lp06मी ठाणे जिल्ह्यतील बदलापूरची. लहानपणी अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रम म्हणून नृत्य शिकण्यासाठी जात होते. साधारण वर्षभर नृत्य प्रशिक्षण घेत होते; परंतु त्यात मन रमलं नाही. एका सुट्टीदरम्यान टेबल टेनिस खेळायची संधी मिळाली. छोटय़ा रॅकेट्स, छोटे बॉल आणि या शस्त्रांनिशी चालणारा तो थरार तत्क्षणी आवडला. पाहताना सोपा वाटणारा मात्र खेळताना दमछाक उडवणाऱ्या या खेळाची ओढ लागली. सुदैवाने लहान आणि योग्य वयातच आनंद नाड पुरोहित सरांच्या अकादमीत मी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच कनिष्ठ गटातील वाटचालीचा टप्पा गाठला आहे. टेबल टेनिसमध्ये वेळ अर्थात टायमिंग, एकाग्रता आणि वेग या त्रिसूत्रीला महत्त्व आहे. रॅकेट कशी पकडायची, सव्‍‌र्हिस कशी करायची, परतीचा फटका कसा मारायचा या मूलभूत गोष्टी सरांकडेच शिकले. मूलभूत प्रशिक्षण झाल्यानंतर खेळातले असंख्य lp24बारकावे त्यांनी शिकवले. तालुका, जिल्हा, राज्य स्तरीय स्पर्धाचे टप्पे ओलांडत गेले ते सरांच्या सखोल मार्गदर्शनामुळेच. अनेकदा पराभवाला सामोरे जावं लागतं. त्यावेळी निराश व्हायला होतं. पण सर नेहमी खंबीर मनाने सल्ला देतात. नक्की काय चुकलं हे सांगतात, जेणेकरून या चुका पुढच्या सामन्यात होऊ नयेत. चिडणं, रागावण्यापेक्षा शांतपणे समजावून सांगण्याची त्यांची पद्धत माझ्यासह असंख्य खेळाडूंना उपयोगी ठरते आहे. देशांतर्गत स्पर्धाच्या वेळी असंख्य गुणवान प्रतिस्पध्र्याना सामोरे जावे लागते. खेळात, डावपेचांमध्ये बदल करावे लागतात. अशा वेळी सामना सुरू असताना मार्गदर्शन करण्यासाठी सर असतील तर आधार वाटतो. एखादा अफलातून फटका मारल्यानंतर ते कौतुक करतात; परंतु स्वैर फटका मारल्यास ओरडाही मिळतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मी आता पाऊल ठेवले आहे. या टप्प्यावर स्पर्धा प्रचंड आहे. चीन, दक्षिण कोरिया या देशांच्या खेळाडूंची मक्तेदारी आहे. त्यांच्याविरुद्ध खेळण्यापूर्वी त्यांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. त्यावेळी प्रशिक्षकाची भूमिका निर्णायक असते. त्यांनी सांगितलेली एखादी क्लृप्ती कामी येते. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मात्र आनंद सरांचे मार्गदर्शन असेल तर देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करेन याचा विश्वास आहे.

* २०१४- राष्ट्रीय कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद
* २०१५- थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गट टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग.
* २०१५- दक्षिण आशियाई टेबल टेनिस सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पदके मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा.
* गेल्या पाच वर्षांत जिल्हा, राज्यस्तरावरील असंख्य स्पर्धाची जेतेपदे.
शब्दांकन : पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com