सुहास जोशीचांदीच्या ताटात, चांदीच्या वाटीत अशा पेशवाई थाटाचं जे वर्णन आपण वाचतो, ते चांदीचं ताट, वाटी आणि इतर भांडी, चांदीच्या विविध प्रकारच्या मोठमोठय़ा वस्तू तयार केल्या जातात, त्या नाशिकमध्ये.
तिथल्या चांदीनगरीचा फेरफटका-

अंगावर चार सोन्याचे दागिने घालण्याचा सोस अनादी काळापासून सर्वानाच आहे. त्यात चांदीला फारसं महत्त्व नाही, पण ही सारी कसर भरून निघते ती चांदीच्या अनेक कलाकुसरयुक्त भांडय़ांनी, वस्तूंनी, देवतांच्या मूर्तीनी आणि प्रभावळींनी. कमी खर्चीक तरीही मौल्यवान अशा या झळाळत्या चांदीने आपले हे स्थान कालौघात आणखीनच पक्कं केलं आहे. किंबहुना, चांदीच्या पेल्यातून दूध पिणारं आणि चांदीच्या ताटात जेवणारं घर म्हणजे सुबत्तेचं लक्षण म्हणावं लागेल. सोनं जरी मौल्यवान असलं तरी त्याचं ताट, वाटी, पेला होत नाही, ते दागिन्यांपुरतंच मर्यादित राहतं; पण चांदीचा असा मुक्त वापर हा सुबत्तेच्या पुढच्या टप्प्यावर नेणारा असतो. जो मान सोन्याला नाही मिळाला तो चांदीला मिळतो तो असा; पण नेमका तो कसा मिळाला आणि हा मान मिळवून देणारे आहेत तरी कोण?
चांदीची भांडी बनवणारी अनेक शहरं देशात आहेत; पण चोख टंचाची (वस्तूतील चांदीचं प्रमाण) भांडी म्हटलं की हमखास नाव समोर येतं ते नाशिकचं. धार्मिक, ऐतिहासिक आणि साहित्यिक पाश्र्वभूमी लाभलेलं हे शहर जसं आल्हाददायक हवेसाठी, द्राक्षांसाठी, वाइनसाठी प्रसिद्ध आहे, तसंच त्याला चांदीचं वलयदेखील लाभलं आहे. आज जरी चांदीने एका किलोला चाळीस-पंचेचाळीस हजारांचा भाव गाठला असला तरी ज्या काळी हा भाव नव्हता तेव्हा चांदीच्या वस्तूंचा व्यापार नाशकात रुजला, वाढला आणि भरभराटीला आला. कोल्हापूर, खामगाव अशी महाराष्ट्रातील काही गावं जरी चांदीच्या वस्तू तयार करण्यात आघाडीवर असली तरी नाशकातल्या गुणवत्तेमुळे चांदीच्या वस्तूंना सातत्याने मागणी राहिली आहे. त्यामुळे शुद्ध चांदीच्या वस्तू म्हटल्यावर आपसूकच सर्वाच्या तोंडी नाशिकचं नाव आल्यावाचून राहत नाही.

Gold-Silver Rate today | gold price gold rate
Gold Silver Price : गणेशोत्सवापूर्वी सोने महागले! चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचाग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
ganesh idols made from paper
पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी
One killed on suspicion of theft four arrested
ठाणे : चोरीच्या संशयावरून एकाची हत्या, चौघांना अटक
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
GSB Ganesh utsav, Insurance Cover GSB
‘जीएसबी’च्या गणेशोत्सवासाठी ४००.५८ कोटींचे विमा संरक्षण
Krishna Janmashtami dahihandi festival celebrated in Konkan
Janmashtami 2024: कोकणात जन्माष्टमीनिमित्त शेवग्याच्या भाजीसह आंबोळी, काळ्या वाटाण्याची उसळ का बनवली जाते? वाचा कारण…
women Murder husband Thane,
ठाणे : अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

डाय आधारित भांडी
