04 March 2021

News Flash

प्रामाणिक खेळ हीच गुरुदक्षिणा अजिंक्य रहाणे – क्रिकेट कर्णधार

कोणताही खेळ म्हणजे शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक कणखरतेची कसोटी असते. आणि या दोन्ही गोष्टींसाठी मार्गदर्शक- प्रशिक्षक अतिशय महत्त्वाचे ठरतात.

| July 31, 2015 01:27 am

lp06कोणताही खेळ म्हणजे शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक कणखरतेची कसोटी असते. आणि या दोन्ही गोष्टींसाठी मार्गदर्शक- प्रशिक्षक अतिशय महत्त्वाचे ठरतात. प्रशिक्षक आणि खेळाडू यांची वेव्हलेंग्थ जुळल्यामुळे त्या-त्या खेळाडूच्या खेळाने किती उंची गाठली याची कितीतरी उदाहरणं देता येतील. म्हणूनच क्रीडा क्षेत्रातले असेच काही शिष्य सांगताहेत आपल्या गुरूंविषयी-

माझे सर्वात पहिले गुरू हे आई-वडील आहेत, कारण त्यांनीच मला घडवलं आहे. त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार मी कधीही विसरू शकत नाही. एक काळ असा होता की आम्हाला बॅट आणि पॅड घेणं परवडत नव्हतं. आता दिवस बदलले, पण त्या परिस्थितीची मला जाण आहे. त्यांनी केलेले संस्कार नेहमीच माझ्याबरोबर राहतील आणि त्यामुळेच मी आता इथपर्यंत पोहोचू शकलो आहे, असं मला वाटतं. त्यांच्याविना मी कुणीच नाही.
गुरू हा असायलाच हवा. माझ्यासाठी आयुष्यात गुरूचे स्थान फार महत्त्वाचे आहे, कारण त्यांनी माझ्यावर घेतलेली मेहनत आणि त्यांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. गुरूंची गरज, गुरूंचा पाठिंबा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरूंच्या आशीर्वादाची गरज प्रत्येकालाच असते. गुरूचं योगदान आयुष्यात फार मोठं आहे.
आतापर्यंत प्रवास हा स्वप्नवत असाच आहे. सुरुवातीला डोंबिवलीमध्ये असताना खातूसरांचं मला चांगलं मार्गदर्शन मिळालं. त्यांच्याच क्लबमधून मी क्रिकेटचा श्रीगणेशा गिरवला. त्यांच्या क्लबमध्ये मी सर्वात लहान मुलगा होतो. या क्लबमध्ये सर्व १४-१५ वर्षांची मुलं होती आणि मी त्या वेळी सात वर्षांचा होतो, पण सरांनी कुठलाही भेदभाव न करता मला शिकवलं, माझ्यासाठी हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. त्यानंतर अरुण कदम यांचा मला चांगला पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळालं. त्या वेळी असं होतं की आमच्यासाठी चांगल्या बॅट्स मिळणं कठीण होतं. त्यांनी मग मला व्ॉम्पायरची बॅट मिळवून दिली, त्यांच्या क्लबला त्यांनी मला संधी मिळवून दिली. कधी मुंबईत आलो तर त्यांना नक्कीच जाऊन भेटतो. ते आणि त्यांचे बंधू विक्रम म्हणून आहेत, त्यांचाही मला चांगला पाठिंबा मिळाला. त्या काळात त्यांचा जो पाठिंबा होता तो फार महत्त्वाचा होता. मी घोष करंडक आणि अन्य स्पर्धामध्ये खेळत असताना आणि तिथून रणजी करंडक स्पर्धेपर्यंतच्या प्रवासात त्यांनी मला मोलाची साथ दिली. सातत्याने ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. क्रिकेटबाबत तर त्यांनी मला मार्गदर्शन तर केलंच, पण त्याव्यतिरिक्त ज्या गोष्टी असतात, आपली वागणूक कशी असावी, त्याचबरोबर क्रिकेटसाठी काय महत्त्वाचं आहे, असे बरेच संस्कार त्यांनी माझ्यावर केले. त्यानंतर डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी त्यांच्या पय्याडे क्लबमध्ये मला संधी दिली. त्यानंतर प्रवीण आमरेसर मला लाभले. रणजी करंडकापासून ते माझे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहेत. ते पूर्णपणे मला ओळखतात. १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धापासून ते मला पाहत आले आहेत. रणजी संघात आल्यानंतर त्यांनी माझ्यावर बरीच मेहनत घेतली. आई आपल्या मुलावर जसे संस्कार करते, जसं मार्गदर्शन करते, काय हवं नको ते सांगते, तसं मला त्यांच्याबरोबर असताना वाटतं, त्यांच्याबरोबर असं मातृत्वाचं नातं निर्माण झालं आहे. प्रवीण सरांबरोबर राहून बरंच काही मला शिकता आलं. मला वाटतं की आमचे सूर चांगले जुळतात. जे सर सांगतात, तसं करण्याचा मी प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्ट मी अमलात आणण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांना ती सांगतो, जर जमत नसेल तर त्यांना स्पष्टपणे सांगतो. नात्यांमध्ये स्पष्टपणा असायला हवा आणि त्याचबरोबर मैत्रीही असायला हवी, असे माझे आणि प्रवीणसरांचे गुरू-शिष्याचे नाते आहे.
विद्या पराडकर यांच्याकडूनही मी बऱ्याचदा क्रिकेटचे मार्गदर्शन घेतले आहे. जेव्हा मला काही समस्या येते तेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन मार्गदर्शन घेतो किंवा कधीही सराव करायचा असेल तर त्यांच्याकडे जाऊन मी सराव करतो. त्याचबरोबर संजय पाटीलसरांचेही मला मार्गदर्शन लाभले आहे.
गुरू असावा की नसावा याबद्दल मी काही सांगू शकत नाही, पण मी तरी गुरूविना कसलीच कल्पना करू शकत नाही. कारण गुरू हा असायलाच हवा. कारण गुरू हा शिष्याला घडवत जातो. गुरू हा नि:स्वार्थी असायला हवा. आतापर्यंत कोणीही माझ्याकडून गुरूदक्षिणा वगैरे मागितलेली नाही. मला वाटतं की त्यांना आनंद द्यावा, चांगली कामगिरी करावी. खेळाशी प्रमाणिकपणे राहावं, हीच खरं तर गुरुदक्षिणा ठरू शकते.
शब्दांकन- प्रसाद लाड – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:27 am

Web Title: guru paurnima special 12
Next Stories
1 गुरू असायलाच हवा योगेश परदेशी – विश्वविजेता कॅरमपटू
2 सरांचं मार्गदर्शन हा मोठा आधार श्रुती अमृते – टेबल टेनिस
3 कदमसरांचे धडे गिरवतेय.. अभिलाषा म्हात्रे – आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू
Just Now!
X