गणेश विशेष
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com / @joshisuhas2
खरं तर श्रावणापासून आपल्याकडे सणासुदीची धावपळ सुरू होते. पण गणेशोत्सव म्हणजे सर्वामध्ये चैतन्य आणणारा सण. या धावपळीची सुरुवात होते बाजारपेठांपासून. उत्सव पंधरवडय़ावर आला की बाजारातदेखील चैतन्य येते. तात्पुरते स्टॉल लावणाऱ्यांपासून ते अगदी मोठय़ा मांडवात सजावटीचे साहित्य विकणाऱ्यांपर्यंत सगळेच गर्दीने ओसंडून वाहायला लागतात. त्या त्या शहरातील मध्यवर्ती आणि ठरावीक ठिकाणी तर मग आधीचा रविवार पकडून एकच गर्दी झालेली असते. प्रत्येकाला आपल्या घरातल्या गणपतीभोवती आकर्षक सजावट करायची असते. कोणी सजावटीचे तयार सेट घेऊन त्याला रोषणाईची जोड देतो, तर कोणी वेगवेगळे साहित्य घेऊन आपली कला आजमावून पाहतो. सध्या मुंबईच्या दादर आणि लालबागच्या बाजारात अशा असंख्य गोष्टींची रेलचेल दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सजावटीतलं पहिलं काम म्हणजे मखर. या वर्षी महाराष्ट्र शासनाने थर्माकोलच्या वापरावर बंदी आणल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी पुठ्ठय़ाचे मखर विक्रीस ठेवले आहेत. पण अशा मखरांना अत्यल्प प्रतिसाद असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लालबाग येथील सजावटीचे व्यापारी उमंग वोरा सांगतात, ‘लोकांना अनेक वष्रे थर्माकोलचे मखर वापरण्याची सवय असल्यामुळे ते अचानक पुठ्ठय़ाचे मखर वापरण्यास तयार होत नाहीत. दुसरा मुद्दा आहे तो खर्चाचा. दोनअडीच फुटांची मूर्ती असेल तर, त्यासाठीची मखरदेखील मोठं करावं लागतं. लोकांना अजून पुठ्ठय़ाची अशी मखरं वापरण्याची, ती टिकतील यावर विश्वास ठेवण्याची सवय नाही. त्यामुळे अशा सजावटीच्या साहित्याला अजून तरी पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.’

वजनाला कमी, सहज हाताळणी आणि कमी खर्च यामुळे थर्माकोल आपल्याकडे अधिक लोकप्रिय झालं होतं. पण त्याचा वापर केवळ मखरच नाही तर इतर सजावटीसाठीदेखील केला जाई. लालबाग येथील एका दुकानात फायबरमध्ये केलेली मोराची सजावट होती. पण त्याची किंमत थर्माकोलच्या तुलनेत खूपच अधिक असल्याने त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.

एकीकडे अशी परिस्थिती असली आणि शासनाने थर्माकोल बंदी केली असली तरी दादर बाजारपेठेत मात्र थर्माकोलची अगदी रेलचेलच दिसून येते. अधिक माहिती घेतली असता कळते की, ही सर्व मखरं मागील वर्षांची आहेत. न संपलेला माल आत्ता पुन्हा रंगवून विक्रीस ठेवण्यात आला आहे. पण यातदेखील अगदी चार-पाच हजारांपासून ते पंधरा हजारांपर्यंतची मखरं विकली जात आहेत. याच किमतीत पुठ्ठय़ाची मखरंदेखील उपलब्ध आहेत. पण कायदा झाला तरी लोकांची मानसिकता न बदलल्याचेच हे चित्र आहे.