चांदीचा चौसा (वीट) अथवा मोड म्हणून आलेल्या वस्तूंपासून मिळवलेली चांदी सर्वप्रथम आटणीमध्ये (भट्टी) वितळवली जाते. मुंबई आणि काही महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये अशी विजेवर चालणारी आटणी यंत्रे उपलब्ध आहेत; पण आजही अनेक ठिकाणी पारंपरिक भट्टीचा वापर होतो. काही ठिकाणी गॅसवर चालणारी भट्टी आहे. वस्तूंसाठी असणारा चांदीचा वापर हा मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे ही आटणीत किलोच्या हिशेबानेच मूस असते. चांदी पूर्णत: वितळल्यावर आयताकृती अशा चपटय़ा आकाराच्या पट्टय़ा केल्या जातात. यालाच पाटला असे म्हणतात. चांदीपासून मुख्यत: मोठय़ा वस्तू तयार केल्या जात असल्यामुळे सोन्यासारखी लगड येथे उपयोगाची नसते. लांब-रुंद पत्रा तयार करण्यासाठी गरजेचा म्हणून पाटलाच हवा असतो. त्यानंतर या पाटल्यापासून रोलर मशिनच्या आधारे हव्या त्या आकाराचा जाडीचा पत्रा तयार केला जातो. या पत्र्याचे गरजेनुसार तुकडे केले जातात. चांदीच्या पत्र्यापासून दोन प्रकारे वस्तू बनविल्या जातात. डायच्या साहाय्याने दाब यंत्रावर हवा तो आकार प्राप्त करणे अथवा डायप्रमाणे डिझाइनचे तुकडे तयार करणे. तर दुसऱ्या प्रकारात लेथ मशिनवर डाय बसवून त्यावर चांदीच्या पत्र्याला डायप्रमाणे आकार देणे. हे काम खूप कौशल्याचे असते. वाटी, ताट, पेला अशी भांडी तयार करताना साच्यावर एकाच वेळी आकार मिळून जातो; पण समई, निरांजन तयार करताना दोन-तीन सुट्टे भागात तयार करून ते जोडावे लागते. अर्थात या दोन्ही प्रक्रियांत डाय हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळेच ज्यांच्याकडे अनेक वेगवेगळ्या डाय आहेत त्यांना उत्पादनात वैविध्यता टिकवता येते. नाशकातील व्यवसायाला तीन-चारशे वर्षांची परंपरा असल्यामुळे आज असे अनेक डाय येथील कारखानदारांकडे उपलब्ध आहेत. तयार झालेल्या उत्पादनावर पुन्हा पॉलिश करणे, झळाळी आणणे अशी कामे यंत्रावर केली जातात.

सोनं आणि चांदी या दोनही मौल्यवान धातूंच्या खाणी एखादा अपवाद सोडला तर भारतात नाहीत. मात्र तरीदेखील आपल्याकडे या दोनही धातूंचं आकर्षण जबरदस्त आहे. सोन्या-चांदीचा ऋग्वेदात उल्लेख आढळतो. इ.स. पूर्वपासून या दोन्ही धातूंचा वापर आपल्याकडच्या चलनातदेखील झालेला आहे. मात्र चांदी वस्तुरूपात नेमकी केव्हा वापरात आली याची ठोस नोंद आढळत नाही. साधारणत: राज्याच्या, व्यापाराच्या भरभराटीच्या काळात अशा प्रकारे मौल्यवान धातूंचा व्यवहारातील वापर वाढतो. कारण त्याच काळात व्यापाराच्या माध्यमातून बाहेरून अशा वस्तू येत राहतात. मग केवळ चलन अथवा मौल्यवान धातू म्हणून होणारा वापर इतर ठिकाणीदेखील होऊ लागतो. आपल्याकडे साधारण मुगल काळात चांदीचा वस्तुरूपातील वापर वाढल्याचे नाशिक येथील सराफ आणि इतिहास अभ्यासक गिरीश टकले सांगतात. अकबराच्या काळात हा वापर वस्तुरूपाने भांडी, सुरई इ. झालेला दिसतो. साधारणत: त्याच काळात म्हणजे सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी दक्षिण अमेरिकेतून जगभरातून नेली तशीच भारतात चांदी मोठय़ा प्रमाणात आणली. त्यामुळे हा काळ चलनाव्यतिरिक्त वस्तुरूपात चांदीचा वापर होण्यास महत्त्वाचा ठरतो. नाशिकच्या बाबतीत हा कालावधी साधारण पेशवे काळातील म्हणावा लागेल, असं गिरीश टकले नमूद करतात.
