13 July 2020

News Flash

दुसरी बाजू : देव आणि माणूस

रिचर्ड अ‍ॅटनबरोंचा गांधी सिनेमा असो की स्पीलबर्गचा लिंकन, माणसाकडे निखळ माणूस म्हणून बघण्याची ही दृष्टी आपल्याकडे का नाही?

| December 19, 2014 01:18 am

रिचर्ड अ‍ॅटनबरोंचा गांधी सिनेमा असो की स्पीलबर्गचा लिंकन, माणसाकडे निखळ माणूस म्हणून बघण्याची ही दृष्टी आपल्याकडे का नाही?

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मी घेत असलेल्या अभिनयाच्या कार्यशाळेत एका मुलाने ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातल्या संभाजीचं स्वगत सादर केलं. त्यात, संभाजी महाराज सईबाईंना, त्यांच्या लहानपणीच्या अत्यंत कटू आठवणी सांगतात. त्यांचे वडील शिवाजी महाराज आग्य्राहून सुटका करून घेतल्यावर मुलाला, म्हणजे बाल संभाजींना आग्य्रामध्ये एका सहकाऱ्यावर सोपवून निघतात, या आठवणींसंदर्भातलं संभाजीचं कानेटकरांनी लिहिलेलं हे खूप सुंदर स्वगत आहे. कार्यशाळेतल्या त्या मुलाने जे स्वगत सादर केलं त्यामध्ये, संभाजींचा कणा सतत ताठ; बालपणीच्या रडू आणणाऱ्या आठवणी सांगतानाही चाल भारदस्त; राजेशाही चिंता म्हणून कपाळाला फक्त एक आठी, शरीर सतत आखडलेलं, घरात अगदी शयनगृहातही पायात मोजडय़ा घातल्यासारखी चाल; दोन्ही हात सतत पाठीमागे एकमेकांना घट्ट धरलेले.
अशी कार्यशाळा, कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त, कार्यशाळा घेणाऱ्या माझ्यासारख्यालाच फार उपयोगी पडत असते. नवीन नवीन विद्यार्थी भेटतात; त्यांच्या नवीन समस्यांची ओळख होत असते; त्यांच्या काही नवीन अडचणी आपल्याला जास्त शिकवून जातात. मी माझ्या अभिनयाची रिफ्रेशमेंट म्हणून, माझी वैचारिक एक्सरसाइझ म्हणून या कार्यशाळांकडे पाहतो.
हा प्रसंग सादर करणारा मुलगा प्रसंग झाल्यावर अत्यंत अपेक्षेनं माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मला कशी आणि कुठून सुरुवात करावी हे काही बराच वेळ समजेना. कारण प्रश्न त्याच्या फक्त संभाजीचा नव्हता. प्रश्न एकूणच आपल्या समाजातल्या असंख्य समजांचा, कल्पनांचा, धारणांचा, गृहीतकांचा होता.
आपल्या देशात मागच्या चाळीस वर्षांत एकही उत्तम चरित्रपट बनला नाही आणि आता इथून पुढे बनण्याची शक्यताही वाटत नाही. हे विधान वाचून एकदम झटका बसल्यासारखं वाटलं ना? पण हे सत्य आपल्याला पचवण्याशिवाय पर्यायच नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित केतन मेहतांनी दिग्दíशत केलेला, परेश रावल यांनी साकारलेला ‘सरदार’ आणि आशुतोष गोवारीकरचा ‘जोधा अकबर’ आणि असाच एखाददुसरा अपवाद वगळता, चरित्रपट बनवण्याची दृष्टी आज या भारत देशात नाही हे आपण मान्य करायला हवं. ही नावंही भारतातल्या आजच्या आदर्श चरित्रपटांमध्ये नाइलाजानं घ्यावी लागतात; कारण हे सिनेमे ‘त्यातल्या त्यात बरे’ म्हणून. मी हल्लीचे सिनेमे असं मुद्दाम म्हणतोय. मागच्या पंचवीस-तीस वर्षांतले, यामध्ये ‘संत तुकाराम’, भालजी पेंढारकरांचा ‘शिवाजी’ या सिनेमांना धरत नाही. कारण एकतर त्या सिनेमांना साठ र्वष झाली. ते इतके अप्रतिम चरित्रपट होते की, त्या सिनेमांच्या तुलनेत चर्चा करायला गेलो तर आजचं कोणतंच नाव घेता येणार नाही. त्यानंतरच्या, विशेष करून, आजच्या काळातल्या चरित्रपटांबद्दल मला बोलायचंय.

