X

स्त्री मूर्तिकारांच्या चार पिढ्या

वर्धा जिल्ह्य़ातील दहापुतेंच्या घरात स्त्री मूर्तिकारांची परंपरा जोपासली गेली आहे.

गणेश विशेष

प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

गणेशमूर्ती तयार करणे हा व्यवसाय असला तरी तो अनेक पिढय़ांमध्ये तो कलेचा वारसादेखील असतो. संपूर्ण कुटुंबाचा सहभाग त्यात असला तरी मुख्य मूर्तिकार हा बहुधा पुरुषच असतो. पण वर्धा जिल्ह्य़ातील दहापुतेंच्या घरात एक वेगळीच परंपरा जोपासली गेली आहे. ती म्हणजे स्त्री मूर्तिकारांची. ७५ वर्षांपासूनच्या या परंपरेमुळे आता या कुटुंबातील महिला मूर्तिकारांची चौथी पिढी कार्यरत आहे.

या परंपरेची सुरुवात मात्र अपघातानेच झाली. वच्छलाबाई दहापुते या कुटुंबातील पहिल्या महिला मूर्तिकार. त्यांच्या पतीचे अचानक निधन झाल्यानंतर कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. ही घटना १९४२ सालची. त्यात हा पारतंत्र्याचा काळ आणि आजच्याप्रमाणे महिला घराच्या चौकटीबाहेर पडून काम करत नसत. वच्छलाबाईंचे नातू अरविंद दहापुते सांगतात की, ‘आमची आजी स्वाभिमानी होती. तिला कोणी नातेवाईकदेखील नव्हते आणि तिला कोणाची फुकटची मदत नको होती. तेव्हा तिच्या डोक्यात गणपतीच्या मूर्ती तयार करण्याची कल्पना सुचली. त्याला कारण होते ते आमच्या घराशेजारचा कुंभारवाडा. कुंभारांकडे मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असायचे. ते पाहून तिनेदेखील एके दिवशी एक मूर्ती तयार केली. कुंभारवाडय़ातील रामजी कुंभार यांना ती मूर्ती दाखवली. रामजींनी मग आजीला सांगितले, तुला मूर्ती करता येते, आत्ता मी तुला सांगतो तशी मूर्ती तयार कर.’ या घटनेतून वच्छलाबाई मूर्तिकार झाल्या. पहिल्या वर्षी त्यांनी ११ गणेशमूर्ती तयार केल्या.

विशेष म्हणजे तेव्हा आजच्यासारखे प्लास्टर ऑफ पॅरिसचे फॅड नव्हते. सारे मातीकामच करावे लागायचे. रंगदेखील नैसर्गिक. अरविंद दहापुते सांगतात की, वच्छलाबाई कोटलाच्या खाणीतून एक पांढऱ्या रंगाचा गोटा आणायच्या. त्याला खडी असे म्हणतात. हा गोटा तुलनेने मऊ असतो. तो बारीक करून पाण्यामध्ये विरघळवला जातो. चुन्याच्या निवळीप्रमाणे मग पांढरा रंग मिळायचा. यात मग इतर नैसर्गिक रंग मिसळले जायचे. कधी दगडीपासून, तर पाल्यापासून रंग मिळवला जायचा. वच्छलाबाईंनी हे सारे नेटाने केले. त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीत महिलांनी ही सर्व कामे करणे फारसे प्रचलित नव्हते. त्यात पुन्हा त्या कबीरपंथी होत्या. त्यामुळे त्यांचा सर्व जातीपातींशी संबंध असायचे. त्यामुळे त्यांना जातीने साथ दिली नसल्याचे अरविंद दहापुते सांगतात. पण वच्छलाबाईंनी हे सगळं सहन करून काम सुरू ठेवले. गणपतीचे काम संपले की मग मातीची खेळणी करायची, ती रंगवायची आणि आजूबाजूच्या यात्रांमध्ये त्याची विक्री करायची. खेळण्यांचे काम नसेल तेव्हा मग कुंभारांच्या कामात मजुरी करून चरितार्थ चालवायचा. रामजी कुंभारांच्या कुटुंबाने आजीला खूपच आधार दिल्याचे अरविंद दहापुते सांगतात.

