28 May 2020

News Flash

मराठी सिनेमांना ‘अच्छे दिन?’

दोन-चार चांगले सिनेमे झळकले की मराठी सिनेमांना आता चांगले दिवस आले, मराठी सिनेमात वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले आहेत, अशी चर्चा सुरू होते. पण खरोखरच तशी

| February 6, 2015 01:13 am

दोन-चार चांगले सिनेमे झळकले की मराठी सिनेमांना आता चांगले दिवस आले, मराठी सिनेमात वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले आहेत, अशी चर्चा सुरू होते. पण खरोखरच तशी परिस्थिती आहे का?

स्मार्टफोन, स्काईप, मेट्रो ट्रेन, झटपट घटस्फोट, क्रोमकास्ट अशा ‘नवीन युगा’तही मराठी चित्रपट रसिक काहीसा भाबडाच म्हणायचा हो..
बघा ना,
समृद्धी पोरे दिग्दर्शित डॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो’ हा अत्यंत अवघड चरित्रपट पाहून खूप खूप भारावून जायला झाले. मराठीत चित्रपटाच्या चौकटीत हेमलकसा व तेथील डॉ. प्रकाश आमटे यांचे सेवाजीवन व्यवस्थित मांडले म्हणून मराठी चित्रपटाबाबत विशेष अभिमान वाटला.
काही आठवडे याच चित्रपटाचे मंतरलेले दिवस होते. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘एलिझाबेथ एकादशी,’ गणेश कदम दिग्दर्शित ‘विटीदांडू’, सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘हॅप्पी जर्नी’ हे एकामागोमाग झळकल्याने तर ‘मराठी चित्रपटात केवढी तरी विविधता दिसू लागली आहे.’ ‘मराठी चित्रपट आशयदृष्टय़ा संपन्न झाला,’ ‘मराठी चित्रपटाने हिंदी चित्रपटाच्या अस्तित्वापुढे आव्हान उभे केले’ असे सकारात्मक वातावरण तयार झाले. मराठी चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे व जागरूक मराठी चित्रपट रसिक या साऱ्यांचा उत्साह, आशावाद वाढावा असे हे दिवस आले. मराठी चित्रपट किती गुणवान, दर्जेदार आहे, यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील लोक प्रमाणपत्र देऊ लागले. मराठी चित्रपटाच्या जाहिरातीत खरं तर मराठी चित्रपटावर मराठी साहित्यिक, विचारवंत, काहीच नाही तर मराठीतील मान्यवर कलाकार यांची मते, प्रतिक्रिया यायला हव्यात. मराठी समाजाला त्याबाबत ‘आपलेपण’ वाटेल. पण हिंदी चित्रपटसृष्टीकडून मराठी चित्रपटाची ‘तारीफ पे तारीफ’ झाल्याने बहुधा त्या हिंदी सिनेमावाल्यांचा मान-पान-शान ठेवला जात असेल. एकदा काही चांगले घडायचे म्हटलं, की ते चहूबाजूने घडू लागते, त्याचे ‘स्वागत’ करण्यातच शहाणपण आहे.
पण असे काही दर्जेदार मराठी चित्रपट बौद्धिक आनंद देत असताना त्या स्तुतीमागे किती तरी मराठी चित्रपट झाकले जात आहेत त्याचे हो काय?