lp45रिचर्ड अ‍ॅटनबरोंचे अनंत उपकार आहेत की, त्यांनी ‘गांधी’ हा सिनेमा बनवला. नाहीतर महात्मा गांधींची सिनेमातली परवड आपल्याच देशात आपल्याला पाहायला लागली असती. कारण आपल्या देशातल्या लोकांचा असा सिनेमा बनवणं हा घासच नाही. तुम्हाला नक्कीच असं वाटू शकतं की, एवढं का मी हे ठामपणाने म्हणतोय? काय कारणं आहेत त्यामागची?
आणि महात्मा गांधी हा विषय तर आपल्या देशात कला प्रांतासाठी जरा विशेषच निराळा विषय आहे. का? ते आपण सविस्तर पाहूच.
भारतात ‘देवत्व’ बहाल करणं, हा थेट द्वैत-अद्वैताच्या मुळाशीच जाणारा विषय. आपल्या देशात ‘माणसा’पेक्षा ‘देवा’ला नेहमीच मोठी किंमत. प्रत्यक्ष समोर असलेल्या ‘माणसा’ला आपण कायम नाकारतच आलेलो आहोत. एखाद्या ‘माणसा’चं मोठेपण सिद्ध करायचं असेल तर आपल्या देशात त्याला आधी ‘देव’ बनवण्याची रीत आहे. कोणतंही क्षेत्र घ्या, त्या त्या क्षेत्रातल्या अत्युच्च शिखरावर जाणाऱ्या माणसाला, ‘देव’ बनवल्याशिवाय आपल्याला त्याचं महत्त्वच वाटत नाही. ‘चुकतो तो माणूस’ हे अदृश्यपणे माणसाच्या आयुष्यावर गोंदवलेलं वाक्य आहे. पण माणूस चुकल्याशिवाय शिकतच नाही. चुकांशिवाय तो सुधारणार कसा? पण मग एकदा का त्याचा ‘देव’ झाला किंवा ‘केला गेला’ की, देवत्व बहाल करण्यापूर्वीच्या, त्यातल्या आधीच्या माणसाच्या चुका काढण्याची नंतर कुणाची िहमत होत नाही. एकदा देवत्व बहाल केल्यानंतर तर चुकांचा विषयच नसतो, कारण ‘देव’ कधीही चुकत नसतो आणि चुकला तरी त्याच्या चुका ‘माणसां’नी काढायच्या नसतात.
सचिन तेंडुलकरला भारतातल्या क्रिकेटप्रेमींनी देवासमान पुजला. सचिन उत्तमच प्लेयर होता. पण मग तो देव होता तर सगळ्या मॅचेस का नाही जिंकला तो? मागच्या पंधरा वर्षांत जिंकून दिलेल्या मॅचेसमध्ये राहुल द्रविडचं योगदान तेंडुलकरपेक्षा कधीही मोठं आहे. पण देवाची कामगिरीच निराळी. त्याला संघापेक्षा मोठा मानला आपल्या देशात, पराभवापेक्षाही. हे फक्त भारतातच घडू शकतं. सामान्यांच्या भावनेपेक्षा काहीच मोठं नाहीय आपल्या देशात. मग तेंडुलकरच्या एखाद्या चुकीबद्दल कुणी उल्लेख केलाच तर तेंडुलकरभक्त लगेच पिसाळलेच. कारण देवाबद्दल बोलायचं नाही काही. खरंतर त्याचं माणूस असणं हिरावून घेतलं आपण. मुक्तपणे चुका करण्याची संधीच दिली नाही त्याला. पण मानवी शरीर आहे. ते कधीतरी थकणारच. त्याला रिटायरमेंट तरी कशी चुकेल? प्रश्न त्याच्या कर्तृत्वाचा नाहीच. ते श्रेष्ठच आहे. पण एक नुसता ‘प्लेयर’ म्हणून त्याचं कर्तृत्व आम्हाला मान्य असत नाही. त्याचं कर्तृत्व श्रेष्ठ ठरवण्यासाठी सोप्पं म्हणजे, देवपण बहाल करून टाकतो आपण लगेच. आपली मजबुरी म्हणून.
