News Flash

तंत्रज्ञान : गूगल फोटो स्टोरेज आता मोजावे लागणार पैसे

गूगलने आपल्या वापरकर्त्यांना दिलेली मर्यादित मोफत स्टोरेजची सेवा १ जून २०२१ पासून बंद केली आहे.

वापरकर्त्यांना हाय रिझोल्यूशन आणि एक्स्प्रेस रिझोल्यूशनचे फोटो १ जूनपासून गूगल फोटो स्टोरेजमध्ये मोफत ठेवता येणार नाहीत.

स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com

गूगलने आपल्या वापरकर्त्यांना दिलेली मर्यादित मोफत स्टोरेजची सेवा १ जून २०२१ पासून बंद केली आहे. वापरकर्त्यांना हाय रिझोल्यूशन आणि एक्स्प्रेस रिझोल्यूशनचे फोटो १ जूनपासून गूगल फोटो स्टोरेजमध्ये मोफत ठेवता येणार नाहीत. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्येच कंपनीने या संदर्भातील घोषणा केली होती. स्मार्टफोन यूझर्सवर या गोष्टीचा थेट परिणाम होणार असून लवकरच त्यांना मोबाइल कॅमेऱ्यातून फोटो काढताना स्टोरेजचा विचार करावा लागण्याची शक्यता आहे. गूगलने ही सुविधा बंद केल्यामुळे वापरकर्त्यांना आता गूगल क्लाऊडवरील स्टोरेजचा वापर करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. गूगल फोटोजच्या या बदललेल्या धोरणांच्या पाश्र्वभूमीवर वापरकर्त्यांंना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे –

गूगल फोटोज स्टोरेजचं धोरण आधी काय होतं आणि आता काय बदललं आहे?

गूगल फोटोजची सुरुवात सहा वर्षांपूर्वी म्हणजे २८ मे २०१५ रोजी झाली होती. ही गूगलकडून दिली गेलेली मोफत फोटो शेअरिंग आणि स्टोरेज सेवा होती. तेव्हापासून अगदी कालपर्यंत ही सेवा गूगलचं अकाऊंट असणाऱ्या प्रत्येकाला मोफत वापरता येत होती. यामध्ये हाय रिझोल्यूशन फोटोंपासून व्हिडीओपर्यंतचा कण्टेण्ट अपलोड करून क्लाऊड स्टोरेजच्या माध्यमातून सुरक्षित ठेवता येत होता. मात्र आता गूगलने धोरणांमध्ये बदल केला असून १५ जीबीपेक्षा अधिक स्पेस हवी असल्यास ती वापरकर्त्यांना विकत घ्यावी लागणार आहे.

गूगलकडून १५ जीबीची (गिगाबाईट) स्टोरेज स्पेस मोफत दिली जाते. जीमेल, गूगल ड्राइव्ह आणि फोटोज या तिन्ही गोष्टींसाठी ही मेमरी समान पद्धतीने वाटून दिली जाते. आधीच्या धोरणांनुसार हाय रिझोल्यूशन तसेच एक्स्प्रेस रिझोल्यूशन फोटो कॉम्प्रेस फॉरमॅटमध्ये साठवले जायचे. मात्र त्यासाठी लागणारी स्टोरेज स्पेस ही फ्री स्टोरेजमधून वापरली जात नसे. म्हणजेच मेमरीची चिंता न करता अनेकांना फोटो थेट गूगल स्टोरेजवर अपलोड करता येत होते. मात्र १ जूनपासून सर्व फोटोंचा समावेश मोफत देण्यात येणाऱ्या १५ जीबी मेमरीमध्येच होईल. म्हणूनच यापुढे वापरकर्ते नवीन नवीन फोटो अपलोड करत राहिले तर स्टोरेज स्पेस संपून त्यांना अतिरिक्त स्टोरेज गूगलकडून विकत घ्यावी लागेल.

किती असणार स्टोरेज स्पेसची किंमत?

गूगलने ‘गूगल वन स्टोरेज’ नावाने सुरू केलेल्या सेवेचा पेड सबस्क्रिप्शन पद्धतीने लाभ घेता येईल. वापरकर्त्यांना १०० जीबी किंवा त्याहून अधिक पटीत स्टोरेज विकत घेता येईल. यासाठी गूगलने वेगवेगळे प्लान्स आणले आहेत. बेसिक प्लानमध्ये १०० जीबी स्टोरेजसाठी वर्षांला १३०० रुपये किंवा महिन्याला १३० रुपये भरावे लागणार आहेत.

२०० जीबी प्लान हा महिन्याला २१० रुपये किंवा वर्षांला दोन हजार १९९ रुपये दराने घेता येईल. या व्यक्तिरिक्त जास्त वापर असणाऱ्यांसाठी दोन टीबी (टेराबाईट) स्टोरेजसाठी महिन्याला ६५० रुपये किंवा वर्षांला सहा हजार ५०० रुपये तर १० टीबी स्टोरेजसाठी महिन्याला तीन हजार २५० रुपये, २० टीबीसाठी महिन्याला साडेसहा हजार तर ३० टीबीसाठी महिन्याला नऊ हजार ७५० रुपये दर आकारला जाईल.

आधी अपलोड केलेल्या फोटोंचं काय?

गूगलने दिलेल्या माहितीनुसार १ जून २०२१च्या आधी अपलोड करण्यात आलेल्या फोटोंसाठी नवीन धोरण लागू होणार नाही. त्यामुळेच वापरकर्त्यांंनी गूगलच्या या सेवेसाठी सबस्क्रिप्शन घेतलं नाही तरी १ जूनआधी अपलोड करण्यात आलेल्या फोटोंचा समावेश मोफत देण्यात आलेल्या १५ जीबीमध्ये होणार नाही. म्हणजेच आधीपासून गूगल फोटोजमध्ये असणारे हाय रिझोल्यूशन किंवा एक्स्प्रेस रिझोल्यूशन फोटो वापरकर्त्यांना स्टोरेज भरण्याच्या भीतीने डीलीट करावे लागणार नाहीत. मात्र १ जूननंतरचे सर्व फोटो हे स्टोरेज स्पेसमध्येच गृहीत धरले जातील.

किती स्पेस वापरली हे कसं ओळखायचं?

गूगल अकाऊंट लॉगइन करून one.google.com/storage/management या लिंकवर वापरकर्त्यांना त्यांनी किती मेमरीचा वापर केलाय याची माहिती मिळवता येईल. या लिंकवर एखाद्या अकाऊंटशी संबंधित कोणत्या फाइल्स डीलीट करता येतील याची यादी आणि पर्यायही दिले जातात. फोटोज, जीमेल आणि ड्राइव्ह अशा तीन भागांमधील वापरात नसलेला कोणता डेटा डीलीट करून मेमरी फ्री करता येईल याचेही पर्याय दिले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 5:25 pm

Web Title: google photos storages free storage ending chargable tecnonology tantradnyan dd70 2
Next Stories
1 तंत्रज्ञान : रॅनसमवेअर.. ऑनलाइन खंडणीखोर!
2 राशिभविष्य : ४ जून ते १० जून २०२१
3 अर्धसत्य
Just Now!
X