29 November 2020

News Flash

संकटातील तारणहार

‘मुहूर्ताला गुंजभर तरी सोनं खरेदी करावंच. अडीनडीला उपयोगी पडतं..’

भारतीय ग्राहक हा आपल्या विश्वासातल्या सराफाच्या पेढीवर जाऊन मनाप्रमाणे दागिने घडवून घेतो.

विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

वाडवडील म्हणत, ‘मुहूर्ताला गुंजभर तरी सोनं खरेदी करावंच. अडीनडीला उपयोगी पडतं..’ ते ज्या अडीनडीच्या काळाबद्दल सांगत तो काळ कसा असतो, याचा अनुभव गेल्या सहा महिन्यांत अख्ख्या जगाने घेतला असेल. नोकरी-व्यवसाय बंद पडले, बचतीवर मिळणाऱ्या व्याजाचे दर घटले, शेअर बाजार गडगडले, स्थावर मालमत्तेला मागणी राहिली नाही. जागतिक साथीच्या आणि आर्थिक संकटाच्या या काळात सर्व स्तरांवर अंधार दाटलेला असताना, सोन्याची झळाळी मात्र सातत्याने वाढतच गेली. सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे दागिने खरेदी अत्यल्प झाली असली, तरी सोन्याने या काळात सामान्यांच्या दैनंदिन गरजा भागवल्या आणि गुंतवणूकदारांना उत्तम परतावाही मिळवून दिला. यापुढेही काही काळ ही झळाळी कायम राहाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२०१९ मध्ये १० ग्रॅम सोन्याच्या दरांचा उच्चांक होता ३० हजार रुपये आणि २०२० मध्ये सोने ५४ हजारांपर्यंत उसळी घेऊन ५० हजारांच्या आसपास स्थिरावले. दर वर्षभरात २८ टक्क्यांनी वाढले. नऊ वर्षांनंतर यंदा पुन्हा एकदा सोन्याने ५० हजारांचा टप्पा पार केला. यावरून करोनाकाळात सोने खरेदी करणाऱ्यांना किती मोठा आर्थिक फटका बसला असेल आणि सोन्यात योग्य मार्गानी गुंतवणूक करणाऱ्यांनी किती भरभक्कम नफा मिळवला असेल, याची कल्पना येऊ शकते. साहजिकच या काळात भारतच नव्हे तर एकंदर जगभरातीलच सोन्याच्या दागिन्यांची मागणी प्रचंड घसरली. पण त्याच वेळी ‘गोल्ड बॅक्ड एक्सचेंज ट्रेड फंड’मधील गुंतवणुकीत मात्र वाढ झाली.

