ज्योती चौधरी मलिक – response.lokprabha@expressindia.com

कणकेचे मोदक

साहित्य :

एका नारळाचा कीस, एक वाटी गूळ

एक चमचा खसखस भाजलेली

एक चमचा वेलदोडा पावडर

एक चमचा तेल, चिमूटभर मीठ

दोन मोठे चमचे साजूक तूप

ड्रायफ्रूटचे तुकडे.

कृती :

नारळाचा चव, गूळ एकत्र शिजवून घ्या. त्यात वेलदोडा पावडर आणि भाजलेली खसखस घाला. यात दोन मोठे चमचे साजूक तूप, ड्रायफ्रूट घाला. पिठात मीठ, तेल घालून कणीक घट्ट मळून घ्या. तेलाचा हात लावून पातळ पुऱ्या लाटून त्यात वरील सारण भरून मोदकाचा आकार द्या. चाळणी किंवा मोदकपात्रात हळदीचे किंवा केळीचे पान तेलाचा हात लावून ठेवा. त्यावर मोदक ठेवून १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या.

तळलेले गुलकंद मोदक

साहित्य :

२ नारळ खवून, १ वाटी साखर

अर्धी वाटी गुलकंद

अर्धी वाटी ड्रायफ्रूट बारीक चिरून

५-६ वेलदोडय़ांची पूड आवडीनुसार

१ वाटी मैदा, १ वाटी रवा, चवीनुसार मीठ

तेल अथवा तूप तळण्यासाठी तसंच मोहनसाठी.

कृती :

खवलेले खोबरे आणि साखर एकत्र करून परतून घ्या. त्यात ड्रायफ्रूट, गुलकंद, वेलची पूड घालून परता. गॅस बंद करा. सारण थंड करत ठेवा. रवा, मैदा, ३ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन आणि चिमूटभर मीठ घालून शक्यतो दुधात अथवा पाण्यात घट्ट भिजवून एक तास झाकून ठेवा. भिजलेला मैदा हाताने चांगला मळून २१ लाटय़ा करा. पोळपाटावर पुरीएवढी लाटी लाटा. हातावर घेऊन चुण्या पडून वाटी करा. १ छोटा चमचा भरून सारण भरून मोदकाचे तोंड बंद करा. असे सर्व मोदक भरून घ्या. कढईत मंद आचेवर सर्व मोदक गुलाबी रंगावर तळून घ्या.

मँगो मोदक (उकडीचे)

साहित्य :

सारणासाठी

खोवलेले ओले खोबरे २ वाटय़ा

साखर १ वाटी

आमरस १ वाटी, रेडिमेड मँगो पल्प वापरू शकता

वरील आवरणासाठी

तांदळाचे पीठ २ वाटय़ा

पाणी २ वाटय़ा

वेलची पूड १ टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल/तूप २ टीस्पून

कृती :

खोबरे, साखर आणि आमरस एकत्र करून सारण साधारण कोरडे होईपर्यंत परतून घ्या. थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. दोन वाटय़ा पाणी गरम करण्यास ठेवा. त्यामध्ये आधी चिमूटभर मीठ व दोन चमचे तेल/ तूप घाला. उकळी आली की वेलची पूड घाला. सर्व एकत्र उकळू लागले की लगेच तांदूळ पिठी घालून रवीच्या टोकाने ढवळा. गुठळी होणार नाही याची काळजी घ्या. गॅस बंद करून झाकण ठेवा.

पंधरा मिनिटानंतर तयार उकड तेल-पाण्याच्या हाताने चांगली मळून एका भांडय़ामधे झाकून ठेवा.

आता त्यातील थोडी-थोडी उकड घेऊन हाताने तिची पातळसर पारी तयार करा. साचा वापरत असाल तर पारी करून त्यात सारण भरा. हाताने करत असाल तर पारीला कळ्या तयार करून त्यात सारण भरा आणि मोदक तयार करा. चाळणीवर किंवा मोदक पात्रात १५ मिनिट वाफवून घ्या. गरमगरम, गोड लुसलुशीत मोदक साजूक तुपासहित खायला द्या.

माव्याचे मोदक

साहित्य :

२ कप मावा,

१ कप पिठी साखर

अर्धा कप मिल्क पावडर,

पाव टी स्पून खायचा रंग (optional)

२ टीस्पून वेलची पूड किंवा इसेन्स (त्याऐवजी अर्धा कप रोझ, मँगो किंवा आवडीच्या फ्लेवरचे सिरप वापरू शकता)

१ टीस्पून साजूक तूप

कृती :

साखर मिक्सरमध्ये एकदम बारीक दळून तिची पिठी करून घ्या. जाड बुडाची कढई घेऊन त्यात एक चमचा तूप घाला. त्यात मावा कुस्करून घाला. मंद आचेवर मावा पाच मिनिटे परतून घ्या. त्यात रंग किंवा सिरप घाला. कढई गॅसवरून काढून घ्या. मावा कोमटसर झाला की पिठीसाखर आणि इसेन्स घालून एकत्र करा. मिश्रण व्यवस्थित आळले की मोदकाच्या साच्याला तुपाचा हात फिरवा आणि मिश्रण साच्यात भरून मोदक तयार करा.

टीप : मिश्रणाला मोदक होण्याइतपत घट्टपणा आला नाही तर त्यात मिल्क पावडर घाला. हाताने मळून घ्या. खूप जास्त मळू नका. फक्त नीट एकत्र होईस्तोवर मळा. नाही तर गोळा चिकट होईल. मिश्रण अगदी कोमट होईल तेव्हा मोदक तयार करा.

