News Flash

संमेलन : जागर दुर्गसंवर्धनाचा

सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकणारे डोंगर भटके नुकतेच मुंबईत मुलुंड येथे एकत्र आले होते ते चौदाव्या गिरिमित्र संमेलनासाठी. ‘दुर्गसंवर्धन’ या विषयाला वाहिलेल्या या वेळच्या संमेलनाचा वृत्तान्त-

| July 24, 2015 01:21 am

lp27सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकणारे डोंगर भटके नुकतेच मुंबईत मुलुंड येथे एकत्र आले होते ते चौदाव्या गिरिमित्र संमेलनासाठी. ‘दुर्गसंवर्धन’ या विषयाला वाहिलेल्या या वेळच्या संमेलनाचा वृत्तान्त-

जुलै ११ आणि १२, २०१५ या दोन दिवसांत महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे चौदावे गिरिमित्र संमेलन संपन्न झाले. महाराष्ट्रात वर्षभर वेगवेगळी संमेलने भरत असतात. मग या संमेलनाचे वैशिष्टय़ काय, असा प्रश्न वाचकांच्या मनात नक्कीच डोकावला असेल. वर्षभर सह्यद्री, हिमालयाच्या डोंगरदऱ्यांत भटकंती करत नवनवीन शिखरे काबीज करणाऱ्या डोंगर-भटक्यांना एकत्र आणणं ही साधी गोष्ट नव्हती. चौदा वर्षांपूर्वी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड यांनी डोंगर-भटक्यांसाठी डोंगर-भटक्यांच्या अनेक संस्थांच्या माध्यमातून गिरिमित्र संमेलन भरवायला सुरुवात केली. सुरुवातीला उत्सवी स्वरूप असलेल्या संमेलनात जसजसा डोंगर-भटक्यांचा सहभाग वाढायला लागला, तसे संमेलनाचे स्वरूप बदलायला लागले. देश-विदेशातले गिर्यारोहक, तज्ज्ञ मार्गदर्शक, गिर्यारोहण मोहिमांवरच्या फिल्म्स, अभ्यासपूर्ण सादरीकरण अशा भरगच्च कार्यक्रमाने गिरिमित्र संमेलन साजरे व्हायला लागले. दरवर्षी गिरिमित्रांशी निगडित विषय घेऊन त्या विषयातील तज्ज्ञांना बोलावून गिरिमित्रांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी संमेलनाच्या निमित्ताने मिळायला लागली.
या वर्षीच्या गिरिमित्र संमेलनाचा विषय होता ‘दुर्गसंवर्धन’. महाराष्ट्रातल्या डोंगर-भटक्यांचे पहिले प्रेम म्हणजे सह्याद्रीतले किल्ले. सर्वाच्याच भटकंतीचा श्रीगणेशा या किल्ल्यांच्या साक्षीने झालेला असतो. काळाच्या ओघात या किल्ल्यांची होणारी पडझड हा गिरिमित्रांच्या चिंतेचा विषय असतो. सरकारच्या किल्ल्यांकडे पाहण्याच्या अनास्थेमुळे आपणच एक तरी किल्ला पूर्वीसारखा उभा करावा या भावनेने झपाटलेले अनेक जण गेली अनेक वर्षे किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम स्वत: किंवा संस्थेमार्फत करत आहेत. निधीची कमतरता, तज्ज्ञ लोकांची वानवा यामुळे प्रत्येक जण आपल्याकडे असलेल्या तुटपुंजा ज्ञानाच्या आधारे विविध किल्ल्यांवर संवर्धनाचे काम करत आहेत. या कामामागील हेतू कितीही प्रामाणिक असला तरीही त्या कामामुळे अजाणतेपणी किल्ल्याचे होणारे कायमस्वरुपी नुकसान, तोडले जाणारे पुरातत्त्वविषयक कायदे आणि त्यातून उद्भवणारे वाद, हे प्रामाणिकपणे काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची व पुरातत्त्व खाते या दोघांची डोकेदुखी ठरले होते. त्यामुळे पुरातत्त्व विभाग आणि दुर्गसंवर्धक यांच्यात समन्वय साधण्यासाठी या वर्षी ‘दुर्गसंवर्धन’ हा विषय घेण्यात आला. पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक डॉ. जामखेडकर या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक डॉ. गोरक्षनाथ देगलुरकर होते.
गिरिमित्र संमेलनाच्या पहिल्या दिवशी राज्याच्या पुरातत्त्व व संग्रहालय संचालनालयाचे साहाय्यक पुरातत्त्ववेत्ता मयूरेश ठाकरे यांनी पुरातत्त्वविषयक कायदे, संरक्षित स्मारके आणि ठिकाणे यांबद्दल माहिती दिली. संवर्धनाचे काम करताना कोणत्या गोष्टी करू नयेत आणि केल्याच तर कशा प्रकारे कराव्यात याबद्दल त्यांनी माहिती दिली. वसई आणि अर्नाळा किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाने केलेल्या संवर्धनाच्या स्लाइड्स दाखवून शास्त्रोक्तपणे संवर्धन करताना येणाऱ्या अडचणी, लागणारा वेळ आणि तज्ञांची आवश्यकता याबद्दल माहिती दिली. कोणताही किल्ला जसा बांधला तसाच्या तसा उभा करणे आज शक्य नाही, असे सांगून त्यांनी स्वप्नाळू संवर्धकांना