पण या बंदीमुळे एका कलाकाराने वेगळाच पर्याय निवडला. हे कलाकार आहेत अरुण दरेकर. १९८५ पासून ते गणपतीच्या सजावटीच्या व्यवसायात आहेत. पण सारा भर हा थर्माकोलवरच होता. या वर्षी बंदी आहे हे एकदा नक्की झाल्यावर दोन महिन्यांपूर्वी त्यांनी वेगळ्या प्रकारे मखर तयार करायला सुरुवात केली. लाकूड, प्लायवूड, ज्यूट, हॅण्डक्राफ्ट कागद, सनबोर्ड, थोडेफार रंग या सर्वाचा वापर करून त्यांनी दोन महिन्यांत ५० मखरं तयार केली. दोन-तीन फुटांच्या लांबरुंद प्लायवूडवर आधारलेल्या या मखरांना सध्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अगदी साधी, पण आकर्षक अशी रचना यामध्ये करण्यात आली आहे. ज्यूटचा वापर करताना त्यावर एक प्रक्रिया केल्यामुळे त्याला वेगळेच टेक्स्चर आलेले दिसते. आजवर अशा प्रकारच्या मखरांचे व्यावसायिक उत्पादन झालेले नव्हते. त्यामुळे याला प्रतिसाद चांगला आहे. अरुण दरेकर सांगतात, ‘थर्माकोल सोडून अशा प्रकारे मखर तयार करायचा हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. वेस्टेज वगरेचा पुरेसा अंदाज नव्हता. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. सध्या याची किंमत अधिक असली तरी पुढील वर्षी छोटय़ा आकारातदेखील मखरं करता येतील. किंमतदेखील कमी होईल.’ सध्या किंमत अधिक असली तरी जवळपास सर्व मखरं विकली गेली आहेत. म्हणजेच लोकांना चांगला पर्याय दिला तर लोकांचा प्रतिसाद मिळतो हे नक्की.

पण असे पर्याय मर्यादितच आहेत, आणि पुठ्ठय़ाच्या मखरांना तसा प्रतिसाद नाही. त्यामुळे सध्या पडद्यांच्या आकर्षक रचनेला बराच प्रतिसाद मिळताना दिसतो. झगमगीत आणि विविधरंगी असे रेडिमेड पडदे सध्या बाजारात मोठय़ा प्रमाणात आहेत. अगदी मध्यवर्तीच नाही तर उपनगरीय बाजारपेठांतदेखील. सजावट उभी करण्यासाठी फार त्रासदायक नसलेले आणि आकर्षक असे पडदे असल्याने यावर ग्राहकांच्या उडय़ा पडताना दिसत आहेत. तसेच पडद्यांचे नुसते कापड, कापडे, लेसेस वगरे उत्पादनांनादेखील चांगलाच प्रतिसाद आहे. खरे तर पडदे, रंगीत कागदांचा वापर हे सर्व थर्माकोलचा वापर वाढण्यापूर्वी आपल्याकडे अगदी सहज वापरले जायचे. किंबहुना त्यातून प्रत्येकाला काहीतरी कलाकृती करण्याचा आनंददेखील मिळायचा. पण थर्माकोलमुळे हा वापर कमीच झाला होता. आता पुन्हा त्यास चालना मिळायला हरकत नाही.

बाकी रोषणाईसाठी चिनी उत्पादनांनी आपली बाजारपेठ संपूर्णपणे केव्हाच काबीज केली आहे. त्यामध्ये आत्ता कसलेही नावीन्य दिसत नाही. त्याच त्याच माळा आणि फिरते दिवे सर्वत्र दिसतात. अपवाद फक्त झुंबरांचा. अक्रेलिकचा वापर करून तयार केलेली ही झुंबरं अगदी २०० रुपयांपासून मिळत असल्याने त्याचेच काय ते नावीन्य म्हणता येईल. ही झुंबरं चांगलीच आकर्षक आहेत. पण रोषणाईच्या इतर चिनी उत्पादनांप्रमाणे यांचीदेखील कसलीच शाश्वती नसणार हे नक्की. याशिवाय कागदी फुलांच्या माळा, कागदी फुलांची झाडं वगरे तर नेहमीप्रमाणेच या बाजारात दिसतात.

आपल्याकडे गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही पातळ्यांवर साजरा होतो. दोन्ही ठिकाणी सजावट व इतर बाबींना भरपूर वाव असतो आणि हौसेला मोल नसते आणि जोडीला श्रद्धेचा भाग असल्यामुळे येथील सजावटीची बाजारपेठ तेजीत असते. केवळ एखाद महिन्याची ही बाजारपेठ आहे. तीदेखील असंघटित क्षेत्रातील. त्यामुळे या बाजारपेठेकडे एक उद्योग म्हणून पाहिले जात नाही. अनेक छोटे-मोठे उत्पादक यामध्ये सक्रिय असतात. या काळाचा अनेक कलाकारांना, छोटय़ा-मोठय़ा व्यापाऱ्यांना मोठा आधार असतो. त्यामुळे नेहमी स्टेशनरी विकणारादेखील सजावटीच्या सामानाची विक्री करतो. अर्थातच संपूर्ण बाजारपेठ उत्सवी वातावरणात न्हाऊन निघते.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganapati festival market overview
First published on: 07-09-2018 at 01:04 IST