मराठी माणूस जातो तिथे संस्था स्थापतो आणि गणेशोत्सव सुरू करतो. गणेशोत्सव हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षणच आहे. आज हा सार्वजनिक गणेशोत्सव १२२व्या वर्षांत पदार्पण करत आहे. सर्वच समाजघटकांना सामावून घेणाऱ्या उत्सवाची शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. हजारो मंडळे (कदाचित हा आकडा लाखाच्या वरदेखील जाऊ शकतो) त्यांचे कार्यकर्ते, असंख्य प्रायोजक, जाहिराती आणि या सर्वामधून निर्माण झालेली एक भली मोठी बाजारपेठ असे आजचे याचे स्वरूप आहे. अनेकांना आवडणारा आणि त्याच वेळी अनेकांना नाकं मुरडायला लावणारा असा हा उत्सव आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच महोत्सवी गणेशोत्सव मंडळांचा आढावा घेताना या उत्सवाच्या इतिहासात डोकावणे आणि त्याच्या सद्य:स्थितीचा ऊहापोह करणे उचित ठरेल.
त्यापूर्वी मराठी घराघरांतून गणेशोत्सव साजरा होत असेच, शिवाय पेशवाईत, पेशव्यांकडे आणि सरदारांकडे मोठय़ा प्रमाणात साजरा होत असे. १८८०-९० च्या दशकात ब्रिटिशांचा जुलमी अंमलामुळे तत्कालीन परिस्थिती ढवळून निघाली होती. स्वातंत्र्य चळवळीचे नेतेपण लोकमान्यांकडे आले होते. पुण्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी त्यांच्या चर्चा होत असत. त्या वेळी नानासाहेब खाजगीवाले यांनी ग्वाल्हेर संस्थानातील गणेशोत्सवाचा सोहळा पाहिला होता. त्या प्रभावाखाली नानासाहेब खाजगीवाले, घोटवडेकर, भाऊ रंगारी, दगडूशेट हलवाई आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यातील मान्यवरांच्या बरोबर एक बैठक झाली. भाऊ रंगारी, खाजगीवाले आणि घोटवडेकर यांनी १९९२ साली उत्सवाची सुरुवात केली होती. उत्सवाचा जनमानसावरील प्रभाव लोकमान्यांनी पाहिला आणि पद्धतशीरपणे हा उत्सव वाढू दिला. त्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठी चालना मिळाली. १८९३ सालीच पुण्यात अनेक मंडळांनी उत्सवाला सुरुवात केली.
पुढील एक-दोन वर्षांत हा उत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पसरला. त्यामागे सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली ती लोकमान्यांच्या केसरीतील अग्रलेखांनी. ‘गणपतीचा उत्सव’ या अग्रलेखातून त्यांनी जी भूमिका मांडली त्याचेच दृश्य स्वरूप पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर दिसून आले. चार भिंतींच्या आत साजरा होणारा उत्सव या माध्यमातून सार्वजनिक झाला. यामागे लोकमान्यांची भूमिका अगदी स्पष्ट होती. बहुजन समाज मेळवावा, त्यातून प्रबोधन व्हावे आणि अंतिमत: त्याचा उपयोग स्वातंत्र्य चळवळीस व्हावा. उत्सवावरील आक्षेपांनादेखील त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्या दोन-चार वर्षांतील लोकमान्यांचे अग्रलेख, गणेशोत्सवातील भाषणे पाहिली असता याची प्रचीती येते.

अग्रलेख – १८ सप्टेंबर १८९४ – गणपतीचा उत्सव
पुण्यातील यंदाचा उत्सव फक्त ब्राह्मणांनी केला नसून त्याच्या आवाहनापासून तो विसर्जनापर्यंतच्या खटपटीत सर्व हिंदू लोकांचा हात होता. साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभारदेखील या सर्व जातींनी क्षणभर आपआपला जातीमत्सर सोडून देऊन परस्परांशी एकदिलाने व एका धर्माभिमाने मिसळले व या सर्वानी हातभार लावल्यामुळे सर्व समारंभ शेवटास गेला.

