शेखर जोशी – response.lokprabha@expressindia.com

डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी आणि अन्य मंडळींनी एकत्र येऊन चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्ष स्वागतयात्रेची मुहूर्तमेढ रोवली. मार्च १९९९ मध्ये पहिली नववर्ष स्वागतयात्रा डोंबिवलीत निघाली. नववर्ष स्वागतयात्रेला आणि या संकल्पनेलाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. डोंबिवलीचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थानच्या माध्यमातून ही नववर्ष स्वागतयात्रा सुरू झाली. आता मुंबईत गिरगाव, दादर, विलेपार्ले, बोरिवली, ठाणे, कल्याणसह महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातही दरवर्षी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन केले जाते..

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी दरवर्षी सगळेजण आतुर झालेले असतात. ‘थर्टी फर्स्ट’ म्हणजे मस्ती, धांगडधिंगा आणि मद्यप्राशन असे समीकरणच झालेले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे काही अपवाद वगळता सर्वजण आपापल्या परीने ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करत असतात. या ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने होणारे गैरप्रकारही अनेकदा समोर आलेले आहेत. या उन्मादाला कुठेतरी आळा घालणे जरुरीचे होते. नववर्षांचे स्वागत म्हणजे फक्त ‘थर्टी फर्स्ट’ नाही, हे नव्या पिढीवर ठसविण्यासाठी आणि भारतीय परंपरा, संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्ष स्वागतयात्रा ही संकल्पना पुढे आली आणि नववर्ष स्वागतयात्रेची सुरुवात डोंबिवलीत झाली. आणि पुढच्या काही वर्षांत मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी नववर्ष स्वागतयात्रांची प्रथा पडली.

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा हा आजवर घराघरात साजरा होणारा सण होता. नववर्ष स्वागत यात्रांनी त्याला समाजव्यापी रूप दिले. बदलत्या काळानुसार आणि सोयीसाठी आपण सर्वानी इंग्रजी कालगणनेचा स्वीकार केला आहे. गेल्या काही वर्षांत प्रसारमाध्यमे, मोठमोठय़ा कंपन्या, जागतिकीकरण, बदलती जीवनशैली, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण यातून ३१ डिसेंबर हा एक व्यावसायिक इव्हेंट झाला. या सगळ्यातून आपण आपली परंपरा, भारतीय संस्कृती विसरत चाललो. त्यामुळे भारतीय कालगणनेनुसार चैत्र महिन्यात सुरू होणाऱ्या आपल्या नववर्षांचे स्वागतही जल्लोषात, जोरदार पण भान न हरपता आणि परंपरा जपत करण्याच्या उद्देशाने नववर्ष स्वागतयात्रेची संकल्पना पुढे आली आणि ती रुजलीही.  विविध ठिकाणी निघणाऱ्या या शोभायात्रांनी त्या त्या शहराला गावकीची भावना दिली. त्यातून एकीची आणि एकसंधतेची भावना विकसित झाली. शहरातील विविध संस्था एकत्र आल्या. संगणक, भ्रमणध्वनी आणि बदलत्या जीवनशैलीत माणसे एकमेकांना भेटत नाहीत. त्यांच्यातील संवाद हरवला गेला आहे. या नववर्ष स्वागतयात्रेतून प्रत्यक्ष भेटीचा, संवादाचा उद्देश साध्य झाला. ज्या ज्या शहरात या नववर्ष स्वागतयात्रा काढल्या जातात तिथे तिथे उत्सवाचे पावित्र्य जपले जातेच जाते.

