पृथ्वीवर जायच्या विचाराने तो जरा धास्तावला होता. हल्ली तिकडे घडणारे प्रसंग पाहून कोणीही धास्तावेलच. अगदी देवही. पण देवाने मात्र अगदी पक्के ठराविलेले. काहीही झालं तरी पृथ्वीवारी ही करायचीच. जरा ‘ग्राऊंड रिअ‍ॅलिटीचा’ आढावा घेऊनच टाकू एकदाचा. 

चौकोनाचे चारही कोन विखुरलेल्या एका चौकोनी कुटुंबात देवाने एण्ट्री घेतली. सकाळची वेळ. त्या कुटुंबातला पंचविशीतला मुलगा बाहेर जाण्याची कसलीशी तयारी करत होता.
‘‘आई, बाबा येतो.’’
‘‘ये आणि नीट दे मुलाखत अणि ऐक रे बाबा, या वेळी झालास सिलेक्ट तर घेऊन टाक बाबा एकदाची नोकरी. खूप झाली ही बदलाबदलीची पळापळ. आता लग्नाचं वय झालं तुझं. त्याआधी स्थिरस्थावर व्हायला नकोस का तू?’’
पण हे सगळं ऐकायला ते पोरगं होतंच कुठे? आई हरिनामाच्या जपासारखी आपलं नेहमीचं दु:ख पुटपुटली. या हरीने मात्र तो जप निमूटपणे ऐकून घेतला आणि मुलाकडे आपला मोर्चा वळवला. मुलगा धावत होता. आजूबाजूला प्रचंड कोलाहल होता, पण त्याच्या मनात त्याहून कित्येक पटींनी गोंधळ माजला होता.
‘‘एकदा ही नोकरी मिळाली ना, की बाकीचे मार्ग पटापट मिळत जातील. आई-बाबांना काय कळतंय यातलं. एकाच नोकरीला चिकटून राहण्याचा जमाना गेला आता. सध्या जिथे संधी मिळेल तिथे धावलं नाही ना, तर त्या संधीबरोबर खूप काही निसटून जातं. मी नाही राहू शकत त्यांच्यासारखं एकाच एक नोकरीत इन्क्रिमेंटची वाट बघत. मला खूप पुढे जायचंय आणि नोकरी ही त्यासाठीची शिडी आहे. शिडीवर थांबायचं नसतं तर त्यावरून पुढचा रस्ता गाठायचा असतो. स्थिरस्थावर व्हायला संपूर्ण आयुष्य पडलंय, पण ही आत्ताची मोलाची र्वष गमावली ना, तर खरंच कठीण आहे. त्यांना वाटायचं तर वाटू दे. हो, आहे मी असमाधानी.’’
देव नुसतं ऐकत होता. पटावरची घरं तीच असली तरी प्यादी बदलली होती. चाली बदलल्या होत्या. इतक्यात मुलाला कोणाचा तरी फोन आला. देवाने हलकेच स्मित केले.
‘‘अगं, आत्ता खूप घाईत आहे गं मी. हो नंतरच भेटू ना. आय नो आपण भेटलो नाही आहोत बरेच दिवस. पण अगं, जेन्युईन कारणं आहेत ना त्याला. असं काय करतेस.. काय? काय? निर्णय? ऐक ना; आपण भेटून बोलू या का हे? असं फोनवर बोलणं.. काय? तू काय करते आहेस? आर यू मॅड? अगं, एवढं चांगलं करिअर सोडून तू त्या खेडेगावात जाणार? कमॉन यार.. समाजसेवा वगैरे सगळं ठीक आहे, बट थिंक प्रॅक्टिकली. काय पगार मिळणार तुला तिथे? बरं बाई, शिक्षण हे फक्त पैशासाठी नाही घेत आपण, पण निदान आपल्या भविष्यासाठी तरी घेतोच ना. काय भविष्य आहे तुला त्या खेडय़ात? ओह्.. ही फिलॉसॉफी ना बोलायला ठीक आहे, पण समाधान नाही मिळत म्हणजे काय?’’
फोन ठेवल्यानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव देवाला बरंच काही सांगून जातात.
‘‘मला या मोठय़ा पगारात समाधान मिळत नाही म्हणे. वेडी आहे का ही मुलगी? म्हणे या रॅट रेसमध्ये धावता धावता मी पण कधी तरी माणूस होते हेच विसरलेय मी. मला हरवलेली मी पुन्हा शोधायचीये. आणि काय तर ही भरमसाट पगाराची नोकरी मला खूप सारे पैसे तर मिळवून देईल, पण अमूल्य असं माझं स्वत्व मात्र मी गमावून बसेन.. आणि म्हणून हिला अशा आडवळणाच्या वाटा चोखाळायच्या आहेत. त्यातच म्हणे तिचं खरं समाधान आहे. काय तरी उगाच. आठवडय़ाभरात येईल लाईनीवर.’’
