लेकीचं लग्न म्हणजे आईसाठी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू. लेकीसाठीही माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जायचं म्हणजे केवढं दिव्य. पण आता काळ बदललाय हे हा दोन पिढय़ांमधला संवादच सांगतोय…

आई : छान आहे ना गं डिझाइन आणि जरा वेगळ्या छापाचं आह़े़, नाही?
ती : हम्. छान आहे.
आई : काय गं तुम्ही मुली.. स्वत:च्या लग्नाची पत्रिका बघायलासुद्धा उत्सुक नाही. ठेव तो लॅपटॉप आधी बाजूला.. काय सारखं काम काम..
ती : हो गं आई.. थांब एवढा मेल पाठवते. आणि मला सांग, या पत्रिकांचा घाट घालण्याची काय गरज होती. सगळ्यांना ई-मेलच केली असती ना, अन् तसंही मोबाइल्स तर आहेतच ना. मेसेजेस केले असते. आता या पत्रिका घेऊन प्रत्येकाच्या घरी फिरायचं.. वेळ किती जाणार त्यात..
आई : असं नाही चालत बाई.. बरं वाटतं का पाहुण्यांना असा एसएमएस करणं. काही रीतीभाती असतात की नाही. तुमची नवी वळणं आमच्या जुन्या रस्त्यांना लावू नकोस तू.
ती : सोडा आता जुने रस्ते. जग बघा आकाशात उडायला लागलंय.. बरं हे सगळं जाऊ दे.. मला सांग, साधारण किती माणसं बोलावणार आपण लग्नाला..
(एखाद्या गुप्तहेराने संशयित आरोपीला विचारावं तसं तिने आईला विचारलं. )
आई : हे बघ, आता लग्न म्हटल्यावर साधारण शे-दोनशे माणसं तर जमणारच ना आणि आपल्या घरातलं पहिलंच लग्न म्हटल्यावर बोलवायला नको का सगळ्यांना..
(आईनेसुद्धा आपली बाजू लावून धरली.)
ती : मला वाटलेलंच तुम्ही ऐकणार नाही माझं. आणि पहिलं लग्न आहे म्हणूनच कमी बोलवायची माणसं.. कशाला नसत्या सवयी लावायच्या त्यांना.. तरी मी सांगत होते की मोजकीच ३० ते ४० माणसं बोलवू. छान हॉटेल बुक करू. कुठे गडबड नाही नि गोंधळ नाही. पण काय आता.. जुने रस्ते खडबडीत असल्याने दळणवळणाच्या साधनांची जरा वानवाच आहे.
आई : हो का.. पण हे जुने रस्ते माणसांच्या वापराकरिता आहेत, साधनांच्या नाही..
ती : व्वा. समोरच्याला निरुत्तर कसं करायचं हे मात्र तू चांगलं शिकून घेतलंयस हां आई माझ्याकडून.
आई : असं का.. सासरी गेल्यावर असं कायतरी बडबडू नकोस सासूला.. नाहीतर माझ्या नावाचा उद्धार होईल. आईने हेच शिकवून सासरी पाठवलं का, असं विचारेल.
ती : बोलूच दे त्यांना असं. त्यांच्या मुलाचे सगळे पाढे वाचून दाखवते किनई ते बघ आणि नंतर त्यांनाच सांगेऩ ‘चांगलं शिकवलंय हो तुम्ही तुमच्या मुलाला’.
आई : करशील गं बाई करशील. तुझा काही नेम नाही पण करू शकतो म्हणून लगेच करायचं नाही. आता तू सून म्हणून जाणारेस त्या घरी. सासूने कितीही तुला मुलगी म्हटलं तरी तू लक्षात ठेव की तू सून असणारेस त्या घरची. तुला..
ती : ए.. आई प्लीज हां.. आता ते ‘होणार सून तू’ टाइप लेक्चर नको ना स्टार्ट करूस. हे बघ आत्ताची इक्वेशन्स बदलली आहेत. पूर्वीच्या बायकांसारखं मी काही चोवीस तास घरात नसणारेय. उलट जवळ जवळ बारा तास घराच्या बाहेरच असणार. घरी आल्यावर जेवणार आणि झोपणार.. वेळ आहे कोणाला सूनपणा सांभाळायला आणि सासूपणा मिरवायला.. घरात मोजून चार माणसं..ती दोघं आणि आम्ही दोघं.. कोणाचे मानापमान काढत बसायचे नाही की काही नाही.. गोंधळ घालायला उगाचची माणसं नाहीत.
