अजित अभ्यंकर – response.lokprabha@expressindia.com

अमेरिका आज खदखदत आहे. कधीही मोठी ठिणगी पडू शकते अशी स्थिती आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये भर टाकण्यासाठी त्यांच्या शैलीनुसार अत्यंत बेलगाम वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना राजप्रासादाच्या तळघरामध्ये लपण्याची वेळ आली आहे. मिनिसोटा राज्यातील चार पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड या निशस्त्र तरुणाच्या मानेवर भर रस्त्यात ९ मिनिटे पाय दाबून ठेवून अत्यंत थंड रक्ताने त्याची हत्या केली. त्याने एका स्टोअरमधून घेतलेल्या सिगारेट्सचे पसे देताना बनावट नोटा दिल्याच्या संशयावरून पोलिसांना बोलावण्यात आले होते. हत्या करताना त्याचे हात त्याच्या पाठीमागे हातकडय़ांनी बांधून त्याला जमिनीवर पाडण्यात आले होते. त्याने या घटनेदरम्यान एकदाही पोलिसांशी किंवा अन्य कोणाशीही िहसक वर्तन किंवा असहकार्य केले नव्हते.

या दरम्यान तो ‘मला श्वास घेता येत नाही,’ असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न सातत्याने करत होता. आजूबाजूला गोळा झालेले लोक तसे ओरडून पोलिसांना सांगत होते. तरीही पोलिसांनी त्याच्या मानेवरचा पाय काढला नाही. रस्त्यावरचे जे लोक घटनेचे चित्रीकरण करत होते, त्यांना पोलीस बाजूला जाण्यास सांगत होते. त्याचे व्हिडीओज् सर्वत्र पसरले. त्याची भीषणता अनेकांनी पाहिली. पोलिसांच्या या कृत्याच्या निषेधार्थ संपूर्ण अमेरिकेत अतिशय संताप पसरला आहे. जनता प्रचंड संख्येने रस्त्यांवर उतरली आहे. मोठमोठय़ा सभा, मोच्रे होत आहेत.

ही पोलीस आणि वंशवाद यांच्याविरोधातील निदर्शने उत्स्फूर्त आहेत. ती केवळ कृष्णवर्णीयांची नाहीत. कृष्णवर्णीयांच्या समवेत त्यांच्यापेक्षा दुप्पट संख्येने श्वेतवर्णीय, लॅटिनोज् आणि आशियायी अमेरिकन्स सहभागी होत आहेत, हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पण ही हत्या आणि त्याच्या विरोधातील संताप ही केवळ अन्य कित्येक मोठय़ा समस्यांची लक्षणे आहेत. केवळ एका व्यक्तीची पोलिसांनी विनाकारण हत्या केली, एवढय़ाच कारणासाठी अमेरिकेतील लाखो लोक आज एकजुटीने रस्त्यावर आलेले आहेत, असे नाही. अमेरिकेतील अनेक समस्यांची मुळे यामध्ये गुंतलेली आहेत. या घटनेमध्ये काही घटक दिसतात.

  • थेट गोळ्या घालण्याची पोलिसांची कार्यपद्धती
  • कृष्णवर्णीयांविरोधातील स्पष्ट पूर्वग्रह आणि भेदभाव
  • अमेरिकेतील बंदूक संस्कृती
  • अल्पमतात असूनदेखील विपरीत अशा तरतुदींना संरक्षण मिळेल, अशा प्रकारची राजकीय व्यवस्था

पहिला प्रश्न असा की, फ्लॉईडला पोलिसांनी मारले. तो कृष्णवर्णीय होता. पण हा केवळ योगायोग नाही. त्याचे कृष्णवर्णीय असणे आणि पोलिसांनी अशा प्रकारे त्याला मारणे यांचा परस्परसंबंध आहे.

पोलिसांकडून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण मोठे

फ्लॉईडची हत्या हा अपवाद नाही, तो अमेरिकेतील नियम आहे. २०१७ पासून मार्च २०२० पर्यंत म्हणजे गेल्या तीन वष्रे तीन महिन्यांत पोलिसांनी रोज तीनच्या सरासरीने तीन हजार २५५ व्यक्तींच्या हत्या केल्या आहेत. त्यापकी जवळपास सर्व हत्या या महामार्गावर किंवा रस्त्यावर केवळ संशयावरून कोणत्याही प्रतििहसाचाराशिवाय करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अशा प्रकारच्या हत्यांसाठी एकाही पोलिसाला मोठी शिक्षा झालेली नाही.