नववर्ष स्वागतयात्रा हा केवळ धार्मिक उत्सव नसून त्यात शहरातील सर्व स्तरांतील संस्था, संघटना, नागरिक सहभागी होत असल्याने हा उत्सव सामाजिक अभिसरणाचा उत्सव ठरला आहे. पारंपरिक पेहराव केलेले आबालवृद्ध, लेझीम, झांज, ढोल-ताशा पथके, सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, पारंपरिक नृत्य, खेळ यांची प्रात्यक्षिके असे सगळेच या नववर्ष स्वागतयात्रांमध्ये असते. सर्वच प्रसारमाध्यमांनीही ठिकठिकाणच्या या नववर्ष स्वागतयात्रांना चांगली प्रसिद्धी दिल्यामुळे या यात्रा सर्वदूर पोहोचल्या आहेत. नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने वेगवेगळ्या विचारांच्या संस्था, संघटना आणि माणसेही एकत्र येतात. हजारो माणसे रस्त्यावर येऊनही यात्रा सुखरूप पार पडते, पोलिसांच्या दृष्टीनेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, ही नक्कीच कौतुकाची बाब आहे. या नववर्ष स्वागतयात्रांमधून जपली जाणारी ही आपलेपणाची, समूहभावनेची जाणीव पुढे अनेक उपक्रमांतूनही व्यक्त होताना पाहायला मिळत आहे आणि ती तशी होत राहणे ही बदलत्या काळाचीही गरज आहे.

जातीपातीच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर पडून समाजाला एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय समाजाला संघटित ठेवण्याच्या प्रयत्नातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, आणि हेच नववर्ष स्वागतयात्रांचे मोठे यश आहे. नववर्ष स्वागतयात्रेच्या आयोजनाने आणि त्यातून तयार झालेल्या उत्साही वातावरणामुळे समाजाचे नवनवे पैलू हे संघटित समाजशक्तीच्या रूपात प्रकट होत आहेत. तरुणाईचा सकारात्मक आविष्कार यानिमित्ताने सर्वत्र पाहायला मिळत आहे. समाजमाध्यमांतूनही तो प्रभावीपणे व्यक्त होतो आहे. जातीपातीच्या भिंती तोडून एकसंध समाजनिर्मितीला चालना देत आहे. या नववर्ष स्वागतयात्रा कुठल्याही धर्माच्या आणि कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नाही, याची खूणगाठ सर्वाच्याच मनात आहे. नववर्ष स्वागतयात्रा निघाली आणि कोणाच्या भावना दुखावल्या, यात्रेवर बंदीच घातली गेली असे आजवर कुठेही घडलेले नाही. शीख, जैन, बौद्ध बांधवांसह काही ठिकाणी मुस्लीम, ख्रिश्चन समाजही या नववर्ष स्वागतयात्रांमध्ये सहभागी होत आहे. नववर्ष स्वागतयात्रा फक्त शहरी, मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाजापुरती मर्यादित ठेवली गेलेली नाही. सर्व समाज एकसंध होऊन यात्रांमध्ये आनंदाने, उत्साहाने सहभागी होत आहे.

सुरुवातीच्या काही वर्षांत या नववर्ष स्वागतयात्रांना राजकीय रंग, अभिनिवेश नव्हता. या यात्रा फक्त आणि फक्त भारतीय नववर्ष स्वागतयात्रा होत्या. पण आता काही अपवाद वगळता या नववर्ष स्वागतयात्रा पुढारीपण आणि राजकीय ताकद, स्पर्धा दाखविण्याचे माध्यम झाले असून स्वागतयात्रांना राजकीय रंग येऊ लागला आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात स्वागतयात्रा पूर्वीसारखी राहिल्या नसल्याची खंतही व्यक्त केली जात आहे.  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राबाहेरही नववर्ष स्वागतयात्रांची संख्या वाढते आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. पण, आता काळानुरूप नववर्ष स्वागतयात्रांच्या स्वरूपात काही बदल होणे गरजेचे आहे. स्वागत यात्रांच्या निमित्ताने निर्माण होणारी ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरली गेली पाहिजे. डोंबिवली नववर्ष स्वागतयात्रेत काळानुरूप काही बदल केले गेले. स्वागतयात्रेचा उद्देश हा भारतात त्या त्या वर्षी समाजात असलेल्या अडचणींना वाचा फोडणे हाही असतो. काही वर्षांंपूर्वी पश्चिम महाराष्ट्र दुष्काळाने ग्रासला होता, तेव्हा स्वागतयात्रेच्या निमित्ताने डोंबिवलीतून दुष्काळग्रस्तांना मूठ-मूठ धान्य देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात डोंबिवलीकरांनी भरघोस मदत केली आणि ट्रक भरून धान्य गावात पोहोचवले गेले. जलसाक्षरता, स्त्रीभ्रूण हत्या, प्लास्टिकबंदी, पर्यावरण आणि अन्य सामजिक विषयांवरही डोंबिवली नववर्ष स्वागतयात्रेतून जनजागृती केली गेली. अन्य ठिकाणीही असे प्रबोधनात्मक विषय हाताळले गेले, हाताळले जात आहेत.

