मानसिक विवेचनातून लक्षात येते की, समूहाच्या माध्यमातून एका आखीव कामानिमित्ताने आणि मर्यादित कालमर्यादेत कार्यकर्त्यांचा हा उत्साह सीमित झालेला असतो. मग अशा काही मर्यादित काळ टिकणाऱ्या या उत्साहाला ऊर्जा म्हणायचे का की निव्वळ उन्माद?
अगदी मोठय़ा शहरांपासून लहान लहान गावांपर्यंत गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस अखंडपणे झटणारे कार्यकर्ते हा त्या उत्सवाचा कणा असतो. पण कार्यकर्त्यांमधली ही ऊर्जा अलीकडच्या काळात उन्मादाकडे झुकते आहे असं काहीजणांना का वाटतं आहे ? हा उन्माद असेल तर तो आवरायचा कसा?
‘अरे मांडववाला कुठे गेला?’,
‘अजून एमएसईबीचे कनक्शेन जोडले गेले नाही?’,
‘पुजाऱ्यांना सांगितले का वेळेवर यायला?’,
‘मूर्ती केव्हा येणार?’,
‘ट्रकवाला आला का?’
गणेशोत्सवाच्या आधीच्या पंधरा दिवसात कोणत्याही सार्वजनिक गणपती मंडळाच्या मंडपात गेलं तर हमखास कानावर पडणारी ही वाक्यं.. अशी सगळी कामं उरकण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग उडालेली असते. नवख्या कार्यकर्त्यांपासून जुन्या- जाणत्यांपर्यंत सगळ्यांचा त्या सगळ्या दिवसात मुक्काम जणू मांडवातच असतो. कुणालाही खाण्यापिण्याची, घरादाराची शुद्ध नसते. दिवसभर कामधंदा सांभाळून रात्र रात्र जागून बाप्पांसाठीची तयारी केली जाते. गणेशोत्सव मंडळ लहान असो की मोठे, दोन्हीकडे कार्यकर्ते आपापल्या मंडळासाठी तेवढय़ाच तन्मयतेने झटत असतात. मुख्य म्हणजे राज्यभरात कुठंही गेलं तरी हेच चित्र दिसतं. त्या अर्थाने गणेशोत्सव हा कार्यकर्त्यांचा उत्सव. त्यांच्यामधल्या सळसळत्या चैतन्याचा उत्सव.
कार्यकर्त्यांमध्ये हे चैतन्य, ही ऊर्जा येते कुठून? त्यामागची प्रेरणा नेमकी काय असते? ती धार्मिक असते की सामाजिक? की निव्वळ काहीतरी करायचं आहे म्हणून चार तरुण मुलं एकत्र येऊन गणेशोत्सवातले कार्यकर्ते बनतात? आज हा प्रश्न उपस्थित होतो. कारण टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यामागची प्रेरणा राजकीय होती. स्वातंत्र्य मिळवणं हे तत्कालीन तरुणांपुढचं ध्येय होतं. आता तसं राहिलेलं नाही. मग आता गणेशोत्सवासाठी तरुण कार्यकर्ते संघटित होतात तेव्हा त्यांच्यापुढच्या प्रेरणा कोणत्या असतात? ती त्यांची आवड असते की करण्यासारखं समोर दुसरं काही दिसत नसतं म्हणून तरुण आपली ऊर्जा गणेशोत्सवासाठी लावतात?  गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत नाराजीचा सूरही उमटताना दिसतो आहे. वर्गणी मागण्यापासून ते अगदी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीपर्यंत होणाऱ्या गैरप्रकारांबाबत नंतर चर्चा होत राहते. काही मंडळं विधायक कामांची वाट निवडून त्यावर चालताना दिसतात. पण अनेकांकडे बोट दाखवलं जातं अशी परिस्थिती आहे हेही नाकारता येणार नाही.