वास्तवात आणले. हाच धागा पकडून पहिल्या सत्रातील दुसरे वक्ते डॉ. सचिन जोशी यांनी किल्ल्यांच्या नकाशांचे संवर्धनाच्या कामी असलेले महत्त्व सांगितले. संवर्धनाचे काम सुरू करण्यापूर्वी त्याच्या नोंदी घेणे आवश्यक आहे यावर भर दिला. त्यासाठी ज्या वास्तूचे किंवा किल्ल्याच्या भागाचे आपण संवर्धन करणार आहोत त्याचा इतिहास जाणून घ्यावा. ती वास्तू कोणती आहे हे निश्चित करावे. या बाबतीत कसे घोळ होतात हे उदाहरणासहित पटवून देताना त्यांनी बहादूरगडावरील स्लाइड दाखवल्या. त्यावरील वास्तू ‘महाल’ म्हणून ओळखली जाते, पण प्रत्यक्षात तो ‘हमामखाना’ आहे. तज्ज्ञांची मदत न घेता संवर्धन केल्यास सुरुवातीपासूनच अशा अनेक गफलती होऊ शकतात हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. निसर्ग आणि मानवाकडून होणारा किल्ल्यांचा ऱ्हास आपण रोखू शकत नाही. पण आज अस्तित्वात असलेल्या किल्ल्यांचे, वास्तूंचे जर आपण डॉक्युमेंटेशन केले तर भविष्यात आपल्याला ती वास्तू, तो किल्ला जसा होता तसा उभारता येईल. किल्ल्याचे आणि त्यावरील वास्तूंचे डॉक्युमेंटेशन कशा प्रकारे करता येईल, त्यासाठी कुठली आधुनिक साधने, सॉफ्टवेअर्स वापरता येतील, याबद्दल त्यांनी माहिती दिली. संवर्धनाचा एक वेगळा आयाम त्यांनी संवर्धकांपुढे मांडला.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात अध्यक्षीय भाषण करताना डॉ. जामखेडकर सरांनी पुरातत्त्व खात्यात काम करताना आलेले अनुभव, अडचणी आणि त्यावर मात करून त्यांनी केलेली कामे याबाबत माहिती दिली. पुरातत्त्व खात्याबद्दल सरकारचा दृष्टिकोन कसा आहे हे सांगताना सरकारने पुरातत्त्व खात्याचे संचालक हे पद गेली १८ वर्षे रिक्त ठेवले असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेले हे उदाहरण आपल्या राज्यातील पुरातत्त्वदृष्टय़ा महत्त्वाच्या वास्तूंची दुर्दशा का आहे याबद्दल खूप काही सांगून जाते. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाला शिक्षण केंद्राचे साहाय्यक प्राध्यापक कुरुष दलाल यांनी किल्ल्यांचे प्रकार, त्यांचे भाग यांची माहिती देऊन किल्ल्यावर गेल्यावर काय करावे, काय करू नये याबद्दल माहिती दिली. त्यानंतर दुर्गसंवर्धन संस्था संवर्धन करताना काय चुका करतात ते स्लाइड्सच्या आधाराने दाखवून दिले. किल्ल्यावर गेल्यावर पाण्याची आवश्यकता सर्वानाच असते. त्यामुळे अनेक संस्थांचा टाक्या साफ करण्याकडे कल असतो. वर्षांनुवर्षे पाण्याच्या टाकीत साठलेल्या गाळात अनेक थर असतात. त्या थरात असलेल्या वस्तू, त्या काळाचा इतिहास सांगत असतात. त्यांची शास्त्रोक्तपणे सफाई केल्यास इतिहासातले अनेक निखळलेले दुवे मिळू शकतात. पण उत्साहाच्या भरात केलेल्या साफसफाईमुळे पुरातत्त्व अभ्यासासाठी आवश्यक असलेले हे दुवे कायमचे नष्ट होतात. संवर्धकांचा दृष्टिकोन कसा असावा याबद्दल हे उदाहरण बरेच काही सांगून गेले.
डेक्कन कॉलेजचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. अभिजित दांडेकर यांनी पुरातत्त्व खात्याकडून उत्खनन कसे केले जाते याबद्दल माहिती दिली. उत्खननात सापडलेल्या वस्तूंवरून त्या काळातील शहरे, बाजारपेठा, व्यापारी मार्ग, व्यापार यांचा परस्परसंबंध कसा लावता येतो हे त्यांनी दाखवून दिले. ‘लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परब यांनी आपल्या दृक्श्राव्य सादरीकरणात त्यांचा एक ट्रेकर ते पुरातत्त्व अभ्यासक हा प्रवास कसा झाला ते सांगितले. पुरातत्त्व विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांच्या भटकंतीत त्यांनी नेहमी पाहिलेल्या गोष्टींकडे पाहण्याची त्यांची दृष्टी कशी बदलली त्याबाबत रंजक माहिती दिली. डोंगर-भटक्यांना डोळस भटकंती करायची असेल तर पुरातत्त्व विषयावरचा पूर्णवेळ किंवा अर्धवेळ कोर्स करणे आवश्यक असल्याचे ठासून सांगितले. महाराष्ट्र ही लेण्यांची खाण आहे. अजून अनेक लेणी प्रकाशात आलीच नाही आहेत. डोंगर-भटके जिथे पोहोचतात तिथे संशोधक पोहोचू शकत नाहीत. त्यासाठी गिरिमित्रांच्या साहाय्याने महाराष्ट्राभर पसरलेल्या लेण्यांच्या शास्त्रोक्त नोंदी करण्याचा उपक्रम हाती घेता येईल असे त्यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक डोंगर-भटक्याने आपल्याला दिसलेल्या लेण्यांची नोंद कशा प्रकारे करावी याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. गिरिमित्रांच्या सहभागातून अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या सर्व लेण्यांच्या नोंदी झाल्यास तो जागतिक पुरातत्त्व अभ्यासात एक मैलाच दगड ठरेल असेही त्यांनी सांगितले.
