येत्या १९ फेब्रुवारी रोजी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मृत्यूला शंभर वर्षे होत आहेत. ब्रिटिशकाळातील भारतीय राजकारणावर सखोल परिणाम करणाऱ्या नामदार गोखले यांना आदरांजली-

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेच्या वतीने राज्यकारभार करतात. जनतेच्या हिताचे रक्षण करणे, नागरिकांचे मूलभूत हक्क शाबूत राखणे हे या प्रतिनिधींचे प्रमुख काम असते. त्यामुळेच लोक प्रतिनिधी हा संसदीय लोकशाहीचा केंद्रबिंदू असतो. स्वातंत्र्योत्तर भारताच्या संसदेमध्ये अनेक दिग्गज संसदपटू होऊन गेले. ज्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा असे पंडित जवाहरलाल नेहरू, बॅ. नाथ पै, अटलबिहारी वाजपेयी, मधु लिमये आदी महनीय व्यक्ती आहेत. अशा या आदर्श भारतीय संसदेचा पाया ब्रिटिश काळातच ‘इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काऊन्सिल’च्या रूपाने घातला गेला होता. हिंदुस्थानचे सुपुत्र नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी इंपिरियल काऊन्सिलमधील आपली कारकीर्द गाजवली होती व सवरेत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा गौरव झालेला होता.
उत्कृष्ट वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती व त्यायोगे प्राप्त झालेले विषयाचे सखोल ज्ञान, प्रखर राष्ट्रभक्ती, जनहिताची तळमळ अशा उत्तम संसदपटूला आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा समुच्चय गोखलेंच्या ठायी झालेला होता. या गुणांव्यतिरिक्त त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे ते इंपिरियल काऊन्सिलचे आकर्षण ठरत.
संसदपटू म्हणून गोखलेंची कारकीर्द बॉम्बे काऊन्सिलच्या माध्यमांतून सुरू झाली. (डिसेंबर १८९९). मुंबई इलाख्याच्या या गव्हर्नर्स लेजिस्लेटिव्ह काऊन्सिलवर फक्त आठ सदस्य अप्रत्यक्षरीत्या (Indirectly) निवडले जात. तत्कालीन बॉम्बे, उर्वरित महाराष्ट्र, गुजरात आणि सिंध प्रांतांचे प्रतिनिधित्व हे सभासद करत. गोखले बॉम्बे काऊन्सिलचे सभासद झाले तेव्हा सँडहर्स्ट हे गव्हर्नर होते. ‘नॉन ऑफिशियल’ असा या सभासदांचा दर्जा होता. त्यांना कुठलेही बिल मांडण्याचा अधिकार नव्हता; परंतु ते चर्चेत सहभागी होऊ शकत. वेगवेगळ्या विषयांवरील गोखलेंची भाषणे, ऐतिहासिक ठरली. बॉम्बे काऊन्सिलमधील त्यांच्या कामगिरीमुळे ते ‘रायझिंग स्टार ऑफ द डेक्कन’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
फिरोजशहा मेहतांनी राजीनामा दिल्यामुळे इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काऊन्सिलचा सभासद होण्याची सुवर्णसंधी गोखलेंना एप्रिल १९०१च्या सुमारास प्राप्त झाली. फिरोजशहांच्या रिक्त झालेल्या जागेवर गोखलेंची एकमताने निवड झाली. गोखलेंना इंपिरियल काऊन्सिलचे सभासद निवडून येण्यास स्वत: फिरोजशहांनी पाठिंबा दिला तर टाइम्स ऑफ इंडियाच्या बेनेट यांनीही मदत केली. इब्राहिम रहिमतुल्ला व बोमनजी दिनशा पेटीट या इतर दोन उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. सदस्य म्हणून कायदेमंडळाच्या कामकाजात १९०२ साली त्यांनी प्रथम भाग घेतला व १९१५ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते या लेजिस्लेटिव काऊन्सिलचे सभासद होते.
कायदे मंडळांतील गोखलेंची निवड ही अतिरिक्त सभासद म्हणूनच झालेली होती व तत्कालीन राज्यघटनेनुसार या अतिरिक्त सदस्यांना स्वत:हून कुठला ठराव किंवा बिल मांडण्याचा अधिकार नव्हता. परंतु ते अर्थसंकल्पावर किंवा व्हॉइसरॉयच्या एक्झिक्युटिव काऊन्सिलने मांडलेल्या ठरावावर चर्चा करू शकत. गोखलेंसारखा जागरूक सदस्य या संधीचा फायदा उठवत अर्थसंकल्पाव्यतिरिक्त इतर प्रश्नांवरील चर्चेतही हिरिरीने भाग घेत असे. पुढे मोर्लेमिंटो सुधारणान्वये या सदस्यांना जनतेच्या हिताच्या प्रश्नासंबंधी प्रस्ताव देण्याचा किंवा चर्चा घडवून आणून मतविभागणी मागण्याचा अधिकार मिळाला.