दक्षिणेत तर नटनटय़ांची मंदिरंच उभी राहतात. खुशबूसारख्या नटीचंही मंदिर आहे तिकडे. मागे एकदा त्या खुशबूच्या विवाहापूर्वीच्या प्रेमप्रकरणाची काहीतरी बातमी फुटली. आता तिचं मंदिर म्हणजे ती ‘देवी’. मग ‘देवी’च्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टींवर तुम्ही कोण चर्चा करणार? म्हणून त्या देवीभक्तांनी आकाश- पाताळ एक केलं. तिला ‘देवी’ मानलंत, पण ती एक ‘स्त्री’ आहे ना वास्तवातली? एक ‘मानव’. मग त्या ‘मानवी देहा’चं काय करायचं तिने?
एखाद्या दैवतासमान पुजल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वावर सिनेमा काढताना त्यामुळेच आपल्याकडे एकांगी विचाराने गोष्ट लिहिली जाते. या व्यक्तिमत्त्वांच्या आरत्याच ओवाळल्या जातात. त्यांच्यातलं माणूसपण सिद्ध करणाऱ्या छोटय़ा छोटय़ा प्रसंगांना फारशी किंमतच राहात नाही. माणूस म्हटला की त्याच्याकडून चुका होणारच. त्याच्या आयुष्यातलं उणेपण कशात तरी उरतंच; त्याच्याही कमकुवत जागा असणार; त्याचा कधीतरी तोल ढळलेला असणार, त्याच्याकडून जगताना काही जाणते-अजाणतेपणे राग, लोभ, मद, मोह, मत्सराच्या खुणा राहिलेल्या असणार; प्रत्येक मनुष्यप्राण्याच्या काही सवयी, उणेपण, स्वभाववैशिष्टय़े, कुठल्या ना कुठल्या परिस्थितीतली हार, पराभव, अगतिकता, जगण्यातली खंत असते की नाही? आयुष्यात काहीच न केलेल्या माणसांचं ठीक आहे. पण कर्तृत्ववान माणसांच्या नशिबी आत्मसंघर्षांच्या बाबी येतात की नाही? पण अशा दैवतासमान वाटणाऱ्या लोकांच्या या खुणा, आठवणी, प्रसंग आपल्याकडे शिताफीनं पुसण्याचाच सपाटा. मग आयुष्यात ‘कधीही न चुकलेल्या’, सतत ‘आदर्श’ विचारांच्या, ‘कधीही न हरलेल्या’, सतत ‘चांगुलपणा’चाच ध्यास घेतलेल्या ‘स्वच्छ प्रतिमे’चाच पाठपुरावा करणाऱ्या गोष्टी रचून सांगितल्या तर त्या ‘खोटय़ा’ वाटतील नाहीतर काय? आणि म्हणूनच आपल्याकडच्या सिनेमांमध्ये या भूमिका तद्दन खोटय़ा, अतिरंजित आणि अवास्तव होऊन बसतात. माणूस आहे तर त्याच्यात दोषही असणारच. पण देवत्व बहाल केलं की, दोषांची चर्चा करता येत नाही.