कृष्णवर्णीयांच्या हत्या योगायोग नाही

कृष्णवर्णीय आफ्रिकन अमेरिकन्सचे लोकसंख्येतील प्रमाण फक्त १२ टक्केआहे. मात्र पोलिसांकडून होणाऱ्या हत्यांमध्ये कृष्णवर्णीयांचे प्रमाण २२ टक्केम्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट आहे. पण ही झाली संपूर्ण अमेरिकेच्या पातळीवरील सरासरी आकडेवारी. पण तेथील इडाहो, मिनिसोटा, नेब्रास्का, रहोड आयलँड, आरॅगॉन अशा काही राज्यांमध्ये कृष्णवर्णीयांच्या लोकसंख्येतील प्रमाणापेक्षा त्यांच्या पोलिसांकडून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण चार ते १० पट जास्त आहे. अशा प्रकारे प्रत्यक्ष िहसाचार झालेला नसतानाही पोलिसांकडून निव्वळ संशयावरून गोळ्या घातल्या जातात,  त्यावेळी निशस्त्र असूनही बळी जाणारी व्यक्ती कृष्णवर्णीय असण्याची शक्यता, ही अन्य वंशांच्या तुलनेत नेहमीच अनेकपटींनी जास्त असल्याचे या विषयातील अभ्यासक पत्रकार नमूद करतात.

यावरून असा निष्कर्ष निघतो की, कृष्णवर्णीय व्यक्ती आणि त्यांच्या हेतूंबद्दल पोलिसांचा दृष्टिकोन अत्यंत भेदभावाचा आहे. ते निशस्त्र असले तरी त्यांच्याबद्दल तीव्र संशय घेऊन त्यांना ठार मारण्याकडेच पोलिसांचा कल असतो. यालाच येथे वांशिक पूर्वग्रह (रेशियल प्रोफाईिलग) असे म्हटले जाते आणि त्याबद्दलच येथे अत्यंत संतापाची भावना आहे.

भारतात सामान्य माणसांशी पोलीस क्रौर्याने वागतातच. त्यामध्ये सर्वसाधारण गरीब, तळच्या जातीतील व्यक्ती, आदिवासी आणि आताच्या काळात मुस्लिमांना विशेष लक्ष्य केले जाते. ते सर्व आपण सोसतोच. पण पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला महामार्गावर किंवा अन्यत्र वाहतूक नियमांच्या भंगाबद्दल किंवा अन्य कोणत्याही सामान्य संशयावरून थांबविणे आणि त्यातून अचानक, त्याच ठिकाणी त्या व्यक्तीला केवळ संशयावरून कोणत्याही िहसाचाराशिवाय स्वतहून प्रथम गोळ्या घालून जागेवरच ठार मारणे, अशा घटना भारतात आपल्याला ऐकूनदेखील माहीत नाहीत. जगातदेखील त्या फारशा कुठेच घडत नाहीत. पण अमेरिकेत अशा घटना सर्रास घडतात आणि त्यांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे,  हे वरील आकडेवारीवरून दिसून येईल.

गोरे- १,२६८

आफ्रिकन (कृष्णवर्णीय)- ६९८

हिस्पॅनिक्स-              ४९८

अन्य- १३२

माहीत नाही- ६२९

एकूण- ३,२५५

पोलिसांचे अमर्याद अधिकार

या वंशवादी, भेदभावपूर्ण, पूर्वग्रदूषित दृष्टिकोनाबरोबरच, अमेरिकेतील पोलीस यंत्रणेची कार्यपद्धती, बंदूक संस्कृती आणि गुन्हेगारीचे प्रमाण यांचा परस्पर सापेक्ष विचारदेखील आवश्यक आहे. पोलिसांनी त्यांचे वाहन थांबविल्यानंतर पोलीस जवळ येत असताना कोणत्याही कारणासाठी फक्त स्वत:च्या खिशात हात घालणे, ही साधी बाबदेखील तिथे पोलिसांवर गोळ्या झाडण्यासाठी रिव्हॉल्व्हर काढण्याचा प्रयत्न म्हणून गृहीत धरली जाते. अर्थातच अशा परिस्थितीत पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी शक्यतो इलेक्ट्रिक शॉक गन आणि न जमल्यास सरळ गोळ्या घालणे ही बाब समर्थनीय मानली जाते. तसेच अन्यत्र पोलिसांनी किरकोळ कारणासाठीदेखील थांबविल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणे ही बाबदेखील गोळ्या घालण्यासाठी पुरेशी समजली जाते. जगात अन्यत्र कुठेही अशा प्रकारे पोलिसांकडून हत्या केल्या जात नाहीत. अशा हत्यांसाठी पोलिसांवर खटले दाखल होण्याचे प्रमाणदेखील अत्यल्पच आहे. पुरेशा कारणाशिवाय हत्या करण्यास पोलिसांना भय वाटत नाही, याचे कारण अशा कित्येक हत्यांबाबत विश्वसनीय व्हिडीओज्च्या आधारे न्यायालयात खटले दाखल झाल्यानंतरदेखील तेथे अत्यंत संवेदनशून्य आणि सरळसरळ पक्षपाती दृष्टिकोन स्वीकारला जातो. २००५ पासून २०१८ पर्यंत केलेल्या अभ्यासातील आकडेवारी सांगते की, २००५ पासून कित्येक हजार लोकांच्या हत्या अशा प्रकारे पोलिसांकडून करण्यात आलेल्या आहेत. त्यापकी फक्त ८० प्रकरणांमध्ये पोलिसांवर काही आरोपपत्र दाखल झाले. पकी फक्त तीन प्रकरणांमध्ये पोलिसांना शिक्षा झाल्या आहेत.

