X

सोन्याचांदीला गणेशोत्सवाची झळाळी

गणेशमूर्तीच्या सजावटीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणेशमूर्तीचे दागिने.

गणेश विशेष

वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com


गणेशोत्सवाची चाहूल लागली की आपल्या घरातल्या गणेशमूर्तीची सजावट कशी करायची याचे मनसुबे घरोघरी रचले जातात. या सजावटीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणेशमूर्तीचे दागिने. मूर्तीवरच सर्व प्रकारचे दागिने रंगवलेले असले तरी गणपतीवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी भक्तांना गणेशमूर्तीसाठी सोन्याचांदीचे नवनवे दागिने करायचे असतात. अगदी घरातल्या प्रेमाच्या व्यक्तीला प्रेमाने, हौसेने दागिने केले जातात, तसेच दागिने गणपतीलाही केले जातात. हे दागिने इतके खास असतात की त्या मूर्तीशिवाय इतर कोणाच्याही अंगावर घातले जात नाहीत. नवविधा भक्तीमधला सख्यभक्तीचा हा आगळावेगळा प्रकारच म्हणायचा.

भक्तांच्या या गणपतीवरील प्रेमामुळे गणेशोत्सवाच्या काळात सोन्याचांदीच्या बाजारात प्रचंड प्रमाणात उलाढाल होते. आपली हौस म्हणून गणेशभक्त गणपतीसाठी सोन्याचांदीतील मुकुट, कडे, कंठी, भीकबाळी, सोंडपट्टी, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगन, कुंडल, दुवार्ंचा हार, जास्वंदीचा हार, केळीचं पान, मोदकाची चळ, जानवं, बाजूबंद, लामणदिवा, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टँड, फुलपरडी, नंदादीप उपरणं, सोन्याचं पाणी दिलेले चांदीचे मोदक, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादीचा चांदीचा ड्रायफ्रूट सेट, सोन्याचं पाणी दिलेली फळं, कान, उंदीर, परशू असे विविध प्रकारचे दागिने तसंच पूजेतील विविध प्रकारच्या वस्तू करताना दिसतात. आजकाल मित्रांकडे, नातेवाईकांकडे गणेशदर्शनासाठी जाताना भेटवस्तू म्हणूनदेखील चांदीसोन्यातील वस्तू घेऊन जाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे असं पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ सांगतात.

अर्थात सोन्याचांदीच्या किमती सतत चढय़ा असल्यामुळे एकाच वेळी सगळे दागिने करणं शक्य नसतं आणि तसं केलं तर दरवर्षीच्या उत्सवात काही नावीन्यही रहात नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोक सहसा दरवर्षी एखादा नवीन दागिना करत राहतात. या वर्षी कंठी केली तर पुढच्या वर्षी मुकुट केला, त्याच्यापुढच्या वर्षी भीकबाळी केली, कधी उंदीर, कधी गणपतीसमोर डेकोरेशनला ठेवायचे मोदक अशी नवनवे दागिने, वस्तू यांची खरेदी होत राहते. त्यामुळे गणपतीसाठीच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या, वस्तूंच्या बाजारपेठेत गणपतीच्या काळात मोठी  एका अंदाजानुसार जवळपास ५०० कोटींची उलाढाल होते.

सौरभ गाडगीळ सांगतात की, गणपतीचे दागिने, पूजेच्या वस्तू यांच्याबाबतीत एका विशिष्ट घटकालाच सतत मागणी आहे, असं नसतं. जास्वंदीचं फूल, कमळाचं फूल, केवडय़ाचं पान यांना कायम मागणी असते. एक मोदक, ११ मोदक, २१ मोदक यांचा सेट एव्हरग्रीन आहे. गणपतीची नाणीही घेतली जातात. लोकांची गणपतीवर श्रद्धा असल्यामुळे सोन्याचांदीच्या वाढत्या दराचा गणपतीसाठीच्या खरेदीवर त्याचा परिणाम होत नाही.

आनंद जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर त्याबद्दल सांगतात की, त्यांच्याकडच्या दागिन्यांमध्ये यावर्षी गणपतीचा मुकुट आणि फुलांना जास्त मागणी आहे. सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे त्यांनी गणपतीचे कमी वजनाचे दागिने आणि पूजेतील वस्तू घडवण्यावर भर दिला आणि त्याला गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.  चांदीत सजावट करायला लोकांना आवडतं. नेहमीच्या लाकडी चौरंगाला अतिशय पातळ असा चांदीचा पत्रा लावला जातो. असे चांदीचे चौरंग, चांदीमधली फुलं, देव्हारे यांची लोक खरेदी करत आहेत. कारेकर ज्वेलर्स यांनी या वर्षी गणपतीसाठी कमी वजनाच्या सोन्याच्या शाली केल्या आहेत. या शालींनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असं संदीप कारेकर सांगतात.

