नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आता गुजराती संस्कृती एकदमच मुख्य प्रवाहात आली आहे. बघूया तरी गुजराती संस्कृती म्हटलं की काय काय समोर येतं…

आव जो…
चला, पुन्हा भेटू असं म्हणत निरोप घेताना कोणताही गुजराती माणूस म्हणतो, आव जो.. त्याचा शब्दश: अर्थ आहे, पुन्हा या.. अर्थात मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींना निरोप देताना मोदी आव जो, असं नक्कीच म्हणाले नसणार.

बेन
गुजराती माणूस बेन म्हणतो तेव्हा तो लंडनमधल्या क्लॉक टॉवरचा उल्लेख करत नसतो तर एखाद्या स्त्रीला ती आपल्या बहिणीसारखी आहे, या अर्थाने संबोधत असतो. सगळे भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत अशी प्रतिज्ञा आपण शाळेत म्हटलेली असते. गुजराती माणूस तिचे शब्दश: पालन करतो. त्यामुळे तिथे सगळ्या बेन असतात. उदा.. आनंदीबेन, जसोदाबेन, हंसाबेन..एक जुना विनोदही सांगितला जातो. रिचर्ड अ‍ॅटनबरोच्या गांधी सिनेमात गांधींची भूमिका एका स्त्रीने केली आहे, असं सगळ्या गुजराती लोकांना का वाटतं.. उत्तर आहे, सिनेमाच्या श्रेयनामावलीत म्हटलं आहे, गांधींच्या भूमिकेत.. बेन किंग्जले!

कुटुंबसंस्था
कुटुंब जितकं मोठं तितकं चांगलं अशीच गुजराती माणसाची धारणा असते. जगात सगळीकडे विभक्त कुटुंब पद्धतीचा बोलबाला असताना गुजराती घरांमध्ये मात्र एकत्र कुटुंब पद्धतीला प्राधान्य दिलं गेलेलं दिसतं. बा, बहू और बेटी ही मालिका पहा किंवा खिचडी ही मालिका बघा. किंवा फार कशाला आपण थोडी वाट बघूया.. कुणाला तरी साँस भी कभी बहू थी ही मालिका पुन्हा दाखवायची आयडिया सुचेलच की! आणि तिचं प्रायोजक असेल, ूमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री

ढोकळा
तेलाबिलाची भानगड नसलेला, एकदम ताजा, स्पॉन्जी ढोकळा तुम्ही अजून खाल्ला नसेल तर लौकर खा. कारण आता तो पंजाबी सामोशाची जागा घेऊ पाहतोय.

शाकाहार
तुम्हाला माहितेय, जगातलं पहिलं मॅकडोनाल्डस अहमदाबादमध्ये उघडलं गेलं. आणि आता ही जगन्मान्य गोष्ट आहे.

मोहनदास गांधी
जगातली ही सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती गुजराती समाजातलीच. असा माणूस दिल्याबद्दल आपला देश गुजराती समाजाचा कायमच ऋणी राहील.

नवरात्री
गरबा खेळला जातो तो नवरात्रीतले नऊ दिवस. पण रंग, वेषभूषा, उत्साह, कमिटमेंट या पातळीवर तो जगातल्या कोणत्याही उत्सवाच्या तोंडात मारतो.

चिवडा आणि चकली
हे दोन पदार्थ कुठल्याही गुजराती स्त्रीचा सुगरणपणा ठरवतात. चकल्या जितक्या खुसखुशीत आणि चिवडा जितका कुरकुरीत तितकी ती स्त्री पक्की गुजराती.

खाकरा
फाफडय़ाप्रमाणेच (अर्थात चकली आणि चिवडाही) खाकरा हा पदार्थ प्रत्येक गुजराती घरात असणार म्हणजे असणारच. आता तर तो इतक्या वेगवेगळ्या चवींसह उपलब्ध आहे. तो लो फॅट पदार्थ असल्यामुळे गेल्या काही वर्षांत इतर समाजांमध्येही तेवढाच लोकप्रिय झाला आहे.

उंधियो
या सगळ्या यादीमध्ये खाण्याच्या पदार्थाना जरा जास्तच महत्त्व दिलं जातंय असं तुम्हाला वाटतंय ना.. पण ते साहजिकच आहे. तुम्हीच सांगा हिवाळ्यात मिळणारे तब्बल ८३ पदार्थ घालून उंधियो बनवणं देशातल्या इतर कुठल्या समाजाला शक्य आहे का, आहे का तेवढा चिवटपणा

दारूबंदी
गुजरात प्रसिद्ध आहे ते दारूबंदीसाठी. ती खरंच आहे का हा वादाचा विषय. प्रत्यक्षात तिथे कुणी अधिकृतपणे झिंगू शकत नाही.

आतिथ्य
कोणत्याही गुजराती घरात तुमचं जसं आतिथ्य होईल तसं जगात इतर कुठेच होणार नाही. जेवताना थाळीत वेगवेगळ्या भाज्या, डाळींच्या आठ दहा वाटय़ा, सोळा सतरा प्रकारच्या चटण्या, एका बाजूला मधुर ताक, दुसऱ्या बाजूला बासुंदी अशा सगळ्या सरंजामात जेवताना वेफर्ससारख्या पातळ फुलके तुमच्या ताटात वाढले जात असतील तर.. तर दहा- बाराव्या फुलक्यानंतर तुम्ही आपण किती खातोय हे मोजणं बंद कराल आणि आडवा हात मारायला सुरुवात कराल.

