25 February 2021

News Flash

परंपरा गुरूपौर्णिमेची

उच्चवर्णीयांपर्यंत मर्यादित असलेली गुरुपरंपरा दीक्षेच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचली. तिचा हा प्रवास कधी तत्त्वज्ञानाच्या तर कधी धर्माच्या अंगाने होत गेला.

| July 31, 2015 01:37 am

lp06उच्चवर्णीयांपर्यंत मर्यादित असलेली गुरुपरंपरा दीक्षेच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचली. तिचा हा प्रवास कधी तत्त्वज्ञानाच्या तर कधी धर्माच्या अंगाने होत गेला.
आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. आणि त्या दिवशी गुरुपरंपरा ‘सिध्यर्थ व्यास पुजां करिष्ये’ असा संकल्प करून धूत वस्त्रावर पूर्वेकडून पश्चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा १२ रेघा गंधाने काढतात. यालाच व्यासपीठ असे म्हणतात. भारतीय संस्कृती कोशात असे म्हटले आहे की ‘‘ब्रह्मा, परापर शक्ती (?), व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदस्वामी व शंकराचार्य यांचे व्यासपीठावर आवाहन करून संन्यासीजन पूजा करतात’’ संन्यासीजनांच्यासाठी शंकराचार्य हे गुरू व त्यापूर्वीचे व्यास हे आद्यगुरू आणि म्हणूनच आषाढी पौर्णिमेस ‘गुरुपौर्णिमा’ असेही म्हणतात. आपण पंचांग पाहिल्यास आषाढी पौर्णिमेला व्यासपूजा, गुरुपौर्णिमा अशा विवरणानंतर ‘संन्यासीनाम् चातुर्मास्यारंभा:’ असा उल्लेख येतो. याचा अर्थ, आषाढी पौर्णिमेपासून संन्यासीजनांचा चातुर्मास चालू होतो. पंचांगामध्ये अशा प्रकारे उल्लेख करण्याचे कारण असे असावे की महाराष्ट्रात वैष्णव व आध्यात्मिक परंपरेत किंवा वारकरी संप्रदायात चातुर्मास हा आषाढी शुक्ल एकादशीला सुरू होतो. तो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रबोधिनी एकादशीला पूर्ण होतो. भागवत धर्माची आणि त्या अनुषंगाने वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, आषाढ शुक्ल एकादशीला विष्णू शेषशयनावर निद्रा घेण्यास सुरुवात करतात. ते चार महिन्यांनंतर कार्तिक शुद्ध एकादशीला जागा होतात आणि म्हणूनच या एकादशींना अनुक्रमे शयनी आणि प्रबोधिनी अशी नावे आहेत.
संन्याशांचा चातुर्मास हा आषाढी पौर्णिमेला सुरू होत असला तरी तो संपतो मात्र भाद्रपद पौर्णिमेला. सारांश असा की आषाढी पौर्णिमेला संन्याशांचा चातुर्मास सुरू होत असल्यामुळे आणि संन्याशांचा आद्य आध्यात्मिक ग्रंथ बादरायण-सूत्रे व्यासांनीच रचला असल्यामुळे तसंच महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेचा लेखनरूपात त्यांनीच आविष्कार केलेला असल्यामुळे ते आध्यात्मिक परंपरेतील आद्यगुरू ठरावेत यात काहीच नवल नाही. आणि त्यामुळेच आषाढी पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा ही नावे पडलेली असावीत.