वर्षभरात तब्बल सव्वाशे मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागलेत, त्यातील सर्वच्या सर्व चित्रपट दर्जेदार असतील असे शक्यच नाही. जगातील कोणत्याही भाषेतील चित्रपटनिर्मितीत शंभर टक्के दर्जात्मक निर्मिती शक्यच नाही. कारण चित्रपटनिर्मितीमागचे अनेकांचे हेतू भिन्न असतात. ‘कलेसाठी कला’ या भावनेपासून ‘टाइमपास’साठी निर्मिती आणि ‘वेगळे काही दाखवूया’ या भावनेपासून ‘हुकमी मसालेदार मनोरंजनाला प्राधान्य देऊ या’ यापर्यंत अनेक प्रकारचा ‘दृष्टी’कोन बाळगून चित्रपटनिर्मिती होत असते. काहीना ‘थीम’ अर्थात विषय खूप चांगला सुचतो, पण त्यावर ‘पटकथा’ रचता येत नाही. काहींना वीतभर प्रेमकथा सुचते, ती खुलवण्यासाठी ते बऱ्याच गाण्यांचे ‘माध्यम’ वापरतात. काहीजण, अमुक मराठी चित्रपटाने २०-३० कोटीची कमाई केली अशा प्रचारकी बातम्यांना ‘भुलून’ येथे येतात. ‘गल्ला पेटी’वरील त्या कमाईतून निर्मिती खर्च, पूर्वप्रसिद्धी मार्केटिंग, विविध प्रकारचे कर, चित्रपटगृहाचं भाडं हे सगळे वगळून ‘शेवटचा खरा आकडा’ हाती किती येतो हे कोणी पाहतच नाही. फायद्याची पातळी दहा टक्के असावी. कोणी दोन-चार चित्रपट महोत्सवांना हजर राहून प्रचंड भारावून वगैरे जातो व पुढील चित्रपट महोत्सवात आपला छोटासा का होईना, पण वेगळा चित्रपट बनवण्याची धडपड सुरू करतो. कोणी एकदम जगभरातील चार-पाच चित्रपट महोत्सवात ‘आपला सिनेमा’ सहभागी होणारच या खात्रीने कोणत्याही विषयावर चित्रपट काढतो. काही निर्मात्या चित्रपटनिर्मितीची हौस पूर्ण करण्यासाठी पतीने दिलेल्या आर्थिक ताकदीवर दिग्दर्शिका बनतात. कोणी खूप पैसा आहे म्हणून ‘एकादा मराठी चित्रपट काढायचे’ पाऊल टाकतात. बडय़ा निर्मिती संस्था, छोटे निर्माते, नवखे निर्माते हे माध्यम व व्यवसाय याबाबत काहीच माहिती नसणारे दिग्दर्शक, कोणी एक-दोन महा मालिकांच्या दिग्दर्शनाचा अनुभव (?) पुरेसा आहे (?) असे मानत चित्रपटाकडे आलेले दिग्दर्शक.. निर्मात्यांचे किती प्रकार याला निश्चित उत्तर नाही. दिग्दर्शकांच्या किती तऱ्हा यालाही तसे काही नेमके उत्तर नाही. ते शोधू देखील नये. अशा अनेक प्रकारच्या निर्माता व दिग्दर्शक यांनी ‘गोळाबेरीज’ म्हणजे मराठी चित्रपटांची वाढता वाढता वाढती संख्या. त्यातून नेमके निष्पन्न काय होते?
तर चार-पाच दर्जेदार मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत असे वातावरण खुलवत-फुलवत असताना दहा-बारा मराठी चित्रपट कधी बरे प्रदर्शित होऊन जातात हे फारसे समजत नाही. ते सगळेच सामान्य, टाकाऊ अथवा फसलेले असतात असे ‘रोखठोक’ विधान करता येणार नाही. कारण, मुद्दाम ठरवून कोणी वाईट चित्रपट निर्माण करीत नसतो व आपल्या चित्रपटात काही तरी ‘पाहण्यासारखे’ आहे हा प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकांचा दावा असतो. ‘मध्यमवर्ग’ चित्रपट मराठीतील भोजपुरी’ असे कोणी थट्टेने म्हटले तरी त्यात दीपाली सय्यदच्या कडक फक्कडबाज आयटेम नृत्यासह सर्व प्रकारचा मसाला असतो. तोच प्रेक्षकांना देणे हाच दिग्दर्शकाचा हेतू असतो. त्याचे ‘लक्ष्य’ अगदी स्पष्ट असते. त्याला पिटातल्या पब्लिकला कोणताही सामाजिक संदेश वगैरे द्यायचा नसतो. ‘गल्लापेटी’बाबतचे गणित अगदी स्पष्ट व शुद्ध असते. ‘गुलाबी’सारख्या पोस्टरपासूनच अत्यंत भडक वाटणाऱ्या चित्रपटाची ‘स्टोरी’देखील तशीच असते. चित्रपटाच्या