मुळात एखाद्या माणसाला ‘माणूस’ म्हणून स्वीकारण्याचा संस्कारच नाहीय आपल्याकडे. त्याचं तौलनिक विश्लेषण भारत देशात होऊच शकत नाही. कारण भक्त काठय़ा घेऊन लगेच डोकी फोडायला तयारच असतात. म्हणून मग ‘वास्तव जीवन’ आणि ‘या लोकांवरचे सिनेमे’ यात कायमच प्रचंड मोठी तफावत राहात आलेली आहे. माणूस म्हटलं की सरसकट चांगला आणि वाईट असं वर्गीकरण करता येत नाही. पण त्याला कथारूप द्यायचं म्हटलं, सिनेमा काढायचा म्हटलं, चरित्र, आत्मचरित्र लिहायला घेतलं की, वर्गीकरण फक्त ‘चांगला’ आणि ‘वाईट’ अशा दोनच भागांत करतात आपल्याकडे; किंवा करावं लागतं.

मला महात्मा गांधींबद्दल सर्वात महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे, ‘सत्याचे प्रयोग’ म्हणून लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र. या ‘महामानवा’ने हे आत्मचरित्र लिहून आपल्यावर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत.

वर मी महात्मा गांधींचा उल्लेख विशेष सदरात केला, तो याचसाठी की, आपल्या देशात महात्मा गांधींना तसं सरसकट देवत्व बहाल केलं गेलं नाही. त्यांनी ते करूही दिलं नाही. त्याचं काय कारण वाटतं तुम्हाला? महात्मा गांधींनी देश स्वतंत्र करण्यासाठी काय काय केलं किती सत्याग्रह केले, किती तुरुंगवास भोगला, फाळणीबद्दल त्यांची काय भूमिका होती या आणि अशा शेकडो राजकीय गोष्टींबद्दल हजारो पंडित आहेत आपल्याकडे बोलायला. पण मला महात्मा गांधींबद्दल सर्वात महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे, ‘सत्याचा प्रयोग’ म्हणून लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र. या ‘महामानवा’ने हे आत्मचरित्र लिहून आपल्यावर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत. कारण त्यांनी स्वतच त्यांच्या आयुष्यातल्या रागाच्या, लोभाच्या, शरीरसुखाच्या, स्वततल्या दोषांच्या, सवयींबद्दलच्या, अज्ञानाच्या, खंतावलेल्या क्षणांच्या, मनाच्या कमजोरीच्या अनंत आठवणी, अनुभव कथन स्पष्टपणे लिहून ठेवलं आहे. स्वतची मुलं कर्तृत्ववान का झाली नाहीत याबद्दल बाप म्हणून आपलं काय चुकलं हे त्यांनी ‘स्वत:च’ लिहिलेलं आहे. समजा त्यांनी हे आत्मचरित्र लिहिलं नसतं आणि त्यांच्यावरच्या सिनेमात त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रसंग चित्रित करायचा ‘प्रसंग’ आला असता तर, आपल्या देशात गांधीभक्तांनी काय केलं असतं याचा जरा विचार करा. वडील आजारी होते, वडिलांनी रात्री हाक मारली, पण हे चटकन गेले नाहीत, कारण त्या क्षणी ते कस्तुरबांबरोबर शय्यागमन करत होते. वडील आजारीच होते, पण ते गेले. त्याक्षणीदेखील आपल्या मनातल्या कामुक भावनांना आपल्याला आवर घालता आला नाही ही खंत त्यांना आयुष्यभर सतावत राहिली. ‘‘मोठा मुलगा हरिलाल असा का झाला’’? याचा विचार करताना, त्याच्या मुळाशी आपलंही कुठेतरी चुकलंच, असं त्यांनी स्वतच लिहून ठेवलंय म्हणून बरं. हा संदर्भ अजित दळवींनी ‘गांधी विरुद्ध गांधी’ नाटकामध्ये अतिशय सुंदर आणि संयतपणे हाताळला आहे.
महात्मा गांधींना ‘देवत्व’ बहाल न करता महा‘मानव’ मानलं जाण्याचं एकमेव कारण म्हणजे, स्वतच स्वतला ‘माणूस’ म्हणवून घेण्याच्या त्यांच्या उदात्त विचारसरणीला जातं. माणूस म्हणून होणाऱ्या प्रत्येक स्खलनाची त्यांनीच दिलेली कबुली याला जातं.