संन्यासीजनांचा आषाढ-भाद्रपदाशी जैन परंपरेमध्ये एका वेगळ्या अर्थाने संबंध येतो. जैन भिक्षूंनी वर्षांवास केव्हा सुरू करावा, उपाश्रय स्वीकारतानाचे निकष, दिनचर्या, त्यातील भिक्षाटन, इ. कार्ये पार पाडताना कुठली काळजी घ्यावी याची माहिती ४५ आगम ग्रंथांपैकी भद्रबाहूनी रचलेल्या कल्पसूत्र या आगम ग्रंथात येते. वर्षांकाल आषाढाच्या सुरुवातीपासून सुरू झालेला असला तरीही वर्षांवास भाद्रपद शुक्ल चतुर्थीपर्यंत तो लांबला तरीही हरकत नाही. परंतु काहीही झाले तरीही जैन संवत्सरी म्हणजे भाद्रपद शुक्ल पंचमी यानंतर त्यास काहीही सुरुवात करता कामा नये असे कल्पसूत्राचे रचनाकार ‘प्राचीन भद्रबाहू’ यांनी निक्षून सांगितले आहे. यामधल्या महिन्याच्या काळाची सवलत यासाठी दिली आहे की जो उपासक साधूंच्या राहण्याची आपल्या घरात सोय करतो, त्याला ते शाकारण्यासाठी, उपाश्रय म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने साफसफाईसाठी तो काळ द्यावा अशी भगवान महावीरांची इच्छा होती. भाद्रपद पंचमीच्या अगोदर कल्पसूत्राचे समारंभपूर्वक जाहीर वाचन जैन मुनींच्या मार्फत केले जाते. या काळाला आजही ‘पज्जूसन’ म्हणजे ‘पर्युषण पर्व’ असेच म्हटले जाते. पर्युषण पर्वाच्या शेवटी म्हणजे कल्पसूत्राचे पूर्ण वाचन झाल्यानंतर भाविक जैन ‘मिच्छामी दुख:डम’ अशा वाक्यांनी एकमेकांची क्षमा मागतात. त्या पाठीमागची कल्पना अशी की जैन मुनी आणि उपासक हे चातुर्मासामध्ये एकमेकांच्या सहवासात अधिक काळ असतात. त्या वेळी साधू आणि यजमान उपासक जे त्यांच्या राहण्याची तसेच भिक्षा देऊन भोजनाची व्यवस्था करतात, त्यात काही आचाराचे उल्लंघन झाल्यास त्यासाठी ‘क्षमा असावी’ अशी भावना या प्रार्थनेत सामावलेली आहे.
या संदर्भात असे लक्षात ठेवले पाहिजे की कल्पसूत्रांव्यतिरिक्त इतर कोणत्याही आगम ग्रंथाचे जाहीर वाचन केले जात नाही. कल्पसूत्रात एकूण तीन भाग आहेत. १. जीनचरित २. साधूसामायारी ३. गुरुवावली. त्यापैकी साधूसामायारीमध्ये जैन मुनींचा आदर्श आचार (सम्यक आचार = सामायारी) काय असावा याचे विवरण आलेले आहे. हा आचार कसा असावा याचे सगळ्यात शेवटी विवरण र्तीथकरांपैकी २४ वे महावीर यांनी आपल्या गौतम व जम्बूस्वामी या शिष्यांना दिले. ज्यांच्यापासून परंपरेने ते भद्रबाहू प्रथम यांच्याकडे आले. हे मौखिक परंपरेने प्राप्त झालेले ज्ञान सूत्ररूपाने भद्रबाहूंनी मांडले. अशा रीतीने भद्रबाहू पहिले र्तीथकर ॠषभनाथ यांच्याशी आध्यात्मिक परंपरेने जोडलेले असल्यामुळे २४ र्तीथकरांची परंपरा सांगण्यासाठी ‘जीनचरित’ नावाचा भाग सामायारीच्या अगोदर निवेदित केला आहे. श्वेतांबर परंपरेप्रमाणे भगवान महावीरांनी प्रत्यक्ष सांगितलेल्या १२ अंग ग्रंथापैकी ‘१४ पूर्वे’ वर्णिलेला १२ वा दृष्टिपाद नावाचा अंगग्रंथ लोप पावला. नंतरच्या काळात म्हणजे इ.स. पहिल्या-दुसऱ्या शतकाच्या सुमारास जैन परंपरेमध्ये मतभेद होऊन दिगंबर आणि श्वेतांबर असे दोन प्रमुख पंथ निर्माण झाले. पैकी दिगंबरांच्या मते १२ वा अंगग्रंथच नाही तर सर्व अंगग्रंथ हे मौखिक परंपरेतून नष्ट झालेले आहेत. श्वेतांबरांच्या परंपरेनुसार ११ अंगग्रंथांव्यतिरिक्त आणखी ३४ ग्रंथांना आगम म्हणून मान्यता असल्याने सर्व ४५ आगम ग्रंथांना देवद्धीगणी क्षमाश्रमण यांनी संहितेचे रूप दिले. यांचा काळ महावीर निर्वाणानंतर ९८० वर्षे (म्हणजे इ.