26 February 2021

News Flash

गणेश विशेष : गणपतीची लिखाई; भाईंची करामत

आपल्या खास प्रथेनुसार गणेशमूर्ती तयार करण्यासाठी दक्षिण मुंबईत मोरेंची चित्रशाळा सुप्रसिद्ध आहे.

भाई मोरे

माधव दामले – response.lokprabha@expressindia.com

मुंबईमध्ये गिरगावात व्ही. पी. बेडेकरांच्या मुख्य दुकानाकडे पाठ करून ठाकूरद्वारच्या दिशेला जाणारा मुगभाटमधला रस्ता जिथे संपतो, त्याच्यासमोर ‘धोबी वाडी’ ही वसाहत आहे. डाव्या-उजव्या दोन्ही बाजूंना पाच-सहा दुकाने आहेत. आत शिरताच समोर मोरे यांची सुप्रसिद्ध गणेश चित्रशाळा आहे. आपल्या खास प्रथेनुसार गणेशमूर्ती तयार करण्यासाठी दक्षिण मुंबईत मोरेंची चित्रशाळा सुप्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या आकारांच्या गणपतीच्या मूर्ती रंगवताना बघणं आणि तासन्तास भान हरपून बसून राहणं हा एक सुखसोहळा आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाली, की शाळेतून घरी येताना वाटेत लागणाऱ्या चित्रशाळेत गणपतीची मूर्ती तयार होताना तासन्तास भान हरपून थांबणं सुरू होतं. चित्रशाळा कुठली, हा खूप मोठा प्रश्न नसतो, कारण गिरगावात चित्रशाळांची जुनी परंपरा आहे. हरमळकरांकडची बांधणी, कोरगावकर यांचे गाय- वासरासोबतचे गणपती, खानविलकरांकडचे तलम कुर्ता आणि फेटा बांधलेले गणपती, मादुस्करांकडचे वेगवेगळ्या दागिन्यांनी सजलेले गणपती असं वेगवेगळ्या ठिकाणी वैविध्य पाहायला मिळत असे. गिरगावात काही मोठे गणपती लवकर मांडव घालून मांडवातच रचले जात. कधी छोटे गणपती – कधी मोठे गणपती असा कार्यक्रम जवळजवळ रोजच चालतो. दिवसागणिक गणपतीच्या मूर्तीत होत जाणारा बदल अनुभवणं, आपल्याला ते कळतंय याचा आनंद होणे या दोन्ही मजेशीर गोष्टी असतात. गिरगावातील अनेक लहान मुलं याच सुखात लहानाची मोठी झाली आहेत.  खूप आधीपासूनच मूर्तिकार आपल्या तयारीला लागलेले असत. समुद्रातून शाडू माती घेऊन त्याच्यावरती वेगवेगळे संस्कार करणे, वर्षभर त्याचा सांभाळ करून मग जसजशी लागेल तसतशी माती काढून आकारानुसार गणपती रचायला घेणे, मूर्ती तयार झाली की आधी त्याला मशीन स्प्रेच्या साहाय्याने एक मूळ रंग देणे, त्याच्यानंतर त्याच्या अंगावरचे कपडे, त्याची बैठक, त्याचे दागिने, चेहरा, कान वगैरे सर्व गोष्टी एक एक करत या क्रमाने मूर्तिकार आपल्या कामाच्या पूर्णत्वाच्या दिशेने प्रवास करतात. एकदा का गणपती साकारायला सुरुवात झाली, की मग त्यांना ‘चैन पडेना’ असं होतं. एकीकडे गणपती तयार करणे ही एक जोखीम असते; पण त्याचबरोबर ज्याला जशी हवी तशी मूर्ती देणे आणि ती घेऊन जाताना घेणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं, ही कुठल्याही मूर्तिकारासाठी मोठी गोष्ट असावी. काही घरगुती गणपती किंवा मंडळांचे गणपती हे वर्षांनुवर्षे सारखेच असतात. त्यांची मागणी ही दरवर्षी ठरलेली असते. डाव्या हाताखाली लोड, गळ्यात फुलांचा हार, मांडीवरती ठेवलेले देता-घेता हात वगैरे; परंतु दरवर्षी मूर्तिकार स्वत:च्या पसंतीने काही गणेशमूर्ती तयार करतात. समाजात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब त्या गणेशमूर्तीमध्ये उमटलेलं दिसतं. अलीकडच्या काळातलं हे प्रतिबिंब दर्शवणारे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे बाहुबलीच्या अवतारातील गणेशमूर्ती. (यंदाच्या वर्षी करोनाच्या आपत्तीमध्ये खूप मोठं काम केलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि पोलिसांच्या वेशातील गौरी बाजारात दिसत आहेत.) मूर्ती कुठल्याही रूपातील असली तरी ती आपल्याकडे पाहाते आणि हसते, हा विचार किती लोभसवाणा आहे. गणेश चतुर्थीच्या आधीचा एक महिना म्हणजे सर्वच मूर्तिकारांची लगबग. रात्रीचा दिवस करून काम पूर्ण करायची त्यांची पद्धत ही अनोखी आहे. ‘उद्या देतो’, ‘थोडय़ा वेळाने या’, ‘काम अजून होतं आहे’ ही असली कारणं इथे नसतात. खूप मेहनतीचं, कष्टाचं आणि त्यामानाने खूप मानमरातब न मिळालेलं असं हे काम आहे; परंतु पिढय़ान्पिढय़ा हे काम मूर्तिकार मंडळी त्याच नजाकतीने, तितक्याच आपुलकीने, तितक्याच मेहनतीने करताना दिसतात. वर्षांनुर्वष सुरू असलेला आठवणीतला हा एक महत्त्वाचा सिलसिला आहे.

