lp06कोणत्याही दौऱ्यावर ‘चेंबूर क्रीडा केंद्रा’चा संघ गेला की माझे प्रशिक्षक सुहास कदम त्यांचा अनुभव आम्हाला सांगायचे. उमा भोसले, नीता दडवे यांच्यासारख्या खेळाडूंचे कौशल्य गोष्टीरूपातून आमच्यासमोर मांडायचे. या साऱ्या मोठय़ा खेळाडूंची मैदानावरील वागणूक कशी आदर्श असायची, पंचांशी ते कधीच कशी हुज्जत घालायचे नाहीत हे ते सांगायचे. त्यांनी आम्हाला खेळाकडे नम्रतेने पाहायला शिकवलं. लहान खेळाडू असेल, तर मार्गदर्शन करा आणि मोठा असेल तर आदर करा, हा धडा त्यांनीच आम्हाला दिला. काही वर्षांपूर्वी आम्ही संघाची दुसरी फळी घेऊन यवतमाळला अखिल भारतीय कबड्डी स्पध्रेसाठी गेलो होतो. अंतिम सामन्यात संघातील एक नवी मुलगी डावा कोपरारक्षण करीत होती. अखेरच्या काही मिनिटांमध्ये सामना विलक्षण रंगतदार झाला. मग तीन मिनिटे शिल्लक असताना आक्रमण आणि lp26बचाव या दोन्ही गोष्टींवर सामन्याचे भवितव्य अवलंबून होते. त्यामुळे कदमसरांनी मला कोपरारक्षण आणि चढाया या दोन्हींची जबाबदारी दिली आणि तो सामना आम्ही निसटता जिंकलो होतो.
जेव्हा माझ्या गुडघ्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली, तेव्हा बऱ्याच जणांनी मला खेळ सोडण्याचा सल्ला दिला होता. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करते आहेस. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्वसुद्धा केले आहे. पुन्हा दुखापत होईल. आता कबड्डी खेळायचे थांबव, असे अनेकांनी मला नकारात्मक सांगितले. चार-पाच महिने विश्रांतीनंतर जेव्हा मैदानावर त्यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी माझे मत जाणून घेतले. मला खेळायचे आहे, असे त्यांना मी सांगितले. मग त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आणि दिलेल्या आत्मविश्वासामुळे मला मैदानावर परतता आले. त्या पायावर ताण येणार नाही, अशा पद्धतीने कसे खेळायचे, याचे तंत्र सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी मला शिकवलं. मी त्याच आवेशात पुनरागमन करू शकते, ही जिद्द मला त्यांच्यामुळेच मिळाली.
कदम सर आम्हाला सांगतात, मी तुला कबड्डीचे चांगले कौशल्य शिकवू शकेन, परंतु तुझ्या गुणवत्तेवर आणि कामगिरीवरच तुझी निवड होऊ शकेल. त्यामुळे आमच्या संघातील खेळाडूंचे पाय जमिनीवरच राहायचे. जो संघासाठी खेळतो, त्याची कामगिरी ही १०० टक्के चांगलीच होते. एखाद्या सामन्यात खेळाडूने चांगली कामगिरी केली, तरी त्या खेळाडूने कोणते गुण गमावले, हे ते सामन्यानंतर आम्हाला सांगतात. त्यामुळे उणिवांवर मात करून खेळ सुधारावा कसा, हे धडे मिळत राहिल्यामुळे अजून सर्वोत्तम कामगिरी करायची आहे, खेळ सुधारायचा आहे. याची जाणीव आम्हाला असायची.
शब्दांकन : प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com