गणेशोत्सवात प्राणपणाने सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत आपल्याला अशी दोन्ही प्रकारची मतं का ऐकायला मिळतात? काही लोकांना कार्यकर्त्यांचं या दिवसातलं काम ही त्यांची ऊर्जा वाटते तर काही लोकांना तो उन्माद वाटतो असं का? मुळात ती ऊर्जा असेल तर तिला आणखी विधायक वळण लावून ती एरवी वर्षभर इतर वेगवेगळ्या कामांसाठी चांगल्या प्रकारे मिळवता येईल का आणि उन्माद असेल तर तो आवरायचा कसा असे अनेक प्रश्न समोर ठेवून राज्यभरातल्या वेगवेगळ्या जाणकारांशी तसंच कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
 या चर्चेतून पुढे आलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्यकर्त्यांच्या या उत्साहामागे भक्तीभाव, श्रद्धा तर आहेच; पण त्याचबरोबर इतरही अनेक महत्त्वाची कारणे आहेत. माणूस म्हणून समूहाने जगण्याची आपसूक जन्मजात सवय-गरज, परंपरेने आलेले संचित सांभाळण्याची जबाबदारी, आनंद आणि कार्यकर्ता म्हणून लाभणारी प्रतिष्ठा अशा सर्व घटकांची एकत्रित प्रेरणा या आजच्या उत्साही प्रवाहाला कारणीभूत आहे. सद्यस्थितीत कोणी याला ऊर्जेचा प्रवाह म्हणतो, तर कोणी निव्वळ उत्साह म्हणतो, तर कोणी निव्वळ धांगडिधगा आणि त्यातून निर्माण होणारा उन्माद म्हणू शकेल.
ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ अनुराधा सोवनी विश्लेषण करताना सांगतात, ‘‘‘स्पेशल फॅसिलिटेशन’ हा यातील महत्त्वाचा भाग आहे. कोणतेही काम आवडीचे असेल, तर आजूबाजूला इतर माणसे असताना जास्त ताकदीने, वेगाने होते आणि नावडते असेल तर त्यात व्यत्यय येतो. अर्थात उत्सवात स्वत:ला पूर्णपणे झोकून देणे ही आवडीचीच गोष्ट असते.’’ याच अनुषंगाने ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. शुभांगी पारकर आणखीन काही गोष्टी नमूद करतात. त्यांच्या मते या सर्व कामात एक कमिटमेंट असते, फेस्टिव्हल कमिटमेंट म्हणूया. मंडळाची ओळख हीदेखील या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची गोष्ट असते. मंडळाचे यश ते आपले यश अशी भावना त्यामध्ये असते. महत्त्वाचे म्हणजे हा जो उत्साह असतो तो एका ठरावीक कालमर्यादेत असतो. शुभांगी पारकर यालाच फेस्टिव्हल कमिटमेंट असे म्हणतात. मुख्य म्हणजे यामागे अभिव्यक्त होण्याची एक भावना असते. ती एक प्रकारे सृजनशील ऊर्जा असते. या काळात मानसिक क्षमता कित्येक पटीने वाढलेली असते. इतकी की ती शारीरिक क्षमतेला पुढे रेटून नेते. त्या वेळी शरीर थकत नाही, मात्र सारे संपल्यावर मात्र रिकामा मांडव पाहून थकल्याची भावना तर येतेच, पण त्यामध्ये एक प्रकारचा रितेपणा देखील असतो असे त्या नमूद करतात.
अनुराधा सोवनी यातील दुसरा पलू उलगडून सांगतात, ‘‘गणेशोत्सवाची स्वाभाविक कालमर्यादा या ऊर्जेला चहूबाजूंनी बांध घालते. एवढय़ाच जोमाने जास्त काळ काम करायचे असेल तर हा जोश ढेपाळेल. पण उत्सवाचा हा नेमका कालावधी हा उत्साह टिकवून ठेवतो आणि त्यात सामाजिक गटांचे इंधन भर घालते.’’ त्याचबरोबर आणखीन एक मानसशास्त्रीय संकल्पना त्या मांडतात ती म्हणजे, ‘गेस्टाल्ट’. ‘द होल इज मोअर दॅन द सम ऑफ इट्स पार्टस’, असे म्हटले आहे. कोणत्याही गोष्टीच्या घटकांच्या बेरजेपेक्षा तिचे पूर्ण स्वरूप कायमच भव्य असते. प्रत्यक्ष गणेशाच्या बाबतीत हे खरे, तर मग त्याच्यासाठी केलेल्या कामाच्या बाबतीत हे खरे असणारच! त्यात भर पडते वातावरण निर्मितीची. संगीत, दिव्यांचा लखलखाट, अत्तर, गुलाल, मखर, फुलांची सजावट .. प्रत्येक घटकाचा असर मर्यादित, पण ते सगळे एकत्र मात्र मन मोहवून टाकतात.