महात्मा गांधी असं पात्र असलेला एकही सिनेमा किंवा टेलिव्हिजन प्रोजेक्ट, वा कुठलंही पुस्तक आजवर फेल गेलेलं नाही. गमतीने आमच्या क्षेत्रात कलावंत मंडळी याला एक योगायोग किंवा महात्मा गांधींना सिनेमासाठी ‘लकी मॅस्कॉट’ मानतात. मुन्नाभाई हे केवढं मोठं उदाहरण!
हा काही योगायोग नाही, लकचा तर चुकूनही भाग नाही; तर हा त्यांच्या स्खलनशील माणूस असण्याचा, त्यातल्या खरेपणाचा, चांगल्याकडे जाण्याच्या परिवर्तनाचा, माणूस म्हणून संपृक्त होण्याच्या त्यांच्या प्रेरणेचा भाग आहे. आपल्यातल्या विकारांवर आपण कसा विजय मिळवला पाहिजे, सवयींना कसं बदललं पाहिजे; मनाची शुद्धी कशी केली पाहिजे याबद्दल त्यांनी स्वतच स्वतवर काम केलं. ते काम कसं केलं याबद्दल मी काही लिहिणार नाही; त्यासाठी ही जागा अप्रस्तुत आहे आणि त्यासाठी तुम्ही ते पुस्तकच वाचा. पण स्वतत बदल घडवण्यासाठी आधी आपल्यात काही कमकुवतपणा आहे, आपल्या मनांत विकार आहेत, आपल्याला सतत राग येतो हे ‘त्यांना’ मान्य होतं. गुणदोषांसकट तो माणूस आपल्याला आज माहिती आहे, म्हणून आपल्याला ते पात्र खरं वाटतं.
चांगल्या-वाईटापेक्षा सिनेमात पात्रं आवडण्यासाठी ती आधी ‘खरी’ वाटावी लागतात. या पाश्र्वभूमीवर अ‍ॅटनबरोंनी समजा ‘गांधी’ हा सिनेमा केला नसता, तर भारतातला मला एक दिग्दर्शक सांगा, ज्याने तसा सिनेमा बनवला असता. अ‍ॅटनबरोंनी तो तितका वास्तवदर्शी केला म्हणूनच तो सिनेमा ग्रेट ठरला. कारण गुणदोषांसकट जगणाऱ्या ‘माणसाचं भव्य आणि उदात्त कर्तृत्व’, हे ‘देवांच्या रंजक कर्तृत्वा’पेक्षा अस्सल आणि विश्वासार्ह असतं.
आपल्याकडे चरित्रपटांत आधी माणूसच एवढा मोठा करून ठेवतात की त्यापुढे त्या माणसाचं कर्तृत्वच थिटं वाटायला लागतं.
अनेक नामांकित व्यक्तिमत्त्वांची आत्मचरित्रं स्वतच्या आरत्यांनीच भरलेली असतात हल्ली आणि एखाद्यानं दुसऱ्याचं चरित्र लिहायला घेतलं की, ते फक्त ‘चांगल्या’च घटनांचं लिहावं लागतं. चरित्रनायकाची दुसरी बाजू लिहिलीच जात नाही. ‘‘मी किती ग्रेट आहे’’ हे सिद्ध करण्यासाठीच चरित्र लिहून घेऊन, किंवा स्वतच स्वतवरचा सिनेमा काढून खूप खर्च करतात हल्ली. खर्च खूप होतो, पण ते ‘खरं’ म्हणून काही वाटत नाही. कारण माणूसपणाच्या उणिवा दडवलेल्याच असतात सगळ्या.