कथावस्तूवर (?) ‘पिंजरा’च्या कथासूत्राचा प्रभाव असला तरी दिग्दर्शक गुड्ड धनवाला चित्रपती व्ही. शांताराम यांच्याशी आपली तुलना व्हावी वगैरे वाटत नसते. तो अत्यंत उघडपणे आपल्याच ‘जिद्दी’, ‘सलाखे’ अशा हिंदीतील पठडीतील बटबटीत, भडक चित्रपट निर्माण करतो. अगदी पाखी हेगडेकडून तो अपेक्षित अशी धाडसी दृश्यदेखील करवून घेतो. तीदेखील डान्स गर्लच्या भूमिकेला चक्क सणसणीत न्याय देते. सचिन खेडेकरदेखील, ‘आपण एखादा असा चित्रपट करून पाहूयात, एक वेगळा अनुभव मिळेल’ असा विचार करून कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याची एका नर्तकीमध्ये वाहवत जाणारी व्यक्तिरेखा साकारतो. हे सगळं अगदी व्यावसायिकता व प्रामाणिकता यांचा व्यवस्थित मेळ घालून होते. ‘आशियाना’ चित्रपटात भिन्न सामाजिक स्तर व अडथळे, अडचणी यांतून आलेल्या तीन युवती डान्स बार गर्ल कशा बनतात याची व्यथा असते. विषयानुसार ‘पडद्याचा’ रंग भडक बनतो. पण ती तर गरजच असते.
पण या असे किती तरी चित्रपट फारसे स्वीकारले का जात नाही? काहींच्या यशाला मर्यादा का पडते? काही चित्रपट मोजून अवघ्या एक-दोन आठवडय़ातच ‘गल्ला पेटी’वरून हद्दपार का होतात?
चित्रपटाप्रमाणे याची उत्तरे बदलतात का?
काही काही मराठी चित्रपट ‘पोस्टर’पासूनच कंटाळा आणतात. आता इतका सामान्य दर्जाचा चित्रपट का निर्माण होतो? त्यासाठी वेळ, पैसा, शक्ती व गोडगुलाबी मुलाखती हे सगळे का खर्च होते?
याचे कारण, एकच; कलेच्या माध्यमात तीन प्रकारचे ‘कारागीर’ आहेत. एक म्हणजे कुशल. ते ‘टपाल’सारखे चित्रपट निर्माण करतात. दुसरे म्हणजे ‘अर्धकुशल’. ते ‘पुणे व्हाया बिहार’ यासारखे चित्रपट बनवतात. (थोडा प्रयत्न केला असता तर हा चित्रपट वेधक होऊ शकला असता) व तिसरे म्हणजे अकुशल. यामध्ये ‘बोल बेबी बोल’सारख्या किती तरी चित्रपटांची नावे घेता येतील. अर्थात, बरेचसे चित्रपट ‘आर्थिक गुंतवणूक करून आणखीन पैसे कमावण्यासाठीच निर्माण केलेले असतात. पण तशी योग्यता आपण पडद्यावर आणू शकलो का, याचे आत्मपरीक्षण करण्याची किती सिनेमावाल्यांची मानसिक तयारी आहे? समीक्षकांनी झोडपल्यानेच आपला चित्रपट ‘पडला’ असा काहींचा कांगावा असतो, पण मग ‘सौ. शशी देवधर’, ‘कॅन्डल मार्च’ यांना मुद्रित माध्यम, उपग्रह वाहिनी व वेबसाइट अशा तीनही ठिकाणांवरून ‘तारीफ पे तारीफ’ होऊनदेखील त्यांच्या यशाला मर्यादा का बरे पडावी? ‘कॅन्डल मार्च’च्या प्रसिद्धीचा ‘फोकस’ उत्तम होता, वातावरण निर्मितीही उत्तम होती. तरी दुसऱ्याच आठवडय़ात तो संपूर्ण मुंबईत अवघ्या दोनच चित्रपटगृहांत शिल्लक राहिला हे आश्चर्याचे आहे.