सोन्याचं काम नजाकतीचं तसंच चांदीचंदेखील आहे; पण ताट, वाटी, गडू, तांब्या, मखर, कळशी इ. भांडी तयार करताना जे तंत्र लागतं त्याची नाळ तांबटांच्या कारागिरीकडे झुकणारी असल्याचं दिसून येतं. पेशवे काळातील तांबट आळीचा दाखला यासाठी गिरीश टकले देतात. म्हणजेच नाशकातील चांदी व्यवसायाचा इतिहास साधारण तीनशे वर्षांपर्यंत मागे जातो असं म्हणावं लागेल. अर्थात या तीनशे वर्षांत नाशकाने स्वत:चं असे वेगळं स्थान निर्माण केलं आहे ते त्याच्या गुणवत्तेने. केवळ ताट-वाटी अशा भांडय़ांमध्ये अडकून न पडता कलाकुसरीच्या आणि हस्तकलेच्या जोरावर अनेक पर्याय येथे निर्माण झाले आहेत. आज नाशकात वेगवेगळ्या स्तरांवर हा व्यवसाय रुजला आहे. ताट, वाटी, तांब्या अशा स्वरूपाची भांडी (ज्याला येथील व्यावसायिक प्लेन माल म्हणून संबोधतात), पूजेअर्चेतील भांडी (ज्याला येथे उपकरण म्हटले जाते), हस्तकलेच्या आधारे केली जाणारी कामं, ओतीव मूर्ती आणि देवस्थानांची कलाकुसरीची कामं असा नाशिकच्या बाजारपेठेचा मोठा आवाका आहे.
नाशकातल्या बुधा हलवाई चौकापासून सुरू होणारी विधंता आळी हे या चांदी कारागिरीचं मुख्य ठिकाण. याच ठिकाणी तयार होणाऱ्या हजारो डिझाइन्सनी महाराष्ट्रातील अनेक सराफ बाजार सजले आहेत. विधंता आळीतून जाताना एखादा कारागीर त्याच्या पडवीतील दुकानात चांदीकाम करताना हमखास दिसून येतो. कोठे एखादा कारागीर मन लावून एकाग्र- चित्ताने चांदीच्या पत्र्यावर घणाचे घाव घालत त्याचं छत्रात रूपांतर करण्याचा घाट घालत असतो, तर एखादा कारागीर मान मोडून राळेवरच्या चांदीच्या पत्र्यावर हस्तकौशल्य अजमावीत असतो. तर कोठे एखाद्या कारखान्यात ताट-वाटय़ांचा खणखणाट कानावर पडतो. नाशिकच्या भरभराटीत या आळीचं योगदान आहे. चांदीच्या व्यापारातील सारी स्थित्यंतरं या बाजाराने अनुभवली आहेत. आज जरी अनेक कामे यंत्राच्या आधारे वेगाने होत असली तरी एके काळी चांदी आटविण्यापासून ते त्या वस्तूला अंतिम झळाळी देण्यापर्यंत सारी कामं हातानंच केली जात.

घाट घालणे
यंत्राच्या माध्यमातून भल्या मोठय़ा आकाराच्या चांदीच्या वस्तू तयार करणे शक्य नसते, किंबहुना ते व्यावहारिकदेखील नसते. घंघाळ, कळशी, देवतांच्या मूर्तीवरील छत्र, कळस अशा वस्तू तयार करताना यंत्र उपयोगी पडत नाही. तेथे गरज असते ती हाताने घाट घालणाऱ्यांची. चांदीच्या पत्र्यावर विशिष्ट पद्धतीने घणाचे घाव घालत अन्य काही अवजारांच्या साहाय्याने आकार देताना खूप कौशल्य लागते. सपाट पत्र्यापासून अर्धगोलाकार, गोलाकार आकार देताना सर्वत्र एकसमानता राखणे महत्त्वाचे असते. हे सारंच काम मोठं जिकिरीचं असतं. पिढय़ान्पिढय़ा हे काम करणारे कलाकार आज नाशकात अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच राहिले आहेत, तर नव्या पिढीतील कारागीर असल्या अंगमेहनतीत फारसे येत नाहीत.