२२ सप्टेंबर १८९६- श्रीगजाननाचा राष्ट्रीय महोत्सव
शहरातील सर्व जातींचे व धंद्याचे लहानथोर मनुष्य अशा रीतीने एका कार्याकरिता झटत असल्याचे उदाहरण क्वचितच सापडेल. गेल्या दहा दिवसांत सर्व शहरांतील लोकांच्या मनोवृत्ती उचंबळल्याच होत्या की काय असा परोपरी भास होत होता.

१६ सप्टेंबर १८९६ – रे मार्केट व्याख्यान
आठ-दहा दिवस उत्साहाने जर काढता येत नाहीत तर ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखेच आहे..
राष्ट्राला कोणता एक खर्च अवश्य आहे की हे पाहताना उल्हास वृत्ती जरूर आहे की नाही हेही पाहिले पाहिजे. थोडा वृथा खर्च होत असल्यास तेवढीच गोष्ट लोकांच्या नजरेस आणावी. सरसकट बारा टक्के एकंदर उत्सवावर कोरडे ओढण्यात िनद्य हेतू दृष्टीस पडतो.

थोडक्यात काय तर लोकमान्य आणि त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी योजल्याप्रमाणे उत्सव मार्गी लागला होता. अर्थात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक हेतू तर सफल झाला, पण आता या उपलब्ध व्यासपीठाचे करायचे काय? काही मंडळांनी स्वत:ला सामाजिक कार्याकडे वळविले, तर काहींच्या उत्सवात खंड पडला, तर बहुतांश मंडळींनी वाट फुटेल त्याप्रमाणे उत्सव चालू ठेवला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उत्सव मंडळांनी काय करायला हवे, संघटन हा प्राथमिक हेतू साध्य झाल्यावर या संघटनांचे करायचे काय यावर काहीच ठोस दिशादिग्दर्शन झाले नाही. असे झाले की मग अशा संघटनांची परिणती ही झुंडशाहीत होते. मग याच झुंडशाहीला अस्मितेची, धर्माची आणि राजकीयतेची लेबलं लागण्याची शक्यता असते. तेच आता दिसत आहे.
आधीच म्हटल्याप्रमाणे हा उत्सव आपला अविभाज्य घटक झाला आहे. तो राहणारच आहे, पण त्याला दिशा हवी. प्रचंड प्रमाणात जर तरुणवर्ग उपलब्ध होत असेल तर त्याची ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरली नाही गेली तर त्या ऊर्जेचे रूपांतर उन्मादात व्हायला वेळ लागणार नाही. पण आज एक खूप मोठा वर्ग या दहा दिवसांच्या गोंधळाकडे नाकं मुरडताना दिसत आहे. मध्यमवर्ग त्यापासून चार हात दूर राहत आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या काळातदेखील हे चित्र काही प्रमाणात टिळकांना दिसून आले होते. अर्थात त्यांनी त्याच वेळी त्यावर सडेतोड उत्तर दिले होते आणि चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या होत्या.

राष्ट्रीय महोत्सवाच्या वेळी सुशिक्षितांनी काय केले पाहिजे – अग्रलेख -८ सप्टेंबर १८९६
महोत्सवातील लोकशिक्षणाचा भाग आपल्या ताब्यात हवा असल्यास सामान्य लोकांत मिसळून वागल्याशिवाय गत्यंतर नाही.. उत्सवाच्या कामात सुशिक्षित मंडळींनी पडल्यास सामान्य जनांचे हातून गैरप्रकार होण्याची भीती बाळगण्यास जागाच उरणार नाही.

रे मार्केट १६ भाषण – सप्टेंबर १८९६ –
उत्सवात काही कमतरता असली तर त्याचे पाप या उदासीन शहाण्या मंडळींच्याच कपाळी मारावे लागते. लोकांत मिसळा, त्यांचे कोठे चुकत असल्यास सर्व गोष्टी नीट जुळवून घ्या. सुशिक्षितांचा अधिकार असा आहे. त्यांची कर्तव्ये हीच आहेत..