मक्याचा हलवा

साहित्य :

४ वाटय़ा गोड मक्याचे दाणे

१ लिटर दूध

२५० ग्रॅम खवा

६ टे. स्पू. साजूक तूप

१ वाटी साखर

ड्रायफ्रूट्सचे काप, वेलची पूड

१ वाटी नारळाचा चव.

कृती :

मक्याचे दाणे मिक्सरमधून फिरवून काढा. खोवलेला नारळ मिक्सरमध्ये बारीक करा. कढईत तूप गरम करा. तुपात मक्याचा किस टाकून परता. किस गुलाबी रंगावर आल्यावर त्यात दूध घाला आणि सतत ढवळा. मग त्यात साखर आणि सारखा केलेला खवा घाला. वाटलेला नारळ घालून परता. सगळं मिश्रण नीट एकत्र करून शिजवा. त्यात ड्रायफ्रूट्सचे काप आणि वेलची पूड घाला. मिश्रण गॅसवर असताना गॅस मंद ठेवा. झाकण ठेवून वाफ आणा. पाच मिनिटांनी गॅस बंद करा. नैवेद्य दाखवतेवेळी सुंदर डिशमध्ये ठेवून चांदीचा वर्ख आणि ड्रायफ्रूट्स घालून सजवा.

गुळाची पोळी

साहित्य :

अर्धा किलो गूळ, अर्धी वाटी खसखस

अर्धी वाटी तीळ, ५-६ वेलदोडय़ांची पूड

एक चमचा खोबऱ्याचा कीस

अर्धी वाटी बेसन पीठ

४ वाटय़ा कणीक, २ लहान चमचे तूप.

कृती :

कणीक आणि बेसन एकत्र करून त्यात थोडे जास्त मोहन घालून पोळ्यांसाठी पीठ भिजवून ठेवा. गूळ चांगला किसून घ्या. तीळ, खसखस आणि खोबऱ्याचा किस भाजून आणि नंतर कुटून घ्या. अडीच चमचा डाळीचे पीठ थोडय़ा तुपावर चांगले भाजून घ्या. वेलदोडय़ाची पूड घालून सर्व साहित्य एकत्र मळून घ्या. नंतर कणकेच्या दोन लाटय़ा जरा लाटून घ्याव्यात. त्यात गुळाच्या सारणाची मोठी गोळी घालून कडा दाबून, हलक्या हाताने पोळी लाटावी. तव्यावर खमंग भाजावी. गुळाच्या पोळ्या गार चांगल्या लागतात म्हणून आधीच करून ठेवाव्यात.

शेवयांची खीर

साहित्य

बारीक शेवया २ वाटय़ा, १ लिटर दूध

१ चमचा साजूक तूप, ५-६ वेलदोडय़ांची पूड

बदाम आणि काजूचे काप, बेदाणे, चारोळी

१ वाटी साखर.

कृती :

दूध जाड बुडाच्या पातेलीत निम्मे होईपर्यंत आटवून घ्या. शेवया हाताने थोडय़ा चुरून दुस?ऱ्या पॅनमध्ये मंद गॅसवर तुपात गुलाबीसर भाजून घ्या. भाजलेल्या शेवयांवर आटवलेले दूध घाला. चांगले उकळले की साखर घाला. एक उकळी येऊन साखर विरघळली की खाली उतरवा. गार झाल्यावर वेलची पूड आणि ड्रायफ्रूट घाला.

गाजराची खीर

साहित्य :

४ लाल गाजरे, ३ वाटय़ा दूध

२ चमचे साजूक तूप, वेलचीपूड

अर्धा कप साखर, काजू, बदाम, पिस्ते.

कृती :

गाजरे स्वच्छ धुऊन त्यांची साले काढा. गाजरांचे तुकडे करून ते कुकरमध्ये २ शिट्टय़ा होईपर्यंत शिजवा. गार झाल्यावर एकजीव करा. गरज वाटल्यास किंचित पाणी घाला. एका पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यावर हे गाजराचे मिश्रण आणि ड्रायफ्रूट परतून घ्या. नंतर त्यात साखर आणि दूध घाला. हे मिश्रण व्यवस्थित ढवळा, उकळी आल्यानंतर उतरवा. वरून थोडे ड्रायफ्रूट पेरून आवडीप्रमाणे थंड वा गरम सव्‍‌र्ह करा.

लाल भोपळ्याची खीर

साहित्य :

लाल भोपळा अर्धा किलो, दूध एक लिटर

साखर ३०० ग्रॅम, १ टीस्पून वेलची/ जायफळ पूड

ड्रायफ्रूट आवडीनुसार, २ चमचे साजूक तूप

चिमूटभर मीठ.

कृती :

लाल भोपळ्याचे साल काढून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. भाजीच्या कुकरमध्ये या फोडी तुपावर २/३ मिनिटे परतून घ्या. त्यात अर्धा कप पाणी आणि चिमूटभर मीठ घालून २/३ शिटय़ा घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवा. नंतर भोपळ्याची पेस्ट दूधामध्ये घाला. त्यात साखर घाला आणि पॅनमध्ये उकळायला ठेवा. ५/७ मिनिटांनंतर गॅस बंद करा. वरून वेलची, ड्रायफ्रूटचे तुकडे घालून सजवा. आवडीनुसार गरम किंवा फ्रीजमध्ये थंड करून सव्‍‌र्ह करा.