नाशकातील एक आघाडीचे चांदी माल कारखानदार सुरेंद्र मोरकर हा बदल सांगताना रोलर मशीनचा आवर्जून उल्लेख करतात. ‘‘रोलर मशीनमुळे पत्रा तयार करण्याच्या कामाला वेग आला. त्याचबरोबर लेथ मशीन, पॉलिश मशीनमुळे पुढील कामं जलद होत गेली.’’ पूर्वी पत्रा तयार करण्यापासून, त्याचा घाट घालण्याचा सारा उपद्व्याप हातानेच करावा लागत असे. त्यामुळेच एक ताट जरी तयार करायचं असेल तरी पूर्ण दिवस मोडायचा. तर आज दिवसाला पन्नास- शंभर ताटं करणंदेखील सहज शक्य झालं आहे. अर्थात पूर्वीच्या काळी ही सर्वच कामं परिश्रमाची आणि कारागिरांच्या अंगभूत कौशल्याची होती. आज यंत्रामुळे जरी त्यातील कौशल्य कमी झालं असलं तरी प्रशिक्षण गरजेचं असल्याचं ते नमूद करतात. नाशकात आज ताट-वाटी असा प्लेन माल तयार करणारे वीस-पंचवीस तरी कारखाने आहेत. त्याच जोडीला अनेक ठिकाणी पूजा साहित्यदेखील तयार होतं. समई, निरांजन, ताम्हण, पळी असा उपकरणी माल हीदेखील नाशिकची खासियत मानली जाते.

चांदीवरची हस्तकला
ताट, वाटी, पेला अशा भांडय़ांत कलाकुसरीला फारसा वाव नसतो; किंबहुना तशी ग्राहकाची मागणीदेखील नसते; पण नक्षीदार तबक, पानाचा डबा, अत्तरदाणी, देवतांच्या प्रतिमा, मंदिरातील मूर्तीची प्रभावळ, मंदिरांच्या भिंतीवरील चांदीचे नक्षीकाम अशा ठिकाणी गरज असते ती हस्तकलेची. असे नक्षीकाम यंत्राच्या आधारे करणे अवघड असते आणि अशी कामे रोजची नसल्यामुळे आणि त्यात वैविध्य असल्यामुळे एखाद् दुसऱ्या वस्तूसाठी डाय बनवणे खर्चीक ठरते. त्यामुळे चांदीच्या पत्र्यावर कलाकारी दाखवत त्यातून देखणी कलाकृती साकारणे हे या हस्तकलाकारांचे वैशिष्टय़. नाशिकचे नाव या हस्तकलेसाठी राजकोटच्या जोडीने प्रसिद्ध आहे. हस्तकलेच्या माध्यमातून वस्तू साकारताना चांदीचा पत्रा तयार करण्यापर्यंतची पद्धत सारखीच असते. त्यानंतर राळेचे मिश्रण (घट्ट ना मऊ) करून ते लाकडी पाटावर बसवले जाते. वस्तूच्या आकारात कापलेला चांदीचा पत्रा त्यावर बसवला जातो आणि मग कलाकारी सुरू होते. आधी कागदावर काढलेले डिझाईन त्या पत्र्यावर आकार घेऊ लागते. जेथे गरज असेल तेथे उठाव देणे, खोलगटपणा देणे असे सर्व काम मग त्या राळेवरच्या पत्र्यावर होऊ लागते. एकदा का मनाप्रमाणे डिझाइन उतरले की मग झाळकाम करून राळ वेगळी केली जाते आणि मग पुढील फिनिशिंगची कामे हाताने आणि यंत्राच्या साहाय्याने पूर्ण केली जातात. एकाच प्रकारच्या अनेक वस्तू करताना प्रत्येक वेळी हीच पद्धत अवलंबावी लागते.

चोख चांदीत तयार केलेली भांडी ही नाशिकची ओळख आहेच, पण त्याचबरोबर चांदीवर हस्तकला करणाऱ्यांची वेगळी कारागिरी येथे आहे. चांदी हस्तकला पिढीजात जोपासणारे संदीप खेले हे त्यापैकीच एक. खेले सांगतात, ‘‘हे काम अत्यंत एकाग्रतेनं आणि दिवसदिवस मान मोडेपर्यंत काम करावं लागणारं आहे. सुरुवातीस कागदावर काढलेल्या रेखाचित्राप्रमाणे चांदीच्या पत्र्यावर कारागिरी करताना सारं हस्तकौशल्य पणाला लागतं. हे काम शिकविणारा कोर्स नाही, त्यासाठी कारखान्यात बसून सराव करणं आणि हातात कौशल्य असणं महत्त्वाचं.’’ अर्थात, या कारखान्यात काम करणं हे फार काही सुखावह नाही. त्यामुळे पुढील पिढी या कामात फारशी येताना दिसत नसल्याचं ते आवर्जून नमूद करतात. हस्तकलेचं कौशल्य असणाऱ्या देवतांच्या प्रतिमा, मुकुट, प्रभावळी अशा कामांना सध्या बरीच मागणी आहे. मात्र ही काम ताट-वाटय़ांच्या कामाप्रमाणे सातत्याने येत नाहीत. एकदा का एखाद्या मंदिराचं काम झालं की ते त्यांच्यासाठी दीर्घकाळ टिकणारं असतं. त्यामुळे कारागिरांच्या मिळकतीत सातत्य राहत नाही, अशी खंत संदीप व्यक्त करतात.