श्रींचे कपडे, सोवळे, लोड, उपरणे आणि बैठक रंगवून झाली म्हणजे ‘लिखाई’साठी मूर्ती योग्य झाली. आता ‘लिखाई’ म्हणजे देवाचे डोळे रंगवणे, मूर्तीत जणू प्राण फुंकणे,  देवाचे हसरे रूप प्रगट करणे, देवाचे प्रसन्न दर्शन कारागिराला प्रथम होणे. हे काम करायला विलक्षण एकाग्रता लागते. गेली सुमारे पन्नास ते साठ वर्षे हे काम एकहाती विलक्षण सफाईने करणारे भाई मोरे यांना मी पाहतो आहे. देवाची लिखाई होताना पाहणे आणि भाईंना लिखाई करताना पाहणे या दोन्ही गोष्टी म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे.

लिखाई पूर्ण झाली की, त्याच्यावरती वॉर्निशचा हलका हात फिरवला की काम पूर्ण. ‘क्या बात है!’ हीच त्याच्यावरची सर्वोत्तम प्रतिक्रिया!

भाईंच्या कामात एक वेगळी नजाकत आहे. त्यांच्या कामाची स्वत:ची अशी एक पद्धत आहे. त्यांच्या आजूबाजूला काम करत असलेल्या इतर कारागिरांना त्यांच्या पद्धतीची माहिती आहे.

एका चक्रावर बसवलेल्या वर्तुळाकार पाटावर एकमेकांकडे पाठ करून ठेवलेल्या श्रींच्या चार मूर्तीची ‘लिखाई’ पूर्ण झाली की, भाई विविध कुंचले धुतलेल्या पाण्यात एक स्वच्छ कुंचला बुडवून देवाच्या मानेच्या मागे आलेल्या केसांवर फिरवीत म्हणजे देवाला किमान २१ दिवस फिकीर नाही. त्यानंतर  भाई हलक्या हाताने फिरकीच्या पाटावर कुंचला आपटत, हा आवाज म्हणजे ‘‘लिखाई’साठी पुढच्या मूर्ती आणा’ हा निरोप असे.

गप्पा मारताना भाई म्हणतात, गणपतीचे नाव ‘गजानन’ आहे. तुम्ही गज म्हणजे हत्ती बारकाईने पाहिलात तर सोंड जिथून बाहेर येते त्याच्या दोन्ही बाजूला हसमुखतेचे प्रसन्न दर्शन घडते. कारागिरांनी नजाकतीने सोंड जोडली तर पुढचे काम सोपे होते. भाईंचा अजून एक विशेष म्हणजे साधारणपणे दोन फुटांपेक्षा मोठय़ा मूर्तीच्या सोंडेवर भाई प्रेमाने ओम किंवा कृष्ण रंगवतात, काही खास मूर्तीच्या सोंडेवर आपल्याला महालक्ष्मीचे दर्शनही होते.