महाराष्ट्रात अनेक खेडय़ापाडय़ांत वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा अद्याप पोहोचलेल्या नाहीत. स्वागतयात्रांच्या निमित्ताने अशा सामाजिक कामांसाठी मदतनिधी मोठय़ा प्रमाणात जमू शकतो. त्याचा योग्य आणि विधायक कामांसाठी उपयोग करून घेता येऊ शकतो. काही गावे, आदिवासी पाडे दत्तक घेऊन त्यांचा विकास घडविता येऊ शकत. रुग्णालये, दवाखाने, शाळा, महाविद्यालय, नळपाणी योजना, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय असे वेगळे उपक्रम, प्रकल्प राबविता येऊ शकतील.

के वळ शोभायात्रा एवढय़ाचपुरता हा विषय मर्यादित न ठेवता संघटित झालेल्या समाजशक्तीतून वर्षभर समाजोपयोगी, विधायक असे वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम, योजना नक्कीच आखता येतील. डोंबिवलीसह अन्य ठिकाणीही नववर्ष स्वागतयात्रेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जपण्याचे, सामाजिक संदेश देण्याचे, विधायक उपक्रम राबविण्याचे काम केले जात आहे आणि ती नक्कीच स्वागतार्ह गोष्ट आहे. यात अधिकाधिक वाढ झाली पाहिजे. गेल्या वर्षी करोनामुळे डोंबिवलीसह राज्यात कुठेही नववर्ष स्वागतयात्रा निघाल्या नाहीत. नववर्ष स्वागतयात्रा आयोजकांनीही समंजसपणा दाखविला. आता यंदाही करोनाच्या वाढत्या संकटामुळे नववर्ष स्वागतयात्रा निघणार नाहीतच असे चित्र आहे. आता सर्वाना प्रतीक्षा आहे ती पुढच्या वर्षीच्या गुढीपाडव्याची आणि नववर्ष स्वागतयात्रांची. २०२२ मध्ये तरी करोनाचे संकट दूर झालेले असेल अशी आशा आपण नक्कीच ठेवू या.

गुढीपाडव्याचे महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढीपाडवा असे नाव असून हिंदूंच्या साडेतीन शुभमुहूर्तापैकी तो एक शुभमुहूर्त मानला जातो. शालिवाहन शकारंभही याच दिवशी असून दक्षिण भारतात तसेच महाराष्ट्रातही नूतन वर्षांरंभ याच दिवशी मानतात. सातवाहनांपैकी कोणी व कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. शक हे परकीय असून त्यांच्यावर सातवाहनांनी मिळविलेल्या एखाद्या महत्त्वाच्या विजयदिनापासून या शकाची सुरुवात झाली असावी, असे काहींचे म्हणणे आहे.  वसंत ऋतूचा आरंभ याच दिवशी होतो. कोणत्याही नवीन कार्यारंभास हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. चौदा वर्षांच्या वनवासानंतर आणि लंकाविजयानंतर रामाने याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला, अशी एक कथा रूढ आहे. या दिवशी घरोघर गुढय़ा-तोरणे उभारतात. या दिवशी मंगलस्नान करून कडुलिंबाची पाने, मिरे, हिंग, लवण, जिरे व ओवा यांसह खाल्ली असता आरोग्य, बल, बुद्धी व तेजस्विता प्राप्त होते, अशी समजूत आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने जग निर्माण केले, म्हणून ब्रह्मपूजा हा या दिवशी महत्त्वाचा विधी मानतात. बांबूच्या टोकास रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर चांदीचे वा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाची डहाळी व फुलांची माळ बांधतात आणि पूजापूर्वक ती सजवलेली गुढी दारात उभारतात. गुढी उभारण्यावरूनच या दिवसास ‘गुढीपाडवा’ म्हटले जाते. पुराणांत या दिवशी बरेच विधी सांगितले आहेत.

(संदर्भ- राज्य मराठी विश्वकोश)