काहीशी हीच खंत हाताने घाट घालणाऱ्या जुन्याजाणत्या कारागिरांचीदेखील आहे. नाशकातील सुनील पिंपळे यांचा हा पिढीजात व्यवसाय. मंदिरांचे मोठमोठे कळस, छत्र, कळशी अशा वस्तू ते लीलया तयार करतात. चांदीच्या पत्र्यावर कौशल्यपूर्ण घाव घालून त्याला योग्य तो आकार देण्याचं कसब हाच तर खरा या व्यवसायाचा मूळ गाभा आहे. त्यातूनच पूर्वी ताट, वाटी, तांब्या अशी भांडी तयार होतं. आज यंत्रामुळे हे काम या कारागिरांकडून गेलं असलं तरी कळस, मखर, छत्र अशी कामं ही त्यांची खासियत झाली आहे. परंपरागत अवजारं आणि हातातील कसब याच्या आधारे यंत्रावरील कामाइतकी अचूकता आणि सफाईदारपणा या कारागिरांच्या कामात दिसतो. सुनील पिंपळे यांनी नुकताच तयार केलेलं चांदीचं छत्र पाहिल्यावर याची हमखास प्रचीती येते.
नाशकाच्या चांदीच्या बाजारपेठेत होणारं आणखीन एक मोठं उत्पादन म्हणजे ओतीव काम करून तयार केलेल्या देव-देवतांच्या भरीव मूर्ती. विशिष्ट प्रकारच्या मातीत मूर्तीचा साचा करून त्यात चांदीचा रस ओतून त्यातून मूर्ती घडविणं हे यांचं पिढीजात काम. कृष्णा पाटोळे यांची ही चौथी पिढी या कामात आहे. हे संपूर्ण काम हस्तकौशल्याचं आहे आणि हे सारं करताना हात राखून काम करता येत नाही. त्यामुळे मौल्यवान धातूचं काम असलं तरी अंगावर मातीचे डाग लागतात आणि हे काम करणारी पिढी तयार होत नाही. कृष्णा पाटोळे सांगतात की, आजकाल मातीच्या साच्याऐवजी रबराचे साचेदेखील वापरले जातात, पण त्यात म्हणावा तसा सफाईदारपणा नसतो.

ओतीव काम
मुख्यत: चांदीच्या भरीव मूर्ती या प्रक्रियेद्वारा तयार केल्या जातात. साचासाठी लागणारी विशिष्ट माती साचा तयार करायच्या चौकटीत चापूनचोपून बसवली जाते. त्यावर ज्या मूर्तीचे उत्पादन करायचे आहे ती मूर्ती ठेवली जाते. वरून दुसरी चौकट दाबून बसवली जाते. हीच प्रक्रिया दोन वेळा केल्यानंतर आत ठेवलेल्या मूर्तीचा साचा त्यावर उमटतो. चांदीचा रस आत जाण्यासाठी जागा केली जाते आणि त्यावर चांदीचा रस ओतल्यावर तो नेमका त्या साचावर जाऊन फिट बसतो. त्यानंतर मूर्तीचे पॉलिश आणि फिनिशिंग गरजेप्रमाणे हाताने अथवा यंत्रावर केले जाते.

हस्तकलेच्या बाबतीत नाशकाची तुलना राजकोटमधील कारागिरांशी केली जाते. नाशकातील या साऱ्याच कारागिरांच्या हातातील कला पुढील पिढीत हस्तांतरित होणंदेखील गरजेचं आहे. मात्र ती तशी होताना आज तरी दिसत नाही. त्यामागची कारणमीमांसा करताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवतात. एक म्हणजे चांदीला सोन्याइतकं वलय नाही. बाजारपेठ मोठी असली तरी या व्यवसायात उतरण्याची नव्या पिढीची मानसिकता कमीच आहे. कामाचा दांडगा व्याप आणि इतर गोष्टींचा बऱ्यापैकी उठारेटा असल्यामुळे कारखान्यात हात काळे करायची तयारी नाही. दुसरं असं की आपल्याकडे चांदीचा भाव साधारण दहा वर्षांपूर्वी किलोमागे सत्तर-पंचाहत्तर हजारांपर्यंत गेला होता आणि पुन्हा तो कमी होऊन आज ४०-४५ हजारांवर स्थिरावला आहे. परिणामी, चांदीत गुंतवणूक करण्याला नाही म्हटले तरी काही प्रमाणात का होईना फटका बसला आहे. त्यामुळे मागणीवर परिणाम झाला आहे.