ज्या ठिकाणी भाई घडले त्या ‘मोरे चित्रशाळेचा’ इतिहास जुना आहे, पाच पिढय़ा ओलांडलेला आहे. मुंबईचा मानाचा पहिला सार्वजनिक गणपती, प्रतिष्ठित ब्राह्मण सभेचा गणपती, मोठय़ा दिमाखात ‘आगमन आणि विसर्जन’ सोहळ्यात पालखीने येतात जातात. शतक महोत्सवाच्या उंबरठय़ावरील जगन्नाथाची चाळ, पारीख बिल्डिंग, माधवदास प्रेमजी सोसायटी, मॅजेस्टिकसमोरील आंबेवाडीचा गणपती हे सारे मोरे गणेशचित्र शाळेचे. गेल्या वर्षी विलेपार्लेच्या लोकमान्य सेवा संघाच्या शतकमहोत्सवी वर्षांची मूर्तीही मोरेंकडचीच. मुंबई दूरदर्शनच्या प्रसन्न वदना, सुहासिनी मुळगावकर यांचा गणपतीही मोरेंच्या चित्रशाळेचा. मुळगावकरबाई गणपती ठरवायला आल्या, की निरीक्षण करता येईल अशा मांडणीवर त्यांच्या मूर्तीसारख्या चार ते पाच मूर्ती ठेवायला सांगत असत. पूर्ण निरीक्षणानंतर निवडलेल्या मूर्तीच्या पाटाखाली कुंचल्याने स्वत:ची सही रंगवताना मी त्यांना पाहिले आहे. मूर्ती बदलली जाऊ नये हा त्यामागचा हेतू असे. गणेशमूर्ती रंगवण्यामागील कसब माहीत असलेल्या आणि तज्ज्ञ, पारखी नजर लाभलेल्या गणेशभक्ताला, भाई मोरे यांची  ‘लिखाई’ पटकन कळून येते. ‘अरे, हा भाई मोरे यांचा गणपती’ अशी वाहवा आपसूकच मिळून जाते. इतक्या वर्षांच्या मेहनतीला मिळालेली ती शाबासकी असते.

भाईंचे वडील काशिनाथ, दोघे भाऊ प्रकाश व श्रीकांत, भाईंचे पुतणे राजा- जयेश अशा चार पिढय़ा मी पाहिल्या आहेत. पुढच्या पिढय़ा हे काम असंच सुरू ठेवतील, अशी आशाही आहे. काम कठीण आहे; पण मोठं आहे. विसर्जनाचा दिवस हा प्रत्येक गणेशभक्तासाठी घालमेलीचा असतो. देवाची उत्तरपूजा झाल्यावर अक्षता टाकण्यापूर्वी यजमान देवाला प्रार्थना करतात. ‘पुनरागमनायच’ अशी विनंती करतात. देवदेखील प्रतिसाद देत म्हणत असावा, ‘वत्सा, तुझी प्रार्थना पोहोचली. मी पुढच्या वर्षी लवकर येईन.’

दरवर्षी विसर्जनासाठी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात ‘श्री गजानन’ मखरातून जेव्हा प्रस्थान ठेवतो तेव्हा आम्हा सर्व भक्तांप्रमाणे मला देवाचे डोळे पाणावलेले दिसतात, त्या वेळेस हमखास भाईंची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

आजही भाईंच्या शेजारी जाऊन बसलो तर गप्पांमध्ये भाई म्हणतात, ‘वयाच्या बाराव्या वर्षांपासून मी हे काम करतोय त्याला साठ वर्षे झाली. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे काम असंच पुढे सुरू राहावे, माझी सेवा तिथपर्यंत पोहोचत राहावी, हीच इच्छा आहे. गजाननाच्या आशीर्वादाने त्याच्या मनात जसं असेल तितकी र्वष ही सेवा श्रींच्या चरणी रुजू होत राहील.’

भाईंच्यासारख्याच श्रीगणेशाच्या सान्निध्यात वर्षांनुवर्षे घालवलेल्या अनेक मूर्तिकारांना मानाचा मुजरा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 7:02 am

Web Title: ganapti special bhai more more ganapati workshop in girgaon ganesh vishesh dd70
टॅग : Ganeshotsav
Next Stories
1 गणेश विशेष : चविष्ट – नैवेद्यम् समर्पयामि
2 गणेश विशेष : आडवाटेवरचा महाराष्ट्र – सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील गणेशरूपे मोठी
3 राशिभविष्य : दि. २१ ते २७ ऑगस्ट २०२०
Just Now!
X