माझं नाव.. पण नको. कारण माझं नाव नक्की काय सांगावं हे मलाच ठरवता येत नाहीये. पण माझ्या भावाचं नाव ‘त्रिभुवन विनायक जोशी’. खरं तर माझाही त्या नावावर तेवढाच हक्क आहे. - म्हणजे होता असं फार फार तर म्हणता येईल. पण लोक हल्ली त्यालाच ‘त्रिभुवन विनायक जोशी’ म्हणून ओळखतात. खरं म्हणजे मीच मला हट्टानं त्रिभुवन म्हणवून घेतो. आणि लोकांनाही या गोष्टीला नाही म्हणता येत नाही, अशी गोची झालेली आहे. विनायक त्रिंबक जोशी हे त्रिभुवनचे वडील. सरस्वती विनायक जोशी ही आई. वडील एका शाळेत विज्ञानाचे शिक्षक आहेत. दोघांचा संसार सुखाचा चालला होता. पण संतती नव्हती त्यामुळे दोघेही दु:खी होते. साधी सरळसोट कहाणी आहे. शक्य होते तेवढे सर्व उपचार वडिलांनी केले. व्रतवैकल्यादी प्रकार आई करीत राहिली. पण ना व्रतवैकल्यांना देव पावला; ना वैद्यकीय उपचारांनी मदत केली. शिक्षक म्हणून वडिलांची वैद्यकीय उपचारांवर श्रद्धा, तर धार्मिक प्रवृत्ती म्हणून आई देवाला साकडं घालत होती. आईची श्रद्धा लवकर फळाला आली, म्हणजे योग्य असे डॉक्टर वडिलांच्या परिचयाचे झाले. डॉक्टर याज्ञिक हे एक संशोधक होते. त्यांचा गुणसूत्रांचा अभ्यास व संशोधन जगमान्यता पावलं होतं. एका बक्षीस समारंभाच्या वेळी शाळेने त्यांना बोलाविलं होतं. तेव्हा त्यांचा परिचय झाला. बोलता बोलता वडिलांची व्यथा डॉक्टरांच्या लक्षात आली आणि त्यांनी वडिलांना सर्व रिपोर्टसह प्रयोगशाळेत भेटायला सांगितलं. सुरुवातीला वडील एकटेच गेले होते. सर्व रिपोर्टस् पाहिल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की दोघांतही दोष नाहीये, फक्त योग्य वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. नंतर त्यांनी दोघांना बोलावून घेतलं व खात्री करून घेतली. कृत्रिम बीजारोपण पद्धतीने त्यांना संतती होणं शक्य होतं; पण उपचार खर्चीक आणि विनायकरावांच्या आवाक्याबाहेरचे होते. हे वैज्ञानिक स्वत:ला समजतात तरी कोण? त्यांचे प्रयोग त्यांनी कुत्र्यामांजरांपुरतेच मर्यादित ठेवावेत. परमेश्वर माणसांवर प्रयोग करतो ते खूप आहे. त्या भानगडीत देवानेच किती प्रयोग करून ठेवले आहेत! काळे-गोरे-पिवळे, नकटे. काही गरज होती का इतके प्रयोग करायची? पण केले तरी त्यानं एक काळजी घेतली होती की त्यांना एकमेकांपासून दूर ठेवलं होतं. हे दूरदूरचे लोक आपली बुद्धी चालवून लांबलांबचे प्रयत्न करून एकत्र आले. आल्यावर गुण्यागोिवदानं न राहता भांडणं, एकमेकांचा द्वेष करत राहिले. आता विनायक - सरस्वती या जोडप्याला मूल न व्हावं ही जर देवाची इच्छा होती; तर या डॉक्टर याज्ञिकला मध्ये अडमडायचं कारण काय? असं सरस्वतीबाईचं म्हणणं. तर मूल व्हावं अशी देवाची इच्छा होती म्हणूनच डॉक्टरांची भेट झाली, असा विनायकरावांचा युक्तिवाद होता. थोडक्यात डॉ. याज्ञिकांनी सर्व सूत्रं हातात घेतली आणि या जोडप्याला मूल द्यायचा चंग बांधला. त्यासाठी होणारा खर्च आपल्या आवाक्याबाहेरचा आहे असं सांगूनही काही उपयोग झाला नाही. कारण सर्व खर्च डॉक्टरांनी स्वत:च करायचा ठरविलं. डॉक्टरांचं नाव व कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्यांच्यातल्या