ते सांगतात की, गणपतीचा मुकुट, त्रिशूल, परशू यांना कायमच मागणी असते. आधी गणपतीसाठी दुर्वाचा हार, मोदकांचा हार अशा हारांना प्राधान्य होतं, तर आता मोदकांचा हार, जास्वंदीचा हार यांची खरेदी करायला लोकांना आवडते आहे. गणपतीच्या दागिन्यांमध्ये पारंपरिक पद्धतीच्या दागिन्यांनाच नेहमी प्राधान्य मिळतं, असंही निरीक्षण ते नोंदवतात.

सोनंचादी दोन्हीही महागच असलं तरी ज्यांना परवडतं, ज्यांचं बजेट जास्त असतं, मूर्ती मोठी असते, ज्यांच्या घरचा उत्सव मोठा असतो ते घरच्या गणपतीसाठी सोन्याचेच दागिने करतात. काही जणांची इच्छा खूप असते, पण सोन्याचे दागिने करणं शक्य नसतं. त्यांना त्यातल्या त्यात चांदी परवडते. मग ते सोन्याचं पाणी दिलेले चांदीचे दागिने असा मार्ग काढतात. आपल्या मनातला भाव देवापर्यंत पोहोचेल याची त्यांना खात्री असते. चांदीचेही दागिने शक्य नाहीत, पण गणपतीसमोर सजावट करण्याची इच्छा मात्र खूप आहे ते एक ग्रॅमच्या दागिन्यांचा मार्ग निवडतात. तेही शक्य नसतं ते इमिटेशनचे दागिने घालून आपल्या घरच्या गणपतीची सजावट करतात.

इको फ्रेण्डली गणेशोत्सव घरगुती पातळीवर साजरा करणारे प्लास्टर ऑफ पॅरिसची तर नाहीच, पण शाडूचीही मूर्ती आणत नाहीत. ते एकदाच चांदीची मूर्ती घेऊन ठेवतात आणि उत्सवात तिचीच प्राणप्रतिष्ठा करून तिची पूजा करतात. विसर्जनादिवशी या चांदीच्या मूर्तीचं घरीच विसर्जन करून पुढच्या वर्षीसाठी ती बाजूला काढून ठेवतात. अशा भक्तांकडून चांदीच्या गणेशमूर्तीला चांगली मागणी असते.

साधारणपणे ज्या शहरात आपण राहतो त्या शहरातल्या प्रसिद्ध गणपतीचे असतात तसे दागिने आपल्या घरच्या गणपतीला असावेत अशीही अनेक भक्तांची इच्छा असते. सौरभ गाडगीळ सांगतात,  म्हणजे उदाहरणार्थ पुण्यातल्या भाविकांना दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीवर आहेत तसे दागिने आपल्या घरच्या गणपतीला करून घ्यायचे असतात, तर मुंबईतल्या गणेशभक्तांना आपल्या घरच्या गणेशमूर्तीसाठी लालबागच्या राजाच्या अंगावर आहेत तसे दागिने करून हवे असतात. थोडक्यात सांगायचं तर आपापल्या शहरातील प्रसिद्ध गणपतीच्या दागिन्यांची छोटी आवृत्ती आपल्या घरच्या गणपतीला असावी अशी त्यांची इच्छा असते. त्यानुसार मागणी असते.

एरवी लोकांचे स्वत:साठी केलेले दागिने मोडणं, नवनवे करणं हे प्रकार सुरू असले तरी गणपतीच्या दागिन्यांच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. घरच्या गणेशमूर्तीसाठी केलेले दागिने सहसा मोडले जात नाहीतच, वर दर वर्षी चांदी किंवा सोन्यातल्या एखाद्या दागिन्याची किंवा पूजेच्या वस्तूची भरच पडत असते. गणेशोत्सव झाला  की हे दागिने बाजूला काढून ठेवले जातात आणि पुढच्या वर्षी पुन्हा काढले जातात. विशेष म्हणजे गणेशासाठी केलेले दागिने एरवी इतर कोणीही वापरत नाही.