नेमक्या याच गोष्टी आज माध्यमांनी आणि तथाकथित विचारवंतांनी, नाक मुरडणाऱ्यांनी आणि अनेक गणेशोत्सव मंडळांनीदेखील दुर्लक्षिल्या आहेत. लोकमान्यांना गणेशोत्सवातील गैरप्रकार त्या काळीदेखील जाणवले होते किंबहुना त्यासाठीच त्यांनी चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. अर्थात आजच्या उत्सवाकडे पाहताना हेच प्रकर्षांने जाणवते.
या पाश्र्वभूमीवर आजच्या गणेशोत्सवाकडे पाहावे लागेल. कारण एक मोठी व्यवस्था उपलब्ध असताना त्याकडे दुर्लक्ष केले तर काय होऊ शकते त्याचे प्रत्यंतर आजच्या उत्सवात दिसून येते. उपलब्ध व्यवस्थेचा चांगला वापर किती ठिकाणी झाला? व्यवस्था महत्त्वाची असते. ती बिघडली असेल तर सुधारता येते. पण जर काहीच नसेल तर शून्यातून नवे साम्राज्य उभे करण्यास अलौकिक व्यक्तिमतत्त्व लागते. तशी व्यक्तिमत्त्वं आपल्यात आहेत का.. मग गणेशोत्वातील व्यवस्था विधायक कामाकडे वळविता आली नाही तर त्याचा वापर हा राजकीय व्यवस्थेसाठी झाला तर नवल ते काय. ही व्यवस्था खंडित करणे शक्य नाही, पण तिचा योग्य वापर करणे शक्य आहे.
बाजारपेठीय यंत्रणेने गणेशोत्सवात शिरकाव केल्याने उत्सवात खंड पडणार नाही. तिचे दूरगामी परिणाम उत्सवावर होऊ शकतात. ते रोखण्यासाठी आणि मूळ व्यवस्था टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी गरज आहे ती नेतृत्वाची. आजचे आपले सारे नेतृत्व हे राजकीय आहे. सामाजिक नेतृत्वदेखील अखेरीस राजकीय वळचणीस जाताना दिसत आहे. मग या सर्वात दोष कुणाचा.. व्यवस्थेचा, त्या व्यवस्थेत अडकलेल्यांचा की ती व्यवस्था स्वत:साठी वापरणाऱ्यांचा? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नेतृत्वाचा अभाव. लोकमान्यांनतर गणेशोत्सवाला एकमुखी, सर्वव्यापी असे नेतृत्वच लाभले नाही.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की सार्वजनिक गणेशोत्सव ही अनेक ठिकाणी एक संस्थांत्मक रचना म्हणून वाढीस लागली. जेव्हा अशी रचना अस्तित्वात असते तेव्हा तिला योग्य दिशा दाखवावी लागते, अन्यथा चांगल्या चांगल्या संस्थादेखील देशोधडीला लागू शकतात. संस्थांत्मक रचनेचा फायदा हा असतो की तुम्ही एखादे कार्य उपक्रम रुजवू शकता आणि एकदा का ते काम संस्थेचे झाले की व्यक्ती महत्त्वाची न राहता कार्याला महत्त्व राहते. मग जोपर्यंत संस्था टिकून आहे तोपर्यंत ते कार्य चालू राहते. पण त्यासाठी संस्थात्मक रचना तर हवी ना? ती असेल तर त्या मधल्या काळात जरी कार्याला दुर्लक्ष झाले, धक्का लागला तरी चौकट शाबूत असते, किंबहुना अशी भक्कम चौकट आपणास गणेशोत्सवाने उपलब्ध करून दिली होती. काळ बदलला, नेतृत्व बदलले तरी कार्याला पुढे नेण्याचा उद्देश त्यातून टिकून राहतो. भले तो मधल्या काळात भरकटलेला असेल, पण तो अस्तित्वात असतो. वाट पाहत असतो सक्षम नेतृत्वाची. त्यामुळे संस्थात्मक रचना ही अंतिमत: महत्त्वाची ठरते. ती आपल्याकडे आहे, गरज आहे ती त्यातील योग्य गोष्टींना पुढे नेण्याची.

