४३० शुक्रवार पेठ, सोलापूर
स्थापना : १८८५ उत्सवी वर्ष : शतकोत्तर तिसावे

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात १८९३ साली झालेली असली तरी, त्याहीपूर्वी काही ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत असे, त्यांपैकीच एक म्हणजे सोलापुरातील आजोबा गणपती. पुण्यातील सार्वजनिक उत्सवाच्या आधी स्थापन झालेला हा गणपती सोलापूरकरांचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. सोलापूरकरांची शान असणारा हा गणेशोत्सव आज १३०व्या वर्षांत पदार्पण करत आहे.
या उत्सवाची नेमकी सुरुवात कशी झाली याची फारशी माहिती आज उपलब्ध नाही. पण लोकमान्य टिळक १८९२ साली सोलापूर भेटीवर आले असता, तत्कालीन आजोबा गणपती मंडळात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या ते संपर्कात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून तेथील अनेक कार्यकर्ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून संघटन आणि स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा हे सूत्र टिळकांनी नक्की केले त्यामागे सोलापूरसारख्या ठिकाणांच्या भेटीगाठी कारणीभूत होत्या हेच यातून लक्षात येते.
सोलापुरातील हे मंडळ त्या काळी केवळ गणेशोत्सवापुरतेच मर्यादित नव्हते. ज्या शुक्रवार पेठेत आजोबा गणपतीचे स्थान होते तेथील अनेकांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती. किंबहुना त्यामुळेच या पेठेला स्वातंत्र्य सैनिकांची पेठ असेदेखील म्हटले जायचे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून या सर्व चळवळींना चांगलेच पाठबळ मिळत होते. १९२६ मध्ये श्रद्धानंद स्वामींची दिल्ली येथील निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या झाली, त्याच्या निषेधार्थ सोलापुरात बंद पाळण्यात आला. सिद्रामप्पा फुलारी, रेवणसिद्धप्पा खराडे, नागप्पा शरणार्थी, नागय्या धोत्री आणि इरप्पा कोरे यांनी त्रिपुरांकेश्वर मंदिरात एकत्र येऊन श्रद्धानंद समाजाची स्थापना केली व सार्वजनिक आजोबा गणपती मंडळाचा कारभार या श्रद्धानंद समाजाच्या मार्गदर्शनाखाली पुढे सुरू झाला.
मंडळाचे वैशिष्टय़ म्हणजे गणपतीची मूर्ती दर वर्षी विसर्जित केली जात नाही. १८८५ साली कागदाचा लगदा, कापडाचे तुकडे, बांबू, कामटय़ा, गव्हाचे तणस, चिंचोका खळ आणि सुतळ्या इ. साधनांपासून ही मूर्ती तयार करण्यात आली होती. याच मूर्तीचे कित्येक वर्षे पूजन होत असे. तर १९९५ च्या सुमारास ही पूर्वीची मूर्ती जाऊन त्या जागी नवीन मूर्ती तयार करण्यात आली.
मंडळाने स्वातंत्र्यपूर्व काळात जसे अनेक स्वातंत्र्यसैनिक दिले तसेच स्वातंत्र्योत्तर काळात अनेक लोकप्रतिनिधीदेखील घडवले आहेत. सध्या आजोबा गणपतीची जबाबदारी अध्यक्ष अ‍ॅड. गौरीशंकर फुलारी यांच्याकडे आहे.
गणपती ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. रुग्णांना आर्थिक मदत, दर वर्षी कुष्ठरोग्यांना मिष्टान्नवाटप, बालसुधार गृहामध्ये फराळवाटप, मुक्या जनावरांसाठी पाणपोई, विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण, हुंडाबळी व भ्रूणहत्याविरोधात जनजागरण अभियान असे उपक्रम राबविले जातात.
धार्मिक कार्याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबविणारा ट्रस्ट म्हणून आजोबा गणपतीची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. लवकरच मंडळाची वेबसाईट आणि ई-दर्शन सुविधा सुरू होणार आहेत.