भीषण बंदूक संस्कृती

प्रश्न फक्त पोलिसांकडून होणाऱ्या िहसेचाच नाही. एकूणच बंदुकीमुळे घडणाऱ्या गुन्ह्य़ांचादेखील आहे. कारण याच कारणामुळे पोलिसांना कोणतीही व्यक्ती ही बंदूक धारण करणारी संभाव्य हल्लेखोर आहे, असे गृहीत धरून त्याला ठार मारण्याचे समर्थन करता येते. या घटनांचा एकत्र विचार केल्यानंतर आपल्यासमोर येते ते अमेरिकेतील मुक्तपणे बंदूक धारण करण्याबाबतचे धक्कादायक कायदे आणि त्याबाबतचे वांशिक सामाजिक-राजकीय वास्तव. अमेरिकेतील ५० राज्यांमध्ये याबाबत काही प्रमाणात वेगवेगळे कायदे असले, तरी संपूर्ण अमेरिकेत कोणत्याही सज्ञान व्यक्तीला साध्या पिस्तुलापासून ते एके ४७ सारख्या युद्धात वापरल्या जाणाऱ्या बंदुकांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कितीही बंदुका, रिव्हॉल्व्हर्स कायदेशीररीत्या बाळगता येतात. जगात बंदुका बाळगणाऱ्यांचे लोकसंख्येतील प्रमाण सर्वात जास्त अमेरिकेत आहे. अशा शस्त्रांचा वापर करून मानसिक विकृती म्हणून किंवा राजकीय वैचारिक प्रेरणेतून शाळा, क्लब्ज्, सार्वजनिक ठिकाणे, राहती घरे अशा ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून हजारो लोकांना मारण्याच्या घटना अमेरिकेत सरसकट घडतच आलेल्या आहेत. त्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. व्यक्तिगत जीवनातदेखील सामान्य शत्रुत्वासाठी, सूड म्हणून, रागातून, संशयावरून असे खून करणे ही बाब इतर देशांशी तुलना करता प्रचंड जास्त आहे. दक्षिण अमेरिका आणि फिलिपाइन्ससारख्या काही मोजक्या देशांचा अपवाद सोडला तर जगात बंदुकीमुळे घडणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अमेरिकेत सर्वात जास्त आहे.

अल्पमतात असणाऱ्यांना घटनात्मक संरक्षण

या विरोधात अमेरिकेत चळवळी होतात. पण हा आमचा घटनात्मक हक्क आहे, या नावाखाली नॅशनल रायफल असोसिएशन आणि पुराणमतवादी रिपब्लिकन्स यांची मजबूत फळी या विरोधात कोणताही कायदा, घटनादुरुस्ती होऊच देत नाही. तसे त्यांना शक्य होते कारण सिनेट हे अतिशय विपरीत पद्धतीने निवडले जाणारे सभागृह हेच आहे. सर्व राज्यांतून प्रत्येकी दोन प्रतिनिधी सिनेट सभागृहासाठी निवडले जातात. अमेरिकेतील कमी लोकसंख्या असलेली राज्ये ही तुलनेने अधिक वंशवादी आणि श्वेतवर्णीय प्रभावाखालील पुराणमतवादी विचारांची आहेत. त्यामुळे अन्य राज्यांतील बहुसंख्य जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधींच्या तुलनेत या पुराणमतवादी राज्यांतील प्रतिनिधींना अवाजवी राजकीय अधिकार प्राप्त होतात. परिणामी २० टक्केलोकसंख्येचे प्रतिनिधी हे, ६० टक्केलोकसंख्येच्या प्रतिनिधींपेक्षा वरचढ होऊन कोणतीही घटना दुरुस्ती थांबवू शकतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या बंदूक धारण करण्याविरोधात सक्षम कायदेशीर तरतुदी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यास यश आले नाही. कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे नेते या बंदूक उत्पादकांच्या लॉबीचे समर्थक आहेत. परिणामी अमेरिकेत बंदूक घेऊन कोणालाही सामान्य कारणासाठी ठार मारणे सहज शक्य होते. तीच संस्कृती पोलिसांमध्ये आहे. त्यात कृष्णवर्णीयांच्या विरोधातील त्यांच्या पूर्वग्रहाची भर पडून असे निरपराधांच्या हत्यांचे भयानक प्रकार सातत्याने घडतच जातात.