विविध विषयांवरील गोखलेंच्या अभ्यासपूर्ण भाषणाने व त्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाने सत्ताधारी निष्प्रभ होत. गोखलेंनी इंपिरियल काऊन्सिलमध्ये द प्रेस बिल (फेब्रु १९१०), एलिमेंट्री एज्युकेशन बिल (मार्च १९१०) वगैरे विषयांवर भाषणे केली. परंतु गोखलेंची अर्थसंकल्पावरील भाषणे सर्वाधिक गाजली. १९०२ ते १९१२ या कालावधीत त्यांनी अर्थसंकल्पावर भाषणे केली व ती सर्व सवरेत्कष्ट म्हणून गणली जातात. गोखलेंच्या भाषणामध्ये त्यांनी विषयाची पूर्ण तयारी केली आहे. हे लक्षात येत असे. अर्थसंकल्पाची निर्भयतेने चिरफाड करत असतानाच ते विधायक सूचना करत. त्यांच्या अर्थसंकल्पावरील भाषणाची संपूर्ण हिंदुस्थान औत्सुक्याने वाट बघत असे. १९१३ साली अर्थसंकल्पावर त्यांचे भाषण झाले नव्हते. त्यावेळेस अर्थसंकल्प समितीचे सभासद गाय विल्सन म्हणाले, ‘दॅट टू डिस्कस द बजेट विदाऊट गोखले वॉज लाइक प्लेइंग हॅम्लेट विथ द पार्ट ऑफ द प्रिन्स ऑफ डेन्मार्क लेफ्ट आऊट’ गोखलेंच्या गैरहजेरीमुळे किती मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ते नवीन सभासदांना समजणे कठीण आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
१९०२ सालचे गोखलेंचे अर्थसंकल्पावरील पहिलेच भाषण सत्ताधाऱ्यांना धक्का देणारे ठरले. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात दाखवलेल्या सात कोटी रुपयांच्या शिलकेची त्यांनी खिल्ली उडवली. जर सात कोटी रु. शिल्लक राहात असतील तर सरकारने जनतेकडून इतके पैसे वसूल करण्याचे कारणच नाही, अशी जोरदार टीका त्यांनी केली. अर्थसंकल्पामुळे जनतेची सद्य:स्थिती आणि देशाची आर्थिक स्थिती यामध्ये सुसंवाद नसल्याचे स्पष्ट होत आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. सरकारने लादलेल्या करांविषयी ते बोलले, ‘अ टॅक्सेशन सो फोर्सड् अ‍ॅज नॉट ओन्ली टू मेन्टेन अ बजेटरी इक्विलिब्रियम बट टू यिल्ड अ‍ॅज वेल लार्ज, कंटिन्यूयस, प्रोग्रेसिव्ह सरप्लसेस इव्हन इन इयर्स ऑफ ट्रायल अ‍ॅण्ड सफरिंग, आय सबमिट, अगेन्स्ट ऑल अ‍ॅक्सेप्टेड कॅनन्स ऑफ फायनान्स’ आपल्या उपरोधित भाषणांत त्यांनी सरकारी उधळपट्टीवर कडाडून हल्ला चढवला. करांच्या रूपांत गोळा केलेल्या पैशाचा व्यय योग्य तऱ्हेने करणे हे सरकारचे कर्तव्य आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. एकीकडे सरकार रेल्वेचे जाळे पसरवण्यासाठी भरमसाट खर्च करत आहे, तर जलसिंचनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहे. ब्रिटिश साम्राज्य वाढवण्यासाठी लष्करावर वारेमाप खर्च होत आहे हे त्यांनी कठोरपणे निदर्शनास आणले. लॉर्ड कर्झन यांनी लष्करावरील खर्च कमी करता येणार नाही, असे ठामपणे सांगितल्यानंतर गोखलेंनी एक अभिनव विचार मांडला. ते म्हणाले, जर लष्करावरील खर्च कमी करता येत नसेल तर तो ब्रिटनच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची शक्यता पडताळून पाहावी.