संभाजीचं स्वगत सादर करणाऱ्या त्या मुलाचा प्रवेश मी बसवायला घेतला. आत्ता संभाजी मोठा जाणता आहे, पण लहानपणी तेवढा नव्हता; मग लहानपणच्या आठवणींनी व्याकूळ होताना, तो, सोडून चाललेल्या वडिलांना, म्हणजे शिवाजी महाराजांना पळत जाऊन त्यांच्या पायाला मिठी मारतो आणि ‘‘आबासाहेब, मला सोडून जाऊ नका’’ म्हणून बालसुलभ रडतो, असे, सदैव ताठरलेल्या देहाच्या भूमिकेतल्या त्या संभाजीच्या माणूसपणाचे बदल करायला मी सुरुवात केली. पण तो नट अडून बसला. ‘‘पण सर, ते राजे होते ना? ते कशाला असे रडतील? वाकतील कसे? संभाजी शिवाजींच्या पायाला मिठी कसे मारतील?’’ या त्याच्या प्रश्नांनी मी अवाकच झालो. या व्यक्तिरेखांचं केवढं जोखड आहे समाजावर? किती दहशत आहे या भूमिकांची? आठ वर्षांचा पोर, वडील सोडून चाललेत म्हणून रडणार नाही तर काय करेल? ‘‘आबासाहेब परत दिसतील न दिसतील म्हणून त्यांच्या पायाला मी घट्ट मिठी मारली’’.. असं तोंडात वाक्य, तसं वागल्याचं दाखवायचं नाही. कारण ‘लहान संभाजी रडतायत’ ..असं दाखवलं तर ‘राजांचा अपमान होईल’ अशी त्या मुलाला भीती. शिवाय ते काही संभाजी महाराजांचं आत्मचरित्र नाही; कानेटकरांचं नाटक आहे. आत्मचरित्र असतं तर एक वेळ अडचण नसती. संभाजीच्या तोंडी कानेटकरांनी लिहिलेले संवाद आहेत. मग संभाजींनी कसं वागायचं हे फक्त संभाजीप्रेमीच ठरवणार.
राजांनी कसं बोलायचं, वागायचं, चालायचं, बसायचं, उठायचं यावर केवढी बंधनं ती? ‘‘मोडेन पण वाकणार नाही’’ किंवा ‘‘आम्ही कधी कुणासमोर वाकलो नाही’’ याचा शब्दश अर्थ घेतला होता त्या नटाने आणि तसाच घ्यायला लावला जातो आपल्या संस्कृतिरक्षकांकडून. ‘‘आम्ही कधी कुणासमोर वाकणार नाही’’ याचा अर्थ, महाराज पाटावर खाली जेवायला बसताना कसे बसत असतील? घोडय़ावर टांग मारताना पाठीच्या कण्याचं काय होत असेल? सिंहगडाच्या दोन दोन फुटी पायऱ्या चालताना कशा चढल्या जात असतील? आग्य्राहून सुटून येताना सलग ४०-४०, ५०-५० किलोमीटर्स घोडय़ावरून वेगवान आल्यावर कधीतरी महाराजांचे पाय दुखले असतील का? त्यांनाही कधी भूक लागली होती का? वाऱ्या-पावसावर स्वार होऊन िहडताना त्यांना कधी िशक आली असेल का? वेळीअवेळी प्रचंड तणावात, मिळेल ते खाऊन झोपेला तिलांजली देताना अ‍ॅसिडिटीचा त्रास त्यांना झाला असेल का? डोकं कधी भणाणलं असेल का? दुखलं असेल का? साडेपाच फूट उंचीच्या देहानं तीस-चाळीस र्वष लढाया करताना त्यांना कधी लागलं होतं की नाही? त्यांचा कधी वार चुकला होता की नाही? त्यांना खरचटलं तरी होतं की नाही? लागलं असेल तर त्या वेदना त्या देहाला झाल्या होत्या की नाही? आयुष्यातली सगळीच युद्धं ते जिंकले का? एखाद्या राजहुकमाचा फेरविचार त्यांना करावा वाटला होता का? एखादी योजना अमुक अशी करायला हवी होती असं त्यांना नंतर वाटलं असेल का? तानाजी मालुसरे गेल्यावर महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं का? या आणि अशा छप्पन्न गोष्टींचा विचार, एवढं डायनॅमिक आयुष्य जगणाऱ्या अशा लोकोत्तर माणसाची भूमिका करताना करावा लागेल की नाही? करायचा की नाही? का करू दिला जात नाही? चारशे वर्षांपूर्वीच्या व्यक्तिमत्त्वाला आज ‘अस्सल’ आणि ‘तंतोतंत खरेपणा’च्या कसोटीवर सादर करण्यासाठी, त्याच्या माणूसपणाच्या खुणा व्यक्त व्हायला हव्यात की नकोत?