भाषा
गुजराती माणसाच्या भाषिक सामर्थ्यांबद्दल गमतीने काय म्हटलं जातं माहीत आहे.. जगातली कोणतीही कितीही अवघड भाषा असू द्या, धंद्यासाठी गरज पडली तर गुजराती माणूस ती शिकेलच, अर्थात त्यातले उच्चार असो की अकाऊंट, तो ते सगळं गुजराती वळणानंच जाणार. म्हणजे गुजराती माणसाच्या तोंडात ती भाषा रुळणार, पण गुजराती वळणानं. एवढंच नाही तर कालांतरानं असं होतं की हा गुजराती माणूस जिथे असेल तिथल्या भाषेच्या शब्दकोशात गुजराती शब्दांचा समावेश होईल.

पर्यटन
भारतातला देशांतर्गत तसंच देशाबाहेर सर्वाधिक प्रवास करणारा समाज म्हणजे गुजराती समाज. गेल्या दशकभरातली आकडेवारी काढली तर त्यात गुजराती लोकांची बहुसंख्या असल्याचं आढळून येतं. विशेष म्हणजे काका, काकी, भाई-बेन असं सगळं गुजराती कुटुंब मिळूनच प्रवास करत असतं. अर्थात बरोबर त्यांचा ‘महाराज’ही असतोच. त्यामुळे डेन्व्हर आणि फिनलंडमध्येही तुम्हाला मोठंच्या मोठं गुजराती कुटुंब ढोकळा आणि फाफडा खात मजेत फिरताना दिसू शकतं.

जिग्नीस
कुणीही असा काही सव्‍‌र्हे केलेला नाही, की मोठमोठी आकडेवारी देता येणार नाही, पण तरीही छातीठोकपणे सांगता येईल की बहुसंख्य गुजराती घरांमध्ये घरातल्या मुलांसाठी ठेवायचं जिग्नीस हे एकदम लाडकं, लोकप्रिय नाव आहे. हां.. आता हे कबूल करायला हवं की २०१४ च्या निवडणुकांनी हे चित्र बदललं असणार आणि गुजराती घरांमध्ये नरेंद्र हे मुलांसाठी ठेवायचं लाडकं, लोकप्रिय नाव असणार.

बुद्धिमत्ता
या मुद्दय़ावर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुमच्या जवळच्या स्टॉक मार्केटमध्ये जा; मुंबईत त्याला दलाल स्ट्रीट म्हणतात, ते काही उगीच नाही.

व्यवसाय
गुजराती माणूस फुटबॉल खेळत नाही, असं म्हणतात, का ते माहितीये..कारण त्यांच्यातल्या एकाला जर कॉर्नर (पेनल्टी कॉर्नर) मिळाला तर लगेच तो तिथे दुकान टाकेल. त्यामुळेच देशात असलेल्या मोठय़ा बिझनेसमनमध्ये गुजराती माणसांची संख्या जास्त आहे. अंबानी, अडानी अशी कोणतीही नावं घेतलीत तर ती हेच सिद्ध करतील.

अमेरिका
आज परदेशात राहणाऱ्या गुजराती लोकांपैकी सर्वाधिकजण अमेरिकेत राहतात. त्यातही एक लाख गुजराती न्यूयॉर्कसारख्या मेट्रोपोलिटन परिसरात राहतात. अमेरिकेतली ४० टक्के हॉस्पिटॅलिटी गुजराती लोकांच्या हातात आहे.

उद्योजकता
इंग्लंडपासून युगांडापर्यंत, अमेरिकेपासून अर्जेटिनापर्यंत कुठेही जा. जगाच्या पाठीवर असा कुठलाही देश- प्रदेश नसेल जिथे तुम्हाला गुजराती माणूस तोटय़ातला धंदा करताना आढळणार नाही.
पटेल- शहा
शहा आणि पटेल ही गुजराती लोकांमधली सगळ्यात कॉमन आडनावं आहेत. इंग्लंडमध्ये तर पटेल आडनावांसाठीची वेगळी डिरेक्टरी काढावी लागली आहे.

फायद्याची बात
एखादा गुज्जू डब्ल्यूडब्ल्यूएफचं ट्रेनिंग घेतो आहे असं दृश्य तुम्हाला अपवादानंच दिसेल. उलट तो तुम्हाला दिसेल डब्ल्यूडब्ल्यूएफवर लावलेली दहा लाख डॉलर्सची बेट जिंकून पैसे मोजत जाताना..

ब्रॅण्ड
अमूलनंतर रिलायन्स हा गुजरातमधला तितकाच मोठा ब्रॅण्ड आहे, ज्यासाठी आज गुजरात ओळखला जातो.

कला
गुजराती लोक फक्त कुटुंबात आणि धंद्यात रमलेले असतात असं कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. संस्कृतीपासून कलेच्या प्रांतापर्यंत, स्थापत्यशास्त्रापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत सगळ्या क्षेत्रात गुजराती लोकांनी आपला ठसा उमटवला आहे. परेश रावल, फारुख धोडी, इस्माइल र्मचट, महेश भट्ट, कैझाद गुस्ताद, आशा पारेख, आयेशा पटेल, अरुणा इराणी, पार्थिव पटेल ही सगळी नावं आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या हजारो गुजराती लोकांपैकी आहेत.