स. ४५३ वे वर्ष) असा होता. कल्पसूत्राच्या तिसऱ्या भागात म्हणजे गुरुवावलीमध्ये महावीरांपासून ते देवद्धीगणी क्षमाश्रमण यांच्यापर्यंत परंपरेने कुठले आचार्य, गणी झाले यांची यादी दिली आहे. सारांशरूपाने असे म्हणता येईल की ज्याप्रमाणे वैदिक संन्यासी आषाढी पौर्णिमेला व्यास गुरूंच्यापासून शंकराचार्यापर्यंतच्या गुरूंची पूजा व स्मरण करतात त्याचप्रमाणे भाद्रपद पंचमीला जैन संवत्सरीच्या दिवशी चातुर्मास्याची सुरुवात करताना जैन साधूसुद्धा ॠषभदेवापासून महावीरापर्यंत २४ र्तीथकरांचे व भगवान महावीरापासून आगम संहिता पूर्ण करणाऱ्या देवद्धीगणींचे स्मरण करून आपल्या चातुर्मासाला सुरुवात करतात.
या संबंधात हेही नोंद करण्यासारखे आहे की भाद्रपद शुक्ल पंचमी ही वैदिक स्मार्त पंरपेत ॠषी पंचमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी सर्व गृहस्थजन म्हणजे वैदिक धर्माचे अनुयायी, व्यास हे वेदांचे संहिताकार असल्यामुळे त्यांच्यापासून पुढील सर्व सुमतू, जैमिनी, वैशंपायन, इत्यादी व्यास शिष्यांच्या नंतर सूत्र आणि भाष्यकारांचे स्मरण करून उदक सोडून त्यांचे तर्पण (ॠषीतर्पण) करतात. एका अर्थाने असे म्हणता येईल की व्यास पौर्णिमा जैन संवत्सरी व ॠषीपंचमी ही सर्व व्रते चातुर्मासाच्या आरंभी आपल्या गुरुपरंपरेचे स्मरण करून त्या गुरूंचे पूजन करावे अशी भावना व्यक्त करतात.
बौद्ध पंरपरेमध्येसुद्धा वर्षांवास म्हणजे ज्याला आपण चातुर्मास असा सर्वसामान्यपणे उल्लेख करतो त्या विषयीच्या परंपरा आहेत. वर्षांचे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ॠतूंच्या अनुरूप चार महिन्यांचे (चातुर्मास) तीन विभाग कल्पिले असले तरीही चार ॠतू असण्याचीसुद्धा बौद्ध परंपरा भगवान बुद्धापासून होते असे फाहीयान या भारतात यात्रेसाठी व ज्ञानाजर्नासाठी आलेल्या बौद्ध भिक्षूने आपल्या प्रवासवर्णनात म्हटले आहे. त्याच्या मते चैत्र ते ज्येष्ठ हा मवाळ उन्हाळा (वसंत), आषाढ, श्रावण, भाद्रपद हा प्रखर उन्हाळा (ग्रीष्म), अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष हा शरद ॠतू, व पौष, माघ आणि फाल्गून हा हिवाळा (हेमंत) असे ते होत. त्याचबरोबर तो सहा भारतीय ॠतूंचेही वर्णन करतो. ते नेहमीच वसंत, ग्रीष्म, वर्षां, शरद, शिशीर आणि हेमंत असे आहेत. चार ॠतूंच्या संकल्पनेत वर्षां ॠतूचा समावेश नसल्याने त्यातील श्रावण आणि भाद्रपद हे मास ग्रीष्म ॠतूत समाविष्ट झाले तरी, तीन महिन्यांचा वर्षांवास हा श्रावण शुद्ध प्रतिपदेला किंवा भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू करावा असे म्हटले आहे. जैन व हिंदू परंपरेप्रमाणे वर्षांवास सुरू करण्याचा दिवस हा वद्य प्रतिपदेस न सुरू होता, शुद्ध प्रतिपदेस सुरू होऊन अमावास्येला संपत असे. त्यामुळे वर्षांवासाच्या शेवटी भिक्षूंचा सत्कार करून भेटीदाखल वस्तू देण्याचा समारंभ मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षात होतो. ही परंपरा निश्चितच प्राचीन होती हे दख्खनमधील गुंफांमध्ये आढळणाऱ्या अभिलेखावरूनही लक्षात येते.