अरविंद दहापुतेंचे वडील मिलमजुरी करत. अरविंद दहापुतेची आई शकुंतलाबाई देखील वच्छलाबाईंच्या कामात मदत करू लागली. आणि पाहता पाहता त्यांनी ही कला आत्मसात केली. सासू-सुनेची जोडी जोमाने मूर्तीकाम करू लागली. दरवर्षी ५० मूर्तीचा आकडा ओलांडू लागला. दरम्यान, त्यांचा मुलगा अरविंदहेदेखील मूर्तीकामामध्ये मदत करत होता. तिसरीत असतानाच आजी वच्छलाबाईंनी त्यांना मूर्तीकला शिकवली आणि पहिली मूर्ती साकार झाली. या मूर्तीकलेमुळेच पुढे अरविंद दहापुते यांनी कला शिक्षण घेऊन कला शिक्षक म्हणून नोकरी पकडली आहे.

वच्छलाबाई, शकुंतलाबाई यांची जोडी जमली होतीच, पण शकुंतलाबाईंची मुलगी माया खुरसडे यादेखील कामात मदत करत होत्या. त्यामुळेच त्यांच्या लग्नानंतरदेखील मूर्तीजापूर येथे त्यांनी स्वत:चा मूर्ती व्यवसाय सुरू केला आहे. वच्छलाबाईंच्या निधनानंतर अरविंद दहापुतेंच्या आईने व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. त्यांची पत्नी प्रतिभा यादेखील त्यांच्या कामात मदत करू लागल्या. पाहून, पाहून एखाद्या गणपतीला पुटिंग कर, एखाद्याला  प्राथमिक रंग दे असं करत त्यादेखील मूर्ती घडवायला शिकल्या. दहापुतेंच्या घरातील ही तिसरी पिढी मूर्तीकामात रमली असतानाच चौथ्या पिढीतील शिलेदारदेखील घडत होते. अरविंद दहापुतेंची मुलगी शीतल ही आर्किटेक्ट झाली असली तरी तीदेखील गणेशमूर्तीच्या कामात सक्रिय असते. बहिणीचा मुलगा श्रेयसदेखील या कामात सामील झाला आहे.

दहापुतेंनी आजही मातीच्याच मूर्तीचा वसा सोडलेला नाही. इतकेच नाही तर तैलरंगाचा वापर न करता केवळ जलरंगच ते वापरतात. वर्षांला १२१ मूर्ती सध्या ते करत असतात. एक-दोन फुटाच्या लहान मूर्तीपासून ते पाच-सात फुटाच्या मूर्तीदेखील येथे घडवल्या जातात. मातीच्या मूर्तीच्या या वैशिष्टय़ामुळे दोन वर्षांपूर्वी दहापुतेंकडील मूर्ती दोहाच्या कतारमध्ये मागवली होती. अरविंद दहापुते सांगतात की, त्यांच्या मूर्तीची किंमत ही तुलनेने स्वस्त असते. एकतर त्यांच्याकडे माती सहज मिळते आणि फायदा मिळवण्यासाठी हा उद्योग अशी भूमिका नसल्याने किमती आटोक्यात ठेवल्या जातात.

विदर्भातील हिंगणघाट येथे वच्छलाबाईंनी सुरू केलेला हा व्यवसाय आज चौथ्या पिढीकडूनही जोपासला जात आहे. स्त्रीमुक्ती वगैरे गोष्टींचा कसलाही गंध नसलेल्या स्वाभिमानी वच्छलाबाईंनी कुटुंब चालवण्यासाठी हा व्यवसाय स्वीकारला. पण आज त्यांच्या पिढीचा व्यवसाय झाला आहे. कोणतेही कामगार न ठेवता सर्व काम घरातील माणसांनीच करत आणि मूर्तीकलेचा हा वारसा पुढे नेत आहेत हे नक्कीच उल्लेखनीय म्हणावे लागेल.

First Published on: September 7, 2018 1:03 am
  • Tags: गणेशोत्सव २०१८,
  • Outbrain

    Show comments