गणपती उत्सवाच्या महिनाभर आधी सोन्याचांदीच्या बाजारात उलाढाल सुरू होत असली तरी हे दागिने आणि गणपतीच्या पूजेसाठी, सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू तयार करण्याचं काम तीन-चार महिने आधीपासून सुरू होतं.  गणपतीच्या दागिन्यांच्या बाबतीत दागिन्यांचा प्रकार तोच राहतो, बदलतं ते डिझाइन. तेच पारंपरिक दागिने नव्या डिझाइनचा साज घेऊन येतात. आता या वर्षी हे डिझाइन चांगलं चालेल, हे डिझाइन लोकांना आवडेल, याचा तीन-चार महिने आधीच कसा अंदाज येतो, याबद्दल आनंद पेडणेकर सांगतात की, वर्षभर एखादा दागिना, त्यातलं विशिष्ट डिझाइन यांची सातत्याने खरेदी होत असते, म्हणजे ते डिझाइन लोकांना आवडलं आहे, त्या डिझाइनचं कंगन किंवा कानातलं एकाचं आवडलं म्हणून दुसरा खरेदी करतो आहे, हे आम्हाला दिसत असतं. मग त्या डिझाइनच्या आसपास जाणारं डिझाइन गणपतीच्या मूर्तीवरील दागिन्यांसाठीही केलं जातं. लोकांनी बघितल्यावर त्यांच्या पटकन ते नजरेत भरलं पाहिजे यावर भर दिला जातो. आमच्याकडे असतील त्या डिझाइनचे दागिने इतरांकडे असणार नाहीत, हे बघितलं जातं.

दागिन्यांच्या डिझाइनबद्दल संदीप कारेकरही सांगतात की गणपतीसाठी पारंपरिक डिझाइनलाच लोकांची मागणी असते. ग्राहकांनी मूर्तिकारांकडची कोणती मूर्ती घ्यायची हे नक्की करून तिची ऑर्डर दिली की ते आम्हाला येऊन त्यांना त्या मूर्तीसाठी कोणता दागिना करायचा आहे, हे सांगतात. मग आम्ही त्या मूर्तिकाराकडून त्या मूर्तीचा डाय घेऊन तो दागिना करतो. आता या वर्षी  बोईंजकरांच्या कारखान्यात वरदहस्त नावाचा गणपतीच्या मूर्तीचा प्रकार आहे, या दोन फूट आकाराच्या गणेशमूर्तीसाठी आम्ही आशीर्वाद हात आणि प्रसाद हात केले आहेत. एकुणात लोकांची मागणी पारंपरिक डिझाइनलाच आहे.

दागिन्यांच्या डिझाइन्सबाबत सौरभ गाडगीळ सांगतात की, एखाद्या मंडळाने त्यांच्या सार्वजनिक गणपतीसाठी एखादा नवीन दागिना करून घेतला की तसा लोकांना घरातल्या गणपतीला करून हवा असतो. मग त्यानुसार आम्हाला त्यांच्याकडून त्या नेकलेस, पर्णकर्ण यांच्या छोटय़ा आवृत्तीच्या डिझाइनची मागणी येते. त्यामुळे मोठी मंडळं या वर्षी नवीन, वेगळं काय करत आहेत, याकडे आमचं लक्ष असतं. मोठी मंडळं सहा महिने आधीपासून दागिन्यांच्या तयारीला लागत असल्यामुळे या वर्षी मार्केटमध्ये काय चालणार आहे, याचा अंदाज येतो. त्यानुसार आम्हीही कामाला लागतो.

गणपती उत्सवाची प्रत्यक्ष तयारी महिनाभर आधी सुरू होत असली तरी भक्तांच्या मनात मात्र ती बरीच आधीपासून सुरू असते. त्यामुळे काही जण गणेशोत्सवाची वाट न बघता वर्षभरात जमेल तेव्हा गणपतीसाठी दागिन्यांची खरेदी करत असतात. परदेशातील गणेशभक्तही त्यांच्या गणेशमूर्तीसाठी इथूनच सोन्याचांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात. त्यासाठी मोठय़ा संख्येने हे दागिने खरेदी केले जातात. त्यामुळे या बाजारपेठेला कायमच झळाळी असते.

First Published on: September 7, 2018 1:06 am
  • Tags: गणेशोत्सव २०१८,