गुरुपैर्णिमेला संन्यासीजनांच्या व्यतिरिक्त गृहस्थाश्रमी व सामान्य हिंदूू परिवारात काही विशिष्ट अर्थ आहे. व्यास पौर्णिमेचा दिवस गुरूंच्या आदरसत्काराचा पर्यायाने पूजनाचा दिवस म्हणून आजही साजरा केला जातो. हिंदू समाजात दुसरे गुरुपौर्णिमेचे महत्त्व म्हणजे विष्णूचा अवतार असलेले दत्तात्रेय किंवा ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा एकत्रित अवतार असलेले अनसूयासुत दत्त हे दत्तगुरू म्हणून ओळखले जातात. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने व अनेक संप्रदायांत दत्तांचा आध्यात्मिक गुरू म्हणून आदराने समावेश असल्याने या दिवशी दत्तपूजन करण्याची प्रथा केव्हातरी मध्ययुगात निर्माण झाली. आजही ती टिकून आहे, एवढेच नाही तर अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.
वैदिक परंपरेप्रमाणे जोपर्यंत कुठल्याही बालकाची विद्याध्ययनास सुरुवात होत नाही तोपर्यंत त्याच्या खऱ्या आयुष्यास सुरुवात होत नाही. एखादे बालक आठ वर्षांचे होत नाही तोपर्यंत त्याची विधीपूर्व अथवा प्रत्यक्ष (औपचारिक) शिक्षणाची सुरुवात होत नाही. त्यासाठी केल्या जाणाऱ्या विधीलाच उपनयन संस्कार असे म्हणतात. उपनयन संस्काराला समांतर असलेले दीक्षेचे संस्कार आदिवासी समाजातसुद्धा प्रचलित असतात. या उपनयन-समावर्तन अथवा दीक्षा संस्कारनंतरच तो किंवा ती तरुण व्यक्ती समाजघटक म्हणून मान्यता पावते. वैदिक परंपरेप्रमाणे जन्मदाते आई-बाप आणि विद्यादाते उपाध्याय किंवा आचार्य या सर्वाचा उल्लेख गुरू या शब्दानेच केला जातो. कारण हे तिघेही त्या बालकास जन्म देऊन नव्या आयुष्याची सुरुवात करून देतात. स्मृती ग्रंथात असे म्हटले आहे की जन्मदात्या आई-बापांच्या मनात जन्म देण्याच्या अगोदर कामभावना असते. म्हणून त्या मुलाचा / मुलीचा जन्म होतो. परंतु शिक्षक किंवा आचार्य तो विद्यासंपन्न व्हावा म्हणून त्याला संस्कारामार्फत दुसरा जन्म देतात. आणि म्हणून शिक्षण किंवा आचार्य हे आई-वडिलांपेक्षा ‘गुरू’ या पदवीस जास्त पात्र आहेत. आणि याच भावनेतून प्रत्येक विद्यार्थी आपल्या गुरूला अभिवादन करतो. त्याचा आदर-सत्कार करतो. तो व्यास पौर्णिमेच्या म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी.