महाराज प्रत्यक्ष साधेच राहात असले पाहिजेत. असं होतं काय महाराष्ट्रात त्या वेळी? राज्यावर अठराविशे दारिद्रय़, संपत्ती म्हणजे काय माहीत नाही, गूळ-खोबरे एवढीच काय ती गोडधोडाची चन, सततच्या चिंता, व्यथा. अंगावरचे कपडे, घरातली भांडीकुंडी, वापरल्या जाणाऱ्या वस्तू, घरं साधीच असली पाहिजेत. प्रत्यक्ष महाराज हे काही धिप्पाड वगरे शरीरयष्टीचे नव्हते, जेमतेम साडेपाच फूट उंची, हातात मावळ्यांची संख्या कमी, म्हणजे शरीराने आणि सामग्रीने शत्रूपेक्षा कमजोर; नाहीतर कशाला युद्धासाठी गनिमीकाव्याचं तंत्र त्यांनी शोधून काढलं असेल? औरंगजेब तर ‘वो चूहा’.. असा नामोल्लेख करायचा. कारण त्याच्या सल्तनतीसमोर मराठय़ांचं ‘साम्राज्य’ ते काय! ‘साम्राज्य’ हा शब्दसुद्धा विनोदीच वाटणारा. खरंतर आपलं ‘साम्राज्य’ म्हणजे औरंगजेबाच्या तुलनेत त्याच्या सन्याची एखादी तुकडी. ‘साम्राज्य’ या शब्दालायक महाराजांनी ‘नंतर’ ते निर्माण केलं. तोवर काय होतं? एवढा धिप्पाड अफजलखान, त्याला भिडायला जाताना मनाची अवस्था काय असेल त्यांच्या? पुढे काय होणार माहीत नाही. जे आणि जसं ठरवलं तसं नाही झालं तर? तरचं काय प्लािनग होतं? आयुष्यातला एकेक क्षण केवढा कमालीचा रोमांचकारी! या सगळ्यामध्ये एका ‘माणसा’ने निर्माण केलेल्या ‘साम्राज्या’ची किंमत म्हणूनच मोठी. पण आधी त्या व्यक्तीला ‘माणूस’ मानलं तर. परिस्थितीनं अनेक वेळेला त्यांना साथ दिली, तशी अनेक वेळेला नाहीपण दिली. पण जेव्हा दिली तेव्हा त्यांचं सगळं आयुष्य ‘दैवी वाटावं’ असं.. पण म्हणजे ‘प्रत्यक्षात दैवी’ नव्हतं. महाराज काही प्रत्येकच लढाई जिंकू शकले नव्हते. काही लढाया हराव्याही लागल्या त्यांना. त्यातूनच पुढच्या लढाईची योजना ठरली असणार. काही तह करण्याचीही वेळ आली म्हणजे, त्यामागेही काही अडचणी असणार. एका ‘माणसाचं कर्तृत्व’ म्हणून या सगळ्याकडे पाहिलं तर किती उत्तुंग आणि अविश्वसनीय आहे हे! आता आजच्या काळात त्यांना ‘दैवता’समान मानणं हे समजूच शकतो आपण, पण त्या काळात तो एक ‘माणूस’ होता हे मान्य न करणं म्हणजे किती अन्यायकारक आहे? कारण आज शिवाजी महाराजांवर सिनेमा करायचा झाला तर, ‘‘त्या वेळी तो हाडामासाचा माणूस होता’ हे दाखवू शकणार आहोत का आपण? ‘आज’ आपण त्यांना देव मानतो म्हणून ‘त्या वेळी’ही ते ‘देवच होते’ असं दाखवावं लागणार आहे आज.