आई : तेच तर.. माणसं नाहीत. माझं लग्न झालेलं ना तेव्हा दोन खोल्यांमध्ये आम्ही दहा माणसं राहायचो. घरी रोज १२ माणसांचं जेवण तरी बनायचं. कारण अचानक कोणी आलं घरी की त्याला उपाशीपोटी जाऊ द्यायचं नाही.. तुझ्या आज्जीचा कडक नियम होता अगदी. गोंधळ होता माणसांचा पण नकोसा नाही वाटला कधीच.
ती : बाप रे.. मला नाही वाटत मी एवढी अ‍ॅडजस्ट होईन असं वातावरण असेल तर.
आई : अ‍ॅडजस्ट होण्याचं काय असतं बाळा.. आपण प्रत्येक नात्यात स्वत:ला अ‍ॅडजस्ट करत असतो. लग्नानंतर मात्र आपण स्वत:ला जाणीव करून देत असतो अ‍ॅडजस्ट करत असल्याची.
ती : पण, आई नेहमी बाईनेच का व्हावं अ‍ॅडजस्ट.. मला नाही पटत.. नवऱ्याचंसुद्धा लग्न होतंच ना. आणि आता त्यांनीही अ‍ॅडजस्ट व्हायला हवं आमच्याइतकंच.. आजकाल तर मुलं-मुली दोघंही नोकऱ्या करतात.. आणि हल्लीचे नवरे जरा नवरेगिरी सोडून वागतातही. मी तुला आजही पाहते, बाबा बाहेरून घरी आले की तू अगदी तत्परतेने चहा आणून देतेस त्यांना.. हीच गोष्ट मात्र तू बाहेरून आल्यावर बाबांना सुचत नाही. आई अ‍ॅडजस्टमेंट करायला मी तयार आहे, पण ती दोघांकडूनही व्हायला हवी. संसार सांभाळायचा मक्ता काय फक्त बाईनेच घेतला नाहीये.
आई : खरंय गं. पण पडल्यात काही गोष्टी अंगवळणी त्या अशा बदलणार थोडीच. ते सगळं असू दे.. आता आपण निवांत बोलतोय म्हणून विषय काढते. तसंही मला बोलायचंच होतं तुझ्याशी याबद्दल.
ती : कळलंय मला.. हे बघ आई, मी तुला अगदी स्पष्टच सांगते, मुलांचं वगैरे तू मला आत्ता काही सांगूच नकोस. आम्हा दोघांनासुद्धा आमच्या करिअरवर फोकस करायचंय. व्यवस्थित स्थिरस्थावर व्हायचंय. तुला माहितीये बाहेर महागाई किती वाढली आहे ते. दोघांचा पगारसुद्धा पुरत नाही हल्ली. त्यात अजून एक झेपणार आहे का आम्हाला..नको नको.. नकोच तो विषय..
आई : अंगावरचं झुरळ झिडकारल्यासारखं काय करतेस गं. मला माहीतेय तुम्हा मुलांना तुमची करिअर्स महत्त्वाची आहेत आणि चांगली गोष्ट ए ती, पण त्याचबरोबर भविष्याचाही विचार करा. काही गोष्टी या वेळच्या वेळेसच व्हायला हव्यात. तुम्ही करिअर करा ना. करिअर करता करता पण सांभाळतात की कित्येक जणी मुलं.
ती : जाऊ दे गं हा विषय.. अजून माझ्या लग्नाचा पत्ता नाही आणि तू मुलांवर कुठे पोहोचतेस माझ्या.. आई.. काय गं.. लक्ष कुठेय तुझं..ए आई..
आई : लग्न होतंय तुझं.. खरंच नाही वाटत ए गं मला.. मलाच मेलीला घाई झालेली तुझं लग्न कधी होतंय, लग्न कधी होतंय आणि आता ऐन उंबरठय़ाशी उभी आहेस तो ओलांडायला. काळ जसा पुढे जात होता तशी मी मागे जात होते. खरंच तू झालीस का गं एवढी मोठी..
ती : अज्जिबात नाही..मुलीसाठी आई कधीच म्हातारी होत नाही आणि आईसाठी मुलगी कधीच मोठी होत नाही.. ए पण तू अशी रडू नकोस हा लग्नात..मला नाही रडायचंय लग्नात.
आई : बरं.. वेडाबाई.. चिने काळ कितीही बदलला ना तरी सासरी जाणाऱ्या मुलीला पाहणाऱ्या आईच्या चेहऱ्यावरचे हसू आणि डोळ्यातले आसू मात्र कधीच बदलणार नाहीत.’’
प्राची साटम