संशोधकाने उचल खाल्ली. त्यांना पशाचं पाठबळही होतं. डॉक्टरांना काही संशोधनात्मक प्रयोग करायचे होते. त्यापासून कोणताच धोका नव्हता. फक्त त्या जोडप्याच्या संमतीची आणि सहकार्याची आवश्यकता होती. विनायकरावांना एका पशाचासुद्धा खर्च येणार नव्हता. भवती न भवती होऊन विनायकरावांनी संमती दिली. कारण ते हाडाचे शिक्षक होते. डॉ. कोटणीसांचा इतिहास त्यांना माहीत होता. डॉक्टर कोटणीसांनी तर संशोधनासाठी आपलं आयुष्यच पणाला लावलं होतं. पण आता डॉ. याज्ञिकांची सुसज्ज प्रयोगशाळा त्यांच्या साहाय्याला होती. प्रयोगात अपयशाची शक्यता होती, धोक्याची नव्हती. म्हणून प्रयोगपूर्व तपासणी व प्रक्रिया यासाठी सरस्वतीबाई हॉस्पिटलवजा प्रयोगशाळेत दाखल झाल्या. जगातील काही प्रसिद्ध व्यक्तींचे मेंदू तपासणीसाठी जपून ठेवलेले आहेत. त्यांपकी काही मेंदूंचे नमुने विविध प्रयोगशाळांत पाठविले आहेत. त्यांच्या तपासणीवरून मेंदूचा आकार, वजन व बुद्धिमत्ता यांचा काही संबंध प्रस्थापित होतो का? - यावर संशोधन चालू आहे. डॉ. याज्ञिकांकडेही असे काही नमुने आले होते आणि त्यावरून त्यांना काही दिशा सापडली होती. रसायनशात्राने अणूरेणूंच्या विविध रचनांनी असंख्य पदार्थ निर्माण होत होते. तर जनुकांच्या पुनर्बाधणीनुसार विविध गुणधर्माचे सजीव तयार होत होते. डॉक्टरांनी जनुकांची अशी रचना शोधली होती की त्यांचा स्मरणशक्तीशी संबंध असावा असं वाटत होतं. काही प्राण्यांची मानसिक पातळी माणसांपेक्षा खूपच कमी असते. अंतिम प्रयोग माणसांवरच करावयास हवा होता. डॉक्टरांना यशाची खात्री होती. फक्त प्रयोग करून घ्यायला तयार असणारं जोडपंच हवं होतं. विनायकरावांनी सहकार्य देऊ केलं. सरस्वतीबाई तशा जुन्या वळणाच्या, नवऱ्याच्या मताविरुद्ध न जाणाऱ्या होत्या. त्यांनी आपले उपाय चालूच ठेवले होते. त्या गुरुवार करू लागल्या. दत्तगुरूवर त्यांची भक्ती होती. डॉक्टरांनी किंवा विनायकरावांनी त्यांना आडकाठी केली नाही. निसर्ग त्याची गुपितं सहजासहजी माणसाच्या हाती लागू देत नाही. त्याने असंख्य प्रयोग करूनच चुका करतच ही सृष्टी निर्माण केली ना? चुका केल्याशिवाय प्रावीण्य मिळत नसते. जाऊ दे. हे विषयांतर झालं. मी सांगत होतो त्रिभुवनच्या जन्माचा इतिहास. डॉ. याज्ञिकांनी सरस्वतीबाईंच्या बीजकोषांतून काही बीजांडं काढून घेतली आणि त्यावर प्रक्रिया केल्या. जी फलित बीजांडं इष्ट गुणधर्म दाखवत होती, त्यांचं रोपण सरस्वतीबाईच्या गर्भाशयात केले. मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्गाला लहर आली आणि डॉक्टरांना जुळं असल्याची शंका आली, फक्त शंकाच. कारण जुळं असतं तर दोन हृदयांची स्पंदनं जाणवायला हवी होती. का एक गर्भ मृत झाला होता? तसं असतं तर गर्भपात संभव होता, की आतल्या आत तो जिरून गेला? काहीच कळत नव्हतं. गर्भाची आणखी थोडी वाढ झाल्यावर लक्षात आलं की, गर्भ एकच आहे; पण त्याला डोकी दोन आहेत. ‘सरस्वतीबाईंना काय सांगायचं? असं राक्षसी मूल वाढवायचं का?’ देवावरची श्रद्धा काय बळ देते पाहा. बाईंनी स्पष्ट सांगितलं, ‘‘मी दत्तात्रयांची उपासना करते आहे. त्यांना तर तीन शिरं आहेत. याला जर दोन शिरं असतील तर बिघडलं काय? हा त्यांचाच प्रसाद आहे.’’ डॉक्टरांना हा निर्णय धक्कादायक होता, तसाच फायदेशीरही होता. परत अशी संधी मिळणार नव्हती. गर्भाची वाढ सुयोग्यपणे होत होती, आणि एके दिवशी सरस्वतीबाईंनी त्रिभुवनला जन्म दिला. ‘दोन डोक्यांचं मूल’ बहुतेक वर्तमानपत्रात ही बातमी आली होती. काहींनी त्या बालकाचे फोटोपण छापले होते. दुसऱ्याच दिवशी ती बातमी लोकांच्या विस्मृतीतही गेली. दोन डोक्यांच्या त्रिभुवनची काळजी होती डॉक्टर याज्ञिकांना आणि त्याच्या पालकांना. हॉस्पिटलमधील नोकरवर्गाला दोन दिवस कुतूहल वाटलं. मूल जास्त दिवस जगणार नाही असं वाटलं होतं. पण डॉक्टरांचे अथक प्रयत्न चालू होते. सरस्वतीबाईंनी अनसूयेच्या मायेने त्या बालकाला स्तनपान दिलं होतं. मूल व्यवस्थित वाढत होतं. सर्व तपासण्या झाल्यावर डॉक्टरांच्या लक्षात आलं की धड एकच असलं तरी डोकी म्हणजे मेंदूपण दोन आहेत. दोनही मेंदू एकाच मज्जारज्जूकडे संदेश पाठवत आहेत. पण ते मेंदू स्वतंत्रपणे काम करत आहेत. त्यांचा एकमेकांशी समन्वय नाही. निर्णयाची खात्री करण्यासाठी त्यांनी आळीपाळीने मेंदू झोपवून पाहिला. तेव्हा त्यांची खात्री पटली की दोन्ही मेंदू पूर्णपणे १०० टक्के कार्यक्षम होते. स्मरणशक्ती वाढवण्याचा, ज्ञान साठवण्याचा हापण एक मार्ग होता. आपण नाही का छोटे छोटे संगणक एकमेकांना संलग्न करून महासंगणक बनवत? निसर्गाने तोच प्रकार केला होता. कदाचित सरस्वतीबाईंच्या ध्यानीमनी तीन शिरांची दत्तमूर्ती सतत असल्याचाही हा परिणाम असू शकतो. दोन्ही शिरं बुद्धिमान मेंदू धारण करून होती. प्रश्न होता तो त्यांच्या सुसूत्रीकरणाचा. डॉक्टर याज्ञिकांना या पर्यायाची कल्पना नव्हती आणि आता त्याचा उपयोग नव्हता. बाळाचं बारसं झालं. त्रिभुवन असं नाव ठेवलं. बाळ वाढत होता. दोन्ही मुखांतून एकाच पोटात अन्न ढकलत होता. दोन हातांवर, दोन पायांवर दोन मेंदू सत्ता गाजवत होते. त्या लहानग्या शरीराला दोन डोक्यांचा भार सांभाळणं कठीण जाई. त्यामुळे उपडं वळणं, रांगणं - सगळ्यालाच उशीर होत होता. बसणं, उभं राहणं तर दूरच राहिलं. डॉक्टरांच्या मते सवयीने हळूहळू दोन डोक्यांचं ओझं सांभाळणं शक्य झालं असतं पण जास्त श्रम झाले की दोन्ही मेंदूंकडे जाणाऱ्या रक्तपुरवठय़ावर परिणाम होई. ते धोक्याचं होतं. एक मेंदू झोपला तरी दुसरा जागा राही. त्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नसे. जोपर्यंत त्रिभुवन पाळण्यात होता, तोपर्यंत ठीक होतं; पण मोठा झाल्यावर खरा त्रास सुरू झाला. माणसाचं मन मोठं गहन आहे. त्याला खरं समाधान कशात आहे तेच कळत नाही. एखादा पदार्थ जिभेला चांगला लागला म्हणून खात राहतो. पोटाने नाही म्हटले तरी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खातो. त्रिभुवनचे तसेच झाले होते. पोट भरले तरी दोन्ही जिभांचे लाड पुरवणे अशक्यच होते. एखादे खेळणे हवे असेल तर रांगत जाऊन घेणे शक्य होते, पण हातातली वस्तू दुसऱ्याची आहे असे वाटत राही. असंतुष्ट राहणं हीच माणसाच्या मनाची घडण असते का? डॉक्टर, तुमच्या विज्ञानात यावर उपाय नाही