lp06इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षांतच चित्रकार सुरेश भोसले यांनी आपल्या चित्रकलेची आवडीची खात्री पटली आणि मग त्यांनी इंजिनीअरिंग सोडून जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला प्रवेश घेतला. सर्वाचा विरोध असतानाही केवळ आईच्या पाठिंब्याने त्यांनी शिक्षण घेतले. ‘त्या वेळी माझी आईच माझी गुरू होती’, अशी त्यांची आजही भावना आहे. त्यांना ए. के. हेब्बर शिष्यवृत्ती मिळाल्यावर त्यांच्या शाळेतल्या गुरूंनी त्यांचे कौतुक केले, मात्र ‘पाय जमिनीवर असू देत’ अशी प्रेमळ ताकीदही दिली. ‘जीवनात ज्या व्यक्तीवर गुरू म्हणून श्रद्धा असेल तिला सर्व यश अर्पण केलं, म्हणजे यशाचा उन्माद चढत नाही’, चित्रकार सुरेश भोसले सांगतात.
सुरेश भोसले यांच्या कलेवर, जीवनावर आणि दृष्टिकोनावर त्यांच्या आध्यात्मिक गुरूंचा मोठा प्रभाव आहे. गुरूंवर पूर्ण श्रद्धेने ठेवलेल्या विश्वासाने त्यांच्या आयुष्याला अनेकार्थानी पूर्णत्व प्राप्त झाले. गुरूंनी केलेलं मार्गदर्शन योग्यच आहे हा त्यांचा विश्वास गुरू-शिष्यांमधलं नातं दृढ करतो. सुरेश भोसले सांगतात, ‘गुरूंच्या हेतूंबद्दल कोणताही किंतु मनात न बाळगता त्यांच्यावर मनोमन श्रद्धा ठेवणे ही आपली संस्कृती आहे, ती हल्ली लोप पावत चालली आहे’, असं ते सांगतात.
कुठलाही शिष्य आपल्या गुरूमध्ये सर्वगुणसंपन्न, आदर्श असं व्यक्तिमत्त्व शोधण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. त्याबद्दल सुरेश भोसले यांचं मत काहीसं वेगळं आहे. ते म्हणतात, ‘आदर्श गुरू शोधण्यापेक्षा आदर्श शिष्य बनण्याचा प्रयत्न करा. गुरूंचे आशीर्वाद आणि प्रेम कायम तुमच्यासोबत असतीलच.’ मात्र या बदललेल्या संकल्पनांबद्दल शिक्षक किंवा विद्यार्थी यांना दोष न देता आपल्या विचारसरणीत मूलभूत बदल गरजेचे आहेत असंही त्यांना वाटतं. यशापेक्षा समाधान महत्त्वाचे आणि समाधान ही गुरूवरील श्रद्धेची फलश्रुती आहे, अशी त्यांची धारणा आहे. गुरू-शिष्य या नात्यात काळानुरूप बदल होताहेत. गुरूंवर असलेली श्रद्धा, विश्वास कधीही ढळू न देता जपलेलं गुरू-शिष्याचं नातं नेहमीच सशक्त राहतं. गुरूप्रेम आणि नितांत आदर यांची प्रचीती सुरेश भोसले यांच्या विनम्रतेतून येते.
वेदवती चिपळूणकर – response.lokprabha@expressindia.com