या मानसिक विवेचनातून लक्षात येते की समूहाच्या माध्यमातून एका आखीव कामानिमित्ताने आणि मर्यादित कालमर्यादेत कार्यकर्त्यांचा हा उत्साह सीमित झालेला असतो. मग अशा काही मर्यादित काळ टिकणाऱ्या या उत्साहाला ऊर्जा म्हणायचे का की निव्वळ उन्माद? शुभांगी पारकर यांच्या मते, ‘‘ऊर्जा की उन्माद याचे हो किंवा नाही असे उत्तर देता येणार नाही. यात ऊर्जा आहेच. आणि तीही ड्रायव्हिंग ऊर्जा आहे. सकारात्मक काम करणारी अनेक मंडळे, कार्यकत्रे आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाला उन्माद असे म्हणता येणार नाही. काही ठिकाणी राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असतो. त्यामुळे मात्र याला उन्मादाचे स्वरूप येऊ शकते. स्वरूप बदलत असले तरी सारे काही विसरून प्रवाहात बांधलेले हे आखीव काम असते. त्यातूनच ही प्रेरणा येत असते.’’
क्षणभर या उत्साहाला ऊर्जेचे स्वरूप आहे असे आपण मानूया. पण एका विवक्षित कारणासाठी अशी कालमर्यादेत बांधलेली ऊर्जा संपल्यावर काय मिळते हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. अभ्यासक अभय टिळक यावर भाष्य करतात, ‘‘ऊर्जा हा सकारात्मक शब्द आहे. त्यामुळे तो येथे या उत्साहाबाबत वापरणे काहीसे शंकास्पद ठरेल.’’ गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्यांनी केली असली तरी सध्याच्या उत्साहाच्या प्रेरणेचा मागोवा घेण्यासाठी लोकमान्यांच्या काळापर्यंत जाण्यात काहीच हशील नाही. कार्यकर्ता आणि सार्वजनिक मंडळे यांसंदर्भातील सद्यस्थिती पाहिली असता सध्याचे ट्रेंडस् काहीसे वेगळे चित्र उभे करतात. केवळ गणेशोत्सवच नाही तर श्रावणातील दहीहंडीपासून ते अश्विनातील नवरात्रोत्सवापर्यंत सध्या अनेक मंडळे कार्यरत असताना दिसतात. काही मंडळे हे तीनही उत्सव एकाच ठिकाणी, एकाच मांडवात साजरे करत असतात. (गणपती आणि नवरात्रदरम्यान मांडव तसाच ठेवून, एकच वेळेस दोन्ही मूर्ती आणून). ३०-३६ तास विसर्जन मिरवणूक, नवरात्रात पंचमीषष्ठीपासून नारळाच्या तोरण घेऊन जाणाऱ्या मिरवणुका असे काहीसे स्वरूप सध्या दिसून येते. याला आपण ऊर्जा म्हणायचे का? यातून सकारात्मक काही घडते का? तरुणांचे वाढते प्रमाण, समूहशक्ती मोठय़ा प्रमाणात कार्यरत होते हे मात्र नक्की.’’
पण यामागची नक्की प्रेरणा काय? धार्मिक भाव, आध्यात्मिक अंग या मूलभूत गोष्टी तर आहेतच, पण त्याचबरोबर या सणाच्या माध्यमातून सर्जनशीलता दाखविण्याची, अभिव्यक्त होण्याची एक संधी कार्यकर्त्यांला आणि उत्सवात सामील झालेल्या सर्वानाच मिळत असते. संघटनांच्या माध्यमातून एक चांगली कारक क्रियाशक्ती निर्माण होत असते. ही क्रियाशक्ती, ऊर्जा अभिव्यक्त होण्याचे माध्यम शोधत असते, ते माध्यम मिळते तेव्हा ती आपल्या परीने अशा ठिकाणी व्यक्त होते. त्याला जोड मिळते ती तारुण्यातील आवेशाची. त्याचे प्रत्यंतर अनेक ठिकाणी प्रगत आविष्कारणात दिसून येतेच. असे ते नमूद करतात. पण हे चित्र सर्वत्र दिसून येत नाही. मर्यादित काळातील या अफाट उत्साहाशी अनेक वेगवेगळे संदर्भ जोडले आहेत. गल्लीबोळातील मंडळांबाबत  तर गणेशोत्सवाच्या काळात त्या मंडळापुरत्या उभ्या राहणाऱ्या अर्थकारणाचा आणि कार्यकर्त्यांच्या बेकारीचा जवळचा संबंध असू शकतो असा अंदाजही ते व्यक्त करतात.