असं असलं तरी काही विशिष्ट प्रकारच्या कारागिरीला, वस्तूंना मागणी वाढल्याचं ज्येष्ठ सराफ राजाभाऊ टकले नमूद करतात. ते सांगतात, ‘‘चांदीचा भाव वाढल्यामुळे घरात पूर्वीसारखे चांदीच्या वस्तू सांभाळण्यावर सुरक्षेच्या कारणास्तव काही प्रमाणात तरी परिणाम झाला आहे. मात्र त्याच वेळी देवस्थानांची सुबत्ता वाढल्यामुळे देवस्थानांच्या कामात बरीच वाढ झाली आहे. भविष्यात ही मागणी आणखीनच वाढणार आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की ही मागणी पूर्ण करण्यासाठी आजचा कारागीर वर्ग पुरेसा आहे.’’ मात्र भविष्यातील मागणीची पूर्तता करणारा वर्ग जो आज विशी-पंचविशीत आहे तो यात आला पाहिजे, असे ते आवर्जून नमूद करतात. त्याचबरोबर ग्राहकांचा कलदेखील बदलत असल्याकडे लक्ष वेधतात. चांदीच्या पारंपरिक घरगुती वस्तूंपेक्षा मेक टू ऑर्डरचे प्रमाण वाढले असल्याचे ते सांगतात.
ग्राहकांच्या मागणीत असे बदल होत आहेत तर दुसरीकडे कारखानदारांच्या आणि कारागिरांच्या- देखील अनेक समस्या आहेत. सोने चांदी सहकारी सोसायटीचे पदाधिकारी सुरेंद्र मोरकर सांगतात की सरकारनं या व्यवसायाच्या विकासासाठी आजवर काहीच विशेष प्रयत्न केले नाहीत. सध्या नाशकातल्या प्लेन मालाला मुंबईतील प्लेन मालाशी प्रचंड स्पर्धा करावी लागते. चांदीच्या वाढलेल्या किमतीमुळे भांडवलाची गरज वाढली आहे, तर दुसरीकडे प्रशिक्षित कारागिरांची टंचाई आहे. त्यामुळे नाशकातील सर्वच कारखान्यांवर परिणाम झाला आहे.’’ नाशकातील सर्वच चांदी उत्पादनाचं वैशिष्टय़ हे शुद्धता आणि गुणवत्ता हेच असल्यामुळे इतर ठिकाणाहून येणारा कमी गुणवत्तेचा माल कमी किमतीत विकला जाण्याचं प्रमाण वाढत आहे. नाशिकची ओळख असणारा भांडय़ाचा मागील इंग्रजी T  (T = १०० टक्के शुद्ध) हा ट्रेडमार्क हल्ली इतर ठिकाणच्या कमी दर्जाच्या उत्पादनावरदेखील बिनदिक्कत वापरला जात असल्याचे ते सांगतात. परिणामी स्पर्धेत नाशिकमधील उत्पादन मागे पडते. त्यामुळे प्लेन मालाच्या नाशिकच्या व्यवसायाला नाही म्हटले तरी फटका बसला आहे. या सर्वाचा परिणाम पुढील पिढीवर हमखास होत असल्यामुळे ती पिढी या व्यवसायात यायला फारशी उत्सुक नसल्याचे ते नमूद करतात.
अर्थात उद्योगातील बदल हा विकासाचा स्थायिभाव असतो. नाशकातील चांदी बाजाराने आजवर अनेक स्थित्यंतर बदल पाहिले आहेत. तांबटांच्या घणांच्या आवाजापासून ते आजच्या यंत्रयुगापर्यंत हा प्रवास चढत्या कमानीने झाला आहे. व्यवसायातील नेमकी गरज ओळखून ती पूर्ण करणारी माणसं प्रत्येक पिढीत असतात. नाशकातील आजची पिढी या साऱ्या अडचणींचा सामना करत नेटाने पुढे जात नाशकाच्या चांदीची शुद्धतेची आणि गुणवत्तेची झळाळी टिकवेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.