एकाच चेहऱ्याची दोन परस्परविरोधी प्रतिबिंबं दाखवणारे आरसे देवाला तिथे दिसत होते. असमाधान. प्रत्येक चिंतेच्या, प्रत्येक संकटाच्या आणि प्रत्येक प्रार्थनेच्या मुळाशी असलेले हे कारण. आणि प्रत्येकाची एकच इच्छा अधिकाधिक असमाधानी बनणे. माणूस समाधानाच्या शोधात त्याच्या थांब्यापाशी येतो आणि हा आपला थांबा नव्हेच, असं स्वत:ला समजावून पुढे निघून जातो. त्याच थांब्याच्या शोधात. नात्यांना फुलायला वेळच देत नाही. त्यांना फुंकर मारून मारून फुलवलं जातं आणि त्याच फुंकरेने नातं विस्कटलं जातं. देव विचारमग्न झालेला.. (देवाला विचारात पाडण्याची किमया माणूसच करू जाणे.) इतक्यात त्याच्या बाजूने एक मुलगी गेली. ती तर त्याच्याही पेक्षा जास्त विचारमग्न. तिला आपलं म्हणणं मांडायचं होतं. अगदी लग्गेच. त्याच विचारात होती ती.
देव मनाशी म्हणाला, ‘अच्छा, हेच का ते? हल्ली मला प्रार्थनास्थळांमधून येणाऱ्या प्रार्थनांपेक्षा जास्त प्रार्थना इथूनच येत असतात. माणसाला अँटीसोशल करणारं सोशल मीडिया. काय गम्मत आहे ना या आभासी जागेची. आपल्यासमोर दिसणाऱ्या माणसांपासून लांब करून, ज्या माणसांच्या अस्तित्वाबद्दलही आपल्याला काही माहीत नाही अशांशी जोडून देते ही जागा. आपल्या विचारांचे माठ काठोकाठ भरले की या जागेवर ते रिते करायचे आणि पुन्हा रिकामे माठ घेऊन सज्ज व्हायचं नव्या विचारांच्या शोधात. विचारांचेही असमाधान वाटावे तेवढय़ात त्याला ती दिसली. नवऱ्याशी भांडून घराबाहेर पडलेली. ऑफिसला जाणारी. जेमतेम एक वर्ष पूर्ण झालं असेल लग्नाला. नात्यांना कोमल हातांनी कुरवाळण्याऐवजी नखांनी ओरबाडलं तर ती विद्रूप होणारच. वेळच नव्हता त्यांना एकमेकांसाठी. असमाधानी होते दोघेही त्या नात्यात. शारीरिक गरजेसाठी एकत्र येण्याला नाती निभावणं म्हटलं, तर आज शरीरविक्रय करणारी किती श्रीमंत असती. खरं तर नवरा बायको हे किती सुंदर नातं.. या नात्याच्या बंधात सारी नाती गुंफायची असतात, पण त्याचीच वीण जर सैल असेल तर सगळंच विस्कटतं.
काय सुरू आहे, काय चुकतंय नक्की.. देव आता खरंच निरुत्तर होत होता. पण छे, निरुत्तर झाला तर तो देव कसला. कुठे काय चुकतंय? असंच तर आहे ना. बरोबरच तर सुरू आहे. सगळीकडे माणूस सुख शोधतोय. मुलांना आत्ता अंथरूण पाहून पाय पसरायचे नाहीयेत, कारण त्यांचं सुख आता पायाएवढं अंथरुण घेण्यात आहे. सुखाची एकच एक शिडी असते हे झुगारणाऱ्यांनी नव्या अशा जुन्याच वळणांवर आपलं सुख शोधलंय. पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाची डागडुजी करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि त्यातच आपलं सुख शोधतोय, मात्र त्याला कधी तरी कळेल का, की प्रतिबिंबासमोर असलेल्या चेहऱ्याची ठेवण नीट केली, तर प्रतिबिंब आपोआपच सुधारेल. एकटं पडण्याची भीती त्याच्या मनात आहे. सतत नात्याच्या मायेची ऊब त्याला सुख देते, हे जाणवतंय नक्की..
प्रत्येकाचं सुख हे वेगळं असतं आणि म्हणूनच प्रत्येकाचं समाधानही. न जाणो असमाधानी राहण्यात पण दडलं असावं सुखाचं समाधान.
प्राची साटम