वैदिक धर्माला उत्तर उपनिषदांच्या काळामध्ये शैव, वैष्णव इ. आगमांच्या रूपाने एक वेगळीच कलाटणी मिळाली. वेदांचे अथवा वैदिक परंपरांचे यज्ञयागादी स्वरूप, महत्त्व पूर्णपणे न डावलता, विष्णू, शीव अथवा शक्तीरूप आदितत्त्वांशी एकरूप कसे व्हायचे याविषयीची एक नवी अवैदिक परंपरा सुरू झाली. त्या त्या परंपरेमध्ये शीव, विष्णू, शक्ती, अदित्य सूर्य अथवा गणपती किंवा त्याचे उपासक ॠषी जे शूक, लकुलीश, मरकडेय, गणक इ. आहेत, त्यांच्या मुखातून या ब्रह्म स्वरूप असलेल्या देवतेची उपासना कशी करावी आणि मोक्ष कसा मिळवावा या विषयीचे त्या त्या शैव-वैष्णवादी आगमातून वर्णन केलेले आढळते. त्यामुळे उपनयन झाले असो किंवा नसो, वेदाध्ययन झाले असो किंवा नसो, त्या व्यक्तीला त्या त्या आगम परंपरेप्रमाणे आचार्याकडून दिक्षा घ्यावी लागते. ही दीक्षा ज्याप्रमाणे बौद्ध धर्मानुयायी बुद्ध, धर्म आणि संघ यांना शरण जाऊन व्यक्त करतो त्याचप्रमाणे विष्णू, शिव इ. देवतांना अनन्यभावाने शरण जाण्याची भावना या दीक्षा विधीतून व्यक्त केलेली असते. ही दीक्षा पूर्ण झाल्याशिवाय त्या त्या संप्रदायामध्ये एक घटक म्हणून त्याचा समावेश होऊ शकत नाही. ज्या प्रकारचे महत्त्व वैदिक परंपरेमध्ये उपनयन विधीला होते तशाच प्रकारचे महत्त्व या आगम परंपरेतील वैष्णव, शैव, शाक्त, सौर्य व गाणपत्य संप्रदायातसुद्धा होते. अशा प्रकारचा त्या त्या संप्रदायाचा घटक हा गुरूने दीक्षा दिल्यानंतरच सदस्य बनू शकत असल्याने आगमाच्या आध्यात्मिक परंपरेत गुरूला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. बौद्ध परंपरेतील त्यासारखे उदाहरण द्यावयाचे झाल्यास, ज्या प्रकारचे महत्त्व बुद्धाखालोखाल अवलोकितेश्वर, इ. आठ बोधिसत्त्वांना होते असे म्हणता येईल.
आगमाचीच पुढली विकसित पायरी म्हणजे तंत्रमार्ग असे म्हणता येईल. हिंदू धर्मामध्ये अशा पाच आगम परंपरा आहेत. त्याचप्रमाणे शैव, शाक्त, गाणपत्य, इ. तांत्रिक परंपरासुद्धा आहेत. आगमामध्ये जेव्हा मंत्रतंत्राला जास्त प्राधान्य येऊन जारण-मारण-उच्चाटन-वशीकरण व सिद्धी यांना जास्त महत्त्व आले त्या वेळी ती तंत्ररूपात विकसित झाली असे स्थूलपणे म्हणावयास हरकत नाही. तंत्र परंपरेत सर्वात महत्त्वाची धारणा अशी की देवता- मंत्र आणि गुरू (दीक्षा गुरू) हे सर्व एकच होय. वेगळ्या शब्दात देवता ही जशी मंत्ररूपाने प्रकट होते, यंत्ररूपाने तिचा दृश्य आविष्कार होतो, तसेच ती गुरूरूपानेही अस्तित्वात असते. वेगळ्या शब्दात तंत्रमार्गातील साधकाला किंवा साधिकेला गुरूरूपाने प्रकट झालेल्या देवतेने जोपर्यंत दीक्षा दिली नाही व गहन आध्यात्मिक मार्गात मार्गदर्शन केले नाही तोपर्यंत त्याला/तिला सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. अशा रीतीने गुरू हे तंत्रमार्गातील मोठेच प्रस्थ झाले.
