lp06गुरू सजीव रूपातच असावा, हा अट्टहास नसावा. विचार, कविता, वाईट प्रसंग, घटना हेही वेळोवेळी आपले गुरू बनतात. या गुरूंकडूनही अनेक गोष्टींची शिकवण मिळते.

माझ्या आयुष्यात गुरू-शिष्य या संकल्पनेविषयी फारशी स्पष्ट आठवण नाही. खरं तर माझे गुरू कोण, असं विचारलं तर मला सांगता येणार नाही. कारण विशिष्ट असं एकाचं मी नाव घेऊ शकणार नाही. आयुष्यात विविध टप्प्यांवर मला अनेक माणसं भेटली. वेगवेगळ्या कारणांसाठी ही माणसंच माझे मार्गदर्शक झाले. ‘गुरू’ म्हटलं की, विशिष्ट रंगातले कपडे घातलेला, दाढी असलेला माणूस, अशी एक समजूत आपल्याकडे आहे; पण मला अशी व्यक्ती कधीच जाणवली किंवा भासलीसुद्धा नाही. वेगवेगळ्या चेहऱ्यांची, प्रकृतीची, वृत्तीची माणसं मला भेटली. विविध रूपांत भेटलेल्या या माणसांची वेळोवेळी जीवनविषयक महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदतच झाली. माणसांशिवायही अनेक गोष्टींमुळे खूप काही शिकता आलं. आई-वडील, शिक्षक, मित्र यांच्यासह वाईट घटना, प्रसंग, कठीण प्रसंगातली माणसांची वर्तनं, वाईट काळातलं चांगल्या माणसाचं प्रेम या सगळ्या गोष्टींतून नकळतपणे शिकवण मिळाली. गुरू बघायचा किंवा शोधायचाच असेल, तर तो प्रत्येकात दिसून येतो. प्रत्येकाकडून काही तरी शिकता येतं. काही जाणतेपणी तर काही अजाणतेपणी.
शाळेत असताना गुरुपौर्णिमा मोठय़ा प्रमाणावर साजरी केली जायची. शिक्षकांसाठी कार्यक्रम असायचे, त्यांच्या पाया पडायचे, हे शाळेत घडायचं. तेव्हा मला वाटे की, हा दिवस म्हणजे शिक्षकांची पौर्णिमा असते. या दिवसाचं महत्त्व तेव्हा फारसं कळत नव्हतं. समोर घडायचं ते फक्त बघायचो. आपल्यापेक्षा मोठय़ा व्यक्ती म्हणजे आपले गुरू असंही तेव्हा वाटायचं. आता दृष्टिकोन बदललाय. वयाने लहान असलेली व्यक्तीही गुरु असू शकते.
‘गुरू’ हा शब्द उच्चारला की, धार्मिक गुरूंची प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर येते; पण मला ही प्रतिमा फारशी पटत नाही. ती विध्वंसक वाटते. म्हणूनच ‘गुरू’ ही संकल्पना या अर्थी नको वाटते. एकमेकांशी नीट वागायला, प्रेम करायला शिकवणारा गुरू हा अभावानेच दिसतो. काही जण स्वत:ला गुरू म्हणवून घेतात. हे असे स्वयंघोषित गुरू कसे असू शकतात, हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. ‘मला गुरू माना’ असं स्वत: घोषित करणं, मला असहय़ होतं. एखादा कोणी गुरू म्हणून खुर्चीत बसला, की लोक सहज त्याच्या पाया पडू लागतात; पण त्या माणसाची पात्रता, क्षमता, गुण या गोष्टींचा विचार केला जात नाही. सहज त्याला गुरुस्थानी बघणं, सहज त्याला मोठं करणं न पटण्यासारखं आहे. या सहजतेची मला भीती वाटते. इतक्या सहज लोक गुरू कशी काय व्हायला लागतात याचं मला आश्चर्य वाटतं. असं गुरुत्व मला योग्य वाटत नाही. प्रेम करणारा आणि प्रेम करायला शिकवणारा खरा गुरू असतो. स्वत:ला गुरू म्हणवून घेणाऱ्या गुरूंपेक्षा मला तो लव्ह गुरू चांगला वाटतो. इतर गुरूंसारखं थोतांड बोलण्यापेक्षा लव्ह गुरू आजच्या काळातलं वास्तव बोलतो असं वाटतं. स्वघोषित गुरू अनेक हजार वर्षांपूर्वीचं बोलतात. त्यांना गुरू म्हणावं का?
ज्या क्षेत्रात आपण करिअर करतो त्याच क्षेत्रातला एखादा गुरू हवा, हा अट्टहास मला चुकीचा वाटतो. आता मी सिने इंडस्ट्रीत काम करतो; पण म्हणून माझा गुरू याच क्षेत्रातला हवा असा विचार करणं न पटणारं आहे. माझे वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळे मार्गदर्शक, गुरू आहेत. माझे वडील माझे गुरू आहेत. ते जिद्दीने, कष्टाने खडतर आयुष्य जगले. त्यांच्या या प्रवासाने मला जिद्दीने जगायला शिकवलं. म्हणजे ते माझे गुरू झाले; पण ते सिनेसृष्टीतले नाहीत तरी माझे गुरूच आहेत. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, र. धों. कर्वे हेही माझे गुरू आहेत. त्यांनी मांडलेले विचार माझे गुरू आहेत. आंबेडकर, फुले यांनी सिनेमा केला नाही; पण तरीही ते माझे गुरू झाले ते त्यांच्या विचारांमुळे. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातला गुरू असला तर नक्कीच चांगलं, पण नसलाच तरी ते वाईटही नाहीच. जो माणसाला माणूस म्हणून जगवतो, हिणवत नाही, तो माझा गुरू. सिनेसृष्टीतले असे अनेक मार्गदर्शक आहेत जे प्रत्यक्ष न भेटताही बरंच काही सांगून जातात.
‘जे जे चांगलं ते घेत जावं’ या तुकारामांच्या सांगण्यावरून जे चांगलं दिसतं, ते मी आत्मसात करतो. या दृष्टीने मी बहुतेकांचा शिष्य आहे, तर दुसरीकडे गाडगे महाराजांचं ‘माझा कोणी शिष्य नाही, मी कोणाचा गुरू नाही’ हे सांगणंही योग्य वाटतं. कोण कधी काय शिकवून जाईल, हे सांगता येत नाही. एखादी व्यक्ती, घटना, कवितेची ओळ, पुस्तकातलं वाक्य, अशाही गोष्टी शिकवून जातं.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक गोष्टींपासून प्रेरणा मिळत असते. ती प्रेरणा म्हणजेही एक प्रकारचा गुरू आहे. मुळात, कोणी तरी आपलं गुरू असल्यापेक्षा आपण चांगलं शिष्य असावं.
शब्दांकन : चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com