lp06प्रख्यात शास्त्रीय गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांची शिष्या आणि नात तेजश्री आमोणकर हिने गुरू, आजी आणि शिष्या हे नाते उलगडण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून केला आहे.

गुरू या नात्याने तुला गानसरस्वती किशोरीताईंबद्दल काय वाटते?
एक गुरू म्हणून आजीबद्दल शब्दात सांगणे खरेच कठीण आहे. कारण आजीने मला फक्त गाणे कधीच शिकवले नाही. गाण्यासोबत आजीने मला कलाकार म्हणूनदेखील घडवले. माझी विचारसरणी समृद्ध करत माणूस म्हणून जगायला शिकवले. केवळ गाण्याच्या खोलीत माझी जडणघडण होते असे नाही. तर आजीच्या lp30सहवासात असताना मी पावलोपावली आयुष्य जगणे शिकत असते.
आजी आणि नातवंडे एक वेगळे नाते असते, तुझ्या आणि गानसरस्वती किशोरीताईंच्या या नात्याबद्दल काय सांगशील? रियाज करताना किशोरीताईंमध्ये आजीचे प्रेम जाणवते का?
आजीत आणि माझ्यात आजी आणि नात या नात्यापेक्षा मैत्रिणीचे नाते जास्त आहे. एखादी गोष्ट तिला जेव्हा पटत नाही तेव्हा ती त्याबद्दल स्पष्टपणे सांगते. पण नव्या पिढीचे विचारही तिला खूपदा पटतात. गुरू म्हणून आपली जबाबदारी सांभाळताना तिने आजी या नात्यानेही आम्हा नातवंडांवर खूप प्रेम केले आहे. आजी आणि नात म्हणून आम्ही जेव्हा जेव्हा गप्पा मारतो तेव्हा आमच्या गप्पा आपोआपच गाण्याकडे वळतात. रियाजाच्या बाबतीत बोलायचे झाले तर रियाजाला असताना माझ्यासमोर आजी फक्त माझी गुरू असते. मलाही इतर शिष्यांसारखीच वागणूक मिळत असते. याबाबतीत तिच्याकडून कधीच भेदभाव होत नाही. सगळ्यांना समान संधी मिळते. त्यामुळे रियाज करताना किंवा गाणे शिकताना आजी आणि नात हे नाते कधीच आड येत नाही.
तुझ्यामध्ये गाण्याची आवड कधीपासून निर्माण झाली आणि गानसरस्वती किशोरीताई गुरू असतील हे कसे ठरले?
मी लहान असतानाच आजीच्या गुरू मोगुबाई कुर्डीकर यांनी या मुलीला गाणे शिकवा असे सांगितले होते. मुळात घरात संगीताचे वातावरण असल्याने लहानपणापासून माझ्या कानावर गाण्याचे संस्कार होत आले. आम्ही तीन नातवंडे, पण आम्हाला गाणे शिकण्यासाठी घरून किंवा आजीकडून कधीच दडपण नव्हते. दररोज घरात कोण ना कोण गात असलेले आम्ही पाहात आणि ऐकत आलो आहोत. त्यामुळे लहानपणीच नकळत आमच्यात गाण्याची आवड निर्माण झाली आणि घरात आजीसारखे व्यक्तिमत्त्व असताना तीच गुरू असणे हे साहजिकच होते.
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर या संगीत क्षेत्रात त्यांच्या करडय़ा शिस्तीसाठीही ओळखल्या जातात. रियाजाला असताना त्या कोणती गोष्ट कटाक्षाने पाळतात?
रियाज करत असताना एखादी चूक होत असेल तर ती सुधारल्याशिवाय आजी कधीच पुढे जात नाही. आजीनेही रियाज अशाच प्रकारे केला आहे, त्यामुळे तिच्या शिष्यांनाही ती तसेच घडवते. बऱ्याचदा शिष्य आपल्याला हे जमणार नाही असे म्हणत हार मानतात, पण आजी त्यांना पुन्हा पुन्हा शिकवते. ती कधीच थकत नाही.
एक गुरू या नात्याने तुला गानसरस्वती किशोरीताई नेहमी काय सल्ला देतात?
आजीने खूप वर्षांपूर्वी सांगितलेली एक गोष्ट माझ्या कायम स्मरणात आहे. ती एकदा म्हणाली होती, जितकं प्रेम तू सुरांवर करशील त्याच पटीने किंबहुना त्यापेक्षा जास्त पटीत सूर तुला प्रेम देतील. आपण या जगातून जाऊ तेव्हा सूरच आपल्या सोबत असतील. आजीच्या या उपदेशाने माझा दृष्टिकोन बदलला आणि मी स्वत:ला संगीतासाठी झोकून दिले. आजीने दिलेला हा सल्ला माझ्या आयुष्यभर आठवणीत राहणारा आहे.
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर हे संगीत क्षेत्रातले खूप मोठे नाव आहे. रियाज करताना किंवा कार्यक्रमात त्या समोर असल्यावर या गोष्टीचे दडपण वाटते का?
आजीचे दडपण वाटण्यापेक्षा एक जबाबदारी वाटते. आजीमध्ये हे कसबच आहे की तिला बघितल्यावर आपसूकच आपल्यात गांभीर्य येते. भीती असते पण ती आदरयुक्त भीती असते आणि प्रत्येक शिष्यामध्ये आपल्या गुरूबद्दल ही भावना असायलाच हवी.
मला माझ्या कार्यक्रमांना आजी तिथे असायलाच हवी असते. ती नसेल तर कदाचित मी दडपणाशिवाय गाणे सादर करेन पण तिच्यासारखी माझ्या गाण्याची परीक्षा कुणीच करू शकणार नाही. आपले गुरू आपल्या गाण्याबद्दल खूप विचार करत असतात. माझ्या कार्यक्रमानंतर आमची गाण्यावर चर्चा होते त्यामुळे मला माझ्या गाण्यात प्रगती करण्यासाठी अजून वाव मिळतो. आणि म्हणून आजी कार्यक्रमाला असली की मला दडपण न जाणवता एक दिलासा मिळतो.
मुलाखत : किन्नरी जाधव – response.lokprabha@expressindia.com
(ही मुलाखत ‘लोकसत्ता शागीर्द’ या पृथ्वी एडिफिस प्रायोजित कार्यक्रमादरम्यान घेण्यात आली.)