कोणताही व्यवसाय यशावर चालतो. चित्रपटाच्या जगात तर ‘हौस’फुल्ल गर्दीसारखे सुख नाही. त्यामुळे अख्खी चित्रपटसृष्टी प्रफुल्लित होते. एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरते. ‘चित्रपट चालण्याचे दिवस आहेत’ असे मनोमन मानत मध्यम व छोटे निर्माते आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचे पाऊल उचलतात. तेव्हा त्यांना पूर्वप्रसिद्धीचा खर्च व चित्रपटगृहे मिळण्यातील अडथळे यांचा सामना करावा लागतो व आपण बडय़ांशी स्पर्धा करू की नाही या शंकेने त्यांना ग्रासले जाते. त्याही आव्हानात्मक परिस्थितीत गोंदण, नदी, कॅम्पस कट्टा, भाकरवाडी सात किलोमीटरसारखे चित्रपट झळकतात. पण बडय़ांच्या स्पर्धेत त्यांची दुर्दैवाने फारशी कोणी दखल घेत नाहीत. हे चित्रपट कितपत चांगले अथवा वाईट आहेत याचे मूल्यमापन होईपर्यंत ते कुठे तरी मागे पडल्याचे जाणवते. ‘तप्तपदी’ची अधिक चर्चा व्हायला हवी होती. १९४०चा काळ व कथेचा फोकस खूप चांगला होता. ‘तुझी माझी लव्हस्टोरी’ मनोरंजक होता, पण मोठय़ा आकाराच्या जाहिरातीने पूर्वप्रसिद्धी होते या गैरसमजात अनेक चित्रपट सापडतात, तसे झाले. मुंबईच्या वृत्तपत्रांतील जाहिरातीत असंख्य मैल दूरवरच्या असणाऱ्या चित्रपटगृहांची नावे ती कशाला हवीत? विलेपार्लेचा चित्रपट रसिक ती जाहिरात वाचून सांगोला, नातेपुते, लातूर येथे जाणार आहे का? भली मोठी जाहिरात अशा चुकीच्या संकल्पनेत मराठी चित्रपट सापडलाय. दुसऱ्याच आठवडय़ात त्याचा आकार लहान होताच, हसे होते. तर ‘गुरुपौर्णिमा’ची जाहिरातबाजी खूप होती, तरी ती उत्सुकता वाढवू न शकल्याने सई ताम्हणकरची दुहेरी मेहनत दुर्दैवाने दुर्लक्षित झाली.
‘लय भारी’, ‘पोश्टर बॉइज’, ‘रेगे’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या चित्रपटांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘रेगे’ वेगळा होता, दृश्यमाध्यमाचा प्रभावी वापर त्यात दिसला. निशिकांत कामतने ‘लय भारी’सारखा नॉन्सेस सिनेमा सेन्स वापरून भारीच खुलवला. ‘पाहा, एन्जॉय करा व विसरा’ हे त्याचे सूत्र होते. पोश्टर बॉइजने दादा कोंडके यांच्या द्वयर्थी संवादाच्या चित्रपटाची संस्कृती जागवली. सिनेमा तेवढा घसरला नाही. ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’वर ‘दुनियादारी’चा प्रभाव होता.
एकीकडे, ‘पैसा वसूल’ मनोरंजन व दुसरीकडे बौद्धिक मनोरंजन अशा दोन प्रकारच्या चित्रपटांत मराठीचे वातावरण सुखद वाटले, पण त्याच्या आड किती तरी मराठी चित्रपटांची आवकजावक सुरू आहे. ‘चिंतामणी’ निराश करतो, तर ‘पोस्टकार्ड’ची कुठे चर्चा सुरू होते तोच तो मागे पडतो.
मग मराठी चित्रपटाला खूप चांगले दिवस आलेत का, या प्रश्नाचे काय.. तसे खरंच आहे का असं विचारलं तर होय, तसे ‘दिसते’ तर खरे असं उत्तर येतं. पण मग मराठी चित्रपटाचे सुगीचे दिवस हे फसवे चित्र आहे का, या प्रश्नालाही हे अगदीच नाकारू शकत नाही, असंही उत्तर येतं. म्हणजेच चार दर्जेदार मराठी चित्रपटामागे काही चित्रपट हरवतात ही वस्तुस्थिती आहे..
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2015 1:13 am

Web Title: good time for marathi movie
Next Stories
1 नीओ-नॉईर चित्रपट ‘बदलापूर’
2 छोटा पडदा : खलनायिका हूं मैं..
3 नाचू आनंदे : नृत्यसंरचना- सर्वत्र, सर्वव्यापी
Just Now!
X