माझी मोठी बहीण किशोरी शिंदे ही आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आहे. मी १३ वर्षांची असताना ती तिच्यासोबत मला सरावाला घेऊन जायची. त्याआधी तीन वष्रे मी जिम्नॅस्टिक शिकून घेतले होते. मला कबड्डी खेळ आवडत नव्हता. पण, स्नेहल कबड्डी चांगलं खेळू शकते, असा विश्वास प्रशिक्षक राजेश ढमढेरे यांनी दिला. मी कबड्डी खेळायला लागले. खेळाची गोडी निर्माण झाली. जिजामाता मुलींच्या शाळेतून उत्तम खेळल्यानंतर वरिष्ठ गटात खेळू लागले.
मैदानावर काहीच मनासारखे घडत नाही, अशा कठीण काळात ढमढेरे सर धीर देतात. मी दिलेली शिकवण आठव, थोडा वेळ डोळे मिट, आपली सर्वोत्तम कामगिरी आठव, तू कशा पद्धतीने खेळली ते सारे डोळ्यांसमोर
येऊ दे. सारख्या पकडी झाल्यावर आलेले नैराश्य झटकून टाकण्यासाठी ते आत्मविश्वास देतात. ही त्यांची मात्रा माझ्या खेळात बदल घडवते.
तुम्ही कदाचित चांगले खेळाडू बनू शकणार नाही, पण, किमान एक चांगली व्यक्ती बनावी, हा त्यांचा दृष्टिकोन. कबड्डी खेळायला शिकवतानाच आमचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची ते काटेकोर काळजी घेतात. अभ्यासालाही ते तितकंच महत्त्व देतात. दहावीत असतानाची एक आठवण सांगते. दोन पेपरमध्ये दोन दिवसांचा अवधी होता. ठाणे महापौर चषक स्पर्धा त्यावेळी चालू होती. माझा पेपर दोन वाजता पूर्ण झाल्यावर सर मला पुण्याहून ठाण्याला घेऊन गेले. दोन दिवस सामने खेळून पुन्हा पुण्यात परीक्षेसाठी नेऊन सोडले. आमच्या संघाच्या बऱ्याच खेळाडूंच्या दहावी-बारावीच्या परीक्षांची काळजी घेऊनच आमचे वेळापत्रक आखतात. परीक्षांच्या काळातील या सामन्यांदरम्यान प्रवासात आम्हाला अभ्यास करायला सांगतात. त्यामुळे माझे शिक्षणसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू राहिले. सध्या शाहू महाविद्यालयात मी एम. कॉम.ला आहे.
शब्दांकन : प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 31, 2015 1:22 am