lp06आयुष्यात अनेक वळणं येतात आणि या वळणांमधून जर तुम्हाला सहीसलामात बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी गुरू हा हवाच. आयुष्याच्या वळणावर मला असेच काही गुरू लाभले आणि आज जो मी काही आहे तो फक्त त्यांच्याचमुळे आहे, असं मला वाटतं. माझा पहिला गुरू म्हणाल तर माझी आई, सुलोचना उदयभान परदेशी. आईनेच मला खऱ्या अर्थाने घडवलं, तिने केलेल्या संस्कारांच्या पायावरच मी आज उभा आहे. त्यानंतर कॅरम कसा खेळायचा हे मला माझ्या भावाने शिकवलं. त्याने माझ्यावर भरपूर मेहनत घेतली. त्याच्यामुळेच मी कॅरम खेळायला शिकलो. पण नुसता कॅरम खेळणं महत्त्वाचं नसतं, त्याचं तंत्रही तुम्हाला माहिती असावं लागतं. हे मला नितीन बोस यांनी शिकवलं. खऱ्या अर्थाने त्यांनी मला कॅरमचा गाभा शिकवला. कॅरममध्ये माझा जो विकास होत गेला तो बोस सरांमुळेच. त्यानंतर मला माजी आंतरराष्ट्रीय कॅरम विश्व गाजवणारे सुहास कांबळीसर गुरू म्हणून लाभले. त्यांचा खेळ हा अवर्णनीय असाच आहे, मोठय़ा स्तरावर जसा खेळला जावा तसाच. अवघड ठिकाणी असतानाही गेम कसा फिनिश करायचा, हे सुहास सरांनी मला शिकवलं. त्याचबरोबर राजन दरेकर, एस. के शर्मा आणि अरुण देशपांडे यांचंही मार्गदर्शन मला योग्य वेळेवर मिळत गेलं.
२००८ सालच्या राष्ट्रीय स्पर्धेनंतर मला गुरूचं आयुष्यातील महत्त्व काय, हे कळलं. १ जानेवारी २००८ साली माझे बाबा वारले. त्यानंतरच्याच महिन्यात राष्ट्रीय स्पर्धा होती. या स्पर्धेसाठी यापूर्वी बरीच मेहनत घेतली होती, पण बाबांच्या निधनाने मी हेलावून गेलो होतो. पण तरीही या स्पर्धेत माझा अद्भुत असा खेळ झाला आणि मी जेतेपदाला गवसणी घातली. मी जिंकलोय यावर माझा काही काळ विश्वासच बसत नव्हता. त्यावेळी मी सर्वानाच विचारत होतो की, मी कसा जिंकलो, हे मला कुणी सांगेल का? पण मलाच याचं उत्तर गवसलं आणि ते म्हणजे गुरू. तेव्हा मला कळलं आयुष्यात गुरू का असावा. माझी बायको मंगलनेदेखील मला या काळात बरीच मदत केली, तीदेखील माझी गुरूच आहे. प्रत्येक वेळी ती माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. ज्यावेळी स्पर्धा जिंकायचो तेव्हा ती अभिनंदन करतेच, पण आता पुढच्या स्पर्धेच्या तयारीला लागा, असे सांगायला विसरत नाही. तिच्यामुळेच मी विजयाच्या आनंदात मश्गुल न राहता पुढच्या स्पर्धाचा कायम विचार करत राहतो.
माझ्या मते गुरूविना आयुष्यात चांगले काही होऊच शकत नाही, गुरू हा हवाच. ज्याच्याकडे गुरू असतो तोच जास्त काळ टिकतो. आयुष्यात बरेच चढ-उतार येत असतात, पण त्यामधून तुम्हाला जो योग्य मार्ग दाखवतो तोच खरा गुरू.
शब्दांकन : प्रसाद लाड – response.lokprabha@expressindia.com