का? डॉक्टर याज्ञिकांच्या माहितीतील सर्व तज्ज्ञांनी त्रिभुवनला तपासले होते. त्यात अस्थी व मज्जासंस्थेचे तज्ज्ञ. मेंदूचे तज्ज्ञ सर्व जण होते; पण त्यांच्याकडे त्रिभुवनच्या स्वभावाला औषध नव्हते. ते तज्ज्ञ त्याला प्रयोगाचे साधन समजत होते. त्यांच्या लेखी उंदीर, माकडे तसाच त्रिभुवन हाही एक गिनिपिग होता. सुरुवातीला जरी तो फार काळ जगण्याची आशा नव्हती, तरी सर्वसाधारण माणसाचे पूर्ण आयुष्य जगेल अशी सर्वाची खात्री पटली होती. खरी अडचण तीच होती. दोन डोकी असलेल्या मुलाला शाळेत किंवा समाजात स्थान नव्हते - तो कितीही बुद्धिमान असला तरी नव्हते. वैज्ञानिक झाले तरी त्यांना वास्तवाचे भान सोडून चालत नाही. म्हणून त्यांनी त्रिभुवनच्या भवितव्याचा विचार करून एक कठोर व अप्रिय असा निर्णय घेतला. ‘‘त्रिभुवनचं एक शिर धडावेगळं करायचं.’’ सरस्वतीबाईंना आणि विनायकरावांना हा निर्णय समजावून सांगितला. त्रिभुवनच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने हाच पर्याय शिल्लक होता. प्रश्न होता कोणते शिर धडावेगळे करायचे? त्या दृष्टीने परत एकदा सर्व चाचण्या झाल्या. अन्न व रक्ताभिसरण मानेपासून खालच्या भागात सामाईक होते. फक्त मानेपासूनच्या वरच्या भागात वेगवेगळे होते. शस्त्रक्रिया त्या जोडावरच करायला हवी होती. ते शक्य होते. मग कोणतेही शिर धडावेगळे झाले तरी फरक पडला नसता. डॉक्टरांना रस होता, तो त्रिभुवनच्या सुखाने जगण्यात. दुसऱ्या शिराशी त्यांना काही घेणं-देणं नव्हतं. एकदा का ते धडावेगळे झाले की ते केराच्या डब्यातच जाणार होते. फार तर फॉम्रेल्डिहाइडमध्ये घालून जपून ठेवले असते- आपल्या प्रयोगाची आठवण म्हणून किंवा भावी वैज्ञानिकांना संशोधनासाठी म्हणून. फरक पडणार होता तो सरस्वतीबाईंना. दोन्ही मुखे त्यांना तेवढीच प्रिय होती. दोघांनाही त्यांनी स्तनपान दिले होते. हाताने भरवले होते. त्यांचे पापे घेतले होते. यापुढे त्यापकी एक शिर नाहीसे होणार होते ते काही जादाचे बोट किंवा अंतर्भागात असलेला अपेंडिक्ससारखा अनावश्यक अवयव नव्हता; तर चालतेबोलते शिर होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची अपरिहार्यता त्यांना पटवली होती. त्यावाचून दुसरा मार्ग नाही हे त्यांनाही पटत होते पण एक शंका मनाला भेडसावत होती. शस्त्रक्रियेत मज्जारज्जूला धक्का लागला तर? त्रिभुवन आयुष्यभर पंगू होऊन राहिला असता; पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली असती तर सर्वसामान्य मुलाप्रमाणे आयुष्य जगला असता, पण आता त्रिभुवन त्यांचा राहिला नव्हता. तो विज्ञानाचा बळी झाला होता. सरस्वतीबाईंनी स्वत:च्या मनाची समजूत काढली. ‘चांगुणेने नाही का आपल्या मुलाचे शिर उखळात घालून कांडले. तिला चिलया बाळ- माझा त्रिभुवन. दत्तात्रेयाच्या मनात असेल ते होईल.’ या वैज्ञानिकांची डोकी कुठे आणि कशी चालतील ते सांगता येत नाही. प्रत्येक अडचणीतून ते मार्ग काढत असतात. त्या डॉक्टरांपकी एकाच्या डोक्यातून भन्नाट कल्पना निघाली की एवीतेवी एक शिर दूर करणारच आहोत; तर त्याचे दुसऱ्या धडावर रोपण करून का पाहू नये? खरे वैज्ञानिक कुठलीही, कितीही मूर्खपणाची कल्पना धुडकावून लावत नाहीत. प्रश्न होता तो ‘दाता धड (शरीर)’ मिळवायचा. तेच काम कठीण होते. शत्रक्रियेची कोणतीच घाई नव्हती. रोपणायोग्य शरीर शोधणे सुरू झाले. नुसते शरीर मिळून उपयोग नव्हता. त्याचा रक्तगट व शरीरातील इतर संस्था एकमेकांना पूरक असण्याची गरज होती. पण दुसऱ्या शिराचे नशीब थोर होते. त्यांना पाहिजे तसा एक देह उपलब्ध झाला. अपघाताची केस होती. एक मुलगा गच्चीवरून पडला होता. त्याच्या डोक्याला मार लागून मेंदूला इजा झाली होती. जगण्याची आशा नव्हती. त्याला डॉक्टर याज्ञिकांच्या प्रयोगशाळेत आणून ठेवले होते. तो अतिदक्षता विभागात २४ तास राहणार होता. शरीर गोठवून ठेवण्याची व्यवस्था केली होती. जगातील अभूतपूर्व असे पहिलेवहिले ‘शिररोपण’ होणार होते. गणेश, तुंबरू या व्यक्तिरेखा फक्त पुराणातच राहणार नव्हत्या; तर प्रत्यक्ष कलियुगात अवतरणार होत्या. आधुनिक विज्ञान त्या मानाने नशीबवान होते. त्यांच्याकडे मानवी धड आणि मानवाचे शिर उपलब्ध होते. वेळ मर्यादित होता. त्रिभुवनचे शिर मुदलियारच्या धडाने स्वीकारावे म्हणून पूर्वतयारी जोरात चालू होती. ऑपरेशन १०० टक्के सफल झाले, याचा जिताजागता पुरावा म्हणजे मी ‘त्रिभुवन मुदलियार’. माझे शिर त्रिभुवनचे आहे आणि धड मुदलियारचे म्हणून मी स्वत:ला त्रिभुवन मुदलियार म्हणवून घेतो. मी आता मुदलियार कुटुंबीयांकडेच राहतो, कारण जोशी कुटुंबीयांशी आता माझा काहीही संबंध नाही. ज्या वेळी माझे शिर त्रिभुवन जोशीच्या धडापासून वेगळे झाले, तेव्हाच माझा मृत्यू झाला होता. ऐन वेळी जर मुदलियारचे शिर मिळाले नसते; तर हे डोके प्रयोगशाळेतील बाटलीत ठेवलेले दिसले असते. त्या बाटलीवर मात्र ‘त्रिभुवन जोशीचे (दोन डोक्यांपकी एक) डोकं अशी चिठ्ठी असती. थोडक्यात म्हणजे जोशी कुटुंबीयांशी माझा संबंध त्याच क्षणी संपला होता. मग मी आता मुदलियारांकडे राहतो त्यात गर काय आहे? पण माणसाला जुने बंध-आठवणी सहजासहजी सोडवत नाहीत हेच खरे. म्हणून मी स्वत:ला ‘त्रिभुवन मुदलियार’ म्हणवून घेतो. खरं म्हणजे मला एक धड आणि नवीन आयुष्य मिळाले. त्रिभुवन जोशी सर्वसामान्य माणसासारखा झाला. डॉ.याज्ञिकांना कीर्ती मिळाली. माझी नवी आई (?), मुदलियारांना त्यांचा मुलगा परत मिळाला. पण माझी जन्मदात्री आई- सरस्वतीबाई जोशी- तिचं काय? (खरं म्हणजे माझी जन्मदात्री किंवा जन्मदाता कोण हाच मला प्रश्न पडतो. सरस्वतीबाई, मुदलियार का डॉ.याज्ञिक?) पुराणातल्या चिलया बाळासारखे आपल्या मुलाचे डोके धडावेगळे होताना तिला काय वाटले असेल? पण आता त्याची आठवण कोणालाच नसेल; कारण विज्ञानाचे आश्चर्य! मी, ‘त्रिभुवन मुदलियार’ आहे, त्रिभुवन जोशी नाही; आणि मुदलियारांच्या घरी राहतो. कधी कधी मनात विचार येतो की, विज्ञानाने निसर्गावर खरोखरच विजय मिळवला आहे का? कारण जनुकात बदल करून डॉ. याज्ञिकांनी मला- आम्हा त्रिभुवनांना- जन्माला घातले, ती जनुके आमच्या दोघांच्या शरीरात आहेत. भविष्यात त्या जनुकांनी उचल खाल्ली तर? त्या सगळय़ाच शिरांना काही मुदलियार उपलब्ध होणार नाहीत. शशिकांत काळे - response.lokprabha@expressindia.com