कल्याण
स्थापना : १९९०, उत्सवी वर्ष : रौप्य महोत्सवी

मुरारबाग मित्र मंडळाचं यंदाचं रौप्यमहोत्सवी वर्ष. १९९० साली स्थापन झालेल्या या मंडळाचे वैशिष्टय़ असं की, हे मंडळ अनेकदा आरोग्यविषयक देखाव्यांना प्राधान्य देत असतं. अर्थात त्यातही वैविध्य टिकून राहून जनजागृती कशी होईल याकडे मंडळाचे कार्यकर्ते लक्ष देत असतात. गेल्या पाच वर्षांपासून एड्स आणि टीबी या दोन्ही आजारांविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचं महत्त्वाचं काम हे मंडळ सध्या करत आहे. यंदा त्यांनी मधुमेह आणि रक्तदाब या आजारांविषयी माहिती देणारी शिबिरं ठेवली आहेत. स्वस्थ निरोगी नागरिक हेच समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असतात म्हणून छोटय़ामोठय़ा सर्वच आजारांबाबत लोकांना माहिती असणं आवश्यक आहे, असं मंडळाला वाटतं. त्यामुळेच आरोग्यविषयक देखावे दाखवण्याला आणि आजारांबाबत माहिती देणारी शिबिरं भरवण्याला मंडळाचं प्राधान्य असतं. टीबी आणि एड्स या विषयांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या सहकार्याने चित्रफीतसह आजवर अनेक वेळा शिबिरं आयोजित केली आहेत. मुरारबाग मंडळाच्या आरोग्यविषयक देखाव्यांनी अनेक बक्षिसांवर आपलं नाव कोरलंय. या देखाव्यांसह राष्ट्रीय एकात्मता, पौराणिक कथा, हिंदुत्व असेही विषय घेऊन मंडळाने देखाव्यांमध्ये नेहमीच बाजी मारली आहे. महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी बचत गट सुरू केले. जेणेकरून त्यांना कमी व्याजदरात त्यांना कर्ज मिळू लागली. त्या पैशांतून त्यांनी काही छोटे-मोठे उद्योगही सुरू केले. त्यामुळे अशा अनेक महिला आता स्वबळावर उभ्या आहेत. मंडळाच्या विभागातील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत गटातील मुलांना संपूर्ण वर्षांची शैक्षणिक मदत देण्यात आली आहे. तसंच विभागातील ७० वर्षांच्या पुढच्या लोकांचे विभागातल्या मोलाच्या कामगिरीबद्दल सत्कार केले जातात. यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त घुसखोरीची भयानकता दाखविणारा देखावा करण्यात आला आहे.