lp06माझ्या यशात माझे प्रशिक्षक मोहन फडके यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. माझी मोठी बहीण, मृणालिनी त्यांच्याकडे बुद्धिबळ शिकायला जायची. पहिल्या दिवशी मी रडतच तिच्याबरोबर गेलो. तेव्हा फडकेसरांनी मला खाऊ दिला. त्या वेळी कोणाकडे बुद्धिबळ शिकायला जाणे ही संकल्पनाच वेगळी होती. मलाही त्याचे आश्चर्य वाटले होते. मात्र फडके सरांकडे गेल्यानंतर ही कोणीतरी महान व्यक्ती आहे याची जाणीव झाली. उत्साह, विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवीत ते शिकवत असत. त्यांनी मला या खेळाविषयी पटवून दिले. या खेळाचा मला अभ्यासाकरिता तसेच माझा त्या वेळी आवडता असलेला क्रिकेट या खेळाकरिता कसा फायदा आहे हेही lp28समजावून दिले. हळूहळू मलाही बुद्धिबळाची गोडी निर्माण झाली. आम्ही दोघं त्यांच्याकडे रोज एक तास शिकायला जायचो. त्यावेळी इंटरनेट दूर होतं. बुद्धिबळाची पुस्तकंही सर्रास उपलब्ध नसत. प्रत्यक्ष अनुभवालाच महत्त्व होतं.
बुद्धिबळात सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी चिकाटी, जिद्द, एकाग्रतेसोबत आत्मविश्वासाची आवश्यकता असते. माझ्यात तो फडके सरांमुळे निर्माण झाला. प्रत्येक डावाचे आत्मपरीक्षण कसे करायचे, डावात झालेल्या चुकांचे बारकाईने कसे टिपण करायचे, या चुका कशा टाळता येतील याचे ज्ञान त्यांनी दिले. खेळात हारजीत नेहमीच असते. एखाद्या स्पर्धेत खराब कामगिरी झाली तरी त्यामुळे निराश न होता त्यावर मात करत पुन्हा विजयपथावर कसे यायचे ही त्यांची शिकवण. आजही मी त्यांच्याकडे हक्काने मार्गदर्शन घेण्यासाठी जातो. फडके सर व त्यांच्या पत्नी आमच्यासाठी गुरुजनांपेक्षाही घरातील मोठे आजोबा व आजीसारख्याच होत्या.
शब्दांकन: मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com