अर्थात हा सारा उत्साह, प्रेरणा, ऊर्जा हे सारे काही त्या काळापुरतेच असते. मुख्य म्हणजे याला विचारांची जोड कमीच असते. एक सामाजिक अभ्यासक या उत्साहाच्या मागील एक वेगळाच दृष्टिकोन मांडतात, ‘‘ऊर्जा ही बौद्धिक आणि वैचारिक असते. मात्र उन्मादाचे तसे नसते. उन्मादाच्या आवेगात अनेक कामे होतात. अंगात आलेल्या बाईची कशी अवस्था असते तसेच काहीसे येथेदेखील आहे. त्या बाईची ती अवस्था संपल्यानंतर मात्र ती त्याच आवेशात इतर कामे करत नाही. अशाच प्रकारे येथेदेखील घडत असल्याचे त्या ठामपणे सांगतात. उन्माद कमी होईल आणि विचारांची जोड जशी वाढेल तसा ऊर्जेचा प्रवाह वाढेल असे त्या नमूद करतात. अर्थात त्याचबरोबर त्या सांगतात की सरसकट हे उन्मादाचे चित्र नाही. काही मोजक्याच ठिकाणी ऊर्जेचे अस्तित्व जाणवते मात्र बाकी साराच गोंधळ आहे.
मग या साऱ्या उत्साहाला उन्माद म्हणायचे का? अभय टिळक याची कारणमीमांसा करताना सांगतात की उन्माद हा ताबडतोब ओसरून जातो. तसेच येथेदेखील घडते. याच अनुषंगाने एक महत्त्वाचा मुद्दा ते मांडतात की, ‘‘कार्यकर्त्यांच्या या सर्व उत्साहाची, ऊर्जेची दीर्घकालीन गोळाबेरीज केली तर दिसते असे की सकारात्मक, दीर्घकालीन, टिकाऊ काही करण्याएवजी तत्कालीन हित साध्य करण्यातच ही सारी ऊर्जा खर्च पडत आहे. या साऱ्या उत्सवात मनस्वी धारणेने शारीरिक, बौद्धिक, आíथक, सांस्कृतिक ऊर्जेला प्रचंड बहर येतो. पण तिचा दीर्घकालीन सकारात्मक व उत्पादक वापर न होणे हीच सध्याची दुर्दैवी अवस्था आहे. असा विनियोग न केल्यामुळेच या ऊर्जेला येणारे उन्मादाचे स्वरूप, ऊर्जेच्या वापराची योग्य व्यवस्था करू न शकणे हीच आपल्या सामाजिक नेतृत्वाची खरी शोकांतिका आहे.’’
एकंदरीत गणेशोत्सवा दरम्यानच्या या साऱ्या परिस्थितीचे मानसिक व सामाजिक विश्लेषण केल्यावर लक्षात येते की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी उत्साहाची अनेक बेटं आहेत. लोकमान्यांचा दृष्टिकोन त्या काळाशी अनुरूप आणि त्यानुसार वेगळा असला तरी त्या परंपरेतून सुरू असणाऱ्या या उत्सवाने राज्याच्या सर्वच भागांत आजदेखील प्रेरणेचे, उत्साहाचे, पर्यायाने ऊर्जेचे असंख्य स्रोत आणि प्रवाह निर्माण केले आहेत. मात्र त्यांच्या समुच्चीय दृष्टीने, सकारात्मक अनुषंगाने वापर करून त्याचे रूपांतर सामाजिक ऊर्जेत झालेले आढळत नाही. अशी व्यवस्थाच आपल्याकडे नाही. ज्यांना या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येऊन पुढे जाणारं काही काम करावं हे जाणवत नाही, समजत नाही, किंवा ज्यांच्यापुढे काही ध्येय नाही, त्यांचं काय? अशा दिशाहीन, भरकटलेल्या कार्यकर्त्यांकडेही उर्जा आहे, पण आज गरज आहे ती त्यांच्यातील ही ऊर्जा ओळखून तिला सकारात्मक व दीर्घकालीन कामाची जोड देण्याची.
response.lokprabha@expressindia.com