हर उपलब्ध केले आहेत.
* या पाउचची खासियत म्हणजे बाहेर कितीही पाणी असले तरी या पाउचमध्ये ठेवलेल्या गॅजेटमध्ये पाणी जाण्याची श्क्यता जवळ जवळ शून्य असते. स्वििमग पूलमध्ये देखील आपण हे पाउच घेवून जावू शकता आणि आपले गॅजेट सुरक्षित असेल.
* विशेष म्हणजे या पाउचमधून आपण मोबाइलचा टच इंटरफेस सहज वापरू शकतो आणि फोटोदेखील काढू शकतो.
* हे कव्हर पाउच डिजीटल कॅमेरा मोबाइलसाठी उपलब्ध आहेत. याची साधारण किंमत ६००-८०० रुपयांपर्यंत असली तरी एकदा केलेला खर्च मॉन्सून एन्जॉयमेंटसाठी वसूल असेल नक्कीच.
* पावसात भिजत असताना गाणी ऐकण्यासाठी वॉटरप्रूफ हेडफोन्सही उपलब्ध आहेत. फिलिप्स आणि काही परदेशी कंपन्यांनी या प्रकारातील हेडफोन्स उपलब्ध केले असले तरी ते जरा महागडे ऑप्शन आहे.
* चार्जिगसाठी पोर्टेबल चार्जर उपलब्ध असले तरी साध्या पेन्सिल सेलवर चालणारे चार्जर बाजारात उपलब्ध आहेत, ते वापरावे. कारण त्यातील सेल संपले तरी ते कोठेही सहज उपलब्ध होऊ शकतात आणि पावसात खराब झाले तरी फारसे नुकसान होत नाही.

lp73मुंबई मॉन्सून अॅप
मुंबईत राहणाऱ्यांसाठी अथवा मुंबईत दररोज ये-जा करणाऱ्यांसाठी पावसाळ्यानिमित्त उपयुक्त माहिती पुरविणारे हे अॅप मुंबईतील हवामानाचा अंदाज वर्तवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणकोणत्या भागात पाणी साचले आहे याबद्दल चालू अपडेटही आपल्याला हे अॅप्लिकेशन उपलब्ध करून देते. येत्या काळात ट्रॅफिक आणि ट्रेन अपडेटही यावर उपलब्ध होतील. त्यामुळे मुंबईतील सखल भागात जायचे असल्यास त्याची किमान माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते.
प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com