स्टीव्हन स्पिलगर्बचा ‘लिंकन’ हा सिनेमा पाहा. आजच्या काळातलं चरित्रपटाचं सर्वोत्तम उदाहरण मानता येईल. अमेरिका स्वतंत्र करणाऱ्या अब्राहम लिंकन यांच्या आयुष्याचा भव्यपट या सिनेमात पाहायला मिळतो. यामध्ये डॅनियल ले लुइस, टॉमी ली जोन्स् यांच्या भूमिका पाहा. लिंकन यांच्या आयुष्यात आलेली संकटं, आव्हानं, अंतर्गत नातेसंबंध, झालेल्या चुका, त्या दुरुस्त करण्यासाठीचे उपाय, घर, मुलं.. किती वास्तववादी. फक्त लिंकनचा पुतळा तेवढा आजवर पाहिलेला, काही मोजक्या कथा ऐकलेल्या, वाचलेल्या. पण एका ‘माणसा’चा ‘अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष’ बनण्यापर्यंतचा प्रवास हा त्याच्यातला ‘माणूस’ दाखवल्याशिवाय शक्यच नव्हता. हे आपण मान्य करायलाच हवं की, पाश्चिमात्यांची चरित्रपटांकडे पाहण्याची दृष्टी आणि अ‍ॅप्रोचच ‘खरे’पणाच्या अट्टहासाचा असतो. ‘तंतोतंत, जसंच्या तसं, अगदी खरं वाटावं’ असा.
आपल्याकडे मात्र अतिरंजितपणा, वाजवीपेक्षा जास्त रंगवून सांगण्याची हातोटी, भावना, गरिबी, दुखांचं अवास्तव उदात्तीकरण, सततची प्रमुख पात्राबद्दलची सिंपथी आणि सोयीच्या घटनांच्या हव्यासापोटी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या ‘खरेपणा’चा चोथा केला जातो.
समाजाला फरक पडणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा इतिहास मांडताना, दाखवताना ‘हवं तेच आणि हवं तेवढंच’ दाखवण्याच्या धाकाचा परिणाम एवढाच की, ‘‘राम, कृष्ण वगरे नक्की होऊन गेले? की, काल्पनिक आहे सगळं?’’ हा प्रश्न आजच्या पिढीला पडतोच आहे आणि आज नक्की कुठे सांगता येतं ते? कारण त्या पात्रांच्या ‘माणूसपणा’च्या खुणाच ‘देवत्व’ बहाल करण्याच्या नादात एव्हाना कालौघात पुसून टाकल्या गेल्या आहेत. आज आपण त्यांना देव म्हणूनच पुजतो की. केवळ ‘देवत्व’ सिद्ध करण्यासाठी शिवाजी महाराज, संभाजी, आंबेडकर, महात्मा फुले, टिळक अशी लोकोत्तर माणसंही इथून पुढे याच वाटेवर आहेत असं वाटतं. कारण माझा मुलगा मला जेव्हा विचारतो, ‘‘बाबा, शिवाजी महाराज खरंच होते ना हो?’’ यावर आज तरी, ‘‘म्हणजे काय? होते म्हणजे? खरेच होते’’.. असं त्वेषानं सांगू शकतो आपण.. पण माणूसपणाच्या खुणा पुसून, या सगळ्यांनाही एकदा ‘देव’ बनवून टाकलं की, अजून शेकडो वर्षांनी ‘खरंच शिवाजी महाराज होते का हो?’ यावर ‘‘नक्की सांगता येणार नाही, असूही शकतील, पण इथं नमस्कार कर’’ एवढंच सांगून महाराजांच्या ‘देवळा’तून बाप-लेक बाहेर पडतील.. कारण माणसांतल्या देवत्वाची ‘दहशत’ निर्माण केली की, नंतर देवातलं ‘माणूसपण’ सापडता सापडत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2014 1:18 am

Web Title: god and human
टॅग God,Human
Next Stories
1 चर्चा : म..म.. मातृभाषेचा!
2 कथा : देणगी
3 संघटित, प्रतिष्ठित चोर विरुद्ध मी भुरटा
Just Now!
X