अर्थसंकल्पावरील गोखलेंच्या पहिल्या भाषणापूर्वीचा पायंडा असा होता की, काऊन्सिलमधील भारतीय सदस्य अर्थसंकल्पावर विरोधी मत व्यक्त करत नसत, फारतर एखाद दुसऱ्या किरकोळ विषयावर दुरुस्ती सुचवत. सर्व जण शिलकीच्या अर्थसंकल्पाबद्दल अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करत. त्यामुळे अर्थसंकल्पावरील गोखलेंचे सडेतोड भाषण हे हिंदुस्थानच्या जनतेला आश्चर्याचा सुखद धक्का देणारे ठरले, तर सरकारमधील उच्चपदस्थांचा जळफळाट होण्यास कारण झाले. देशामध्ये सर्वत्र गोखलेंच्या विचाराचे स्वागत झाले. एका वर्तमानपत्राने अशा तऱ्हेची घटना पहिल्यांदाच घडली, असे म्हटले. तर एका ब्रिटिशधार्जिण्या वृत्तपत्राला गोखलेंचे विचार अर्थातच पटले नाहीत, तरीही ते आमचे म्हणजे (Western India चे ) आहेत म्हणून त्यांनी गोखलेंची स्तुती केली. सर्वात सुंदर प्रतिक्रिया कोलकात्याच्या एका ब्रिटिश वृत्तपत्राची होती. ते लिहितात, मिस्टर गोखले, अ मेंबर फ्रॉम बॉम्बे मेड अ स्लॅशिंग अ‍ॅटॅक ऑन द होल फायनान्शियल पोझिशन ऑफ द गव्हर्नमेंट अ‍ॅण्ड द एक्स्प्लोजन ऑफ अ बॉम्बशेल इज देअर मिड्स्ट कुड हार्ड्ली हॅव क्रिएटेड ग्रेटर सरप्राइज अ‍ॅण्ड कॉन्स्टेरनेशन इन द मिड्स्ट ऑफ द सीडेट असेम्ब्ली. गोखलेंच्या वक्तृत्वशैलीची स्तुती करताना संपादक म्हणतात, गोखलेंच्या भाषणात तारुण्यातील धिटाई, भाषेची अस्खलितता आणि विषयाची तंत्रशुद्ध मांडणी यांचा मनोज्ञ संगम झाल्यामुळे त्यांचे भाषण ऐकणे ही एक पर्वणीच ठरली.
इंपिरियल काऊन्सिलमध्ये गोखलेंचा एवढा दबदबा निर्माण झाला की, अर्थखात्याचे एक सदस्य गाय फ्लीटवूड म्हणाले, ‘द वन मॅन आय फ्रॅन्कली फीअर्ड वॉज गोखले, ‘द ग्लॅडस्टोन’ ऑफ इंडिया. लॉर्ड मिंटो त्यांना ‘लीडर ऑफ द नॉन ऑफिशियल्स इन द लॅजिस्लेटिव्ह काऊन्सिल’ असे म्हणत. तर काऊन्सिलचे आणखी एक सदस्य अली इमाम हे गोखलेंचा उल्लेख ‘लीडर ऑफ द आपोझिशन ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस’ असा करत.
गोखलेंनी दादाभाईंप्रमाणे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये प्रवेश करावा, असे अनेकांचे मत होते. यामुळे आपणास वैयक्तिक मानसन्मान मिळेल, परंतु देशाच्या सक्रिय राजकारणापासून आपण दूर जाऊ, अशा विचाराने त्यांनी हा प्रस्ताव गांभीर्याने घेतला नाही. हिंदुस्थानातील राष्ट्रीय उत्थानाचे एक प्रमुख नेते व इंपिरियल काऊन्सिलमध्ये तेजाने तळपणारे उत्कृष्ट संसदपटू म्हणून गोखलेंची कीर्ती एव्हाना साता समुद्रापार पोहोचली होती. अमेरिकेतील ‘सिव्हिल फोरम ऑफ न्यूयॉर्क’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या बिगर राजकीय संस्थेमध्ये ‘हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळ’ या विषयावरती भाषण करण्याचे त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण मिळाले. परंतु गोखले हे निमंत्रण स्वीकारू शकले नाहीत.
राष्ट्रहिताच्या प्रश्नावर चर्चा करताना विचारांतील पारदर्शकता, आपल्या विचारांवरील ठाम निष्ठा व ते निर्भयपणे मांडण्याचे धैर्य व कौशल्य यामुळे गोखले हे स्वातंत्र्य चळवळींतील एक अग्रणी बनले. सुशिक्षितांमध्ये ते खूपच प्रसिद्ध होते. सरकार व सरकारी धोरणांवर टीका करताना ते काळजीपूर्वक छाननी केलेल्या माहितीचा व काटेकोरपणे जमवलेल्या आकडेवारीचा आधार घेत. त्यामुळे गोखलेंची मते खोडून काढणे सरकार पक्षाला खूपच जड जात असे. विधिमंडळात संपूर्ण तयारीनिशी चर्चा करण्याची गोखलेंची ही पद्धत सुशिक्षितांना विशेष भावत असे.
गोखलेंची इम्पिरियल काऊन्सिलमधील कार्यशैली व आपल्या आजच्या संसदेतील खासदारांच्या कार्यशैलीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. सार्वभौम भारताच्या संसदेमधील गोंधळ बघितला की गोखलेंची प्रकर्षांने आठवण होते. संसदपटू म्हणून त्यांचे कार्य अविस्मरणीय व आदर्श असे आहे. म्हणूनच लॉर्ड कर्झन म्हणाले, ‘आय हॅव नेव्हर मेट अ मॅन ऑफ एनी नॅशनॅलिटी मोअर गिफ्टेड विथ पार्लमेन्ट्री कॅपॅसिटीज. मिस्टर गोखले वुड हॅव ऑब्टेन्ड अ पोझिशन ऑफ डिस्टिनेशन इन एनी पार्लमेन्ट इन द वर्ल्ड, इव्हन इन द ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स’
विवेक रं. आचार्य 
response.lokprabha@expressindia.com