पुराणवास्तू संवर्धन व्यवस्थापक चेतन रायकर यांनी संवर्धन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय यावर आपले अनुभव मांडले. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडतो हे सरकारचे नेहमीचे रडगाणे असते. त्यामुळे कमीत कमी निधीत किल्ल्याची दुरुस्ती करण्यासाठी किल्ला आहे तसा बांधण्याचा अट्टहास सोडावा असे त्यांनी सांगितले. आपले म्हणणे स्पष्ट करताना त्यांनी किल्ल्याच्या भिंतींचे उदाहरण दिले. तोफेच्या माऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी त्या काळी १० ते १५ फुटांच्या भिंती बांधल्या जात. आता तशीच भिंत बनवली तर प्रचंड खर्च येईल. आताच्या काळात आपल्याला त्याच जाडीची भिंत बनवायची असली तरी तेवढी मजबूत बनवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे दोन भिंती बांधून त्यामध्ये किल्ल्यावरच जमा झालेली माती टाकून जुन्या भिंतीसारखीच दिसणारी भिंत बांधता येईल. अशा प्रकारे अभिनव योजना वापरून खर्च कमी करता येईल. याशिवाय किल्ल्यावर पर्यटनाच्या संधी निर्माण कराव्यात म्हणजे पर्यटक किल्ल्यांकडे आकर्षित होतील. त्यातून जमा होणाऱ्या निधीतून किल्ल्याचे संवर्धन करता येईल असा विचार त्यांनी मांडला. पण किती गिरिमित्र आणि याच्याशी सहमत असतील याबाबत शंकाच आहे.
शिवप्रेमींना नेहमी पडणारा प्रश्न रायगड किल्ल्याला जागतिक वारशाचा दर्जा मिळेल का? यावर पुराणवस्तू अभ्यासक तेजस्विनी आफळे यांनी जागतिक वारसा म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो? त्यासाठीच्या क्लिष्ट कागदपत्रांची पूर्तता याबद्दल माहिती दिली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे आव्हान आपणास पेलणार आहे का, याची जाणीव करून दिली.
गडकिल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र शासन यांचे मुख्य मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे यांनी अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण संमेलन भरवल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. समिती स्थापन झाल्यापासून गेल्या चार महिन्यांत शासनदरबारी फारशी हालचाल झाली नसल्याचे सांगितले. संवर्धनासंबंधीचे शिबीर महाराष्ट्राच्या चार भागांत घेण्याचा समितीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलनात किल्ले संवर्धनावर बराच ऊहापोह झाला. तज्ज्ञांची मते गिरिमित्रांनी ऐकली. पण वेळेच्या मर्यादेमुळे गिरिमित्रांना त्यांच्या मनातील प्रश्न, शंका विचारता आल्या नाहीत. किल्ल्यांवर संवर्धन करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी आणि पुरातत्त्वतज्ज्ञ यांच्यात एखादा परिसंवाद ठेवला असता तर ही उणीव भरून काढता आली असती.
संमेलनाचे सूप वाजले, पण फलित काय? या संमेलनाचे फलित म्हणजे पुरातत्त्व खाते, पुरातत्त्वतज्ज्ञ आणि गिरिमित्र यांच्यात संवाद सुरू झाला. याचाच परिपाक म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाला विभागाने सुरू केलेल्या पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासक्रमाला गिरिमित्रांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संमेलनातच १०० पेक्षा जास्त सदस्यांनी या अभ्यासक्रमासाठी नावनोंदणी केली. ‘दुर्गसंवर्धन- एक ध्यास, डोळस अभ्यास’ या बोधवाक्याला हे साजेसेच म्हणावे लागेल.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2015 1:21 am

Web Title: girimitra sammelan
टॅग : Sammelan,Trekking
Next Stories
1 कथा : खरी दुनियादारी
2 मद्यपुराण (प्रशस्ती ते बंदी)
3 तंदुरुस्तीसाठी…
Just Now!
X