नोंदीकरणाची अक्षम्य उपेक्षा.. 
‘लोकप्रभा’ने महोत्सवी गणेशोत्सव विशेषांक करण्याचे ठरविल्यावर पुणे, मुंबई आणि इतर अनेक ठिकाणी संपर्क साधून या वर्षी रौप्य, सुवर्ण, हीरक, अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना आवाहन केले. शताब्दी पार केलेल्या सर्वच मंडळांची माहिती मागवली. या माहितीचे संकलन करताना जाणवली ती मंडळांची आपल्याच कार्याच्या नोंदीकरणाची अक्षम्य अशी उपेक्षा. शताब्दी पार केलेल्या अनेक मंडळांकडे त्यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती. ज्यांच्याकडे होती त्यांना ती व्यवस्थित कागदावर मांडून पाठवणे शक्य नव्हते. अनेक मंडळे तर स्वयंभूच. त्यामुळे त्यांनी तर आम्हाला हे असले काही जमणार असे सांगितले. ही केवळ स्वत:ची उपेक्षा नाही तर इतिहासाशी प्रतारणाच म्हणावी लागेल. शहराशहरांतून असणारी समन्वय मंडळे केवळ आपल्या मिरवणुकीच्या आणि मंडपाच्या सोयीसाठी प्रशासनाशी झगडण्यात गर्क असताना दिसतात पण आपल्या शहराच्या गणेशोत्सवाच्या इतिहासाबद्दल उदासीन असतात. अर्थात पुण्यातील आनंद सराफ यांच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां, अभ्यासकांसारखे काही अपवाद असतात. १९७३ पासून गणेशोत्सवात सक्रिय असणाऱ्या सराफांनी पुण्यापुरती का होईना पण महत्त्वाच्या मंडळाची यादी ठेवली आहे. त्याचा या कामी खूपच फायदा झाला. 
सार्वजनिक गणेशोत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सवी वाटचाल करत असताना त्यातील ठळक घडामोडींची नोंद घेणे, त्यातील दुर्मीळ छायाचित्रे एकत्रित करणे असे उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. याबाबतीत केसरी संस्थेने दोन महत्त्वाचे दस्तावेजवजा ग्रंथ संकलित केले आहेत. गणेशोत्सव हीरकमहोत्सवी वर्षांत आणि शताब्दी वर्षांत पदार्पण करताना प्रकाशित केलेले हे ग्रंथ हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा दुर्मीळ ठेवा आहे. त्याचबरोबर मुंबईतील केशवजी नाईकांच्या चाळीमधील मंडळाने ‘सार्वजनिक गणेशोत्सव शतकाची वाटचाल’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित केला होता. अशी काही मोजकी उदाहरणे सोडली तर आपल्याकडे नोंदीकरणाची उपेक्षाच आढळून आली. 
‘लोकप्रभा’ने महोत्सवी गणेश विशेषांकाच्या निमित्ताने काही प्रमाणात ही उपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. काही दुर्मीळ छायाचित्रे या निमित्ताने जमा झाली तर अनेक जुन्या-नव्या घटना एकत्रित आल्या आहेत.

आजचा उत्सव हा इव्हेंट झाला आहे. वारेमाप प्रायोजक आणि ढीगभर बॅनरखाली तो झाकोळून गेला आहे. अंग मोडून काम करण्यापेक्षा पैसे फेकून काम करवून घेण्यावर सारा भर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्गणीतून येणारी बांधीलकी प्रायोजकांमुळे कमी झाली आहे. तरीदेखील काही चाळी आणि पेठांमधून पारंपरिक उत्सवाची धुरा वाहण्याचे काम नेटाने केले जात आहे. यांच्याच हाती खरे तर या उत्सवाची दिशा आहे. कारण तेथे अजून तरी उपरोक्त व्यवस्था, संस्थात्मक रचना अस्तित्वात आहे. अशा अनेक मंडळांकडे उत्सवाच्या माध्यमातून जी अपरिमित ऊर्जा आहे ती कशी वापरली जाते यावरच सार्वजनिक गणेशोत्सवाचे आज आणि उद्या अवलंबून आहे.
टिळकांनी सुशिक्षितांना केलेले आवाहन आज या सुशिक्षित मंडळांना करावेसे वाटते. सर्वच मानक ऱ्यांनी आता मानापेक्षा जनांच्या उत्सवाकडे लक्ष द्यायची गरज आहे. कारण हा जनांचा उत्सव आहे हीच यातील मूलभूत अंत:प्रेरणा आहे. महोत्सवी मंडळींची ही किमान जबाबदारी आहे की, त्यांनी केवळ मंडळाचे वय वाढविण्यापेक्षा लोकमान्यांना अभिप्रेत असेला उत्सव जनांमध्येच पुन्हा कसा वाढीस लागेल हे पाहावे.