गुरूशिवाय सिद्धी प्राप्त होत नसल्याने वेगळ्या शब्दात परमसाध्य ब्रह्मस्वरूप असलेल्या व अज्ञेय असलेल्या देवतेचे स्वरूप नीट कळणार नसल्याने व तिच्यापर्यंत जाणाऱ्या मार्गामध्ये गुरूचा आशीर्वाद असल्याशिवाय तिच्यापर्यंत पोहोचता येत नसल्याने, अलंकारिक रीतीने देवतेपेक्षाही गुरूला जास्त महत्त्व प्राप्त झाले. अशीच काहीशी भावना संत कबीर यांनी आपल्या प्रसिद्ध दोह्य़ामध्ये प्रकट केली आहे. ते म्हणतात की गुरू आणि देवता एकाच वेळी समोर आल्यास कोणास प्रथम वंदन करावे? भोळेपणाने एखादा साधक असा म्हणेल की देवताच मोठी. त्यामुळे तिला प्रथम वंदन करावे. परंतु कबिराच्या मनात असे आहे की देवता मोठी यात शंकाच नाही. परंतु तिच्यापर्यंत पोहोचायचा मार्ग गुरूच दाखवतात आणि म्हणून ते असे म्हणतात की मी प्रथम गुरूला वंदन करतो आणि मग परमेश्वराला.
मध्ययुगांमध्ये पातंजल योगाचे हठयोगात रूपांतर झाले, मंत्र, तंत्र आणि सिद्धी यांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले. मंत्र आणि तंत्रातून अमानुष आणि दैवी अचाट शक्तींचा मोठा गवगवा झाला. त्या वेळी गुरुप्रतिमेस गूढ अध्यात्माच्या विश्वात व सामान्यजनांच्या भक्ती संप्रदायात गुरू या पदवीस पात्र होणारी जर कुठली अलौकिक व्यक्ती वाटली असेल तर ती गुरू दत्तात्रेय ही होय. आणि त्यामुळेच भक्ती मार्गातल्या भक्तांना तारण देणारा किंवा गूढ विद्यांच्या साधनेत प्रसन्न होऊन मार्ग दाखवणारा एवढेच काय महानुभावांसारख्या अवैदिक संप्रदायातसुद्धा व आजच्या साई परंपरेतसुद्धा दत्तात्रेयाला एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरू दत्तात्रेयाच्या पूजनाची परंपरासुद्धा बरीच लोकप्रिय झाली आहे. मात्र दत्तात्रेय संप्रदायातील साधक उपासक फाल्गुन कृष्ण प्रतिपदेस गुरू प्रतिपदा म्हणतात आणि गाणगापूरला या दिवशी दत्तात्रय पूजा म्हणजे गुरुपूजन करायची प्रथा आहे. शीख संप्रदायात नानक हेसुद्धा गुरू असल्यामुळे कार्तिक महिन्याच्या पर्व काळात ग्रंथसाहेबाची मिरवणूक काढून गुरू परब (गुरुपर्व) साजरे केले जाते. भगवद् शंकराचार्याच्या परंपरेत ज्याप्रमाणे गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमेस साजरी केली जाते त्याचप्रमाणे शृंगेरी आदी ठिकाणी ज्येष्ठ पौर्णिमेस ही व्यासपूजा केली जाते.
डॉ. अरविंद जामखेडकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:37 am

Web Title: guru paurnima special 2
Next Stories
1 आधुनिक गुरू अर्थात मेंटॉर
2 मल्टी गुरूंची शिकवणी
3 ‘शिष्य’देखील तितकेच महत्त्वाचे! पद्मश्री प्रताप पवार – कथक नृत्य कलाकार
Just Now!
X