डिसेंबरच्या अखेरीस चीनमधील कोविडच्या साथीची चाहूल जगाला लागली आणि जगभरातील सराफा बाजारांतील गणितं बदलू लागली. भारताला कोविडच्या झळा जाणवू लागल्या मार्चमध्ये! मार्चअखेरीस देशभर कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत देशभरातील सराफांचा व्यापार पूर्णपणे बंद राहिला. हा खरं तर अक्षय्य तृतीया, गुढीपाडव्यासारख्या सोनेखरेदीच्या मुहूर्ताचा आणि लग्नसराईचा काळ. नेमक्या याच काळात व्यवसाय बंद राहिल्याने सोनेखरेदी होऊच शकली नाही. मेच्या मध्यावर र्निबध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. पण त्यानंतरही सराफा पेढय़ांसमोरील आव्हाने कायम राहिली. सोन्याच्या किमती वधारल्या होत्या. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार २०२०च्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते जून) १० ग्रॅम सोन्याचे सरासरी दर गतवर्षीच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वधारून ४६ हजार ३८१ रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे सराफांपुढे सर्वात मोठी समस्या होती ती मागणीची. भारतीयांसाठी सोन्याचे दागिने म्हणजे संपन्नतेचे प्रतीक. पण ही श्रीमंती मिरवण्याची संधी देणारे सर्व समारंभ नियमांच्या बंधनांत अडकले. अनेकांचे नोकरी-व्यवसाय बंद पडल्यामुळे आणि ज्यांचे सुरू होते त्यांच्याही पगार कपात झाल्यामुळे सोनेखरेदी त्यांच्या प्राधान्यक्रमात अगदी शेवटच्या स्थानीही राहिली नाही. ज्यांची उत्पन्नाची साधने अबाधित राहिली होती, त्यांनीही पुढच्या अनिश्चिततेचा अंदाज आल्याने दागिने खरेदीत हात आखडताच घेतला. र्निबध शिथिल झाले असले, तरी देशाच्या अनेक भागांत टाळेबंदीची मुदत वारंवार वाढवली जात होती. रेड झोनमधील दुकाने बंदच होती. शिवाय या काळात कोणतेही मोठे मुहूर्त वा सण-उत्सव नव्हते. साहजिकच सोन्याच्या दागिन्यांना असलेली मागणी २०१९च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तब्बल ७४ टक्क्यांनी घसरली. या काळात देशभरात मिळून केवळ ४४ टन सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली. पहिल्या सहामाहीचा (जानेवारी ते जून) विचार करता दागिन्यांना असलेली मागणी ६० टक्क्यांनी घटली आणि केवळ ११७.८ टन सुवर्णालंकारांची विक्री झाली.

२०१९च्या सुरुवातीपासूनच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) आलेख खालावतच चालला आहे. २०२० मध्ये कोविडच्या महासंकटाने या घसरणीची तीव्रता आणि गती अधिकच वाढवली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालानुसार ग्राहकांत खरेदीविषयी असलेल्या आत्मविश्वासाचा निर्देशांक मार्च २०२० मध्ये ८५.६ तर मे २०२० मध्ये ६३.७ पर्यंत गडगडला.

भारतीय ग्राहक हा आपल्या विश्वासातल्या सराफाच्या पेढीवर जाऊन मनाप्रमाणे दागिने घडवून घेतो. ऑनलाइन दागिनेखरेदी अद्याप भारतात फारशी रुळलेली नाही. कोविडच्या पाश्र्वभूमीवर हा ग्राहक सराफाकडे जाऊन संसर्ग ओढवून घेण्यास तयार नाही. घरात लग्नकार्य नसताना केवळ हौस म्हणून दागिने घडवून घेण्यासाठी ही योग्य वेळ नाही, असे या ग्राहकांना वाटते. त्यामुळे दागिने खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी सराफांनी आता ऑनलाइन पर्याय ग्राहकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

जागतिक स्तरावरही सोनेखरेदीची स्थिती निराशाजनकच आहे. जगातील अनेक देशांत भारताच्या तुलनेत खूप आधीच करोनाचा प्रसार सुरू झाला. त्यामुळे जागतिक स्तरावर पहिल्या सहामाहीत केवळ ५७२ टन सोने खरेदी करण्यात आले. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४६ टक्के कमी आहे आणि गेल्या १० वर्षांतील सरासरी १ हजार १०६ टनांच्या तुलनेत निम्मेच आहे. दुसऱ्या तिमाहीत गतवर्षीच्या तुलनेत ५३ टक्के कमी म्हणजे केवळ २५१ टन सोनेखरेदी झाली.

जगातील सुवर्णालंकारांच्या एकूण खरेदीत चीन आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असतात. दागिने खरेदीत त्यांचा वाटा नेहमीच मोठा असतो. पण या दोन्ही देशांना साथीचा जबरदस्त फटका बसला आणि त्याचे परिणाम जगभरातील सुवर्णालंकार खरेदीच्या आकडेवारीत प्रतिबिंबित झाले. पण जगभरातील अन्य मोठय़ा सराफ बाजारांच्या तुलनेत चीनमधील बाजार अधिक वेगाने सावरला. तिथे दुसऱ्या तिमाहीत सोने खरेदी गतवर्षीच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी घटली. त्या काळात तिथे एकूण ९०.९ टन सुवर्णालंकारांची खरेदी झाली. त्याच काळात अमेरिकेत मागणी ३४ टक्क्यांनी घटून १९.१ टन दागिन्यांची खरेदी झाली. थोडक्यात दैनंदिन गरजा भागणेच दुरापास्त झालेल्या ग्राहकांनी महागडय़ा सुवर्णालंकारांकडे पाठ फिरवली.

सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच सोन्याचे बार आणि नाणी खरेदी केली जाण्याचे प्रमाणही पहिल्या सहामाहीत घटले. जानेवारी ते जून दरम्यान ४८.८ टन बार आणि नाण्यांची खरेदी झाली. ही खरेदी गतवर्षीच्या तुलनेत ३९ टक्क्यांनी कमी आहे. दुकाने आणि बुलियन डीलर्सचा व्यवसाय मे महिन्याच्या मध्यापर्यंत बंदच होता. पेढय़ा उघडल्यानंतर हळूहळू सराफा बाजार सावरू लागला. सोन्याचे दर वाढल्यामुळे अनेकांनी आणखी फायदा मिळवण्याच्या उद्देशाने अधिक सोने खरेदी केली आणि आपल्या गुंतवणुकीत भर घातली, तर काहींनी आपल्याकडील सोन्याची विक्री करून नफा कमावण्याचा मार्ग स्वीकारला. टाळेबंदीच्या काळात ग्राहकांनी डिजिटल स्वरूपातील सोने खरेदीला काही प्रमाणात प्राधान्य दिले, मात्र तरीही हे प्रमाण एकंदर बाजाराचा विचार करता नाममात्रच ठरले.

या साथीच्या काळात जगभरातील अनेक बाजारांत सोने हीच सर्वोत्तम परतावा देणरी गुंतवणूक ठरली. पौर्वात्र्य देशांतील गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री करून फायदा मिळवण्यास प्राधान्य दिले, तर पाश्चिमात्य देशांतील गुंतवणूकदारांनी सावधपणे सोने खरेदी करून आपल्या ठेवींमध्ये भर घालण्याचा पर्याय स्वीकारला. सोन्याच्या वाढत्या दरांच्या पाश्र्वभूमीवर जगभरातील अनेक गुंतवणूकदारांनी ‘गोल्ड बॅक्ड एक्सचेंज ट्रेड फंड’ला (ईटीएफ) प्राधान्य दिले. त्यामुळे या क्षेत्रातली गुंतवणूक ७३४ टनांनी वाढली आणि जूनअखेरीस जगभरातील गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीने तीन हजार ६२१ टनांचा विक्रमी आकडा गाठला. सर्वच प्रकारच्या बचत आणि गुंतवणूक पर्यायांना फटका बसला असताना सोन्यातून अधिक परतावा मिळण्याची स्पष्ट चिन्हे असल्यामुळे ग्राहकांनी साहजिकच गोल्ड ईटीएफवर भर दिला.

गुंतवणुकीचा सर्वाधिक विश्वासार्ह पर्याय म्हणून असलेली सोन्याची ख्याती या साथीने सार्थ ठरवली. भारतात सोन्याकडे वारसा, प्रतिष्ठेचा भाग, कठीण काळातील पुंजी, लग्नकार्यातील अपरिहार्य घटक म्हणून पाहिले जाते. गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे डोळसपणे पाहण्याचे प्रमाण तसे कमीच आहे. शेअर्स, म्युच्युअल फंड, स्थावर मालमत्ता इत्यादी पर्यायांना आजचे भारतीय गुंतवणूकदार अधिक प्राधान्य देतात. सामान्य स्थितीत ते योग्यच आहे, पण बहुतेक गुंतवणूक सल्लागार एकूण गुंतवणुकीच्या किमान १०-१५ टक्के गुंतवणूक सोन्यात करण्याचा सल्ला देतात. त्यामागे आजच्यासारख्या संकट काळातही टिकून राहाता यावे, असा विचार असोत.

जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार भारतातील घराघरांत जपलेल्या सोन्याचे प्रमाण तब्बल २५ हजार टन एवढे अवाढव्य आहे. जगातील अन्य कोणत्याही देशातील घरगुती सोन्याच्या प्रमाणापेक्षा हे जास्त आहे. हे झाले केवळ घरातील सोन्याबाबत, देशातील मंदिरेही याबाबतीत समृद्ध आहेत. त्यांच्याकडे असलेले पुरातन काळापासूनचे अलंकार आणि देणगीच्या स्वरूपात आलेले दागिने मिळून सुमारे ४ टन सोने आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक कुटुंबांना आणि मंदिरांनाही आज त्यांचा हा पारंपरिक ठेवा आधार देत आहे. पर्सनल लोन मिळवण्यासाठी सादर करावी लागणारी अनेक कगदपत्रे आणि मोजावे लागणारे प्रचंड व्याज टाळण्यासाठी सुवर्णकर्जाचा पर्याय स्वीकारण्याकडे कल वाढला आहे. हे कर्ज तुलनेत सहज मिळते आणि त्याचे व्याजदरही कमी आहेत. सुवर्णकर्ज घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी काही संस्थांनी आपली सेवा घराच्या उंबरठय़ापर्यंत नेली आहे. त्यांचे मध्यस्थ ग्राहकाच्या घरी येऊन सोन्याचे वजन करतात आणि तिथल्या तिथे कर्ज मंजूर केले जाते. त्यामुळे संसर्गाच्या काळात घराबाहेर पाऊलही न ठेवणाऱ्यांनादेखील कर्ज मिळवणे शक्य झाले आहे. धार्मिक स्थळे बराच काळ बंद राहिली, महाराष्ट्रात तर ती आजही बंद आहेत. त्यामुळे देणगीच्या रूपाने मंदिरांकडे येणाऱ्या पैशांचा ओघ आटला आहे. मंदिरांतले सोने हे पवित्र किंवा देवाचे सोने मानले जाते. त्यामुळे सामान्यपणे कोणत्याही कारणासाठी त्याला हात लावला जात नाही. पण सध्या परिस्थितीच एवढी कठीण उद्भवली आहे की मंदिरांनाही त्यांच्या दैनंदिन देखभाल खर्चासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आपल्या या पवित्र आणि मौल्यवान ठेव्याचा वापर करावा लागत आहे.

एप्रिल-मे हा मुहूर्ताचा आणि लग्नसराईचा काळ तर हातचा गेला आहेच. आता सराफांचे डोळे लागले आहेत दसरा, दिवाळी आणि त्या मागोमाग येणाऱ्या लग्नसराईकडे. अनलॉकमुळे उद्योग, व्यवसाय अडखळत का असेनात, पण सुरू झाले आहेत. रुग्णसंख्याही काही प्रमाणात कमी होत आहे. संसर्गाच्या दहशतीला लोक सरावले आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांत दागिने खरेदी आणि सोन्यातील गुंतवणूकही वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सोन्याच्या दरांची झेप येत्या काळात अधिक उत्तुंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किमान लस उपलब्ध होईपर्यंत तरी दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या साथसंकटाने गुंतवणुकीची गणिते पुरती बदलवली आहेत. या मौल्यवान धातूची गुंतवणुकीचा सार्वकालिक सुरक्षित पर्याय म्हणून असलेली ओळख अधोरेखित केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 8:16 am

Web Title: gold helps in crisis gold investment gold loan coverstory dd70
Next Stories
1 करोना रुग्णांतील घट किती खरी, किती खोटी?
2 ‘विकासा’च्या वाटेवर मुली असुरक्षितच!
3 राजकारणाला मिळाला हमीभावाचा मुद्दा!
Just Now!
X